इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शुक्रवार, १३ एप्रिल, २०१२

कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांचा कोल्हापूर जिल्हा दौरा कार्यक्रम

       कोल्हापूर दि. १२ : कामगार आणि विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ १४ एप्रिल २०१२ रोजी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
      दि. १४ एप्रिल रोजी सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत कागल निवासस्थानी गाठीभेटी. ९ वाजता कागल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कार्यक्रमास उपस्थिती. ९-३० वाजता कागल स्टेडियमवर कागल प्रिमियर लिग लेदर बॉल क्रिकेट सामन्यांचे उद्‌घाटन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी १२ वाजता शासकीय विश्रामगृह, कागल येथे नविद मुश्रीफ व गडहिंग्लज आणि उत्तूर येथील कार्यकर्त्यांसमवेत चर्चा. १२-३० वाजता कोल्हापुरकडे प्रयाण. १ वाजता शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे आगमन व राखीव. सोयीनुसार कागलकडे प्रयाण व मुक्काम.
      दि. १५  एप्रिल  रोजी  सकाळी  ७-३० ते १०-३० वाजेपर्यंत कागल निवासस्थानी गाठीभेटी. १०-३० वाजता शासकीय विश्रामगृह, कागल येथे आणूर येथील कार्यकर्त्यांसमवेत बैठक. ११-३० वा. कोल्हापुरकडे प्रयाण. दुपारी १२ वा. शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे आगमन व राखीव. १ वाजता मोटारीने पुण्याकडे प्रयाण, असा त्यांचा दौरा कार्यक्रम आहे.

बुधवार, ११ एप्रिल, २०१२

प्रत्येक महिन्याच्या २१ तारखेस ग्राहक संरक्षण समिती बैठकीचे आयोजन

        कोल्हापूर दि. ११ : ग्राहक संरक्षण समितीची बैठक माहे एप्रिल २०१२ ते मार्च २०१३ अखेर प्रत्येक महिन्याच्या २१ तारखेस घेण्यात येणार आहे. जर २१ तारखेस सुट्टी असल्यास ही बैठक २२ तारखेस दुपारी १२ वाजता होईल असे जिल्हा पुरवठा अधिकारी, कोल्हापूर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

शहर व तालुक्यांसाठी माहे एप्रिलकरिता योजनानिहाय धान्य वाटप

         कोल्हापूर दि. ११ : कोल्हापूर जिल्ह्यातील शहरी आणि तालुक्यांसाठी एप्रिल २०१२ महिन्याकरिता खालीलप्रमाणे योजनानिहाय धान्य वाटप करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी, कोल्हापूर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे. योजनानिहाय मंजूर नियतन पुढीलप्रमाणे असून आकडे क्विंटलमध्ये आहेत.
        कोल्हापूर - नियमित बीपीएल- गहू १८४५, तांदूळ १३८८, नियमित एपीएल- गहू ८२१८, तांदूळ १४१३, नियमित अंत्योदय- गहू ७४४, तांदूळ ५४०, अतिरिक्त एपीएल- गहू- ४१०९, तांदूळ ७०५, करवीर - नियमित बीपीएल- गहू २५२०, तांदूळ १८९७, नियमित एपीएल- गहू ४९६६, तांदूळ ११२०, नियमित अंत्योदय- गहू ४४७, तांदूळ ३२५,अतिरिक्त एपीएल - गहू- २४८२, तांदूळ ४२७, पन्हाळा- नियमित बीपीएल- गहू २७६४, तांदूळ २०८१, नियमित एपीएल- गहू १८४८, तांदूळ ३१७, नियमित अंत्योदय- गहू ९८८, तांदूळ ७१५, अतिरिक्त एपीएल- गहू- ९२४, तांदूळ १६०, हातकणंगले - नियमित बीपीएल- गहू ३५२१, तांदूळ २६५०, नियमित एपीएल- गहू ४८२७, तांदूळ ८३०, नियमित अंत्योदय- गहू १०६०, तांदूळ ७६८, अतिरिक्त एपीएल - गहू- २४१३, तांदूळ ४१५, इचलकरंजी - नियमित बीपीएल- गहू २०६०, तांदूळ १५५१, नियमित एपीएल-गहू ३५४५, तांदूळ ६११, नियमित अंत्योदय- गहू  ९३८, तांदूळ  साठा  शिल्लक  आहे, अतिरिक्त  एपीएल - गहू - १७७२, तांदूळ ४३७, शिरोळ - नियमित बीपीएल- गहू २७३८, तांदूळ २०६१, नियमित एपीएल- गहू ३७६७, तांदूळ ६४७, नियमित अंत्योदय-  तांदूळ १००९, तांदूळ साठा शिल्लक आहे, अतिरिक्त एपीएल - गहू- १८८४, तांदूळ ३२४, कागल - नियमित बीपीएल- गहू ३०९१, तांदूळ २३२८, नियमित एपीएल- गहू २४०५, तांदूळ ४१३, नियमित अंत्योदय- गहू ९४९, तांदूळ ६८९, अतिरिक्त एपीएल - गहू- १२०३, तांदूळ २०६, शाहूवाडी- नियमित बीपीएल- गहू १९४०, तांदूळ १४६०, नियमित एपीएल- गहू १७८५, तांदूळ ३०७, नियमित अंत्योदय- गहू ७५६, तांदूळ ५४८, अतिरिक्त एपीएल - गहू- ८९३, तांदूळ १५३, गगनबावडा- नियमित बीपीएल- गहू १९०, तांदूळ १४३, नियमित एपीएल- गहू २८०, तांदूळ ४८, नियमित अंत्योदय- गहू २०९, तांदूळ १५१, अतिरिक्त एपीएल - गहू- १४०, तांदूळ २३, राधानगरी - नियमित बीपीएल- गहू २३२३, तांदूळ १७५०, नियमित एपीएल- गहू १८७०, तांदूळ ३२१, नियमित अंत्योदय- गहू ९२६, तांदूळ ६७०, अतिरिक्त एपीएल - गहू- ९३५, तांदूळ १६०, गडहिंग्लज- नियमित बीपीएल- गहू २०५७, तांदूळ १५४९, नियमित एपीएल- गहू २४१५, तांदूळ ४१५, नियमित अंत्योदय- गहू १३८९, तांदूळ १००६, अतिरिक्त एपीएल - गहू - १२०८, तांदूळ २०७, आजरा - नियमित  बीपीएल - गहू १०१३, तांदूळ ७६३२, नियमित एपीएल- गहू १०८२, तांदूळ १८६, नियमित अंत्योदय- गहू ८८६, तांदूळ ६४०, अतिरिक्त एपीएल - गहू - ५४१, तांदूळ ९२, चंदगड - नियमित बीपीएल- गहू १६६५, तांदूळ १२५३, नियमित एपीएल- गहू १५४४, तांदूळ साठा शिल्लक आहे, नियमित अंत्योदय- गहू ११७२, तांदूळ ८४७, अतिरिक्त एपीएल - गहू- ७७२, तांदूळ साठा शिल्लक आहे, भुदरगड - नियमित बीपीएल- गहू २०१३, तांदूळ १५१६, नियमित एपीएल- गहू १५२८, तांदूळ २६२, नियमित अंत्योदय- गहू ८१७, तांदूळ ५९१, अतिरिक्त एपीएल - गहू- ७६४,तांदूळ १३१.

नवीन घाऊक साखर नॉमिनी परवान्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

     कोल्हापूर दि. ११ : कोल्हापूर शहर परिसरासाठी व तालुक्यांसाठी शासन निर्णयातील मार्गदर्शक तत्वानुसार नवीन अतिरिक्त घाऊक साखर नॉमिनी परवाना द्यावयाचा आहे. तरी नवीन घाऊक साखर नॉमिनी परवान्यासाठी ज्यांना अर्ज करावयाचा असेल त्यांनी संबंधित तहसिलदार कार्यालयात दि. २६ एप्रिल २०१२ पर्यंत अर्ज करावेत. मुदतीनंतरचे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, असे जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
       कोल्हापूर शहर, करवीर, पन्हाळा, गगनबावडा, शाहुवाडी, आजरा, चंदगड, इचलकरंजी शहर, भुदरगड, कागल आणि गडहिंग्लज  तालुक्यासाठी नवीन घाऊक नॉमिनी मंजूर करावयाचे आहेत. शासन पत्र दि. ९ ऑक्टोबर २००१ मध्ये दिलेली प्राधान्य सूची खालीलप्रमाणे आहे.
       सहकारी क्षेत्रातील तालुका खरेदी विक्री संघ, अनुसूचित जाती/जमाती सदस्यांच्या सहकारी संस्था, जिल्हास्तरीय घाऊक सहकारी ग्राहक संस्था, इतर सहकारी संस्था, स्वातंत्र्य सैनिकांची विधवा पत्नी अथवा माजी सैनिकांची विधवा पत्नी, इतर महिला, माजी सैनिक, अपंग व्यक्ती आणि इतर व्यक्ती अशी प्राधान्य सूची आहे.
       अर्जातील अटी पुढीलप्रमाणे आहेत. केंद्ग शासनाने नियतन केलेल्या नियंत्रित साखरेची उचल करुन वाटपासाठी राज्यातील, जिल्ह्यातील कोणत्याही कारखान्याच्या गोदामातून तालुक्यामधील मध्यवर्ती ठिकाणच्या स्वतःच्या गोदामापर्यंत लेव्ही साखर उचल करणे आवश्यक आहे. लेव्ही साखर आणण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सबळ म्हणजेच किमान २० ते २५ लाखाचे आर्थिक स्थिती दाखविणारा बँकेचा चालू तारखेचा दाखला जोडणे आवश्यक, मंजूर झालेल्या नॉमिनीस प्रथम साखर कारखान्याचा एक्स फॅक्टरी दराप्रमाणे डी. डी. ची रक्कम गुंतवावी लागेल. ज्या जागेत घाऊक वितरण करण्यात येणार आहे त्या जागेचा चालू प्रॉपर्टी कार्डाचा उतारा अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. अर्जदार व्यतिरिक्त / जागा इतरांचे मालकीची असेल तर अर्जदारांनी जागा मालकाचे शंभर रुपये स्टॅम्पपेपरवर मालकाचे संमतीपत्र सक्षम अधिकारी यांचे समोर करुन जोडणे आवश्यक आहे. निवड केलेल्या जागेत घाऊक साखर नॉमिनी म्हणून साठा करण्यास ग्रामपंचायत/नगरपालिका ना हरकत दाखला आवश्यक असून तो सोबत जोडला पाहिजे. ज्या जागेत घाऊक साखर नॉमिनी म्हणून साठा करणार ती जागा चिन्हांकित दाखविणे आवश्यक असून समजुतीच्या नकाशावर अर्जदार यांची स्वाक्षरी आवश्यक आहे. कोणत्याही कारखान्यातून साखर वाहतूक ठेकेदार आपले गोदामामध्ये साखर वाहतूक करतील त्यांना आलेल्या वाहतुकीची रक्कम द्यावी लागेल. साखर गोदामात साठा केल्यानंतर जिल्हाधिकारीयांच्याकडून विहित केलेल्या दराने तहसिलदार यांच्याकडून दिलेल्या परमिटप्रमाणे रास्त भाव दुकानदार यांना साखर देण्याची आहे. साखर विक्रीबाबत नमुन्यात दिलेली रजिस्टर व पावत्या ठेवणे आवश्यक राहील. या कार्यालयाकडून मंजूर होणारा कोठा दि. ५ पूर्वी ८० टक्के व उर्वरित दि. १० पर्यंत प्रत्येक महिन्यात उचल करावा  लागेल.  साखर  उचल  विक्री  याबाबतचे  लेखे  सादर  केल्यानंतर  ९०  टक्के  रक्कम  या कार्यालयाकडून व १० टक्के रक्कम शासन स्तरावरुन मंजूर झाल्यानंतर देणे अनुज्ञेय राहील. प्रति क्विंटल रु. २३.६० किंवा शासनाने सुधारणा केल्यास या दराने मार्जिन म्हणून रक्कम दिली जाईल. तसेच विक्री होऊन येणारी दर फरकाची येणे / देणे रक्कमा शासन नियमाप्रमाणे प्रतिपूर्ती करण्यात येईल. नियंत्रित साखर साठा करण्यासाठी विमा उतरविण्याची जबाबदारी नॉमिनीवर राहील. त्यासाठी शासनाकडून कोणत्याही प्रकारची प्रतिपूर्ती केली जाणार नाही. पोलीस अधिक्षक यांचा दंड दोष झाले नसल्याबाबत ना हरकत प्रमाणपत्र, सहकारी संस्थेच्याबाबत जिल्हा निबंधक यांच्याकडून घेतलेले रजिस्टर प्रत, ऑडीट इत्यादी कागदपत्रांची छायांकित प्रत असणे आवश्यक आहे. नियंत्रित साखर विक्री फक्त रास्त भाव दुकानदार यांचेच परमिटवर करता येईल, इतरांना वाटता येणार नाही. नियंत्रित साखरेचे नियतन जिल्हाधिकारी / शासन मंजूर आदेशाप्रमाणे राहील. अप्पर जिल्हाधिकारी / शासनाने घालून दिलेल्या अटींचा भंग झाल्यास परवाना रद्द करण्यात येईल. या कार्यालयाकडून नियुक्त केलेल्या साखर वाहतूक ठेकेदाराकडूनच साखर उचल करावी लागेल. घाऊक नॉमिनी म्हणजे साठा करणे, विक्री करणे असे कामाचे स्वरुप राहील. अर्ज मंजूरीचा आदेश हा शासनाने ठरविलेल्या अग्रक्रमानुसार राहील असेही प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांचा कोल्हापूर दौरा कार्यक्रम

      कोल्हापूर दि. ११ : गृह, ग्रामविकास आणि अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री सतेज पाटील १२ एप्रिल २०१२ रोजी कोल्हापूर दौर्‍यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
      गुरुवार दि. १२ एप्रिल २०१२ रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत यशवंत निवास, कसबा बावडा, कोल्हापूर येथे राखीव. सायं. ६ ते ८ वाजेपर्यंत विहार कॉर्नर कार्यालय येथे राखीव. रात्रौ ८ वाजता यशवंत निवास, कसबा बावडा, कोल्हापूर येथे राखीव व मुक्काम, असा त्यांचा दौरा कार्यक्रम आहे.

अनैतिक मानवी वाहतुकीला आळा घालण्यास व्यापक समाज प्रबोधनाची आवश्यकता जिल्हा पोलीस अधिक्षकांचे प्रतिपादन

कोल्हापूर दि. ११ : अनैतिक मानवी वाहतुकीला आळा घालण्यासाठी अनैतिक वाहतूक (प्रतिबंध) अधिनियमाची व्यापक पातळीवर प्रसिध्दी होण्याची आणि समाज प्रबोधनाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक विजयसिंह जाधव यांनी आज येथे केले.
अनैतिक वाहतूक प्रतिबंध कायदा १९५६ अंतर्गत जिल्हा महिला आणि बाल विकास कार्यालयाच्यावतीने आज एक दिवसाची कार्यशाळा पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
श्री. जाधव म्हणाले, अनैतिक वाहतूक (प्रतिबंध) अधिनियम १९५६ नुसार मानवी वाहतूक करणार्‍यांना कडक शिक्षेची तरतूद आहे. पण हा प्रश्न केवळ कायद्याने आणि त्याच्या अंमलबजावणीने सुटणारा नाही. त्यासाठी व्यापक समाज प्रबोधनाची आवश्यकता आहे. पोलीस, सामाजिक संस्था, समाजातील विविध घटक यांनी हा अनिष्ट प्रकार थांबविण्यासाठी पुढे येणे, संघटित होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर या प्रश्नांची समाजाच्या वेगवेगळ्या व्यासपीठावर याबाबत चर्चा होण्याची आवश्यकता आहे. अनैतिक वाहतूक बंद होण्यासाठी समाजाचं पाठबळ मिळणंही आवश्यक आहे.
सेव्ह द चिल्ड्रन इंडियाचे समन्वयक प्रविण कदम यांनी लैंगिक शोषणाकरिता होणारी मानवी वाहतूक याबाबत संकल्पना स्पष्ट केली. यासाठी त्यांनी लघुपटाद्वारे सादरीकरण केले.
      जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संजय माने यांनी प्रास्ताविक आणि पाहुण्यांचे स्वागत केले. परिविक्षा अधिकारी बी. जी. काटकर यांनी सूत्रसंचलन केले. दिवसभराच्या या कार्यशाळेत मुंबईच्या रेस्कू फाऊंडेशनचे अ‍ॅड. हरिष भंडारी यांनी अनैतिक वाहतुकीला बळी पडलेल्या व्यक्तींची सुटका, काळजी आणि संरक्षण याबाबत माहिती दिली. बाल कल्याण समितीचे माजी अध्यक्ष सतीश पाटील यांनी बाल न्याय (बालकांची काळजी आणि संरक्षण) अधिनियम यांच्यामधील संबंध आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना यावर मार्गदर्शन केले.

मंगळवार, १० एप्रिल, २०१२

कोल्हापुरात १५ एप्रिलला मेगा लोकअदालतचे आयोजन

कोल्हापूर दि. १० : मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, कसबा बावडा रोड, कोल्हापूर येथे १५ एप्रिल २०१२ रोजी सकाळी १०-३० वाजता मेगा लोकअदालत आयोजित करण्यात आली आहे. मेगा लोकअदालतमध्ये एक पॅनेल ठेवण्यात आलेले असून संबंधितांनी या अदालतचा लाभ घ्यावा असे आवाहन कोल्हापुरचे मुख्य न्यायदंडाधिकारी बी. सी. कांबळे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

सोमवार, ९ एप्रिल, २०१२

रणजित देसाई यांच्या स्मारकासाठी राज्य शासन प्रयत्नशील : पाटील

        कोल्हापूर दि. ९ : थोर साहित्यिक रणजित देसाई यांचे कोवाड येथे स्मारक उभारण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करेल. त्यासाठीचा आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जातील, अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी कोवाड (ता. चंदगड) येथे दिली.
      रणजित देसाई यांची ८५ वी जयंती आणि सार्वजनिक ग्रंथालयाचा दहावा वर्धापन दिन या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. कोवाड येथील श्रीराम विद्यालयाच्या प्रांगणात रविवारी सायंकाळी हा कार्यक्रम झाला.
      श्री. पाटील म्हणाले, रणजित देसाई यांनी श्रीमान योगी, स्वामी, राधेय यासारख्या आपल्या साहित्यकृतींनी मराठी साहित्याचे दालन समृद केले आहे. त्यांच्या लिखाणामुळे मराठी साहित्याचे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव झाले. त्यांचं कोवाड येथे उचित स्मारक झालं पाहिजे, अशी माझी इच्छा आहे. त्यासाठी राज्य शासन सकारात्मक पावले उचलेल. स्मारकाचा आराखडा कसा असावा, त्याची रचना कशी असावी याबाबतचा विचार करण्यासाठी राज्याच्या कला संचालनालयास सांगण्यात येईल.
      यंदाचे वर्ष महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. यशवंतराव चव्हाण साहित्यिक, कलाकार यांना कायमच आदराचे स्थान देत असत. त्यांचे ते धोरण राज्य शासनाने पुढे सुरु ठेवले आहे, असे सांगून श्री. पाटील म्हणाले, राज्य शासनाने मराठी भाषेच्या विकासासाठी स्वतंत्र मराठी भाषा विभाग सुरु केला आहे. या विभागाच्या माध्यमातून मराठी संवर्धनासाठी राज्य शासनाचे कार्य सुरु आहे.
      यावेळी व्यासपीठावर सरपंच मारुती कांबळे, सौ. पारु नाईक, मधुमती शिंदे, विजयकुमार दळवी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश डोके, उप मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने, गडहिंग्लजच्या प्रांताधिकारी निलीमा धायगुडे, चंदगडचे तहसिलदार शिवाजीराव तळपे आदी उपस्थित होते.
      यावेळी डॉ. रमाकांत जोशी यांनी लिहिलेल्या गंध आठवणींचा या पुस्तकाचे पंडीत राहुल देशपांडे  यांच्या  हस्ते  प्रकाशन झाले.  कार्यक्रमानंतर पंडीत राहुल देशपांडे यांच्या गायनाचा कार्यक्रम झाला.

शनिवार, ७ एप्रिल, २०१२

पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांचा कोल्हापूर जिल्हा दौरा कार्यक्रम

       कोल्हापूर दि. ७ : सहकार व संसदीय कार्य तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ९ एप्रिल २०१२ रोजी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
      दि. ९ एप्रिल २०१२ रोजी पुणे येथून सकाळी ८-१५ वाजता खाजगी हेलिकॉप्टरने चिप्री, ता. शिरोळ येथे आगमन व मोटारीने नृसिंहवाडीकडे प्रयाण. ८-३० वाजता नृसिंहवाडी येथे आगमन व राखीव. ११-४५ वाजता नृसिंहवाडी येथून मोटारीने चिप्री येथील हेलिपॅडकडे प्रयाण. दुपारी १२ वाजता खाजगी हेलिकॉप्टरने मुंबईकडे प्रयाण, असा त्यांचा दौरा कार्यक्रम आहे.

कृषी-उद्योगाच्या माध्यमातून विकासाचे आनंदराव पाटील यांच्याकडून कार्य राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांचे गौरवोद्‌गार

       कोल्हापूर दि. ७ : महाराष्ट्राचे शिल्पकार आणि माजी मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या कृषी औद्योगिक धोरणातून राज्याचा विकास साधण्याचे स्वप्न गोकुळ दुध संघाने आणि आनंदराव पाटील चुयेकर यांनी साकार केले आहे, असे गौरवोद्‌गार त्रिपुराचे राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांनी आज येथे काढले.
      कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे संस्थापक आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्त आयोजित सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. दुध उत्पादक संघाच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयाच्या आवारात हा कार्यक्रम झाला. प्रमुख पाहुणे म्हणून दुग्धविकास मंत्री मधुकरराव चव्हाण उपस्थित होते. यावेळी सहकार व संसदीय कार्य तथा कोल्हापूरचे पालकमंत्री हर्षवर्धन पाटील, कामगार मंत्री हसन मुश्रीफ, गृह राज्यमंत्री सतेज पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.
      राज्यपाल म्हणाले, कृषी उद्योगाच्या विकासातून राज्याचा विकास साधण्याचे यशवंतराव चव्हाण यांनी धोरण आखले होते. त्यांचे हे धोरण गोकुळने प्रत्यक्षात उतरवून दाखवले. त्यासाठी आनंदराव पाटील यांनी अतिशय परिश्रम घेतले. गोकुळमुळे जिल्ह्यातील अनेक गावांत विकासाची गंगा वाहत आहे.
पालकमंत्री पाटील म्हणाले, गोकुळमुळं महाराष्ट्राचं नाव देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर गेले. दुग्धव्यवसाय हा समाजातील कोणत्याही स्तरातील व्यक्ती करु शकतो. या व्यवसायामुळं कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावात सामाजिक आणि आर्थिक क्रांती घडली आहे.
      दुग्धविकास मंत्री मधुकरराव चव्हाण म्हणाले, गोकुळन शेतकर्‍यांच्या जीवनात क्रांती घडवली आहे. यापुढे गोकुळच्या विकासासाठी सर्वते सहकार्य करु.
      कामगार मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, गोकुळ आणि आनंदराव पाटील यांनी शेतकर्‍याला केंद्गबिंदू मानून काम केले. म्हणूनच आज गोकुळ आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला आहे.
      गृह राज्यमंत्री सतेज पाटील म्हणाले, आनंदराव पाटील चुयेकर यांच्या सहकारातील अनुभवाचा फायदा शासनाने घ्यायला हवा. त्यांनी सहकार क्षेत्रासाठी केलेले कार्य अतुलनीय आहे.
      यावेळी आमदार के. पी. पाटील, आमदार महादेवराव महाडिक यांचीही भाषणे झाली.
      यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रा. संजय मंडलिक, खासदार जयवंतराव आवळे, आमदार सर्वश्री. सा. रे. पाटील, के. पी. पाटील, चंद्गदीप नरके, सुजित मिणचेकर, महादेवराव महाडिक, चंद्गकांतदादा पाटील, पी. एन. पाटील आदी उपस्थित होते.
      यावेळी माजी खासदार उदयसिंहराव गायकवाड, कल्लाप्पाण्णा आवाडे, श्रीमती निवेदिता माने, माजी आमदार संजय घाटगे, गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण नरके, माजी आमदार नामदेवराव भोईटे, बी. एन. पाटील-मुगळीकर आदी उपस्थित होते.
      प्रास्ताविक गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी केले. आभार संचालक विश्वास पाटील यांनी मानले.

बोरबेट येथे आज कायदेविषयक शिबीर

         कोल्हापूर दि. ७ : सामान्य नागरिकांना कायद्याची माहिती व्हावी यासाठी गगनबावडा तालुक्यातील बोरबेट येथे ८ एप्रिल २०१२ रोजी सकाळी १०-३० वाजता कायदेविषयक शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
      कोल्हापुरचे मुख्य न्यायदंडाधिकारी बी. सी. कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली शिबीर होत आहे. यावेळी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना या विषयावर विस्तार अधिकारी (कृषि) एम. एस. शिनगाडे, महसूल अभिलेख विषयी गगनबावड्याचे नायब तहसिलदार ए. टी. गुरव, मालमत्ता हस्तांतरण कायदा विषयी न्या. डी. व्ही. कुटे आणि विधी सेवा प्राधिकरण विषयी न्या. एस. एन. शिंदे मार्गदर्शन करणार आहेत.
      या कायदेविषयक शिबीराचा गगनबावडा तालुकावासियांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

राज्य मागासवर्ग आयोगाची कोल्हापुरात बैठक संपन्न

      कोल्हापूर दि. ७ : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. आयोगाचे सदस्य डॉ. प्रा. नागोराव कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस सदस्य सर्वश्री प्रा. जवाहर चरडे, प्रा. न. मा. जोशी, हाजी शौकतभाई तांबोळी, कैलास गौड आणि अ‍ॅड. पल्लवी रेणके उपस्थित होते.
      प्रथम आयोगाचे सदस्य सचिव दिलीप स्वामी यांनी सर्व सदस्यांचे स्वागत केले. आयोगाचे अध्यक्ष न्या. बी. पी. सराफ हे बैठकीस उपस्थित राहू न शकल्याने प्रा. नागोराव कुंभार यांनी बैठकीचे अध्यक्षस्थान भूषविले. बैठकीत विविध विषयावर चर्चा झाली.
      बैठकीच्या अखेरीस प्रा. कुंभार यांनी विविध जातींच्या मागण्यांची निवेदने स्वीकारली. बैठकीस विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी विजयकुमार गायकवाड आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.