इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शुक्रवार, २९ जून, २०१२

शेतीच्या शाश्वत विकासासाठी ऊस पाचट अभियान उपयुक्त राज्यमंत्री सतेज पाटील यांचे प्रतिपादन

कोल्हापूर , दि. २९ - ऊस पाचट अभियान शेतीच्या शाश्वत विकासासाठी अतिशय उपयुक्त आहे. शेतीच्या क्षेत्रात या अभियानासारखे नाविन्यपुर्ण प्रयोग राबवायला हवेत, असे प्रतिपादन गृह, ग्राम विकास, राज्यमंत्री सतेज पाटील यांनी आज येथे केले.
जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाच्या वतीने जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या ऊस पाचट अभियानात सहभागी झालेल्या आणि विमान प्रवासाची संधी लाभलेल्या शेतकरी दांपत्यांचा आज सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. येथील दसरा चौकात हा कार्यक्रम झाला.
जिल्हा कृषी कार्यालयाच्या वतीने ऊस पाचट अभियान राबविण्यात आले. त्यात जिल्ह्यातील सुमारे ६० टक्के ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी सहभाग घेतला. या अभियानात सहभागी होणार्‍या शेतकर्‍यांतून लकी ड्रॉच्या सहाय्याने प्रत्येक तालुक्यातील दोन याप्रमाणे चोवीस दांपत्यांना पुणे-बंगळूर विमान प्रवास करण्याची संधी मिळाली आहे. आज सकाळी हे शेतकरी आणि कृषी विभागाचे अधिकारी पुण्याला रवाना झाले. त्यावेळी त्यांच्या बसला मंत्री पाटील यांच्या हस्ते ध्वज दाखविण्यात आला.
श्री. पाटील यांनी सांगितले की, धकृषीच्या क्षेत्रात नवनवीन प्रयोग होण्याची आवश्यकता आहे. ऊस पाचट अभियान हा असाच एक महत्वाचा प्रयोग आहे.  शेत मालाचा उत्पादन खर्चात कपात करणार्‍या, पाणी, वीज आणि खताची  बचत करणार्‍या या अभियानामुळे शेती किफायतशीर होण्यास मदत  होणार आहे. या अभियानात आधिक आधिक शेतकर्‍यांनी सहभागी व्हायला हवधे.
यावेळी श्री. पाटील यांच्या हस्ते शेतकर्‍यांचा फेटा आणि गुलाब फुल देउन  सत्कार करण्यात आला. विमान प्रवास करण्याची संधी मिळणार या बाबीने सर्वच शेतकर्‍यांत उत्साह होता. श्री. पाटील यांनीही शेतकर्‍यांशी संवाद साधला. त्यामुळे शेतकर्‍यांचा उत्साह आधिकच दुणावला.
विजेते ठरलेले शेतकरी आज पुण्याकडे रवाना झाले. तेथून ते विमानाने बंगळूरला रवाना होतील. बंगऴूरला एक दिवसाच्या मुक्कामानंतर हे शेतकरी रविवारी कोल्हापूरला परत येतील, असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी उमेश पाटील यांनी सांगितले. पाचट अभियान यशस्वी करण्यासाठी उपसंचालक सुधर्म जामसांडेकर, व्ही.बी. जाधव, एस.पी. बेंदगुडे, आर.एस. रानगे, अतुल जाधव, प्रकाश देसाई, एकनाथ माने, के.एम.बागवान,विजय धुमाळ, एम.व्ही.  लाटकर आदींनी संयोजन केले.

गुरुवार, २८ जून, २०१२

जिल्हा वार्षिक योजनेतून 21 लाख रुपयांचा निधी काविळवरील औषध खरेदीसाठी पालकमंत्री पाटील यांचा निर्णय


कोल्हापूर. दि. 28: कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील काविळीची साथ आटोक्यात आणण्यासाठी करावयाच्या उपाययोजना व औषध खरेदीसाठी सहकार, संसदीय कार्य तथा पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी जिल्हा वार्षिक योजनेतून 21 लाख रुपयांचा निधी खास बाब म्हणून उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. 
       काविळीची साथ आटोक्यात आणण्यासाठी मंत्रालय, मुंबई येथे बैठक झाली.  पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या जिल्हा वार्षिक योजनेतून खास बाब म्हणून निधी उपलब्ध करण्याच्या सूचना दिल्या. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी आप्पासाहेब धुळाज यांनी सदरच्या प्रस्तावास तातडीने प्रशासकीय मान्यता दिली. तसेच हा निधी जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर यांच्या नांवे प्राधिकारपत्राव्दारे वितरीत केलेला आहे असे जिल्हा नियोजन अधिकारी बी. जे. जगदाळे यांनी सांगितले.
       या निधीतून काविळीची लागण झालेल्या रुग्णांना तातडीचे आषध उपचार करता यावेत यासाठी हा निधी औषधे खरेदी करण्यासाठी वापरावा, अशा सूचना जिल्हाधिकारी धुळाज यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांना पत्राव्दारे दिल्या आहेत.

गडहिंग्लजच्या मेळाव्यातून मिळाली तीनशे युवकांना रोजगाराची संधी

कोल्हापूर दि.27 : आजरा, गडहिंग्लज आणि चंदगड या तीन तालुक्यातील सुमारे तीनशे युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध झाली. जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्गाने आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यामुळे तीनशे युवक-युवतींच्या जीवनाला आशेचा किरण मिळाला.
जिल्हा रोजगार आणि स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्गाने 24 जून 2012 रोजी जागृती हायस्कूल व ज्युनि. कॉलेज गडहिंग्लज येथे रोजगार मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात जिल्ह्यातील नामवंत 18 खाजगी कंपन्या सहभागी झाल्या होत्या. एकूण 612 उमेदवारांपैकी 582 तांत्रिक/अतांत्रिक पदांच्या  मुलाखतीत 302 उमेदवारांची निवड झाली. यामध्ये बहुतांशी युवक-युवती आजरा, गडहिंग्लज आणि चंदगड तालुुक्यातील आहेत.
सध्या अनेक कंपन्या कुशल मनुष्यबळाच्या शोधात असतात आणि अनेक तरुणांना संधी मिळत नाही. अशा युवक-युवतींना रोजगाराची संधी मिळावी, यासाठी असे रोजगार मेळावे आयोजित केले जातात. या तीन तालुक्यातील तरुणांना संधी मिळावी, या उद्देशाने येथे रोजगार मेऴावा, आयोजित केला. जिल्ह्याच्या विविध भागात अशा प्रकारचे रोजगार मेळावे आयक्षेजित केले जाणार असल्याचे, जिल्हा रोजगार आणि स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्गाचे सहाय्यक संचालक जी. ए. सांगडे यांनी सांगितले. या मेळाव्यासाठी इंडो काऊंट, रेमंड झांबायती, सोक्टास इंडिया, वेस्ट एंड फॅशन्स, डीएमई इंडस्ट्रीज, शांताराम मशिनरीज, मेनन- मेनन, एस.बी.रिसेलर्स, युरोटेक्स इंडस्ट्रीज, अरविंद काटस्पिन आदी कंपन्या सहभागी झाल्या होत्या.
रोजगार मेळाव्याचे दिप प्रज्वलन करुन उद्‌घाटन गडहिंग्लजच्या विद्या प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती रत्नमाला घाळी यांनी केले. यावेळी भगवानगिरी महाराज अध्यक्षस्थानी होते, गडहिंग्लजचे प्रभारी गट विकास अधिकारी एल. एस. पाच्छापूरे, जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्गाचे सहाय्यक संचालक जी. ए. सांगडे, जागृती हायस्कूल व ज्युनि. कॉलेज गडहिंग्लजचे प्राचार्य एस. जी. वाली आदि उपस्थित होते.

काविळीची साथ पसरु नये यासाठी काटेकोर नियोजन करा -- विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख

कोल्हापूर, दि. 26 - काविळीची साथ पसरु नये यासाठी काटेकोर नियोजन करा आणि त्याची पूर्ण अंमलबजावणी करा, असे आदेश विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी आज जिल्ह्यातील सर्व संबंधित अधिकार्‍यांना दिले.
काविळीच्या साथीवर केलेली उपाययोजना आणि साथ पसरु नये यासाठी केलेला आराखडा याचा आढावा घेण्यासाठी श्री. देशमुख यांनी आज जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद आणि कोल्हापूर महानगरपालिका यांच्या अधिकार्‍यांची संयुक्त बैठक घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयातील शिवाजी सभागृहात झालेल्या या बैठकीस प्रभारी जिल्हाधिकारी आप्पासाहेब धुळाज, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, महापालिका आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार आदी उपस्थित होते.
श्री. देशमुख यांनी इचलकरंजी नगरपालिका, जिल्ह्यातील इतर नगरपालिका आणि ग्रामीण भागात काविळीचे किती रुग्ण आहेत, त्यापैकी किती गंभीर आहेत आणि त्यांच्यावर कोणत्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत याबाबत माहिती दररोज मिळायला हवी ही कार्यवाही जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी एकत्रित करुन पाठवायला हवी, असे सांगितले.
इचलकरंजीतील काविळीची साथ प्रामुख्याने दूषित पाण्यामुळे झालेली आहे त्यामुळे नदीच्या पात्रात दुषित पाणी जाणार नाही याची काळजी घ्यायला हवी. याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठोस कार्यवाही करायला हवी, असे श्री. देशमुख यांनी सांगितले. कोल्हापूर महानगरपालिकेने दूषित पाण्यावर प्रक्रीया करण्यासाठी प्रकल्प उभारण्यास प्राधान्य द्यायला हवे. पाणी आणि आरोग्य याबाबींना प्राधान्य देवून महानगरपालिकेने काम करावे, असे श्री. देशमुख यांनी आयुक्त बिदरी यांना सांगितले. जे कारखाने नदीपात्रात सांडपाणी प्रक्रीया न करता सोडतात त्यांच्यावर ठोस कारवाई करा असे आदेश त्यांनी यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्‍यांना दिले.
शतकोटी वृक्ष लागवडीबाबतही श्री. देशमुख यांनी यावेळी आढावा घेतला. साखर कारखाने, शैक्षणिक संस्था, देवस्थानच्या जमिनी, गृहनिर्माण संस्था, शासकीय कार्यालये यांच्या परिसरात वृक्ष लागवडीसाठी नियोजन करा, वृक्ष लागवडीसाठी ग्रामस्थ, महाविद्यालयीन विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था यांना सहभागी करुन घ्या, वृक्ष लागवड करण्याचे प्रशिक्षणही सर्व संबंधितांना द्या अशा सूचना श्री. देशमुख यांनी दिल्या. यावेळी सर्व गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ, कोल्हापूर महानगरपालिकेचे अधिकारी, जिल्हा परिषदेचे अधिकारी उपस्थित होते.

शाहू जन्मस्थळाचा विकास नियोजित वेळेत पूर्ण करणार गृह राज्यमंत्री सतेज पाटील:राजर्षी शाहू जयंती विविध उपक्रमांनी साजरी


कोल्हापूर, दि. 26 - राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मस्थळाचा विकास नियोजित वेळेत पूर्ण होण्याकडे लक्ष दिले जाईल. त्यासाठी दरमहा बैठक घेतली जाईल, असे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी आज येथे सांगितले.
     राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त कसबा बावडा येथील लक्ष्मी विलास पॅलेस या शाहू जन्मस्थळी गृह राज्यमंत्री सतेज पाटी यांच्या उपस्थितीत अभिवादन सोहळा संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.
श्री. पाटील यांनी सांगितले, शाहू जन्मस्थळ विकास आणि जतनाचे काम दर्जेदार व्हावे, तसेच ते नियोजित वेळेत पूर्ण व्हावे याकडे जातीने लक्ष घालणार आहे. त्यासाठी प्रत्येक महिन्यात शाहू जन्मस्थळ विकास आणि जतन समितीची बैठक घेण्यात येईल. त्याचबरोबर समितीचे सर्व सदस्य आणि शाहूप्रेमी नागरिकांनीही हे काम गतीनं व्हावं यासाठी प्रयत्नशील रहावे. श्री. पाटील यांनी यावेळी वास्तुविशारद अमरजा निंबाळकर तसेच पुरातत्व विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्याकडून झालेल्या विकास कामाची माहिती घेतली व पाहणी केली. स्मारकाच्या स्वागत कमान उभारणी करण्यासंदर्भात कृषि विभागाशी चर्चा केली जाईल. तसेच महानगरपालिकेच्या विकास आराखड्यात आवश्यक ते बदल करुन घेतले जातील असेही श्री. पाटील यांनी सांगितले.
तत्पुर्वी गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रा. संजयसिंह मंडलिक,महापौर कादंबरी कवाळे, विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, प्रभारी जिल्हाधिकारी आप्पासाहेब धुळाज, विशेष पोलीस महानिरीक्षक तुकाराम चव्हाण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक म्हैसेकर, महापालिकेच्या आयुक्त  विजयालक्ष्मी बिदरी, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. एन. जे. पवार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार, वसंतराव मुळीक, नगरसेवक तसेच शाहूप्रेमी नागगरिक व विद्यार्थ्यांनीही शाहूंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांच्याकडून शाहू पुतळयास अभिवादन
      दरम्यान गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी दसरा चौकातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
      याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रा. संजयसिंह मंडलिक, महापौर कादंबरी कवाळे, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, उपमहापौर दिगंबर फराकटे, विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, प्रभारी जिल्हाधिकारी आप्पासाहेब धुळाज, विशेष पोलीस महानिरीक्षक तुकाराम चव्हाण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक म्हैसेकर, महापालिकेच्या आयुक्त  विजयालक्ष्मी बिदरी, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. एन. जे. पवार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार, वसंतराव मुळीक, विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी विजयकुमार गायकवाड, शिक्षण तज्ञ डी. बी. पाटील, प्राचार्य सुनिलकुमार लवटे आदि पदाधिकारी, शासकीय अधिकारी, शाळा, महाविद्यातील विद्यार्थी-विद्यार्थीनी आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते.
      गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी श्रीफळ वाढवून शोभायात्रेस प्रारंभ केला. शोभा यात्रेत श्री. पाटील यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्ष प्रा. संजयसिंह मंडलिक, महापौर कादंबरी कवाळे, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, उपमहापौर दिगंबर फराकटे, विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, प्रभारी जिल्हाधिकारी आप्पासाहेब धुळाज, विशेष पोलीस महानिरीक्षक तुकाराम चव्हाण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक म्हैसेकर, महापालिकेच्या आयुक्त  विजयालक्ष्मी बिदरी आदिंसह विविध संस्थांचे पदाधिकारी, शाहूप्रेमी नागरिक सहभागी झाले.
      राजर्षी शाहूंच्या जयंतीनिमित्त दसरा चौकातील शाहू पुतळा परिसर विद्युत रोषणाई व फुलांच्या तोरणांनी सजविण्यात आला होता. हा परिसर शाहूप्रेमीनी फुलून गेला होता. शाहूंच्या विचारावर प्रेम करणार्‍या व शाहू विचाराने भारलेल्या हजारो नागरिक, विद्यार्थी- विद्यार्थींनी यांनी शाहूंच्या स्मृतीला वंदन केले. शालेय विद्याथींनींचे लेझीम पथकाकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी राजर्षी शाहूंच्या जीवनातील महत्वपूर्ण घटनांवर आधारित सादर केलेले चित्ररथ नागरिकांचे आकर्षण बनले होते.मुस्लीम बोर्डींग, भाई माधवरावजी बागल हायस्कूल, सरस्वतीबाई गौड सारस्वत ब्राम्हण वसतिगृह, शाहू छत्रपती शिक्षण संस्था, जवाहरनगर हायस्कूल, शहाजी छत्रपती महाविद्यालय, उषाराजे हायस्कूल, नेहरु हायस्कूल आदिंनी हे रथ सादर केले. चित्ररथाची शहरातून शोभायात्रा काढण्यात आली.