इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शुक्रवार, ३० मार्च, २०१२

सामाजिक वनीकरण विभागाच्या राज्यस्तरीय निबंध, चित्रकला स्पर्धांचे निकाल जाहीर

          कोल्हापूर दि. ३० सामाजिक वनीकरण संचालनालयातर्फे सन २०११-२०१२ मध्ये राज्यस्तरावर निबंध, चित्रकला स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. राज्यस्तरीय निकाल जाहीर करण्यात आला असून विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
      राज्यस्तरीय खुली छायाचित्र स्पर्धा - प्रथम क्रमांक कु. कोमल विजय पाटील, बुलढाणा, द्वितीय रविंद्गसिंग गोविंदसिंग राजपूत, धुळे, तृतीय क्रमांक सोमनाथ एकनाथ महाजन, जळगांव, उत्तेजनार्थ कु. मधुरा महादेव गाडगीळ, सिंधुदुर्ग, बाळासाहेब बापूराव जठार, अहमदनगर, राजू मुकुंदराव पगार, वाशिम, रविंद्ग प्रल्हाद वाघमारे, बुलढाणा, सुरेश उकंडा शिंगणे, बुलढाणा.
      चित्रकला स्पर्धा - महाविद्यालयीन गट (इ. ११ वी व पुढे) - प्रथम क्रमांक गिरीधर मारुती लाड, आदर्श विद्या निकेतन अँड ज्युनि. कॉलेज, मिणचे, ता. हातकणंकले, जि. कोल्हापूर, द्वितीय सुशिल सुर्यभानजी पाटील, वर्धा, तृतीय क्रमांक कु. ललिता नंदलालजी गांधी, अकोला.
      विद्यालयीन गट (इ. ८ वी ते १० वी) - प्रथम क्रमांक कु. तेजश्री पांडू एस. बी. जि. रायगड, द्वितीय कु. अंकिता नागनाथ खवणेकर, मुंबई आणि तृतीय क्रमांक कु. स्वप्निल नारायण आयरे, जागृती हायस्कूल राधानगरी, जि. कोल्हापूर.
      प्राथमिक विद्यालयीन गट (इ. ४ थी ते ७ वी) - प्रथम क्रमांक अथर्व सु. बारापात्रे, जि. चंद्गपूर, द्वितीय तेजस बाळकृष्ण किणेकर, रामराव इंगवले हायस्कूल, हातकणंगले, जि. कोल्हापूर आणि तृतीय क्रमांक हिमांशी आर. राठोड, मुंबई.
      राज्यस्तरीय निबंध स्पर्धा - महाविद्यालयीन गट (इ. ११ वी पुढे ) - प्रथम क्रमांक रोहिणी दगू म्हस्के, जि. नाशिक, द्वितीय प्रियांका गणपत राजिवडे, जि. पुणे आणि तृतीय क्रमांक उमेश गणपत पावरा जि. नंदुरबार.
      विद्यालयीन गट (इ. ८ वी ते १० वी)- प्रथम क्रमांक मिनल पांडुरंग केळुसकर, विद्यामंदिर हायस्कूल, कणकवली, जि. सिंधुदुर्ग, द्वितीय सुरज संजय पाटील, समाजविकास माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सांगली आणि तृतीय क्रमांक निकिता किशोरकुमार वाघ.

नाशिक येथे विविध पदांसाठी सैन्य भरती

       कोल्हापूर दि. ३० : माजी सैनिकांचे पाल्य, सख्खे भाऊ, अविवाहीत शहीद जवानांचे सख्खे भाऊ. मुलगा नसलेल्या शहीद जवानांचे जावई (दत्तक मुलीच्या पतीसह) तसेच राज्य व राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू यांच्यासाठी आर्टिलरी सेंटर, नाशिक रोड कॅम्प, नाशिक येथे त्यांच्या युनिट कोट्यातून २ ते ४ एप्रिल २०१२ कालावधीत सोल्जर जीडी, सोल्जर टेक्नीशियन, सोल्जर स्टोअर हॅड जनरल ड्युटी आणि सोल्जर ट्रेडसमेन पदासाठी सैन्य भरतीचे आयोजन करण्यात आले आहे.
      सर्व पदांसाठी साडेसतरा ते २१ वय असावे. सोल्जर जीडी पदासाठी दहावी पास, दहावीमध्ये ४५ टक्के गुण व ३२ टक्के कमीत कमी इंग्रजी, गणित व शास्त्रमध्ये आवश्यक, हायर एज्युकेशन असलेल्या विद्यार्थ्यांना ४५ टक्क्याची अट लागू नाही. सोल्जर टेक्नीकल पदासाठी १० + २ पास (भौतिकशास्त्र, केमिस्ट्री, गणित व इंग्रजी विषयासह), सोल्जर स्टोअर हॅड जनरल ड्युटी पदासाठी दहावी पास, सोल्जर ट्रेडसमेन पदासाठी चिफ आरटिसन/टेलर/ड्रेसर/वॉशरमॅन : दहावी पास, सोल्जर ट्रेडसमेन पदासाठी हाऊस किपर/मेस किपर : आठवी पास अशी शैक्षणिक अर्हता आहे.
      शैक्षणिक प्रमाणपत्र व गुणपत्रिका, रिलेशन सर्टिफिकेट, तहसिलदार, प्रांत, जिल्हाधिकारी यांचे  अधिवासी प्रमाणपत्र, चारित्र्याचा दाखला, दहा रंगीत पासपोर्ट आकाराची छायाचित्रे (संगणकावर काढलेले फोटो ग्राह धरले जाणार नाहीत), कुटुंबातील सर्व व्यक्तींचा रंगीत पासपोर्ट आकाराचे छायाचित्र व प्रत्येक व्यक्तीचे नाव, नाते, जन्मतारीख असलेले सरपंच यांच्या सही शिक्क्यासह प्रमाणपत्र, जातीचा दाखला, डिसचार्ज बुक/पीपीओची छायांकित प्रत, एनसीसी प्रमाणपत्राची छायांकित प्रत, आवश्यक असेल त्यांना मृत्यूचा दाखला, अविवाहीत असल्याबाबतचा दाखला आदी कागदपत्रे आवश्यक असतील.
      इच्छुकांनी आर्टिलरी सेंटर, नाशिक रोड, कॅम्प नाशिक, येथे दि. २ एप्रिल २०१२ रोजी सकाळी ६ वाजता आवश्यक कागदपत्रांसह भरतीसाठी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, कोल्हापूर यांनी केले आहे.

ए. जी. आय. मेडीकल सवलत योजना संबंधितांनी माहिती कळवावी

       कोल्हापूर दि. ३० : आर्मी ग्रुप इन्शुरन्स फंड ए. जी. आय. भवन, रामतुला मार्ग, न्यू दिल्ली यांच्या सुचनेनुसार १ एप्रिल २००३ पासून माजी सैनिक अंशदायी स्वास्य योजना ( ECHS ) सुरु करण्यात आली आहे. इ. सी. एच. एस. योजना सुरु झाल्याने आर्मी ग्रुप इन्शुरन्सच्या मेडीकल बेनिफिट स्कीमची योजना एजीआय व्दारे बंद करण्यात आलेली आहे.
      सेनेतून निवृत होताना मेडीकल बेनिफीट स्कीम अंतर्गत जमा करण्यात आलेली रक्कम एजीआय व्दारे परत करण्यात येत आहे. यासाठी १ मार्च २००३ पूर्वी निवृत झालेल्या माजी सैनिकांनी जमा करण्यात आलेली रक्कम परत घेण्याकरिता मेडीकल बेनिफिट स्कीमच्या प्रमाणपत्राची मुळप्रत (MBS Card), स्वतःचा बँक खाते क्रमांक व बँकेचा पूर्ण पत्ता, स्वतःचा पूर्ण पत्ता, संपर्क दूरध्वनी क्रमांक AGI Fund, AGI Bhawan, Ramtula Marg, PO- Vasant Vihar Post Bag No 14, New Delhi-57 येथे पाठवावीत. अधिक माहितीसाठी डायरेक्टर (क्लेम्‌स) दूरध्वनी क्रमांक ०११-२६१४५७०९ व एमबीएस सेक्शन ०११- २६१४२८९७ एक्स्टेशन ४२८ वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, कोल्हापूर यांनी केले आहे.

बुधवार, २८ मार्च, २०१२

माजी सैनिकांनी पेन्शनसाठी वारस पत्नीचे नाव लावण्यासाठी विशेष अभियान

         कोल्हापूर दि. २८ : पन्हाळा, कागल व शाहुवाडी तालुक्यातील जे माजी सैनिक डिसेंबर १९८६ पूर्वी सैन्य सेवेतून निवृत्त झालेले आहेत व ज्या माजी सैनिकांनी अद्याप त्यांच्या पेंशन कागदोपत्री वारस पत्नीचे नाव लावलेले नाही अशांनी खालील तारखांना व दिलेल्या ठिकाणी सकाळी ११ ते सायं. ४ या वेळेत पेन्शन कागदोपत्री नाव लावून घेण्याकरिता कागदपत्रे पूर्ण करण्यासाठी वारस पत्नीसह उपस्थित रहावे.
      माजी सैनिक संघटना कोडोली, ता. पन्हाळा येथे दि. ३ एप्रिल २०१२ रोजी फॉर्म भरुन दिले जातील व ४ एप्रिल २०१२ रोजी पूर्ण झालेले फॉर्म स्वीकारले जातील. तहसिलदार कार्यालय, कागल येथे दि. १२ एप्रिल २०१२ रोजी फॉर्म भरुन दिले जातील व दि. १३ एप्रिल २०१२ रोजी पूर्ण झालेले फॉर्म स्वीकारले जातील. तहसिलदार कार्यालय, शाहुवाडी येथे दि. १८ एप्रिल २०१२ रोजी फॉर्म भरुन दिले जातील व दि. २९ एप्रिल २०१२ रोजी पूर्ण झालेले फॉर्म स्वीकारले जातील.
      संबंधित माजी सैनिकांनी त्यांचे मूळ डिसचार्ज पुस्तक, माजी सैनिक ओळखपत्र, ग्रामसेवक/सरपंच यांच्याकडून एकमेव पत्नी असल्याबाबतचा जॉईंट फोटो लावून दाखला (फोटोवर सही व शिक्का घेणे आवश्यक), पत्नीसह जॉईंट फोटो ५ प्रती, बँकेचे पासबुक आदी कागदपत्रे घेऊन दिलेल्या तारखेस व ठिकाणी सकाळी १० वाजता उपस्थित रहावे. माजी सैनिक अथवा वारस पत्नी मयत असल्यास त्यांचा मृत्यू दाखला व मृत्यू दाखल्याच्या झेरॉक्स प्रती घेऊन याव्यात असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, कोल्हापूर यांनी कळविले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात बंदी आदेश जारी

          कोल्हापूर दि. २८ : कोल्हापूर शहरांतर्गत आय. आर. बी. कंपनीने तयार केलेल्या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असल्याबाबतच्या तक्रारी, टोल वसुलीस जनतेमधून विरोध तसेच जिल्ह्यात पाणी प्रश्न, वीज भारनियमन, गॅस दरवाढ, वाढती महागाई या प्रश्नांवर सर्व राजकीय पक्ष व विविध संघटना यांच्यावतीने होणार्‍या विविध आंदोलनामुळे कोल्हापूरचे अप्पर जिल्हादंडाधिकारी संजय पवार यांनी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) अ ते फ व कलम ३७ (३) अन्वये संपूर्ण जिल्ह्यामध्ये बंदी आदेश जारी केला आहे. सदरचा बंदी आदेश दि. २८ मार्च २०१२ रोजी रात्रौ ००.०१ वाजलेपासून ते दि. ७ एप्रिल २०१२ रोजीच्या रात्री १२ वाजेपर्यंत  खालील वर्तन करण्यास मनाई केली आहे.
      शस्त्रे, बंदुका, सोटा, तलवारी, भाले, सुर्‍या, लाठी अगर काठी किंवा शारिरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशा कोणत्याही वस्तु बरोबर नेणे, कोणताही ज्वालाग्रही पदार्थ किंवा स्फोटके  पदार्थ वाहून नेणे, व्यक्ती, अगर त्यांच्या प्रतिमांचे प्रदर्शन आणि दहन करणे. सार्वजनिक घोषणा देणे आणि वाद्ये वाजविणे. असभ्य हावभाव करणे. ग्राम्य भाषा वापरणे, सभ्यता आणि नितीविरुद्ध जाऊन निरनिराळ्या जातींच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊन त्यांच्यात भांडणे होतील. त्याद्वारे शांततेस आणि कायदा सुव्यवस्थेस धोका निर्माण होईल अशी सोंगे अगर कृती निर्माण करुन त्याचा प्रसार करणे. या मनाई आदेशातून शासकीय अधिकारी, कर्मचारी ज्यांना त्यांच्या कर्तव्यपालनासाठी उपरोक्त वस्तू हाताळाव्या लागतात आणि एकत्र जमावे लागते त्यांना यातून वगळण्यात आले आहे. वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या पूर्वपरवानगीने आयोजित समारंभ, तसेच अंत्ययात्रांसाठी हा मनाई आदेश लागू नाही, असेही अप्पर जिल्हा दंडाधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे.

राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष कुपेकर यांचा कोल्हापूर जिल्हा दौरा कार्यक्रम

कोल्हापूर दि. २८ : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर दि. २९ मार्च २०१२ रोजी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
गुरुवार दि. २९ मार्च २०१२ रोजी मुंबईहून सायं. ६ वाजता कोल्हापूर येथे आगमन, राखीव व मुक्काम.
           शुक्रवार दि. ३० मार्च ते बुधवार दि. ४ एप्रिल २०१२ पर्यंत कोल्हापूर येथे राखीव व मुक्काम, असा त्यांचा दौरा कार्यक्रम आहे.

सोमवार, २६ मार्च, २०१२

कोल्हापूर जिल्ह्यात पाच ठिकाणी लोक कला यात्रेचे आयोजन

         कोल्हापूर दि. २६ : दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्ग, नागपूर, संस्कृती मंत्रालय, भारत सरकार आणि जिल्हा प्रशासन, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने लोक कला यात्रा दर्शन २०१२ कोल्हापूर येथे आयोजित करण्यात येत आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्यातील धनगरी गजा, आंध्र प्रदेशातील बोनालु नृत्य, कर्नाटक राज्यातील ढोलु कुनिथा, मध्य प्रदेशातील प्रसिध्द राई नृत्य व छत्तीसगढ राज्यातील पंडवानी गायन अशा पाच राज्यातील लोकनृत्य व लोक संगीताचा एकूण ७० कलावंतांचा समूह कलांचे प्रदर्शन करणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सांगरुळ, पन्हाळा, कोडोली वारणानगर व कागल येथील रसिक श्रोत्यांसाठी लोक कला यात्रेचा हा कार्यक्रम पाच ठिकाणी ठेवण्यात आला आहे.
      हा कार्यक्रम २७ ते ३१ मार्च २०१२ असा पाच दिवसांचा असून ज्या गावात कार्यक्रम निश्चित केला आहे त्या गावातील मुख्य बाजार पेठेतील रस्त्यावरुन शोभा यात्रा व चौका-चौकात नृत्यांची झलक दाखविण्यात येणार आहे. ही शोभा यात्रा सायं. ५-३० ते ६-३० पर्यंत राहणार असून त्यानंतर सर्व ठिकाणी सायं. ७ ते रात्रौ ९ वाजेपर्यंत खुल्या रंगमंचावर या लोक कला यात्रेचा कार्यक्रम होईल. लोक कला यात्रेच्या कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. गावाचे नावांपुढे कार्यक्रमाचे स्थान व त्यापुढे कंसात शोभा यात्रा निघण्याचा मार्ग दिला आहे.
      २७ मार्च २०१२ रोजी कोल्हापूर शहर - भवानी मंडप (मुख्य मेन बाजार रोड, कोल्हापूर शहर), २८ मार्च रोजी सांगरुळ - हायस्कूलचा खुला मंच (मुख्य बाजारपेठ चौक), २९ मार्च रोजी पन्हाळागिरी - पन्हाळागिरी नगर परिषद खुले रंगमंच मयुरबाग ( नगर परिषद खुले रंगमंच मयुरबाग), ३० मार्च रोजी कोडोली - वारणा विद्या मंदीर ग्राऊंड, वारणानगर मेन रोड (मुख्य बाजारपेठ रोड) आणि ३१ मार्च २०१२ रोजी कागल - गैबी चौक, खुला रंगमंच (मुख्य बाजारपेठ रोड).
      कोल्हापूर जिल्ह्यातील आयोजित करण्यात आलेल्या लोक कला यात्रेच्या रंगारंग कार्यक्रमास जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहून पाच राज्यातील कलांचा आस्वाद घ्यावा असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

शेतकरी, सामान्य माणसाच्या विकासाचे शासनाचे धोरण विधान परिषद सभापती देशमुख यांचे प्रतिपादन

       कोल्हापूर दि. २६ : सामान्य माणूस आणि शेतकरी यांना केंद्गबिंदू मानून विकास करण्याचे राज्य शासनाचे धोरण आहे, असे प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांनी केले.
      पन्हाळा तालुक्यातील माले येथील श्री जयभवानी सहकारी पाणीपुरवठा संस्थेच्यावतीने आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून सहकार, संसदीय कार्य तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हर्षवर्धन पाटील उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर आमदार विनय कोरे, ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील, माजी आमदार संजय घाटगे, संस्थेचे अध्यक्ष सचिन जमदाडे आदी उपस्थित होते.
      श्री. देशमुख म्हणाले, शेतकरी, कष्टकरी यांचा आर्थिक विकास साधणे याला प्राधान्य आहे. यासाठी शेतकर्‍यांच्या जमिनीला पाणी मिळायला हवे. म्हणूनच राज्य शासनाने जयभवानी पाणीपुरवठा संस्थेला कर्जातून मुक्त करण्यासाठी राज्य शासनाने उचललेले सकारात्मक पाऊल अतिशय महत्वाचे आहे. शासनाच्या या निर्णयाचा सर्वसामान्य शेतकर्‍यांना लाभ होणार आहे.
      पालकमंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले, जयभवानी पाणी पुरवठा संस्था कर्जमुक्त झाल्यामुळे या परिसरात आर्थिक परिवर्तन येईल. या पाणीपुरवठा संस्थेच्या जोरावर येथील शेतकर्‍यांची मुले चांगले आणि उच्च शिक्षण घेऊ शकतील.
      ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी राज्य शासनाने सकारात्मक भूमिका घेऊन शेतकर्‍यांना न्याय दिल्याबद्दल राज्य शासनाचे आभार मानले. जयभवानी पाणीपुरवठा संस्थेला कर्जमुक्त करुन राज्य शासनाने शेतकर्‍यांना आधार दिल्याबद्दल आमदार विनय कोरे यांनी राज्य शासन आणि पालकमंत्र्यांचे आभार मानले.
      यावेळी सभापती देशमुख आणि पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते शेतकर्‍यांना कोर्‍या झालेल्या सात-बाराचे वाटप करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष सचिन जमदाडे यांनी प्रास्ताविक तर राजू जमदाडे यांनी आभार मानले.

रविवार, २५ मार्च, २०१२

योजनांचे सर्व्हेक्षण करुन अहवाल सादर करा : पालकमंत्री

        कोल्हापूर दि. २५ : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत राबवल्या जाणार्‍या योजनांचे सर्व्हेक्षण करुनत्याचा अहवाल सादर करा अशा सूचना सहकार, संसदीय कार्य तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज जिल्हा परिषदेच्या अधिकार्‍यांना दिल्या.
      जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेची वार्षिक सर्वसाधारण सभा आज झाली. पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विश्रामधाम येथे ही सभा झाली. त्यावेळी त्यांनी वरीलप्रमाणे सूचना दिल्या.
      त्यांनी सांगितले की, जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत अनेक योजना राबवल्या जातात. पण त्याचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांच्या जीवनाचा आर्थिक स्तर उंचावला आहे का याची जाणीव करुन घेण्यासाठी लाभार्थ्यांचे सर्व्हेक्षण करणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील किमान दहा टक्के लाभार्थ्यांचे सर्व्हेक्षण करण्यात येवून त्याचा अहवाल तयार करावा.
      जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष हिंदुराव चौगले यांनी घरकुल योजनेतून बांधलेल्या घरांच्या दुरुस्तीसाठी निधी देण्याची मागणी केली. मात्र अशाप्रकारे निधी देता येणार नसल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.
      एकात्मिक पडीक जमीन विकास कार्यक्रमात पाणलोटांचे काम पूर्ण करा. काम करताना ग्रामपंचायत सदस्याना विश्वासात घ्या, अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. पन्हाळा तालुक्यातील वेतवडे येथील पाणलोटच्या कामाबाबत उपमुख्य कार्यकारी अधिकार्‍यांमार्फत चौकशी करुन अहवाल सादर करण्याची सूचनाही त्यांनीदिली. याबाबत आमदार चंद्गदीप नरके यांनी सभेत मुद्दा उपस्थित केला होता.
      सभेस गृह, ग्रामविकास राज्यमंत्री सतेज पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रा. संजय मंडलिक, आमदार चंद्गदीप नरके, जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख, मुख्य कार्यकारीअधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, महापालिका आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी-प्रसन्ना, प्रकल्प संचालक पी. बी. पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने आदी उपस्थित होते.

ग्रंथदालनामुळे वाचन संस्कृतीला प्रोत्साहन मिळेल - पालकमंत्री

      कोल्हापूर दि. २५ : कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात उभारण्यात येणार्‍या ग्रंथदालनामुळे वाचन संस्कृतीला प्रोत्साहन मिळेल असा विश्वास सहकार, संसदीय कार्य तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज येथे व्यक्त केला.
      कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात उभारण्यात येणार्‍या ग्रंथदालनाच्या बांधकामाचे त्यांच्या हस्ते भूमीपूजन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी गृह राज्यमंत्री सतेज पाटील, आमदार चंद्गदीप नरके, ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस, जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख, महानगरपालिकेच्या आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
      पालकमंत्री म्हणाले, ग्रंथदालनाच्या उभारणीमुळे जिल्हाधिकारी कार्यालयात येणारे विविध प्रकारच्या नागरिकांपैकी काही नागारिक तरी भेट देतील. ते काही पुस्तके विकत घेतील. त्यांना नव्या पुस्तकांची ओळख होईल. अशाप्रकारे वाचन संस्कृती जोपासली जाईल. ग्रंथादालनाचे काम गतीने आणि गुणवत्तापूर्ण व्हावे. त्यासाठी अधिकार्‍यांनी लक्ष घालावे.
      साहित्यिक राजन गवस म्हणाले, मराठी भाषेच्या विकासासाठी ग्रंथदालनासारखा उपक्रम अतिशय महत्वाचा आहे. राज्यात इतरही अशा प्रकारची ग्रंथदालने उभारली जातील. ग्रंथदालनामुळे सामान्य माणसांपर्यंत पुस्तके पोहोचण्यास मदत होईल.
      यावेळी साहित्यिक कृष्णात खोत, सखा कलाल, प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार,जिल्हा पुरवठा अधिकारी संजय शिंदे, उपजिल्हाधिकारी सुभाष बोरकर आदी उपस्थित होते.

बुधवार, २१ मार्च, २०१२

शासकीय मुद्गणालयातील पदांच्या भरतीस स्थगिती

            कोल्हापूर दि. २१ : शासकीय मुद्गणालय व लेखन सामग्री भांडार, कोल्हापूर येथे वर्ग-४ मधील मजूर, पहारेकरी व सफाईगार पदासाठी २७ फेब्रुवारी २०१२ रोजीच्या दै. महासत्ता व दै. तरुण भारत या वृत्तपत्रात जाहिरात देण्यात आली होती. या जाहिरातीनुसार ज्या उमेदवारांनी अर्ज पाठविले आहेत व ज्यांना मुलाखतीसाठी पत्र प्राप्त झाली आहेत अशा सर्व उमेदवारांना कळविण्यात येते की, या पदांच्या भरतीस पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे दि. २५ मार्च २०१२ रोजीची लेखी परीक्षा व मुलाखत रद्द करण्यात आली आहे, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. याविषयीचा पुढील भरती कार्यक्रम यथावकाश जाहीर करुन प्रसिध्द करण्यात येईल, असे व्यवस्थापक, शासकीय मुद्गणालय व लेखनसामग्री भांडार, कोल्हापूर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

मंगळवार, २० मार्च, २०१२

आयटीआय, तंत्रनिकेतन व महा-ई-सेवा केंद्गातून बेरोजगार उमेदवारांनी व उद्योजकांनी नोंदणी करावी

         कोल्हापूर दि. २० : बेरोजगार उमेदवारांनी नाव नोंदणी, शैक्षणिक पात्रता, अनुभव, संपर्क व पत्ता बदलणे, नोंदणीचे नुतनीकरण, दुय्यम ओळखपत्र देणे, संपर्क व पत्ता बदलून औळखपत्र देणे याचबरोबर उद्योजकांकरिता नवीन आस्थापनेची नोंदणी करणे, ईआर-१ व ईआर-२ विवरणपत्रे सादर करणे या सेवा ३ जानेवारी २०१२ पासून अधिकृत महा-ई-सेवा केंद्गे, शासकीय आय. टी. आय., पॉलिटेक्नीक, इंजिनिअरिंग कॉलेजेस आदीमधून ऑनलाईन पध्दतीने सशुल्क उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत.
      यापुढे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तसेच इचलकरंजी शहरामध्ये प्रत्येक महिन्याच्या ठराविक तारखांना पंचायत समिती कार्यालयात होणारे फिरते नाव नोंदणी पथकाचे काम एप्रिल २०१२ पासून बंद करण्यात येत आहे. तरी कोल्हापूर जिल्ह्यातील उमेदवारांनी त्यांची नोंदणी सर्व शासकीय आय. टी. आय., शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय येथील केंद्गात तसेच मे. स्पॅन्को लि. या कंपनीच्या कोल्हापूर जिल्ह्यातील महा-ई-सेवा केंद्गात करावी. या नवीन सुरु केलेल्या रोजगारविषयक सशुल्क सेवांचा लाभ कोल्हापूर जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवार व उद्योजकांनी घ्यावा, असे आवाहन कोल्हापुरच्या जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्गाचे सहाय्यक संचालक गं. अ. सांगडे यांनी केले आहे.

मोटार सायकलसाठी २१ मार्चपासून नवीन मालिका

             कोल्हापूर दि. २० : मोटार सायकल (दुचाकी) वाहनाच्या नोंदणीकरिता एमएच-०९-सीएफ ही जुनी मालिका २० मार्च २०१२ पर्यंत संपणे अपेक्षित आहे. तद्‌नंतर प्रादेशिक परिवहन कार्यालय, कोल्हापूरमार्फत एमएच-०९-सीजी ही नवीन मालिका २१ मार्च २०१२ रोजी सुरु करण्यात येत असल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, कोल्हापूर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांचा कोल्हापूर दौरा कार्यक्रम

        कोल्हापूर दि. २० : गृह, ग्रामविकास आणि अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री सतेज पाटील २१ मार्च २०१२ रोजी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
      दि. २१ मार्च २०१२ रोजी सकाळी ७-२० वाजता मुंबईहून कोल्हापूर रेल्वे स्टेशन येथे आगमन व यशवंत निवास, कसबा बावडा, कोल्हापूरकडे प्रयाण. ७-३० वाजता यशवंत निवास येथे आगमन व राखीव. त्यानंतर कोल्हापूर येथील स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती. रात्रौ ८ वाजता कोल्हापूर रेल्वे स्टेशनकडे प्रयाण व ८-२३ वाजता महालक्ष्मी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण, असा त्यांचा दौरा कार्यक्रम आहे.

रविवार, १८ मार्च, २०१२

सुसंस्कृत समाज निर्मितीसाठीकायद्यांची माहिती आवश्यक - मुख्य न्यायदंडाधिकारी बी. सी. कांबळे

          कोल्हापूर दि. १८ : सुसंस्कृत समाज निर्मितीसाठी तसेच समाजाच्या हितासाठी व महिलांच्या कल्याणासाठी केंद्ग व राज्य शासनाने केलेल्या विविध कायद्यांची व योजनांची माहिती ग्रामस्थांनी करुन घेतली पाहिजे असे प्रतिपादन कोल्हापुरचे मुख्य न्यायदंडाधिकारी बी. सी. कांबळे यांनी आज तिसंगी येथे केले.
      गगनबावडा तालुका विधी सेवा समितीच्यावतीने तिसंगी गावांत बी. सी. कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली कायदेविषयक शिबीर घेण्यात आले, त्याप्रसंगी ते बोलत होते.
      प्रत्येकाला कायद्याची किमान माहिती व्हावी, तो माहितीविना वंचित राहू नये असे सांगून श्री. कांबळे म्हणाले, जमिनीच्या सात-बारा विषयी ग्रामस्थांनी जागरुक असले पाहिजे. यासाठी किमान वर्षातून एकदा तरी जमिनीचा सात-बारा उतारा काढायला हवा, म्हणजे त्यावरील नोंदीची कल्पना येते. महिलांनी कायद्याचा आपल्या भल्यासाठी वापर करावा.
      तृतीयपंथीयांचे हक्क कायद्याविषयी न्या. एस. एम. पाटील, माहितीचा अधिकार विषयी न्या. ए. बी. कुलकर्णी, महिलांचे हक्क संरक्षण कायद्याविषयी न्या. एच. एस. भोसले तसेच शासकीय लोककल्याणकारीयोजनाविषयी अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे आणि महिला व बालकांच्यासाठी असणार्‍या लोककल्याणकारी योजनांविषयी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संजय माने यांनी ग्रामस्थांना सोदाहरण माहिती देवून मार्गदर्शन केले.
      गटविकास अधिकारी जी. बी. सावंत यांनी ग्रामपातळीवर कायदेविषयक शिबीर आयोजित करण्यामागील उद्देश विशद केला. यावेळी आम आदमी योजनेंतर्गत लाभार्थींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. शाहीर रंगराव पाटील यांनी महिलांविषयी असणार्‍या योजनांची व कायद्यांची माहिती पोवाड्यातून सोप्या शब्दात करुन दिली. 
      कायदेविषयक शिबीरास तहसिलदार अजय पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत वसेकर, जिल्हा परिषद सदस्य भगवान पाटील, सरपंच आनंदराव पाटील, ग्रामपंचायतीचे सदस्य, ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. श्री. वाघरे यांनी आभार मानले तर संजय पाटील यांनी सूत्रसंचलन केले.