इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

बुधवार, ३१ ऑगस्ट, २०१६

कोल्हापूर पर्यटन महोत्सवाचे सुक्ष्म नियोजन करा -जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी


         कोल्हापूर, दि. 31 :  ऑक्टोबर महिन्यात घेण्यात येणारा कोल्हापूर पर्यटन महोत्सव हा कोल्हापूर जिल्हा पर्यटनाला चालना देणार महत्वपूर्ण उपक्रम असल्याने सर्व यंत्रणांनी यामध्ये सुक्ष्म नियोजन परिपूर्ण तयारी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी दिले.
            ऑक्टोबर महिन्यात दिनांक 14,15,16 रोजी पर्यटन महोत्सव होणार असून या महोत्सवाची रुपरेषा ठरविण्यासाठी  कोल्हापूर जिल्हा पर्यटन समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंग पवार, महापौर अश्विनी रामाणे, महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सदाशिव साळुंखे, उपवन संरक्षक रंगनाथ नाईकडे, प्रोबेशनरी आयएएस श्रीमती भुवनेश्वरी, शाहू स्मारक ट्रस्टचे सचिव विवेक आगवणे, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील,  हॉटेल मालक असोसिएशनचे उज्ज्वल नागेशकर, अमरजा निंबाळकर आदींची उपस्थिती होती.
            ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या तीन दिवसाच्या पर्यटन महोत्सवामध्ये विविध ठिकाणच्या टुर ऑपरेर्ट्सची कोल्हापूर टुरिझमच्यादृष्टीने भेट घडवून आणण्यात येईल. त्यासाठी विविध सर्कीट्स तसेच जिल्ह्यातील वैशिष्ट्ये या बैठकीत निश्चित करण्यात आली. महोत्सवा दरम्यान इव्हीनिंग कल्चर शो शाहू मेमोरियल ट्रस्ट मध्ये दाखविण्यात येईल. यातून शाहू स्मारक भवनला कल्चरल हब बनिण्याचा प्रयत्न केला जाईल, तसेच दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शनही शाहू स्मारक येथे आयोजित  करण्यात येईल. तसेच लवकरच ट्रस्टच्या वतीने टुरिस्ट बसही सुरु करण्यात येणार असल्याचे डॉ. सैनी यांनी सांगितले. यात विविध तालमींच्या भेटी घडवून आणल्या जातील. पंचगंगा घाटावरील आरतीचाही यामध्ये समावेश करण्यात येईल, असे याबैठकी स्पष्ट करण्यात आले.
            या बैठकीत एमटीडीसीने महापालिका परिसरात माहिती केंद्र त्वरीत सुरु करावे. कोल्हापूरच्या पर्यटन वाढीच्या दृष्टीने ते आवश्यक असल्याचे सांगून या व्यतिरिक्त शाहू स्मारक भवन आणि रेल्वे स्टेशन परिसर या ठिकाणीही माहिती केंद्र सुरु करावीत. यावेळी पन्हाळा येथील इंटरप्रिटेशन सेंटर, एमटीडीसीकडून पन्हाळा नगरपालिकेला हस्तांतरीत करण्याबाबत तत्वत: मान्यता देण्यात आली. पन्हाळा शिवतीर्थ तलावाच्या सुशोभिकरणाला शासनाने 5 कोटी रुपये निधी मंजूर केला असून सदरचे काम रखडल्याबाबत जिल्ह्याकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करुन काम त्वरीत पूर्ण करावे. पंचगंगा घाट परिसर विकास आराखड्याबाबत महानगरपालिका आयुक्तांनी बैठक घ्यावी सदरचा विषय मार्गी लावावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी दिले.
            आंबा आणि राधानगरी येथील रेस्ट हाऊस सुधारणा करावी आणि ती शाहू स्मारक ट्रस्ट आणि संबंधित शासकीय यंत्रणा या दोहोंच्या माध्यमातंन चालविली जावीत यासाठीचा प्रस्ताव तयार करण्याबाबतही जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी सुचित केले.
            यावेळी हॉटेल मालक असोसिएशनच्या पदाधिकाऱ्याच्या वतीने कोल्हापूरसाठी स्वतंत्र पर्यटन धोरण असावे. पर्यटन स्थळे स्वच्छ असावीत, स्वच्छ पिण्याचे पाणी आणि शौचालयाच्या पुरेशा सुविधा असाव्यात, पार्किंग, टुरिस्ट बसेस असावे. गाईड प्रशिक्षण असावे आदी मागण्या करण्यात आल्या. 

  00 0 0 0 0 0

गणपती बाप्पा मोरया : अवयवदान करुया अवयवदान जागृतीपर पथनाट्याने सादरीकरण अवयवदानासाठी सर्वांनी फॉर्म भरुन नोंदणी करा.. जिल्हाधिकारी





         कोल्हापूर दि. 31 :  गणपती बाप्पा मोरया : अवयवदान करुया.. यासह अन्य घोषणांनी महाअवयवदान अभियानावरील महाविद्यालयींन विद्यार्थ्यांच्या पथनाट्याने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दुमदुमून गेला. यावेळी आकर्षक चित्ररथाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
अवयवदान हे श्रेष्ठ दान आहे. अवयवदानाबाबत समाजात जागृती  करण्यासाठी  जिल्ह्यात काल पासून   महाअवयवदान अभियान सुरु झाले असून या अभियानानिमित्त राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अवयवदान जनजागृती बाबत तयार केलेल्या पथनाट्याचे सादरीकरण जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, महानगरपालिका आयुक्त पी.शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, राजर्षि शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, निवासी उप जिल्हाधिकारी शंकर बर्गे आदीजण उपस्थित होते.
गणपती बाप्पा मोरया - अवयव दान करुया, सबसे महान अवयवदान अशा घोषणा देत राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अवयवदान जनजागृती पथनाट्याचे दिमाखदारपणे सादरीकरण केले.. मृत्युनंतरही आपण अवयवदानाच्या स्वरुपात दुसऱ्याच्या शरिरात जिवंत राहु शकतो. अवयवदानाच्या या उदत्त कार्याला जात, धर्म, लिंग यांचे बंधन नाही. अशा या महाअवयवदान अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वांनीच अवयवदानासाठी नांव नोंदणी करण्याचे आवाहनही या विद्यार्थ्यांनी पथनाटयाव्दारे उपस्थितांना केले.
अवयवदान जनजागृतीसाठी  पथनाट्याचे सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
अवयवदानासाठी सर्वांनी फॉर्म भरुन नोंदणी करा.. जिल्हाधिकारी
महाअवयवदान अभियान जिल्हयात कालपासून गतीमान झाले असून, या अभियानात जिल्ह्यातील जनतेने उत्फुर्तपणे सहभागी होऊन उद्या गुरुवार दि. 1 सप्टेंबररोजी आयोजित केलेल्या अवयवदान नोंदणी शिबीरात आपल्या नावाची नोंदणी करुन महाअवयवदानाच्या राष्ट्रीय कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी यावेळी केले.
जिल्हयात 30 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या कालावधीत हे अभियान प्रभावीपणे राबविण्याचे नियोजन केले असून जनजागृतीच्या विविध कार्यक्रमाव्दारे या अभियानात सहभागी होण्यासाठी जनतेला प्रोत्साहित केले जात आहे. अवयवदानाने मृत्यूच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या अनेक रुग्णांना दुसरे जीवन जगण्याची संधी आपण अवयवदानाव्दारे देवे शकतो, मृत्यूनंतरही आपण दुसऱ्याच्या शरिात जीवंत राहू शकतो. अवयवदानाच्या या उदात्त कार्यात सर्वानीच सक्रीय सहभाग नोंदवावा.
 1 सप्टेंबररोजी अवयवदान नोंदणी शिबीर आणि प्रत्यक्ष अवयवदान केलेल्या अवयव दात्यांचा सन्मान राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय, कोल्हापूर येथे आयोजित केला आहे. याचदिवशी अवयवदान नोंदणीसाठी सावित्रीबाई फुले हॉस्पीटल, डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पीटल, वेणूताई यशवंतराव चव्हाण होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज, एस. जे. पी. एज्युकेशन सोसायटी होमिओपॅथिक कॉलेज या ठिकाणीहीअवयवदान शिबीरांचे आयोजन केले आहे. अवयवदान नोंदणी 18 वर्षावरील व्यक्तींनी नोंदणी फॉर्म भरावयाचा असून, ऑनलाईन नोंदणी अर्ज Dmer.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत, असे राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी यावेळी सांगितले.
            यावेळी महसूल उपजिल्हाधिकारी किरण कुलकर्णी, जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे, उपवनसंरक्षक रंगनाथ नाईकडे, नायब तहसिलदार श्रीमती मोरे यांच्यासह अनेक अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकही उपस्थित होते.
000000