इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शनिवार, २१ जुलै, २०१२

अन्न व औषध प्रशासनातर्फे गुटखा बंदी अंमलबजावणी सुरु


  कोल्हापूर, दि. २१ : राज्यात गुटखा, पानमसाला पदार्थांच्या उत्पादन, वितरण, साठा व विक्रीवर १ वर्षाकरीता प्रतिबंध करणारी अधिसुचना अन्न सुरक्षा आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांनी दि. २० जुलै २०१२ रोजी जारी केली आहे. त्यानुसार अन्न व औषध प्रशासनाने जिल्ह्यात तात्काळ गुटखा, पानमसाला बंदी आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी सुरु केली असून त्यासाठी अन्न सुरक्षा अधिकार्‍यांची चार पथके करण्यांत आली आहेत.
        अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ अंतर्गत तरतुदीनुसार बंदी आदेशाचे उल्लंघन करणार्‍याला ६ महिने ते १ वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा व एक लाख ते तीन लाखापर्यंत दंडाची तरतुद करण्यात आली  आहे.    
      जिल्ह्यातील गुटखा पानमसाला पदार्था वितरक, घाऊक, किरकोळ विक्रेते, तसेच पानस्टॉलधारक, फेरीवाले यांनी त्यांच्याकडील गुटखा पानमसाल्याचा साठा तात्काळ नष्ट करावा. अन्यथा त्यांच्या विरुध्द अन्न सुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत कडक कारवाई केली जाईल, असे अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, कोल्हापूर यांनी सूचित केले आहे.
      जिल्ह्यामध्ये गुटखा, पानमसाला पदार्थाचे वितरक घाऊक, किरकोळ विक्रेते यांच्या गोदामांच्या तसेच पान स्टॉलधारक फेरीवाले अशा सर्व स्तरावर तपासणीची मोहीम राबविण्यात येत असून तपासणीमध्ये प्रतिबंधीत पदार्थांचा साठा आढळून आल्यास त्यांचे नमुने घेऊन उर्वरीत साठा जप्त करण्याची कारवाई करण्यात येत आहेत. 
      परराज्यातून जिल्ह्यामध्ये गुटखा, पानमसाल्याची चोरटी वाहतूक होणार नाही यासाठी वाहन तपासणी नाक्यावर, जकात नाक्यावर, वाहतूक करणारी वाहनांची तपासणी मोहीम राबविण्यात येत असून त्याकरीता पोलीस व परिवहन विभागाचे सहकार्य घेण्यात येत आहे.
     सर्व शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्था, सेवाभावी संस्था, ग्राहक संस्था यांना सदर बंदी आदेशा बाबत जनजागृती व प्रबोधन करुन बंदी आदेशाची प्रभावीपणे अंमलबजावणी होणेबाबत प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य कोल्हापूर यांनी केले आहे.
     जिल्ह्यामध्ये प्रतिबंधीत गुटखा, पानमसाला या पदार्थाचा साठा अथवा विक्री बाबत काही माहिती असल्यास ती अन्न व औषध प्रशासनास कळवावी, असे आवाहनही प्रशासनाच्या वतीने करण्यातआले आहे.                                                                                         

कोल्हापुरातील पेट्रोल पंपांची वैधमापनमार्फत तपासणी करणार ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत निर्णय


     कोल्हापूर दि. २१ : कोल्हापुरातील पेट्रोल पंपांची वैधमापन शास्त्र विभागामार्फत तपासणी करण्याचा निर्णय ग्राहक संरक्षण परिषदेच्या आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. तसेच शहरातील एकतरी पेट्रोल पंप २४ तास सुरु ठेवण्यात येण्याबाबत कार्यवाही करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हा पुरवठा अधिकारी संजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक    झाली. त्यावेळी वरील निर्णय घेण्यात आले.
            बैठकीस अखिल भारतीय ग्राहक पंचायत समितीचे जिल्हाध्यक्ष संजय हुक्केरी, मधुमती पावनगडकर, वैधमापन शास्त्र विभागाचे रवींद्ग आदाटे, जिल्हा उपनिबंधक सी. एम. इंगवले, व्ही. आर. मनगुत्ते आदी अधिकारी उपस्थित होते.
            बैठकीत ग्राहक संरक्षण परिषदेच्या सदस्यांनी शहरातील पेट्रोल पंपावर योग्य परिमाणानुसार पेट्रोल मिळत नसल्याची तक्रार केली. त्यावर परिमाणानुसार पेट्रोल मिळते की नाही, याची तपासणी करण्यासाठी वैधमापन शास्त्र विभागामार्फत पेट्रोल पंपाची अचानक तपासणी करावी अशा सुचना जिल्हा पुरवठा अधिकारी संजय शिंदे यांनी दिल्या.
            कोल्हापूर शहरातील रस्त्यांवरील खड्डे, उघड्या गटारीवरील झाकणे घालण्याबाबत तसेच महानगरपालिकेची १९१३ ही हेल्पलाईन कार्यान्वित नसल्याबाबत महापालिका आयुक्तांचे लक्ष वेधण्याचे बैठकीत ठरले. उघड्यावरील खाद्य पदार्थांची अन्न व औषध प्रशासनातर्फे तपासणी करण्याचा निर्णयही घेण्यात आला.
            विद्यार्थी वाहतूक व्यवस्थेबद्दल रिक्षा मालक-चालक संघटना, प्रादेशिक परिवहन अधिकारी व पालक संघटना यांची संयुक्त बैठक घेणार असल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले. मध्यवर्ती बस स्थानक ते महालक्ष्मी मंदिर, मुख्य प्रशासकीय इमारत, कसबा बावडा, शिवाजी विद्यापीठ आणि के. आय. टी. या चार मार्गावर शेअर रिक्षा उपक्रम राबविता येईल का याची चर्चा करण्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी, पोलीस विभाग आणि रिक्षा चालक-मालक संघटना यांची लवकरच संयुक्त बैठक घेतली जाईल असे श्री. शिंदे यांनी सांगितले.

कोल्हापूरची स्नेहल बेंडकेची लंडन ऑलिपिंकसाठी पंच म्हणून निवड देशाचे नाव ऑलिपिंकमध्ये उज्वल करु


कोल्हापूर, दि. १६ : कोल्हापूरची क्रीडा परंपरेची पताका आंतरराष्ट्रीय स्तरावरही फडकत ठेवेन. कोल्हापूरबरोबरच देशाचे नावही उज्वल होईल अशी ऑलिपिंकमध्ये  कामगिरी करू, असा विश्वास कोल्हापूरची बास्केटबॉलपटू आणि लंडन ऑलिपिंकसाठी पंच म्हणून निवड झालेली स्नेहल बेंडके हिने व्यक्त केला.
लंडन ऑलिपिंक स्पर्धेसाठी बास्केटबॉल पंच म्हणून स्नेहल बेंडकेची निवड झाली आहे. यानिमित्त तीचा गृह ग्रामविकास औषधे व प्रशासन राज्यमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी तीने आपल्या कारकीर्दीचा आलेख उलगडून सांगितला.
ऑलिपिंकसाठी पंच म्हणून निवड झालेली मी पहिलीच बास्केटबॉलपटू आहे याचा मला अतिशय आनंद झाला. आहे आणि अभिमान ही वाटतो. ऑलिंपिक स्पर्धेत एक पंच म्हणून चांगली कामगिरी करुन कोल्हापूर बरोबरच देशाचे नावही उज्वल करेन अस विश्वास स्नेहलने व्यक्त केला.
ऑलिपिकसाठी पंच म्हणून निवड होण्यासाठी लेखी परीक्षा, शारीरीक चाचणी आणि मागील काही स्पर्धातील कामगिरीचा विचार केला जातो. या तीनही आघाड्यावर सरस ठरल्यामुळे स्नेहलची ऑलिपिक स्पर्धेसाठी पंच म्हणून निवड झाली आहे. कोल्हापूरला मोठी क्रीडा परंपरा आहे. येथील अनेक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करुन देशाचे नाव रोशन केले आहे. खेळातच नाही तर क्रीडा प्रशासन आणि संयोजन या मध्ये ही कोल्हापूरचे खेळाडू मागे नाहीत हे स्नेहलने दाखवून दिले आहे. स्नेहल ऑलिपिक स्पर्धेत निश्चितच चांगली कामगिरी करेल, असा विश्वास गृह, ग्रामविकास औषधे व प्रशासन राज्य मंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केला.
स्नेहल २००० मध्ये बास्केटबॉल खेळण्यास सुरवात केली. २००३ ते २००६ या कालवधीत तीने शिवाजी विद्यापीठाकडून अनेक स्पर्धांत प्रतिनिधीत्व केले. २००५ मध्ये ती राज्य स्तरावरील पंच परीक्षा उत्तीर्ण झाली. २००६ मध्ये ती आंतरराष्ट्रीय पंच परीक्षा उत्तीर्ण झाली. २००९ मध्ये चेन्नईत झालेल्या आशियाई महिला बास्केटबॉल स्पर्धेत तीने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदार्पण केल. गेल्या वर्षी चीन मध्ये    झालेल्या आशियाई स्पर्धेच्या अंतिम सामन्यात तीने पंच म्हणून काम केले.



शुक्रवार, १३ जुलै, २०१२


प्रत्येकाने कायद्याची माहिती घेणे आवश्यक न्या. उपाध्ये यांचे प्रतिपादन : किरवे येथे कायदेविषयक शिबीर


महात्मा फुले महामंडळाकडून लाभार्थ्यांना धनादेश वितरित


      कोल्हापूर, दि. १० : लाभार्थ्यांना बीज भांडवल योजनेतून धनादेश देऊन महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळचा वर्धापनदिन आज येथील जिल्हा कार्यालयात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त विजयकुमार गायकवाड उपस्थित होते.
       मुख्य प्रशासकीय इमारतीतील महामंडळाच्या कार्यालयात हा कार्यक्रम झाला. अनुसुचित जाती व नवबौध्द लोकांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने १० जुलै १९७८ रोजी महामंडळाची स्थापना केली आहे. येथील जिल्हा कार्यालयामार्फत महामंडळाच्या विविध योजना राबविण्यात येतात. त्यापैकी बीज भांडवल योजनेतून लाभार्थ्यांना श्री. विजय कुमार गायकवाड यांच्या हस्ते धनादेश वितरित करण्यात आले. यावेळी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक शिवाजीराव केसकर, लोकशाहीर आण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक के. के. गायकवाड, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक टी. एम. पाटील. आदी उपस्थित होते. यावेळी सुजाता गायकवाड, शिवाजी खाबडे, अमोल कांबळे, राजु कांबळे, प्रज्ञावंत शिंदे आदींना धनादेश वितरित करण्यात आले.

वैद्यकीय व्यावसायिकांनी सामाजिक जबाबदारीचे भान ठेवावे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एल. एस. पाटील यांचे आवाहन


कोल्हापूर दि. १०- वैद्यकीय व्यावसायिकांनी सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून कार्यरत रहावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एल. एस. पाटील यांनी केले. जागतिक डॉक्टर दिनानिमित्त छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उत्कृष्ट काम करणार्‍या डॉक्टर आणि परिचारिकांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा एडस्‌ प्रतिबंध आणि नियंत्रण पथक, नेटवर्क ऑफ कोल्हापूर बाय पीपल लिव्हींग विथ एच. आय. व्ही. कोशिश प्रकल्प आणि सीफार यांच्या संयुक्त विद्यमाने केले होते.
            एच. आय. व्ही. सह जीवन जगणार्‍या व्यक्तींना समाजाकडून अवहेलना सहन करावी लागू नये, म्हणून त्यांच्या मानवाधिकारासाठी कोशिशतर्फे प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येतो. अशा व्यक्तीना रोजगार, शिक्षण, शाळा, लैंगिक व प्रजनन आरोग्य आणि मानवाधिकार रक्षण आदी सोयी मिळवून दिल्या जातात. नेटवर्कच्या  सहकार्याने पाठपुरावा केला जातो. नगर, ठाणे व कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हा उपक्रम सुरु आहे अशी माहिती युवराज शिंदे यांनी दिली.
     कार्यक्रमाकरिता जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षला वेदक, स्त्री रोग विभागप्रमुख डॉ. शानबाग, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. जगताप व डॉ. यादव, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. बसरे, लोटस मेडिकल फौंडेशनच्या डॉ. किमया शहा, एन. के. पी प्लसचे युवराज शिंदे, एन एम पी प्लसचे विजय भेंडे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर, सामाजिक कार्यकर्ते संजय देशपांडे, आशु जाधव उपस्थित होते.
सुत्रसंचालन जिल्हा पर्यवेक्षक निरंजन देशपांडे यांनी केले तर आभार सीफारचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी सचिन कांबळे यांनी मानले.

गुरुवार, १२ जुलै, २०१२

वैद्यकीय व्यावसायिकांनी सामाजिक जबाबदारीचे भान ठेवावे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एल. एस. पाटील यांचे आवाहन


कोल्हापूर दि. १०- वैद्यकीय व्यावसायिकांनी सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून कार्यरत रहावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एल. एस. पाटील यांनी केले. जागतिक डॉक्टर दिनानिमित्त छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उत्कृष्ट काम करणार्‍या डॉक्टर आणि परिचारिकांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा एडस्‌ प्रतिबंध आणि नियंत्रण पथक, नेटवर्क ऑफ कोल्हापूर बाय पीपल लिव्हींग विथ एच. आय. व्ही. कोशिश प्रकल्प आणि सीफार यांच्या संयुक्त विद्यमाने केले होते.
            एच. आय. व्ही. सह जीवन जगणार्‍या व्यक्तींना समाजाकडून अवहेलना सहन करावी लागू नये, म्हणून त्यांच्या मानवाधिकारासाठी कोशिशतर्फे प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येतो. अशा व्यक्तीना रोजगार, शिक्षण, शाळा, लैंगिक व प्रजनन आरोग्य आणि मानवाधिकार रक्षण आदी सोयी मिळवून दिल्या जातात. नेटवर्कच्या  सहकार्याने पाठपुरावा केला जातो. नगर, ठाणे व कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हा उपक्रम सुरु आहे अशी माहिती युवराज शिंदे यांनी दिली.
            कार्यक्रमाकरिता जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षला वेदक, स्त्री रोग विभागप्रमुख डॉ. शानबाग, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. जगताप व डॉ. यादव, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. बसरे, लोटस मेडिकल फौंडेशनच्या डॉ. किमया शहा, एन. के. पी प्लसचे युवराज शिंदे, एन एम पी प्लसचे विजय भेंडे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर, सामाजिक कार्यकर्ते संजय देशपांडे, आशु जाधव उपस्थित होते.
सुत्रसंचालन जिल्हा पर्यवेक्षक निरंजन देशपांडे यांनी केले तर आभार सीफारचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी सचिन कांबळे यांनी मानले.                         

शनिवार, ७ जुलै, २०१२

ज्ञानच सध्याच्या युगातील भांडवल केंद्गीय कृषि मंत्री शरद पवार


कोल्हापूर, दि. ७ - ज्ञान हेच सध्याच्या युगात खरे भांडवल आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या मुलांनी गुणवत्तापुर्ण शिक्षण घेऊन ज्ञान संपादन करायला हवे आणि त्याजोरावर नवनव्या क्षेत्रात जायला हवे, असे प्रतिपादन केंद्गीय कृषीमंत्री शरद पवार यांनी आज केले.
कागल तालुक्यातील अर्जुननगर येथील जनता शिक्षण मंडळाचा सुवर्णमहोत्सव आणि संस्थापक देवचंद शाह यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उद्योगपती दीपचंदभाई गारडी होते. यावेळी व्यासपीठावर कामगार मंत्री हसन मुश्रीफ, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर, कोल्हापूरच्या महापौर कादंबरी कवाळे आदी उपस्थित होते.
श्री. पवार म्हणाले, देशातील ८५ टक्के शेतकर्‍यांची जमीन पाच एकरच्या आत आहे. त्यापैकी साठ टक्के शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे  शेतीवरील भार कमी होण्यासाठी शेतकर्‍यांच्या मुलांनी शिक्षण घेण्याची आवश्यकता आहे. शिक्षणाच्या माध्यमातून ज्ञान संपादन करून विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवायला हवे. कुटुंबातील एकच व्यक्ती शेतीत असणे व्यवहार्य होणार आहे. कारण जमीनधारणा कमी होत असल्यामुळे शेती करणे दिवसेदिवस व्यवहार्य होणार नाही.
आपल्या देशात  सध्या तरूणांची संख्या मोठी आहे. ही संख्याच आपल्या देशांचे खरे भांडवल आहे. पण या तरुणाना चांगले आणि गुणवत्तापुर्ण शिक्षण देण्याची गरज आहे. याची जबाबदारी महाविद्यालय आणि शाळांतील शिक्षकांची आहे, असे सांगून श्री. पवार म्हणाले, ज्ञान ही कोणाचीही मक्तेदारी नाही. प्रत्येकाला संधी मिळाली तर ते ज्ञानाच्या जोरावर चांगली कामगिरी करू शकतात. महिलांना संधी मिळाली तर त्याही उत्तम प्रकारचा कारभार करू शकतात.
आपण सध्या अनेक देशांना अन्न-धान्य निर्यात करू लागलो आहे. त्यामुळे आपला देश आता अन्न पुरविणारा देश म्हणून ओळखला जाऊ लागला आहे, असे सांगून श्री. पवार म्हणाले, देशातील शेतकर्‍यांची क्रयशक्ती वाढायला पाहिजे यासाठी गेल्या काही वर्षात सातत्याने शेती मालाला चांगली किंमत देण्याचा शासनाने प्रयत्न केला आहे.
यावेळी कर्नाटकचे कृषीमंत्री उमेश कत्ती, खासदार प्रभाकर कोरे, खासदार रमेश कत्ती, आमदार के. पी. पाटील, आमदार चंद्गदीप नरके, आमदार वीरकुमार पाटीस, आमदार काकासाहेब पाटील, माजी खासदार निवेदीता माने, माजी खासदार श्रीनिवास पाटील, जनता शिक्षण मंडऴाचे अध्यक्ष आशिष शाह  आदी उपस्थित होते.
                                     

कोल्हापूरची क्रीडा संस्कृती बळकट करणार -जिल्हा क्रीडाधिकारी नवनाथ फरताडे

कोल्हापूर, दि. ६  - कोल्हापूरच्या मातीत घडलो. येथील लोकांच्या आशीर्वादामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवू शकलो आता येथेच शासकीय सेवा करण्याची संधी मिळत आहे. या संधीचा फायदा घेत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय क्रीडापटू घडवून कोल्हापूरची क्रीडा संस्कृती आधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जिल्हा क्रीडाधिकारी नवनाथ फरताडे यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत यश मिळविणार्‍या खेळाडूंना राज्य शासनाच्या सेवेत थेट वर्ग एक पदावर नियुक्ती करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू नवनाथ फरताडे यांनी क्रीड़ा खात्यातच सेवा करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार त्यांची कोल्हापूरचे जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यांनी सांगितले की, राज्य शासनाने सुमारे १२ खेळाडूंची थेट वर्ग एकच्या पदावर नियुक्ती केली. त्यापैकी केवळ दोनच खेळाडूंनी क्रीडा विभागात सेवा करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यापैकी मी एक आहे. क्रीडा खात्याच्या सहकार्यामुळेच मी आंतरराष्ट्रीय खेळाडू बनू शकलो त्यामुळे मी क्रीडा खात्यात येण्याचा निर्णय घेतला.
श्री. फरताडे यांनी विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहा सुवर्ण पदके पटकावली आहेत. श्रीलंकेतील कोलंबो येथे झालेल्या दहाव्या सॅफ स्पर्धेत नव्या स्पर्धा विक्रमासह सुवर्णपदक पटकाविले आहे. दहा मीटर एअर रायफल हा फरताडे यांचा नेमबाजीतील आवडता स्पर्धा प्रकार आहे. या प्रकारात  त्यांनी जर्मनी,  चेक प्रजासत्ताक, हंगेरी, अमेरिका अशा देशांत झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांत उल्लेखनीय यश मिळवले आहे.
कोल्हापूरच्या मातीतच मी घडलो. येथील प्रबोधनीमध्ये सराव करूनच मी आंतरराष्ट्रीय नेमबाज घडलो, त्यामुळे मला कोल्हापूरविषयी विशेष प्रेम आहे. आता मला कोल्हापूरचा क्रीडा अधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळत आहे, ही बाब माझ्यासाठी अतिशय महत्वाची आहे, असे श्री. फरताडे यांनी सांगितले.
त्यांनी सांगितले की, राज्य शासन खेळासाठी खूप पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत आहे. क्रीडा खात्याला चांगल्या आणि उच्च गुणवत्तेचे खेळाडू घडवायचे आहेत. त्यासाठी शासन मोठ्या प्रमाणावर निधीही खर्च करीत आहे. आता प्रत्येक तालुक्यात क्रीडा संकुल उभारण्याची योजना आहे. विशेष बाब म्हणून हुपरी आणि बाचणी येथेही क्रीडा संकुल उभारण्यात येत आहेत. त्याचबरोबर कोल्हापुरात विभागीय क्रीडा संकुलही उभारले जात आहे. यामुळे कोल्हापूरची क्रीडा संस्कृती आधिकच बळकट होण्यास मदत होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.