इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शुक्रवार, २५ डिसेंबर, २०१५



विधान परिषद निवडणूक
मतदानाची तयारी पूर्ण
                   - जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी

कोल्हापूर, दि. 25 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या कोल्हापूर प्राधिकार मतदारसंघाच्या व्दिवार्षिक निवडणूकीसाठी रविवार दि. 27 डिसेंबर 2015 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 4 या वेळात मतदान होणार असून मतदानाची संपूर्ण तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी यांनी आज येथे बोलतांना दिली. त्यांच्या समवेत  पोलीस अधीक्ष्‍ाक प्रदीप देशपांडे, निवासी उपजिल्हाधिकारी एस.आर.बर्गे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी संगीता चौगुले आदीजण उपस्थित होते.
या निवडणूकीसाठी जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि नगरपालिकांचे मिळून 382 मतदार असून 12 मतदान केंद्रावरुन मतदान होईल. मतदान केंद्रामध्ये महसूल भवन चंदगड 6, पंचायत समिती हॉल, आजरा 4, नगरपरिषद हॉल, गडहिंग्लज 25, कन्या विद्यामंदीर राधानगरी 6, सार्वजनिक बांधकाम इमारत, उत्तर बाजू, गारगोटी 5, नगरपरिषद हॉल, कागल 44, उद्योग भवन, कोल्हापूर 93, तहसिल कार्यालय, गगनबावडा 3, नगरपरिषद हॉल, पन्हाळा 26, नगरपरिषद हॉल, मलकापूर 24, महसूल भवन, हातकणंगले 93, पंचायत समिती हॉल, शिरोळ 53 अशी आहेत.
सर्व मतदारांना मतदान कसे करावे याबाबतच्या मा.आयोगाकडून प्राप्त झालेल्या सर्व सूचना लेखी देण्यात आल्याचे सांगून निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अमित सैनी म्हणाले, या निवडणूकीसाठी झोनल ऑफिसर म्हणून चार उपविभागीय अधिकारी यांची नेमणूक केली असून,त्यांना प्रत्येकी 3  तालुके देण्यात आले आहेत. या निवडणूकीसाठी 96 कर्मचाऱ्यांसह राखीव कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून यामध्ये  प्रत्येक मतदान केंद्रासाठी  1 मतदान केंद्राध्यक्ष, 2 सहायक, 1 शिपाई, कर्मचारी व  1-Micro-observer इतके कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. नियुक्त कर्मचाऱ्यांना पहिले व दुसरे प्रशिक्षण देण्यात आले असून तिसरे प्रशिक्षण 26 डिसेंबर 2015 रोजी देण्यात येणार आहे. मतमोजणीसाठीच्या नियुक्त कर्मचाऱ्यांनाही पहिले प्रशिक्षण दिले असून दुसरे प्रशिक्षण 28 डिसेंबर 2015 रोजी देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
      मतदानासाठीच्या मतपेटी व साहित्याचे वाटप दि.26 डिसेंबर 2015 रोजी सकाळी 8.30 वा. महाराणी ताराबाई सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथून करण्यात येणार असून, सर्व मतदान केंद्रांवर Micro-observer आणि व्हिडीओग्राफर नेमण्यात आले आहेत. मतदान प्रक्रियेच्या अनुष्ंगाने वाहतूक आराखडा तयार करण्यात आला असून मतदान शांततेत आणि निर्भयपणे व्हावे या दृष्टीने पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात केल्याचेही पोलीस अधीक्षक प्रदीप देशापांडे त्यांनी सांगितले . कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीत सर्वच मतदान केंद्रावर कडक उपाययोजना केल्याचेही ते म्हणाले.
      बोगस मतदान होऊ नये म्हणून सर्व मतदान प्रक्रियेचे व्हिडीओ चित्रीकरण होणार आहे. तसेच बोगस मतपत्रिका मतदान केंद्रात येणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे. मतदानासाठी वापरण्यात येणा-या मतपत्रिकेच्या पाठीमागे केंद्राध्यक्ष, केंद्राचा नंबर नमूद असलेला शिक्का मारणार व त्यावर  स्वाक्षरी  करणार असल्याने मतदार मतदान केल्यानंतर मूळ मतपत्रिका मतदान पेटीत टाकत आहे का याचेवर केंद्राध्यक्ष मायक्रो- ऑर्ब्झवर व व्हिडीओ कॅमेरा यांचे संनियंत्रण राहणार आहे.  सदरचे मतदान हे गुप्त मतदान पध्दतीने असल्याने गोपनीयतेचा भंग झाल्यास संबंधित मतदारांवर गुन्हा दाखल होऊ शकतो, असे जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी स्पष्ट केले.
      मतदान केंद्रात कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रानिक साधन, मोबाईल, कॅमेरा, पेन, डिजीटल पेन इ. तत्सम वस्तू नेण्यास प्रतिबंध करण्यात आला असून या वस्तू हया मतदारांसोबत असल्यास त्यांनी त्या मतदान  केंद्राबाहेरच ठेवाव्यात. मतदान केंद्रात  या वस्तू आढळल्यास संबंधितांवर कारवाई होऊ शकते. कोणत्याही प्रकारे गेापनीयतेचा भंग केला जाणार नाही यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा सक्षम करुन केंद्राध्यक्षांना दंडाधिकाऱ्यांचे अधिकार देण्यात आले आहे, अशा प्रसंगी तात्काळ कारवाई करणेबाबत त्यांना निर्देश देण्यात आले आहेत.
     
0000000


मंगळवार, २२ डिसेंबर, २०१५



मतमोजणी प्रक्रियेचे प्रशिक्षण संपन्न 

कोल्हापूर, दि. 21 : कोल्हापूर स्थानिक प्राधिकारी मतदार संघातील मतमोजणीची प्रक्रिया सुरळीत पार पडावी यादृष्टीने मतमोजणी प्रक्रियेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडाव्यात अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी आज येथे बोलतांना केली.
कोल्हापूर स्थानिक प्राधिकारी मतदार संघात येत्या 27 डिसेंबर 2015 रोजी मतदान होत असून 30 डिसेंबर रोजी मतमोजणी होत आहे. या अनुषंगाने मतमोजणी प्रक्रियेतील नियुक्त अधिकारी, कर्मच्याऱ्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शिवाजी सभागृहात आयोजित केलेल्या प्रशिक्षण सत्रात जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी बोलत होते.
या प्रशिक्षण शिबिरास निवासी उपजिल्हाधिकारी एस. आर. बर्गे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी संगीता चौगुले, जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे यांच्यासह सर्व उपजिल्हाधिकारी तसेच उप विभागीय अधिकारी, तहसिलदार अन्य नियुक्त कर्मचारी उपस्थित होते.
मतमोजणी प्रक्रीयेतील सर्व बारकावे जाणून घेवून प्रक्रीया अचूकपणे राबवावी अशी सूचना करुन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी म्हणाले, मतमोजणीसाठी नियुक्त केलेल्या पथक प्रमुखांनी भारत निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले कायदे, आदेश, निर्देश यांचे अभ्यासपूर्वक अवलोकन करुन आवश्यक ती कार्यवाही करावी तसेच आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार मतमोजणीची कार्यवाही करावी.
यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे यांनी सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना मतमोजणी प्रक्रियेच्या अनुषंगाने माहिती दिली.

00000

शनिवार, १९ डिसेंबर, २०१५



नाबार्डचा वित्त आराखडा महत्वाचा दस्तऐवज
   -- जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे

      कोल्हापूर, दि. 19 : नाबार्डद्वारे प्रत्येकवर्षी देशातील प्रत्येक जिल्ह्यासाठी तयार केला जाणारा संभाव्य वित्त आराखडा (PLP) एक महत्वाचा दस्तऐवज असून याचा वापर भारत सरकार, विविध शासकीय, निमशासकीय कार्यालये, देशातील सर्व बँकाकडून केला जात असल्याचे प्रतिपादन जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे यांनी केले.
जिल्ह्याच्या सन 2016-17 करीता संभाव्य वित्त पुरवठा आराखड्याची बैठक जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे यांच्या अध्यक्षतेखाली आज येथे झाली यावेळी श्री. आगवणे मार्गदर्शन करीत होते. यावेळी नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी नंदू नाईक, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबईचे सहा.महा.प्रबंधक सांगवीकर, बँक ऑफ इंडिया, कोल्हापूरचे जिल्हा आग्रणी व्यवस्थापक एम.जी. कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री. आगवणे यावेळी म्हणाले, जिल्हा अग्रणी बँक दस्तऐवजामध्ये प्रस्तावित वित्तीय आराखड्याचा सुयोग्य वापर करुन रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्वांप्रमाणे जिल्ह्याची पतयोजना (DCP) बनवून देतात त्याची जिल्ह्यातील सर्व बँकाकडून प्रभावीपणे अंमलबजावणी करुन जिल्ह्याच्या विकासामध्ये मोलाचे योगदान देत आहे. जिल्ह्याचा सन 2016-17 संभाव्य वित्तीय आराखडा 7 हजार 185 कोटी 27 लाख रुपयांचा आहे. यामध्ये शेती, शेतीपुरक क्षेत्रासाठी 4 हजार 465 कोटी 62 लाख रुपये तर सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योगासाठी 1 हजार 980 कोटी 41 लाख तर प्राथमिक क्षेत्रासाठी 739 कोटी 24 लाख रुपये प्रस्तावित केले आहेत. शेती  आणि शेतीपुरक क्षेत्रामध्ये पीक कर्जासाठी 2 हजार 676 कोटी 33 लाख रुपये, सिंचनासाठी 543 कोटी 2 लाख, शेती यांत्रिकीकरणासाठी 320 कोटी 64 लाख, फळबाग रेशीम उद्योगासाठी 74 कोटी 75 लाख, वनीकरण पडित जमीन सुधारणासाठी 14 कोटी 55 लाख, दुग्धव्यवसायासाठी 410 कोटी 61 लाख, कुकुटपालनासाठी 42 कोटी 45 लाख, शेळी-मेंढीपालनासाठी 40 कोटी 19 लाख, मत्स्यव्यवसायासाठी 3 कोटी 95 लाख, गोडावून, शेतीगृहयासाठी 206 कोटी 1 लाख, भुविकास, जमीनसुधारणा यासाठी 53 कोटी 40 लाख, शेतीमाल प्रसंस्करणासाठी 58 कोटी 39 लाख रुपये यांचा प्रामुख्याने समावेश करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
      प्राथमिक क्षेत्रातील गृहकर्जासाठी 433 कोटी 92 लाख, अपरंपरागत उर्जासाठी 29 कोटी 11 लाख, शैक्षणिक कर्जासाठी 134 कोटी 25 लाख, निर्यातीसाठी 75 कोटी रुपयांचा वित्तपुरवठा करण्यात आला आहे. महिला बचत गटासाठी 50 कोटी रक्कमेचा विशेष वित्तपुरवठा प्रस्तावित करण्यात आला आहे. यावेळी 2016-17 करीता संभाव्य वित्त पुरवठा आराखड्याचे (PLP) प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

000000

सोमवार, ७ डिसेंबर, २०१५



विक्रीकर अधिकाऱ्यांनी प्रशासकीय सुधारणा
आधुनिक तंत्रज्ञान आणि कायद्याचे ज्ञान आत्मसात करावे
                                     - अप्पर जिल्हाधिकारी अजित पवार
कोल्हापूर दि. 6 : विक्रीकर अधिकाऱ्यांनी प्रशासकीय सुधारणा, आधुनिक तंत्रज्ञान आणि विक्रीकर कायद्याचे ज्ञान आत्मसात करुन विक्रीकर विभाग अधिक लोकाभिमूख आणि कार्यक्षम करण्याच्या कामात सक्रीय व्हावे, असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी अजित पवार यांनी येथे बोलतांना केले.
विक्रीकर विभागाच्या कोल्हापूर झोनमधील पदोन्नत झालेल्या सहाय्यक विक्रीकर आयुक्त आणि विक्रीकर अधिकाऱ्यासाठी विक्रीकर भवनमधील सभागृहात आयोजित केलेल्या सहा दिवसांच्या पायाभूत प्रशिक्षण सत्राच्या समारोप समारंभात अप्पर जिल्हाधिकारी अजित पवार बोलत होते. या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून अप्पर विक्रीकर आयुक्त सी. एम. कांबळे, विक्रीकर सह आयुक्त विलास इंदलकर उपस्थित होते.
 प्रशासकीय कामकाज करताना जिद्द, निष्ठा आणि कार्यतत्परतेबरोबरच कायद्याचे ज्ञान, प्रसंगावधान, संघवृत्ती आणि निर्णयक्षमता हे गुण अंगी बानवण्याचा सल्ला देऊन अप्पर जिल्हाधिकारी अजित पवार म्हणाले, आपल्याला देण्यात आलेली उद्दिष्टे साध्य करतांना कायद्याच्या चौकटीत राहून नीट आणि नेटकी भूमिका घ्यावी,  पारदर्शी आणि लोकाभिमूख प्रशासनाव्दारे विक्रीकर विभागाचा लौकीक वृध्दींगत करण्याचे आवाहनही त्यांनी केले. कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने विकसित केलेल्या ई-डिस्नीक प्रणालीस राष्ट्रीय पातळीवरील स्कॉच पुरस्काराने गौरविण्यात आले असून, ही प्रणाली शासनाने राज्यभर लागू केली आहे. यापुढील काळात ई-जमाबंदी हे सॉफ्टवेअर विकसित करण्याचा प्रशासनाचा मानस असल्याचेही ते म्हणाले.
कोल्हापूर झोनचे अप्पर विक्रीकर आयुक्त सी. एम. कांबळे म्हणाले, विक्रीकर विभाग अधिक सक्षम करण्यासाठी विक्रीकर अधिकाऱ्यांनी विभागात होणाऱ्या सुधारणा आणि बदलांना सामोरे जाण्याची क्षमता आणि सजगता प्रशिक्षणातून निर्माण करावी, विक्रीकर विभागातील अधिकाऱ्यांना वेळोवेळी प्रशिक्षण देऊन त्यांच्यात नवी उमेद निर्माण करण्याचा विक्रीकर विभागाचा प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले. विक्रीकर विभागाने कोल्हापूर झोनसाठी निश्चित केलेले महसूलाचे उद्दिष्ट मुदतीत साध्य करण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील रहावे, असे आवाहनही त्यांनी केले.
विक्रीकर सह आयुक्त विलास इंदलकर यावेळी म्हणाले, विक्रीकर विभागातील अधिकाऱ्यांनी आपल्या कामात अचूकता, गतीमानता आणि कार्यतत्परता जोपासून विक्रीकर विभागाचा लौकीक वाढविण्यास कटिबध्द व्हावे. पदोन्नत अधिकाऱ्यांसाठी वेळोवेळी प्रशिक्षण सत्रे आयोजित करुन त्यांना त्यांचे अधिकार आणि जबाबदाऱ्यांची जाणीव करुन देऊन विक्रीकर विभागाचे कामकाज अधिक सुकर करण्यास प्राधान्य असल्याचेही ते म्हणाले.
प्रारंभी विक्रीकर अधिकारी बजरंग मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. शेवटी विक्रीकर अधिकारी गोपाळ पाटील यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी बेस्ट परफॉरमर ऍ़वॉर्डचे वितरणही अप्पर जिल्हाधिकारी अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये विक्रीकर अधिकारी शंकर पाटील, माधुरी पाटील,अभिजीत भोसले या अधिकाऱ्यांचा समावेश होता. या प्रशिक्षण सत्रानिमित्त स्वच्छ भारत अभियानांतर्गत विक्रीकर भवन येथे अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांच्या वतीने स्वच्छता अभियानही राबविण्यात आले. सहा दिवसांच्या या प्रशिक्षण सत्रामध्ये कोल्हापूर झोनमधील सहा जिल्हयातील 46 अधिकारी सहभागी झाले होते.
या समारंभास मुकुंद पन्हाळकर यांच्यासह  विक्रीकर विभागातील अधिकारी तसेच कर्मचारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

000000