इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शुक्रवार, २२ जुलै, २०१६


कन्यागत महापर्वकाळासह संपूर्ण जिल्ह्यात
आपत्ती व्यवस्थापनाचे सुक्ष्म नियोजन करा
-          जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी

कोल्हापूर, दि. 22 : ऑगस्ट महिन्यात मुसळधार पावसाची शक्यता गृहीत धरुन प्रत्येक विभागाने श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे होणाऱ्या कन्यागत महापर्वकाळ सोहळ्यासह संपूर्ण  जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापनाचे सुक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी दिले.
            कन्यागत महापर्वकाळ सोहळ्याची सुरुवात 12 ऑगस्ट 2016 पासून होत आहे. या निमित्ताने महाराष्ट्र आपत्ती धोके व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यातील दुसऱ्या दिवसाची कार्यशाळा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महाराणी ताराराणी सभागृहात घेण्यात आली.  यावेळी मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, आपत्ती व्यवस्थापन सेलचे संचालक निवृत्त कर्नल व्ही. एन. सुपनेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सदाशिव साळुंखे, अप्पर पोलीस अधीक्षक दिनेश बारी, अप्पर मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख, उप विभागीय अधिकारी अश्विनी जिरंगे, तहसिलदार सचिन गिरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
            ऑगस्ट महिन्यात मुसळधार पावसाची शक्यता असून जिल्ह्यातील धरणे जवळपास भरली आहेत. त्यामुळे पाऊस जास्त झाल्यास परिस्थिती बिकट उदभवू शकते, त्यासाठी श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे होणाऱ्या कन्यागत महापर्वकाळाबरोबरच जिल्ह्यात सर्व ठिकाणी प्रत्येक विभागाने आपत्ती व्यवस्थापनाचे सुक्ष्म नियोजन करावे, भूस्खलनप्रवण ठिकाणे सुमारे 20 आहेत. त्याची पाहणी आपत्ती ओढवल्यास पर्यायी नियोजन संबंधित विभागाने करावे. जिल्ह्यात एकही जिवित हानी होणार नाही याची सर्वांनी  दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी दिले.
            कन्यागत महापर्वकाळाचे श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे नियोजन करत असतांनाच गणेशवाडी, औरवाड, खिद्रापूर या ठिकाणीही नियोजन करा, व्यवस्था ठेवा असे सांगून कन्नड आणि मराठी भाषिक दोघांनाही समजतील असे  सायंनेजिस तयार करा. विद्युत, एस.टी. या विभागानी बॅकपचे नियोजन करावे. मंदीर परिसर अन्य भागात स्वच्छता राहील याची दक्षता घ्यावी. गणेशवाडी पालखी मार्गावरील अडथळा ठरणारा डी. पी. त्वरीत हटवा, असे आदेश देऊन जिल्हाधिकारी म्हणाले, व्यावसायिकांनी घरगुती सिलेंडरचा वापर व्यवसायिक कारणांसाठी करु नये. तसेच आग प्रतिबंधक उपकरणे तयार ठेवावीत.
            यावेळी सुपनेकर यांनी सर्व विभागाना 11 12 रोजी 24 तास काम करावे लागणार असल्याने प्रत्येक विभागाचे सुक्ष्म नियेाजन करावे. संबंधित सर्व घटकांनी दोन दिवस आधी संपूर्ण परिसर पायाखाली घालावा. श्री क्षेत्र नृसिंहवाडीसह गणेशवाडी, औरवाड, खिद्रापूर या ठिकाणीही कंट्रोल रुम असणे आवश्यक आहे. महालक्ष्मी,  पन्हाळा याठिकाणीही पर्यटक मोठ्या प्रमाणात जाऊ शकतील त्यामुळे तेथेही नियोजन आवश्यक आहे. प्रत्येक विभागाने आपली भूमिका समजून घेऊन नियोजन करावे. संवाद हा आपत्ती व्यवस्थापनाचा कणा असल्यामुळे सर्व यंत्रणांमध्ये सुसंवाद असणे आवश्यक आहे. घाट परिसरात दिव्यांची व्यवस्था, ध्वनीक्षेपण यंत्रणा, वॉच टॉवर आदी आवश्यकतेनुसार उपलब्ध असावेत.
             यावेळी सर्व विभागांचे प्रमुख, सामाजिक संस्था, देवस्थान समितीचे मान्यवर पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

0 0 0 0 0  0

शनिवार, १६ जुलै, २०१६




प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा शेतकऱ्यांनी  लाभ घ्यावा
                                                 -खासदार राजू शेट्टी
कोल्हापूर दि. 16 u कोल्हापूर जिल्ह्यात उद्भवलेल्या पूरसदृश्य स्थितीच्या पार्श्वभूमीवर भविष्यातील नुकानास टाळण्याकरिता जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ घेणे आवश्यक असून याकरिता संबंधित बँकेशी दि. 31 जुलै 2016 पर्यंत संपर्क साधावा. तसेच  याबाबत काही अडचण निर्माण  झाल्यास लीड बँक कृषि विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा दक्षता संनियंत्रण समितीचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात आयोजित जिल्हा दक्षता संनियंत्रण समितीच्या सभेत ते बोलत होते. याप्रसंगी आमदार चंद्रदीप नरके, आमदार उल्हास पाटील, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार डॉ. सुजित मिणचेकर, कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विमल पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, डीआरडीचे प्रकल्प संचालक डॉ. हरिष जगताप, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बी. बी. मास्तोळी आदी मान्यवर उपस्थित होते.
     जिल्ह्यात नुकतीच अतिवृष्टीमुळे पूरसदृश्य स्थिती उद्भवली होती. तथापि जिल्ह्यातील धरणे अजून 100 टक्के भरलेली नाहीत. त्यामुळे ही धरणे भरल्यानंतर या पावसाळ्यात पुन्हा पूरस्थिती उद्भवण्याची दाट शक्यता आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांनी आपले नुकसान टाळण्याकरिता प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ घ्यावा. या योजनेंतर्गत भात, ज्वारी, नाचणी, भुईमुग, सोयाबीन आदी पिकांचा समावेश करण्यात आलेला आहे. अशी माहिती यावेळी बोलताना खासदार राजू शेट्टी यांनी दिली.
जिल्हाधिकारी यांच्या आरोग्य यंत्रणेस दक्षतेची  सूचना
     जिल्ह्यातील पूरस्थिती कमी होत आहे. जिल्ह्यातील नद्यांच्या पाण्याची पातळी कमी होत आहे.  तथापि या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात रोगराई उद्भवण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने आरोग्य विभागाने आपली यंत्रणा सज्ज ठेवावी. पावसाळ्यात सर्पदंशाच्या घटना घडतात. तसेच लेप्टो, मलेरिया, डेंगू यांसारखे आजार उद्भवतात त्यादृष्टीने पुरेसा औषधसाठा उपलब्ध ठेवावा. अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी केली. तसेच बैठकीत उपस्थित केलेल्या विविध विषयांच्या अनुषंगाने दिलेल्या सूचनांची संबंधित अधिकाऱ्यांनी सात दिवसात पूर्तता करावी असे  निर्देशही या बैठकीत बोलताना जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
     कोल्हापूर जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने पुरग्रस्त भागात तपासणी सुरु  केली असून, नागरिकांना पावसाळी आजार उद्भवू नयेत याकरिता मार्गदर्शन केले  जात असल्याची माहिती सभागृहास दिली. 
     बैठकीत मागील सभेच्या इतिवृत्ताचे वाचन करून त्या अनुषंगाने विविध विकास कामांचा आढावा घेण्यात आला. तसेच  महसूल मंत्री म्हणून बढती मिळाल्याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, कृषि राज्यमंत्रिपद मिळ्याल्या बद्दल आमदार सदाभाऊ खोत, उत्कृष्ठ संसदपट्टू म्हणून देशात तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरल्याबद्दल खा. धनंजय महाडिक, तसेच राज्यसभेवर खासदार म्हणून निवड झाल्या बद्दल खा. छ. संभाजी राजे,  आदींच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. 
     याप्रसंगी  जिल्ह्यातील पंचायत समितीचे सभापती,  विविध विभागाचे प्रमुख, जिल्हा दक्षता संनियंत्रण समितीचे शासकीय अशासकीय सदस्य, अधिकारी, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000