इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शुक्रवार, २७ नोव्हेंबर, २०१५




लोक अदालत म्हणजे खर्च आणि वेळेची बचत जलद न्याय
                                        -एम.व्ही.गुजराथी
        कोल्हापूर, दि. 26 : भारताची लोकसंख्या उपलब्ध न्यायाधिशांची कमी संख्या यामुळे न्यायालयांमध्ये प्रलंबित खटल्यांची संख्या फार मोठी आहे. त्यामुळे खर्च वेळेची बचत करुन तांत्रिक बाबींचा अडसर टाळून जलदगतीने न्याय मिळवून देण्यासाठी लोक-अदालतींचे कार्य महत्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूरचे सचिव एम.व्ही.गुजराथी यांनी केले.
            तालुका विधी सेवा समिती पेठवडगाव श्री. बळवंतराव यादव हायस्कूल, पेडवडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने फिरते विधी सेवा लोक अदालत अंतर्गत कायदे विषयक मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी विधी सेवा समिती पेठवडगाचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश उमेशचंद्र मोरे, गटविकास अधिकारी एस.वाय.माळी, पेठवडगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी एन.ए.मुतकेकर, पोलिस निरीक्षक डी.ए.जाधव, आर.एच.आत्तार, सहा.अधिक्षक जी.टी.पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक के.पी.यादव, प्राचार्य शिवाजीराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
            समाजातील दुर्बल घटकांना मोफत विधी सल्ला सेवा पुरवून सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याच्या प्रक्रियेत विधी सेवा प्राधिकरणाची भूमिका महत्वपूर्ण असल्याचे सांगून ए.व्ही. गुजराथी यांनी संविधान दिनानिमित्त बोलताना देशाचे स्वातंत्र्य अखंडत्व टिकवून ठेवण्याची क्षमता राज्य घटनेतच असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकास मूलभूत हक्क अधिकार दिल्याचे सांगून कायद्याच्या चौकटीत राहून प्रत्येकाने जीवन सुखकर करावे त्यासाठी कायद्याचे पालन करावे असे मत मांडले.
            न्या. उमेशचंद्रजी मोरे यांनी सामाजिक न्यायाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी न्या. भगवती यांनी मोफत कायदेशिर सल्ल्याच्या लावलेल्या रोपट्याचा आज न्याय आपल्या दारी या संकल्पनेनं वटवृक्ष झाला आहे. फिरत्या न्यायालयामुळे गत दोन दक्षकात सव्वा कोटी खटले निकाली निघाले आहेत. त्यामुळे पक्षकारांचा पैसा, श्रम वेळ यामध्ये बचत झाली आहे. जलद न्याय मनशांती यामुळे साध्य झाली आहे, असे सांगून विलंबाने मिळणाऱ्या न्यायाला खंबीर पर्याय म्हणजे लोक अदालत असल्याचे स्पष्ट केले.
            यावेळी न्या. मोरे यांनी भारताची राज्यघटना ही मूलभूत हक्कांचे संरक्षण करणारी यंत्रणा असल्याने भारतीय लोकशाहीत राज्यघटनेपेक्षा मोठे काहीही नाही असे स्पष्ट केले तसेच भादोली येथे कायद्याचे वाचनालय लवकरच सुरु करण्यात येणार असल्याचे सांगितले.
            यावेळी के.पी. यादव यांनी महिलांवरील अत्याचार, बालकांवरील अत्याचार या विषयक प्रतिबंधक कायद्यांची नियमांची माहिती दिली. आर.एच.आत्तार यांनी वाहतूकीच्या नियमांची माहिती दिली. धनंजय जाधव यांनी सायबर क्राईम याविषयावर तर एस.वाय.माळी पारिवारिक संस्कार आणि मुतकेकर यांनी नगरपालिकेची कार्ये याविषयक माहिती दिली.
            कार्यक्रमाच्या सुरुवातीला संविधान दिनानिमित्त प्रास्ताविकेचे वाचन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे संविधानाचे पूजन, फिरते विधी सेवा व्हॅनचे पूजन करण्यात आले. यावेळी पक्षकार, तंटा मुक्त समित्यांचे पदाधिकारी, शासकीय कर्मचारी, विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 0 00 0 0

शनिवार, २१ नोव्हेंबर, २०१५


एमआरईजीएस मधून विहिरी पाणंद रस्त्यांची कामे घ्या
- खासदार राजू शेट्टी  
जिल्हा दक्षता संनियंत्रण समितीची आढावा बैठक संपन्न

कोल्हापूर, दि. 21 : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत सर्व कार्यान्वित यंत्रणांनी विहिरी तसेच पाणंद रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात हाती घ्यावी,अशी सूचना खासदार राजू शेट्टी यांनी आज येथे बोलतांना केली.
 केंद्र शासन पुरस्कृत विविध योजनांची अंमलबजावणी, प्रगती आणि संनियंत्रण यांचा आढावा घेण्यासाठी सर्किट हाऊस येथील शाहू सभागृहात समितीचे अध्यक्ष तथा खासदार राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली  बैठक संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस समितीचे सहअध्यक्ष खासदार धनंजय महाडिक, जिल्हा परिषद अध्यक्षा विमल पाटील, जिल्हाधिकारी तथा समितीचे सदस्य सचिव डॉ. अमित सैनी, मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे नूतन प्रकल्प संचालक डॉ. हरीष जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
 जिल्ह्यास यंदा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत 500 विहिरी घेण्याचे उद्दिष्ट असून हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी तसेच पदाधिकाऱ्यांनी या कामी सक्रीय व्हावे, असे आवाहन करुन खासदार राजू शेट्टी म्हणाले, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत अधिकाधिक कामे घेण्याचे नियोजन सर्व विभागांनी करावे. प्रामुख्याने पाणंद रस्त्याची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घ्यावीत. सध्या पाणंद रस्त्यांसाठी 20 फुटाची असलेले बंधन 15 फुटावर आणावे, यासाठी या बैठकीत ठरावही मंजूर करण्यात आला. जिल्ह्यात सध्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत 19 गावामध्ये 25 कामे सुरु असून याकामांवर 772 मजूर काम करीत आहेत. या योजनेंतर्गत सेल्फवर मोठ्या प्रमाणात कामे मंजूर करुन ठेवण्यात आली असून मंजूरांची मागणी येताच ही कामे तात्काळ सुरु करण्याचे निर्देशही त्यांनी या बैठकीत दिले.
 स्वच्छ भारत अभियानांतर्गत संपूर्ण जिल्हा येत्या मार्च अखेर हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प असल्याचे यावेळी सांगण्यात आले. जिल्ह्यात स्वच्छ भारत अभियान गतिमान करण्याची सूचना खासदार राजू शेट्टी यांनी केली. जिल्ह्यात 171 गावे हागणदारीमुक्त झाली असून गगनबावडा तालुका हागणदारीमुक्त तालुका म्हणून जाहिर झाला आहे. जिल्ह्यात पाच तालुके डिसेंबरअखेर हागणदारीमुक्त करण्याचे प्रयत्न असून येत्या मार्च अखेर संपूर्ण जिल्हा हागणदारीमुक्त करण्याचा मानसही या बैठकीत व्यक्त करण्यात आला. सांसद आदर्श योजनेतील सोनवडे खुर्द, पेरीड आणि रोजगोळी खुर्द या तीन गावांचा सर्वांगिण विकास करण्याच्या दृष्टीने सर्व यंत्रणांनी आपापल्याकडील विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. तसेच या तीन गावामध्ये शौचालय नसलेल्या 386 कुटुबांना शासन योजना, लोकसहभाग आदी उपक्रमातून शौचालय उपलब्ध करुन देण्यास प्राधान्य द्यावे, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी या बैठकीत केली.
 पाणलोट विकासाचा कार्यक्रम अधिक दर्जेदारपणे राबविला जावा, या कामांमध्ये हलगर्जीपणा आणि गैरव्यवहार खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा देऊन खासदार राजू शेट्टी म्हणाले, पाणलोट विकासाच्या कार्यक्रमातून शेती विकासाला प्राधान्य मिळत असून या कामास कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सर्वोच्च प्राधान्य द्यावे. जिल्ह्यात 47 पाणलोट असून यामध्ये 11 तालुक्यांचा समावेश आहे. यासाठी 524 गावांमध्ये पाणलोटाची कामे सुरु असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
 तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी पंचायत समितीच्या बैठकांना सर्व कागदपत्रे आणि माहितीसह उपस्थित राहावे, अन्यथा संबंधितावर कारवाई केली जाईल, अशी सूचनाही खासदार राजू शेट्टी यांनी या बैठकीत केली. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात कायपालट योजनेतून आमुलाग्र बदल करण्यात आला असून लोकसहभागातून प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उप केंद्रांना 192 लाखाचा निधी उपलब्ध झाला असून या निधीतून जिल्हयातील प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उप केंद्रांची अंर्तबाह्य सुधारणा करण्यात आली असून पुरेसा औषधसाठा, स्वच्छता आणि अन्य सुविधा उपलब्ध झाल्याने ग्रामीण जनतेची सोय झाली असल्याचे यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदान यांनी सांगितले.
या बैठकीत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापनाचा कार्यक्रम, राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम, निर्मल भारत अभियान, राष्ट्रीय सामाजिक सहाय्यता कार्यक्रम, राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण कार्यक्रम, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, सर्व शिक्षा अभियान, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रशासन योजना, इंदिरा आवास योजना, डाक विभागाकडील योजना, राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियान, पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, सांसद आदर्शग्राम योजनेसह अन्य केंद्र शासन पुरस्कृत योजनांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला.
यावेळी जिल्ह्यातील पंचायत समितीचे सभापती, समितीचे अशासकीय सदस्य तसेच विविध विभागांचे खातेप्रमुख उपस्थित होते. प्रारंभी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी अध्यक्षांचे स्वागत केले. प्रारंभी शहीद कर्नल संतोष महाडिक यांना दोन मिनिटे स्तभ्दता पाळून आदरांजली वाहण्यात आली.

00000