इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

मंगळवार, ८ नोव्हेंबर, २०१६

लष्करी इतमामात साश्रुपूर्ण नयनांनी शहीद राजेंद्र तुपारे यांना अखेरचा निरोप




        कोल्हापूर, दि. 8  : अमर रहे... अमर रहे, शहीद राजेंद्र तुपारे अमर रहे.. भारत माता की जय, वीर जवान तुझे सलाम  अशा गगनभेदी घोषणांनी साश्रुपूर्ण नयनांनी हजारोंच्या उपस्थितीत शहीद जवान राजेंद्र तुपारे यांना मजरे कार्वे येथे लष्करी इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला.
            यावेळी शहीद राजेंद्र तुपारे यांच्या पार्थिवास राज्य शासनाच्या वतीने  कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहिली. याबरोबरच  खासदार धनंजय महाडिक, आमदार संध्यादेवी कुपेकर, आमदार अमल महाडिक, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, बेळगावचे आमदार संजय पाटील, माजी आमदार भरमुअण्णा पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे, मराठा लाईट इन्फन्ट्री युनिटचे ब्रिगेडीअर प्रविण शिंदे यांनीही शहीद राजेंद्र तुपारे यांना पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहिली. यावेळी शहीद राजेंद्र तुपारे यांचे वडील नारायण तुपारे, पत्नी शर्मिला, पुत्र आर्यन आणि वैभव यांच्यासह हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता.
            शहीद राजेंद्र तुपारे यांचे तिरंग्यात लपेटलेले पार्थिव आज सकाळी 8.30 वाजता बेळगाव येथून त्यांच्या मूळ गावी मजरे कार्वे येथे आणण्यात आले. प्रथम त्यांच्या घरी त्यांच्या कुटुंबियांच्या अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात आले. वडील नारायण तुपारे, आई , पत्नी शर्मिला,  मुले आर्यन आणि वैभव तसेच नातेवाईकांनी साश्रुनयनांनी अंत्यदर्शन घेतले. यावेळी त्यांच्या कुटुंबियांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. यानंतर मजरे कार्वे गावातून शहीद राजेंद्र तुपारे यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली. रस्त्याच्या दोन्ही बाजूने जमलेल्या लोकांनी साश्रुनयनांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पवृष्टी केली. अंत्ययात्रेच्या मार्गावर दोन्ही बाजूला रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या व रस्त्याचा मध्य मार्ग विविध फुलांच्या पाकळ्यांनी सजवला होता. गावातील प्रत्येक चौकात शहीद राजेंद्र तुपारे अमर रहे.. वीर जवान तुझे सलाम अशा घोषणांचे  बॅनर्स लावण्यात आले होते. रस्त्याच्या दुतर्फा गावातील महिला, आबालवृध्द, तरूण मुले, मुली शहीद राजेंद्र तुपारे यांच्या पार्थिवावर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करत होते. त्यानंतर शहीद राजेंद्र तुपारे यांचे पार्थिव महात्मा फुले हायस्कुल व गुरुवर्य म.भ.तुपारे ज्युनिअर कॉलेजच्या प्रांगणात उपस्थित जनसमुदायाच्या अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. यावेळी लष्करी जवानांनी मानवी साखळी तयार करुन शहीद जवान राजेंद्र तुपारे यांना अखेरची मानवंदना दिली. त्यावेळी उपस्थित जवान, तसेच जनसमुदायाच्या शोकभावना अनावर झाल्या. यावेळी दोन मिनिटे स्तब्धता पाळून शहीद जवान राजेंद्र तुपारे यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर राष्ट्रीय ध्वज शहीद जवान राजेंद्र तुपारे यांच्या पत्नी शर्मिला यांच्या हाती लष्कराच्या वतीने अर्पण करण्यात आला. यावेळी राज्य शासनाच्या वतीने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी तसेच कुटुंबियांनी शहीद जवान राजेंद्र तुपारे यांच्या पार्थिवास पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली अर्पण केली.   
            शहीद जवान राजेंद्र तुपारे यांचे  पार्थिव  महात्मा फुले हायस्कुल व गुरुवर्य म.भ.तुपारे ज्युनिअर कॉलेजच्या प्रांगणात खास तयार केलेल्या आणि फुलांनी सजविलेल्या चौथऱ्यावर आणण्यात आले.   यावेळी वडील नारायण तुपारे यांनी शहीद जवान राजेंद्र तुपारे यांच्या पार्थिवास पुष्पचक्र अर्पण करुन अखेरची मानवंदना दिली.   लष्कराच्या 14 जवानांच्या पथकाने बंदुकीच्या तीन फैरी हवेत झाडून शहीद राजेद्र तुपारे यांना अखेरची मानवंदना दिली. त्यानंतर शहीद जवान राजेंद्र तुपारे यांचे पुत्र आर्यन यांनी शहीद जवान राजेंद्र तुपारे पार्थिवास अग्नी दिला. यावेळी अमर रहे... अमर रहे शहीद राजेंद्र तुपारे अमर रहे.. भारत माता की जय, वीर जवान तुझे सलाम  अशा शोकाकुल घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
राज्य शासनाच्या वतीने 15 लाखाची मदत
        शहीद जवान राजेंद्र तुपारे यांच्या हौताम्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त करुन त्यांच्या कुटुंबियांना राज्य शासनाच्या वतीने 15 लाखाचा निधी जाहिर केला आहे. याबाबतचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना आलेला संदेश यावेळी जाहिर करण्यात आला.
            यावेळी प्रांताधिकारी संगीता चौगुले, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल सुभाष सासने, व्हाईट आर्मीचे प्रमुख अशोक रोकडे, तहसिलदार आप्पासाहेब समिंदर, पंचायत समितीच्या सभापती ज्योती पाटील,  विजय देवणे, मजरे कार्वेचे सरपंच अशोक कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी शासकीय व लष्करी अधिकारी, जवान आणि बेळगाव, कोल्हापूर परिसरातील हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता. यावेळी लष्करी व पोलीस जवानाबरोबरच व्हाईट आर्मीच्या जवानांनीही मोलाचे योगदान दिले.

00000

बुधवार, २ नोव्हेंबर, २०१६

पोलिसांची निवासस्थाने सुधारणार - पालकमंत्री चंद्रकांत पाटील




कोल्हापूर, दि. 2 :  पोलिसांची निवासस्थाने अत्यंत दयनीय स्थितीत असून ही स्थिती सुधारण्यासाठी राज्यात 29 हजार निवासस्थाने पोलिसांसाठी बांधण्यात येणार असून यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील 1400  निवासस्थानांचा समावेश आहे,  ही बांधकामे पूर्ण होईपर्यंत सध्या असणाऱ्या निवासस्थानांमध्ये शौचालये, सांडपाणी व्यवस्था, पाणी पुरवठा, रंगरंगोटी अशा सुविधा लवकरच उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
            पोलीसांच्या निवासस्थानाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच आढावा घेतला असून प्रत्येक पालकमंत्र्यांनी आपल्या जिल्ह्यात पोलीस क्वाटर्समध्ये जाऊन भेट द्यावी, असे आवाहन केले होते. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पोलीस मुख्यालयातील निवासस्थानांमध्ये भेट देऊन पाहणी केली व आढावा घेतला. यावेळी आयोजित समारंभात त्यांनी पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता एस.एस.साळुंखे, कार्यकारी अभियंता आर.एस.पाटील, नगरसेविका स्वाती यवलुजे, पोलीस उप अधीक्षक (गृह) सतिश माने पोलीस उप अधीक्षक भरतकुमार राणे यांची प्रमुख उपस्थिती होती.           
पोलीस मुख्यालय कोल्हापूर येथील 100 वर्षापूर्वीची शाहूकालीन 518 जुनी निवासस्थाने पाडून त्याठिकाणी अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी पोलीस गृह निर्माण व कल्याण महामंडळातर्फे बहुमजली इमारत बांधकामाबाबतची प्रशासकीय कारवाई सुरु आहे. ही बांधकामे पूर्ण होण्यासाठी काही कालावधी लागणार असून तोपर्यंत सध्या असलेल्या क्वाटर्समध्ये चांगल्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी शौचालय, सांडपाणी व्यवस्था, पाणी पुरवठा व्यवस्था, रंगरंगोटी यांच्या दुरुस्तीसाठी, सुधारणेसाठी तसेच 1986 मध्ये बांधलेल्या निवासस्थानांच्या मेंटन्ससाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सूचनेनुसार प्रस्ताव तयार केले असून सदरचे प्रस्ताव आपण स्वत: मंत्रालयस्तरावर घेऊन जाणार असून यासाठी आवश्यक निधी तात्काळ उपलब्ध करुन देणार असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. नगरपालिकेची आचारसंहिता संपताच याबाबतची निविदा प्रक्रिया करा व मे अखेरपर्यंत ही कामे पूर्ण करा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. पोलीस निवासस्थानांची पाहणी करत असताना चंद्रकांत पाटील यांनी वाहक आप्पासो घाटगे यांच्या घरी भेट देऊन चहापान केले. 
            कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातंर्गत सध्या पोलीस मुख्यालय, कोल्हापूर 718 यामध्ये जुनी शाहू कालीन 518 व 1986 साली बांधलेली 200, लक्ष्मीपुरी पोलीस लाईन 60, रिसाला पोलीस लाईन, कसबा बावडा 51, जुना बुधवार पोलीस लाईन 84 अशी 913 निवासस्थाने उपलब्ध आहेत. महाराष्ट्र राज्य पोलीस गृह निर्माण कल्याण महामंडळामार्फत 1139 निवासस्थानांना मंजूरी प्राप्त झालेली आहे. सदर मंजुरी अंतर्गत पहिल्या टप्यात जुना बुधवार पोलीस लाईन येथे 200 निवासस्थाने व लक्ष्मीपुरी पोलीस लाईन येथे 200 निवासस्थाने. जुनी निवासस्थाने पाडून त्या ठिकाणी बांधणेबाबत प्रशासकीय कार्यवाही सुरु झालेली आहे. तसेच इचलकरंजी येथे अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी कलानगर येथील पोलीस खात्याच्या मोकळ्या जागेवर एकूण 242 निवासस्थाने बांधकामाबाबत कार्यवाही सुरु आहे. पोलीस मुख्यालय कोल्हापूर येथे 718 निवासस्थाने उपलब्ध असून त्यापैकी जुनी शाहू कालीन 518 तर 1986 साली बांधलेली 200 निवासस्थाने आहेत. यामध्ये 18 निवासस्थाने राहण्यास अयोग्य असून उर्वरित मध्ये कर्मचारी राहत आहेत.
             
                        पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी पोलीस विभागाकडून जनतेच्या व प्रशासनाच्या अपेक्षा वाढत असून त्यांच्या समस्या जाणून त्या सोडविण्यासाठी व पायाभुत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी शासन प्रयत्नशिल आहे.  आतापर्यंत पोलीसांना 180 चौ. फुटाची निवासस्थाने होती. ती आता 430 चौ.फुटाची होतील. जिल्हा मुख्यालयातील जुनी 518 निवासस्थाने पाडून टप्याटप्याने टॉवर उभे केले जातील.  1986 मधील 200 निवासस्थाने न पाडता त्यांच्यात सुधारणा केली जाईल. यामुळे पोलीसांना व त्यांच्या कुटुंबियांना अधिक चांगले वातावरण लाभेल.
            कार्यक्रमाचे प्रस्ताविक व आभार पोलीस उप अधीक्षक (गृह) सतिश माने यांनी केले


00000