इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

मंगळवार, ३१ जानेवारी, २०१२

हातकणंगले तालुका हद्दीत प्रवेश करण्यास तेवीस जणांना मनाई आदेश

         कोल्हापूर दि. ३१ : हातकणंगले तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक चालू असल्याने या कालावधीत गंभीर स्वरुपाचा गुन्हा होऊन सार्वजनिक शांतता भंग होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून फौजदारी संहिता कलम १४४ (२) नुसार हातकणंगले तालुक्याचे कार्यकारी दंडाधिकारी समीर शिंगटे यांनी तेवीस जणांना हातकणंगले तालुक्याच्या हद्दीत  दि. १ फेब्रुवारी पासून ते दि. ९ फेब्रुवारी २०१२ पर्यंत प्रवेश करण्यास मनाई केली आहे. तथापि ७ फेब्रुवारी २०१२ रोजी मतदान असल्याने या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्याकरिता या तेवीस जणांना हातकणंगले तालुक्याच्या हद्दीत प्रवेश करण्यास परवानगी देण्यात येत आहे.
      हातकणंगले तालुका हद्दीत प्रवेश करण्यास मनाई करण्यात आलेल्या दखलपात्र गुन्हे दाखल असलेल्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. सुरेश दत्तू हणबर, तुकाराम सुरेश हणबर, शितल सुरेश हणबर, जयसिल सुरेश हणबर, बाळासाहेब उर्फ रायबा नानासो बागल, कुलदिप रायबा बागल, राजाराम आण्णासो सलगर, सुनिल दत्ता वाडकर, जयदिप शेलार बागल, राहूल आनंदा वाडकर, अनिल आदगोंडा पाटील, उत्तम राजाराम कागले, दत्तू आदगोंडा पाटील, गणपतराव दौलतराव बागल, सागर आप्पासाो माकणे, संदिप आप्पासाो माकणे, चंद्गकांत बाबू आंबाडे, कल्लप्पा बाळागोंडा पाटील, अमित उर्फ पिंट्या एकांडे, सुजित अशोक एकांडे, गजानन तुकाराम रेंदाळे, किशोर शिवाजी देसाई, महादेव हरी पाटील,

सोमवार, ३० जानेवारी, २०१२

अनधिकृत उच्च माध्यमिक शाळेत प्रवेश घेतल्यास पालक व विद्यार्थी जबाबदार राहतील

कोल्हापूर दि. ३० : कोल्हापूर जिल्ह्यात खालील अनधिकृत उच्च माध्यमिक शाळा सन २०११-१२ मध्ये सुरु असून अशा शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नये, तसेच पालकांनीही विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करु नये. अनधिकृत उच्च माध्यमिक शाळांमध्ये प्रवेश घेतल्यास होणार्‍या शैक्षणिक नुकसानीस संबंधित पालक व विद्यार्थी जबाबदार राहतील, त्यास माध्यमिक शिक्षण विभाग अथवा शासन जबाबदार राहणार नाही.
           कोल्हापूर जिल्ह्यातील सन २०११-१२ मधील अनधिकृत उच्च माध्यमिक शाळा पुढीलप्रमाणे आहेत. शिवाजी हायस्कूल व भालचंद्ग कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय, महागांव, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर इयत्ता ११ वी आणि दत्तसेवा विद्यालय, तुरुकवाडी, ता. शाहुवाडी, जि. कोल्हापूर इयत्ता ११ वी.
      अनधिकृत उच्च माध्यमिक शाळांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना नजिकच्या मान्यता प्राप्त उच्च माध्यमिक शाळांतून इयत्ता बारावीचे परीक्षा फॉर्म भरता येणार नाहीत. सन २०११-१२ मध्ये अनधिकृत उच्च माध्यमिक शाळा सुरु केल्यास अशा संस्था चालकांच्या विरुध्द भारतीय दंड संहिता ४२० किंवा ४०६ किंवा ३४ ब अन्वये फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, याची संबंधितांनी नोंद घ्यावी असे कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांनी प्रसिध्द पत्रकाद्वारे कळविले आहे.

एसएसबी प्रशिक्षण वर्गासाठी कोल्हापुरात १० फेब्रुवारीला मुलाखत

कोल्हापूर दि. ३० : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलात अधिकारी होण्यासाठी पात्र उमेदवारांना एसएसबी प्रशिक्षण वर्गांचे आयोजन करण्यात आले आहे. सैन्य दलातील तज्ञ अधिकार्‍यांकडून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या व स्पेशल एन्ट्रीद्वारे सैन्यदलात अधिकारी होऊ इच्छिणार्‍या तसेच ज्या महाराष्ट्रीयन नवयुवक/युवतींना सशस्त्र सैन्यदलाकडून एसएसबी परिक्षेची मुलाखत पत्रे मिळण्याची शाश्वती आहे अशा उमेदवारांना एसएसबी मुलाखतीच्या पूर्व तयारीसाठी महाराष्ट्र शासनामार्फत छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्ग, विभागीय महसूल आयुक्त कार्यालय परिसर, नाशिक रोड येथे प्रत्येकी १० दिवसांचे दोन प्रशिक्षण वर्ग चालविण्यात येणार आहेत. प्रशिक्षण कोर्सचा कालावधी १५ फेब्रुवारी २०१२ ते २४ फेब्रुवारी २०१२, आणि १३ मार्च २०१२ ते २२ मार्च २०१२ असा आहे. प्रशिक्षण कालावधीत निवासाची व प्रशिक्षणाची सोय विनामूल्य करण्यात आलेली असून भोजनासाठी प्रती दिवस रु १९ प्रमाणे अतिरिक्त शुल्क आकारण्यात येईल.
          इच्छुक व पात्र उमेदवारांनी प्रशिक्षण वर्गात प्रवेश घेण्यासाठी दि. १० फेब्रुवारी २०१२ रोजी सकाळी १० वाजता सैनिकी मुलांचे वसतिगृह, कोल्हापूर (दूरध्वनी क्र. २६६५८१२) येथे पात्रताधारक उमेदवारांनी शैक्षणिक प्रमाणपत्र व गुणपत्रिकेच्या मूळ प्रतीसह मुलाखतीस उपस्थित रहावे. एसएसबी प्रवेश वर्गासाठी पुढीलप्रमाणे कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे. एसएसबी मुलाखतीचे पत्र प्राप्त झाले असल्यास किंवा सीडीएस लेखी परीक्षेत उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र किंवा स्पेशल एंट्रीव्दारे एसएसबीकरिता अर्ज पाठविलेबाबतचा पुरावा आणावा. एनसीसी (सी) सर्टिफिकेट अे/बी ग्रेडधारक, एनडीएमधील परीक्षा उत्तीर्ण असल्याचा पुरावा आणावा. सैन्यदलामध्ये अधिकारी पदासाठी रोजगार समाचार पत्रानुसार टेक्निकल/मेडिकल किंवा इतर अधिकारी पदासाठी अर्ज केले असल्यास अर्जाची छायांकित प्रत सोबत आणावी. इच्छुकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन कोल्हापूरचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल सुहास नाईक यांनी केले आहे.

सोल्जर टेक्नीकल पदासाठी बीडमध्ये सैन्य भरती

       कोल्हापूर दि. ३० : सोल्जर टेक्नीकल पदासाठी पोलीस ट्रेनिंग ग्राऊंड, बीड येथे दि. १३ फेब्रुवारी २०१२ रोजी पहाटे ५-३० वाजता लातूर, उस्मानाबाद, बीड, अहमदनगर आणि पुणे जिल्हे सोडून सैन्य भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
      आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे- शैक्षणिक प्रमाणपत्र (बोर्ड सर्टिफिकेट आणि मार्कशीट), तहसिलदार/प्रांत/जिल्हाधिकारीयांच्या सही शिक्क्यासह अधिवासी प्रमाणपत्र, सरपंच, एसएचओ, पोलीस स्टेशन, जेथे शिक्षण घेत असेल त्या शाळा / कॉलेजचे प्राचार्य यांचे सहा महिन्याच्या आतील चारित्र्याचा दाखला असावा. १० रंगीत पासपोर्ट साईज छायाचित्रे, संगणकावर काढलेली छायाचित्रे चालणार नाहीत. प्रांत/उपजिल्हाधिकारी व जिल्हाधिकारी यांच्या सही शिक्क्यासह जातीचा दाखला, आवश्यक असेल त्यांना मृत्यूचा दाखला. २१ वर्षाखालील उमेदवारांसाठी दहा रुपयांच्या स्टँप पेपरवर सरपंच किंवा नोटरी यांच्या सही शिक्क्यासह अविवाहीत असल्याबाबतचा दाखला.
      इच्छुक उमेदवारांनी पोलीस ट्रेनिंग ग्राऊंड, बीड येथे भरतीसाठी वेळेत उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, कोल्हापूर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

शनिवार, २८ जानेवारी, २०१२

माहिती तंत्रज्ञान, वैकल्पिक विवाद निवारण व्यवस्थेच्या उपयोगातून प्रलंबित प्रकरणाची संख्या ४४ लाखावरुन ३५ लाखावर आली -- न्यायमूर्ती आर. सी. चव्हाण

       कोल्हापूर दि. २८ : माहिती तंत्रज्ञानाचा, वैकल्पिक विवाद निवारण व्यवस्थेचा उपयोग करुन आणि महात्मा गांधी तंटामुक्तीचे माध्यमातूनही न्याय व्यवस्थेवरचा भार कमी करण्याचे नियोजनबध्द प्रयत्न मुंबई उच्च न्यायालयाने मुख्य न्यायमुर्तींच्या निर्देशाने चालवले असून ह्या प्रयत्नामुळे महाराष्ट्रातील विविध न्यायालयांतील प्रलंबित प्रकरणांची संख्या गेल्या दीड वर्षात ४४ लाखावरुन ३५ लाखावर आली असल्याची माहिती मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती आर. सी. चव्हाण यांनी आज गडहिंग्लज येथे  दिली.
      गडहिंग्लज येथील जिल्हा न्यायाधीश - १, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर आणि सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर न्यायालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन व  कोनशिला अनावरण समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. चव्हाण बोलत होते.
      न्याय व्यवस्थेसाठी पर्याप्त पायाभूत सुविधा नसल्याने न्यायदानात येणार्‍या अडचणी व पर्यायाने होणारा विलंब हा भारताच्या सरन्यायाधीशांसाठी चिंतेचा विषय होता. सरन्यायाधीश स्वतः दर सोमवारी एकेका राज्यातील सुविधांचा, त्रुटींचा, झालेल्या प्रगतीचा आढावा घेतात व केंद्ग व राज्य सरकारे तसेच उच्च न्यायालयांना योग्य निर्देश देतात असे सांगून आर. सी. चव्हाण म्हणाले, त्यामुळे गेल्या दीड वर्षात महाराष्ट्रात किमान शंभर ठिकाणी एकतर नवी न्यायालये स्थापन झालीत, नव्या इमारती उभ्या झाल्या असून पन्नास गावांमध्ये नव्या इमारतींचे काम प्रगतीपथावर आहे.
      आजही न्यायासाठीची प्रतिक्षा निराश करणारी आहे असे सांगून श्री. चव्हाण म्हणाले, न्यायालयात गेल्यावर आपल्या प्रकरणाचा केव्हा निकाल लागेल व अन्याय प्रत्यक्षात केंव्हा दूर होईल ह्यासाठी पक्षकाराला जोतिष्यांची मदत घ्यावी लागते आहे. हे विदारक चित्र बदलण्यासाठी प्रकरण दाखल होताच त्याच्या निपटर्‍याचा कालबध्द कार्यक्रम पक्षकाराला मिळावा व त्या वेळापत्रकाप्रमाणे ह्या व्यवस्थेचा सर्व घटकांनी न्यायाधीश-वकील-पोलीस-सरकारी यंत्रणेनी विविध टप्पे गाठावयाचा प्रयत्न करावयाचा आहे. विधी व्यवसायासमोरचे हे सर्वात मोठे आव्हान असल्याचे सांगून श्री. चव्हाण म्हणाले, पुरेशा सुविधा नाहीत ह्या सबबीखाली आतापर्यंत विधी व्यवस्थेने नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत. पण आता ही सबब उपलब्ध नसणार आहे. त्यामुळे नागरिकांना विवाद निवारण्याचा कालबध्द कार्यक्रम देण्याचा विचार सर्वांना करावा लागेल. न्यायालयासमोर येणारे काही अन्यायी पक्षकार व त्याला तो अन्याय सुरु ठेवण्यासाठी मदत करणारे काही थोडे अपवादात्मक विधी व्यावसायिक ह्या दोघांनाही भूमिकेत बदल करावा लागेल. त्यासाठी सूज्ञ विधीज्ञांनी अशा प्रवृत्तींना व व्यक्तींना बदलण्यास भाग पाडायला हवे, तरच विधी व्यवस्थेकडे नागरिक पुन्हा धाव घेतील.
      जिल्हा व सत्र न्यायाधीश वि. रा. लोंढे अध्यक्षीय भाषणात म्हणाले, न्यायालय इमारतीसाठी ७ कोटी ३३ लाख रुपयांचा खर्च येणार असून इमारतीमध्ये पाच न्यायालयांचे काम चालणार आहे. नवीन इमारतीमध्ये पक्षकारांसाठी पुरेशा सुविधा पुरविण्यात येतील. न्यायाधीशांसाठी पाच घरकुले बांधली जाणार असल्याचे सांगून न्यायालयीन प्रक्रिया कशी गतीमान होईल याकडे सर्वांनी लक्ष द्यावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
      प्रारंभी न्यायमुती आर. सी. चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन व कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. दिप प्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात झाली. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे सदस्य शिवाजीराव चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. गडहिंग्लज वकील संघाचे अध्यक्ष अ. रा. बसरीकट्टी यांनी प्रास्ताविक केले. न्या. एस. के. कुलकर्णी यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला.
      कार्यक्रमास सातार्‍याचे जिल्हा सत्र न्यायाधीश श्री. कोतवाल, जिल्ह्यातील न्यायाधीश, श्रीमती घाळी, कोल्हापूर जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष संतपराव पवार, गडहिंग्लजच्या उपविभागीय अधिकारी निलीमा धायगुडे, तहसिलदार संजय पवार, सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता डी. वाय. पाटील, सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभागाचे कार्यकारी अभियंता एस. एस. माने, गडहिंगलजचे उपअभियंता एन. डी. मगदूम, अ‍ॅड. बी. के. देसाई, नीता चव्हाण, वकील वर्ग, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
      अ‍ॅड. पी. आर. देशपांडे यांनी सूत्रसंचलन केले तर अ‍ॅड. डी. जी. दळवी यांनी आभार मानले. मीरा जोशी यांनी गायिलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

शुक्रवार, २७ जानेवारी, २०१२

कोल्हापूर महोत्सवाची उत्साहात सांगता

       कोल्हापूर दि. २७ : लखलख चंदेरी या बहारदार कार्यक्रमाने कोल्हापूर महोत्सवाची आज उत्साहात सांगता झाली. कोल्हापूर जिल्हा प्रशासन व कोल्हापूर दसरा महोत्सव ट्रस्ट यांच्यावतीने पाच दिवस सुरु असलेल्या महोत्सवामध्ये लखलख चंदेरी कार्यक्रम कोल्हापूर रसिकांचे खास आकर्षण ठरला. सुरुवातीलाच प्रसिध्द अभिनेत्री अमृता खानविलकर हीने चिकनी चमेली या गीतावर बहारदार नृत्य करीत खचाखच भरलेल्या छ. शिवाजी स्टेडियमवरील रसिक प्रेक्षकांना डोलायला लावले.
         प्रसाद ओक, सतीश तारे यांनी नाट्यमयरिता कार्यक्रमाचे सूत्रसंचलन करीत उपस्थित प्रेक्षकांची भरभरुन दाद मिळविली. महाराष्ट्राचा महागायक अभिजीत कोसंबी, ऋषिकेश रानडे, आनंदी जोशी आदींनी विविध प्रकारची गीते सादर करुन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
        अप्पर जिल्हाधिकारी अप्पासाहेब धुळाज यांनी रसिक प्रेक्षकांनी केलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. जिल्हा पोलीस अधीक्षक विजयसिंह जाधव, उपजिल्हाधिकारी सुभाष बोरकर यांनी झी वाहिनीच्या टीमचे  पुष्पगुच्छ देऊन आभार मानले.
          गेले पाच दिवस सुरु असलेल्या कोल्हापूर महोत्सवामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे, रांगोळी, छायाचित्र स्पर्धा आदींचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवाचे सूत्रसंचलन बी. न्यूजचे कार्यकारी संपादक चारुदत्त जोशी यांनी केले. कोल्हापूर महोत्सव सांगता कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, पर्यटक तसेच रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नसीर अत्तार यांच्या छायाचित्रास प्रथम क्रमांक

         कोल्हापूर दि. २७ : कोल्हापूर महोत्सव २०१२ अंतर्गत आयोजित केलेल्या कोल्हापूर जिल्हा पर्यटन स्थलदर्शन छायाचित्र स्पर्धेत नसीर अत्तार यांच्या रंकाळा तलावातील संध्यामठ घाटाच्या छायाचित्राला प्रथम क्रमांक मिळाला.
      अतिरिक्त जिल्हाधिकारी अप्पासाहेब धुळाज, उपजिल्हाधिकारी सुभाष बोरकर, दिग्दर्शक आणि स्पर्धा संयोजन समितीचे चंद्गकांत जोशी, जिल्हा माहिती अधिकारी रवींद्ग राऊत आणि छायाचित्रकार अनिल वेल्हाळ यांच्या प्रमुख हस्ते पुरस्कार वितरण झाले. प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानावर उभारलेल्या कला दालनात पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम झाला.
      यावेळी अप्पासाहेब धुळाज यांनी स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वच छायाचित्रकारांचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, कोल्हापुरात पर्यटनाला चालना मिळावी यासाठी कोल्हापूर महोत्सव आयोजित केला जातो. जिल्ह्यातील पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाची ठिकाणे सर्वांसमोर यावीत यासाठी ही छायाचित्र स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सहभागी झालेली छायाचित्रे पाहता स्पर्धेचा हेतू साध्य झाला आहे. बक्षीसपात्र छायाचित्रांच्या सहाय्याने कोल्हापुरचे पर्यटन विकासासाठीची पुस्तिका तयार करण्याचा जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न राहील.
      स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे - लक्षवेधी पुरस्कार - रघु जाधव (लोकजीवन छायाचित्र), पप्पू अत्तार (शिवाजी पूल छायाचित्र), अविनाश कुलकर्णी (भुदरगड पठार छायाचित्र).
      बक्षिसपात्र स्पर्धक (क्रमांक, नाव, छायाचित्रे याप्रमाणे) प्रथम - नसीर अत्तार (संध्यामठ, रंकाळा), द्वितीय सौ. आरती अभय गट्टे (लेणी, पोहाळे), तृतीय शिवराज मारुती फुटाणे (कोपेश्वर, खिद्गापूर मंदिर), चौथा युवराज विठ्ठल उगळे (स्वप्नवेल पॉईंट), पाचवा योगेश अरुण साटम (पॅराडाईज इन, कोल्हापूर), उत्तेजनार्थ सौ. शुभा गणेश गवळी (सायलेंट डेथ), कृष्णात बाळासाो निऊंगरे (पोटासाठी अन्न..जगण्यासाठी), रविंद्गकुमार दिपचंद शहा (रांगणा गड), राजेंद्ग धोंडीराम निगवेकर (शाहूकालीन धुण्याची चावी), सूरज अनंत खटावकर (प्रतिबिंब), निलेश आबासाो पाटील (गव्हाणी घुबड), सौ. प्रणिता सुभाष बोरकर (जोड समाधी), दिग्वीजय आनंदा पाटील (शिवाजी पुतळा, विद्यापीठ), बाजी धोडीराम निऊंगरे (मीच माझ्या रुपाची राणी ग..), मंदार महादेव गवळी (व्यक्ती).

गुरुवार, २६ जानेवारी, २०१२

प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा पालकमंत्र्यांच्या हस्ते गुणवंतांचा सत्कार

         कोल्हापूर दि. २६ : प्रजासत्ताक दिनाचा ६२ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्ह्याचे पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय समारंभात छत्रपती शाहू स्टेडियम येथे ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी त्यांना मानवंदना देण्यात आली.
      येथील छत्रपती शाहू स्टेडियमवर ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ पार पडला. यावेळी प्रा. एन. डी. पाटील, जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दिपक म्हैसेकर, विशेष पोलीस महानिरीक्षक तुकाराम चव्हाण, पोलीस अधीक्षक विजयसिंह जाधव, जिल्हा होमगार्ड समादेशक विलास पाटील कौलवकर तसेच स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ नागरीक, वरिष्ठ शासकीय अधिकारी व शालेय विद्यार्थी या समारंभास मोठ्या संख्येने उपस्थित होते.
      मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मानवंदना स्वीकारली व संचलनाची पाहणी केली. पोलीस सशस्त्र दल, एनसीसी पथक, महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती, पोलीस बँड, श्वान पथक, गृहरक्षक दल, बिनतारी संदेश विभाग, महापालिका अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन, वनरक्षक दल आदी पथकांनी शानदार संचलन केले.
      छ. शाहू विद्यालय, कोल्हापूर पब्लिक स्कूल, राजर्षी शाहू हायस्कूल, नागोजीराव पाटणकर विद्यालयाच्या आरएसपी, गाईड आणि राष्ट्रीय छात्र सेनेच्या पथकांचे संचलन विशेष उल्लेखनीय ठरले. आपत्ती व्यवस्थापनात मदत करणार्‍या व्हाईट आर्मीच्या जवानांनी संचलनात सहभाग घेतला.
पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण
      शहीद जवानांच्या कुटुंबियांना पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. वीर पिता-माता श्री. शिवाजी साबळे, सौ. आक्काताई साबळे यांना आर्थिक मदतीचे धनादेश देण्यात आले. अवधूत अशोक गायकवाड व शीलादेवी हिंदुराव लोंढे यांना नेहरु युवा पुरस्कार प्रदान करण्यात आले. गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल अरविंद रामचंद्ग पाटील (हवालदार, विशेष शाखा), एकनाथ गणपत देसाई (हवालदार, चंदगड पोलीस ठाणे), डॅनियल जॉन बेन (निरीक्षक, पोलीस कल्याण), सूरज दत्तात्रय बेंद्गे (उपनिरीक्षक, शाहूवाडी), श्रीधर बाळकृष्ण राजमाने (उपनिरीक्षक, हातकणंगले) आणि विनायक सुधीर मगर (उपनिरीक्षक, राजारामपुरी) या पोलीस दलातील अधिकारी-कर्मचा-यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी न्यू हायस्कूल प्राथमिक मराठी शाखा आणि शा. कृ. पंत वालावलकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या लेझीमच्या प्रात्यक्षिकांनी सर्वांची लक्ष वेधून घेतले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या या भारतात बंधुभाव नित्य वसू दे आणि बलसागर भारत होवो या देशभक्तीपर गीतांनी स्टेडियमवरील उपस्थित रोमांचित होऊन गेले.

मंगळवार, २४ जानेवारी, २०१२

कोल्हापूर महोत्सव 2012 समुहगीत स्पर्धेत उषाराजे हायस्कूल तर रांगोळी स्पर्धेत दयानंद मुतकेकर प्रथम

       कोल्हापूर दि. 24 : कोल्हापूर महोत्सव 2012 अंतर्गत स्थानिक कलाकारांना उत्तेजन देण्याच्या उद्देशाने राजर्षी शाहू स्मारक भवनात आयोजित करण्यात आलेल्या समूहगीत स्पर्धेत उषाराजे हायस्कूलने तर खुल्या रांगोळी स्पर्धेत दयानंद राजाराम मुतकेकर यांनी प्रथम क्रमांक मिळविला.
      समुहगीत, खुली भावगीत-सिनेगीत व लोकसंगीत तसेच रांगोळी स्पर्धेचे उद्‌घाटन उपजिल्हाधिकारी सुभाष बोरकर यांच्या हस्ते झाले.
      समूहगीत स्पर्धेत द्वितीय क्रमांक वि. स. खांडेकर प्रशाला, शाहुपूरी, कोल्हापूर, तृतीय क्रमांक शा. कृ. पंत वालावलकर हायस्कूल, मुक्त सैनिक वसाहत, कोल्हापूर आणि उत्तेजनार्थ विद्यावर्धिनी वृंद, प्रायव्हेट हायस्कूल व म. दूं, श्रेष्ठी समता हायस्कूल, भोसलेवाडी यांनी मिळविला. स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून सौ. मनीषा माने-नायकवडी व दिपा सुर्यवंशी यांनी काम पाहिले.
      खुल्या भावगीत-सिनेगीत व लोकगीत स्पर्धेत सौ. सरिता प्रकाश सुतार यांनी प्रथम क्रमांक, सचिन मांडवकर द्वितीय आणि रविंद्ग पाटील यांनी तृतीय क्रमांक मिळविला. उत्तेजनार्थ क्रमांक योगेश खांडेकर व संजय शर्मा यांनी मिळविला. परिक्षक म्हणून उमेश नेरकर व सौ. सविता वेल्हाळ यांनी काम पाहिले.
      खुल्या रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक दयानंद मुतकेकर, द्वितीय क्रमांक सतिश कुंभार आणि तृतीय क्रमांक प्रियदर्शनी करंबे तर उत्तेजनार्थ अभिजीत पन्हाळकर, पुनम बाबासाहेब पाटील आणि तेजश्री सुर्यवंशी यांना विभागून देण्यात आला. परिक्षक म्हणून प्राचार्य अजय दळवी आणि विजय टिपुगडे यांनी काम पाहिले.
      शाहीर आझाद नायकवडी यांनी स्पर्धांचे आयोजन केले. सहाय्यक करमणूक अधिकारी सौ. अर्पणा मोरे-धुमाळ, नायब तहसिलदार अश्विनी वरुटे यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा पार पडल्या. हणमंत चौगुले, निशीकांत कांबळे यांनी संगीत साथ केली. युवराज कदम यांनी संयोजन तर अरुण शिंदे यांनी सूत्रसंचलन केले.

रविवार, २२ जानेवारी, २०१२

शानदार कार्यक्रमाने कोल्हापूर महोत्सवास प्रारंभ

      कोल्हापूर दि. २२ :  गणेश वंदना, करवीरच्या नावानं चांगभलं हे कोल्हापूर महोत्सवाचं गीत आणि नेत्रदीपक  लेसर  शो  अशा  भरगच्च  कार्यक्रमाच्या सलामीने आज कोल्हापूर महोत्सवाला प्रारंभ झाला.
      येथील छ. शिवाजी स्टेडियमवर आज सायंकाळी कोल्हापूर महोत्सवाचे दीप प्रज्वलन करुन श्रीमंत शाहू महाराज यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. यावेळी कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी-प्रसन्ना, अतिरिक्त जिल्हाधिकारी अप्पासाहेब धुळाज, अप्पर पोलीस अधीक्षक संजय येनपुरे, उपजिल्हाधिकारी सुभाष बोरकर, शिवाजी कादबाने आदी उपस्थित होते.
      सायंकाळी पावणेसातच्या सुमारास गणेश वंदनाने कार्यक्रमास सुरुवात झाली. मंजिरी फडणीस यांच्या समूहाने सादर केलेल्या गणेश वंदनाने महोत्सवाची नांदी झाली. त्यानंतर करवीरच्या नावानं चांगभलं हे कोल्हापूर महोत्सवाचं गीत सागर बगाडे यांच्या समूहाने सादर केले.
      शिवाजी विद्यापीठाच्या समुहाने महाराष्ट्राची लोकसंस्कृती बॅले सादर करुन महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परपंरेचा पटच रसिकांसमोर उलगडला.
      यावेळी संदीप तावरे, अनुराधा भोसले, दीपक बीडकर, सागर बगाडे, आझाद नायकवडी, संजीव पाटील आदी कलाकारांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

मुलांना सुसंस्कृत बनविल्यास नातेसंबंध अधिक दृढ होतील - प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. आर. लोंढे

        कोल्हापूर दि. २२ : भाऊबंदकीतील वाद संपुष्टात येण्यासाठी पालकांनी मुलांना सुसंस्कृत बनविल्यास नातेसंबंध अधिक दृढ होतील, असे प्रतिपादन जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष व्ही. आर. लोंढे यांनी आज आसळज येथे केले.
      गगनबावडा तालुका विधी सेवा समितीच्यावतीने आसळज गावांत श्री. लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली विधी साक्षरता शिबीर संपन्न झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते.
      वडिलांच्या मालमत्तेत आता मुलींनाही समान हक्क असल्याने बर्‍याच ठिकाणी तंटे उद्‌भवतात. त्यासाठी मुलांना सुसंस्कृत बनविले पाहिजे. मुलगा सुसंस्कृत असेल तर बहिणीला योग्य मान देईल. त्यामुळे सुसंस्कृत मुलगी आपल्या भावाच्या वाटणीत हिस्सा मागणार नाही असे सांगून श्री. लोंढे म्हणाले ईर्र्षा व कटुता सामंजस्याने एकत्र बसून सोडविली पाहिजे. त्यासाठी न्यायालयात खटले दाखल करण्यापेक्षा ते तालुका व जिल्हा पातळीवर आयोजित करण्यात येणार्‍या लोक अदालतमध्ये  आपआपसात तडजोड करुन सोडविले जातात. याचा लाभ जास्तीत जास्त ग्रामस्थांनी घेतला पाहिजे. यासाठी कायद्याचे मोफत मार्गदर्शनही करण्यात येत असून न्याय मिळण्यासाठी होणारा खर्च, वेळेची बचत होऊन कुटुंब एकसंघ राहण्यास मदत होईल. 
      बाल हक्क संरक्षण कायद्याविषयी न्या. एस. एम. पाटील, मिळकतीसंबंधीच्या कायद्याबाबत न्या. डी. व्ही. कुटे, महिला हक्क संरक्षणविषयी असणार्‍या कायद्याबाबत न्या. सौ. एम. एस. सहस्त्रबुध्दे तसेच कामगार कायद्याविषयी अ‍ॅड. बी. बी. कुरणे यांनी ग्रामस्थांना सोदाहरण माहिती देवून मार्गदर्शन केले.
      ग्रामीण भागातील कायद्यापासून वंचित राहिलेल्या पिडीत नागरिकांचे कायद्याविषयीचे अज्ञान दूर व्हावे, त्यांना  कायद्यांची सविस्तर माहिती व्हावी यासाठी ग्रामीण भागात कायदेविषयक शिबीर भरविली जात आहेत, असे प्रास्ताविकात सांगून मुख्य न्यायदंडाधिकारी बी. सी. कांबळे म्हणाले, ग्रामस्थांनी आपले तंटे लवकरात लवकर मिटावेत यासाठी लोक न्यायालयाचा लाभ घ्यावा. त्यामुळे खर्च वाचतो शिवाय कोर्ट फीही परत मिळते. याशिवाय गरिबांना न्याय मिळण्यासाठी आर्थिक सहाय्यही दिले जाते.
      विधी साक्षरता शिबीरास नायब तहसिलदार अनंत गुरव, सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत वसेकर, ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. स्वागत ग्रामसेवक एस. ए. भोसले यांनी तर आभार मानसिंग पाटील यांनी मानले.