इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

गुरुवार, २६ जानेवारी, २०१७

देशाच्या प्रगतीसाठी जातीभेद विसरुन एकजुट व्हा - पालकमंत्री चंद्रकांत पाटील






            कोल्हापूर, दि. 26 : विविधता में एकता यहीं भारत की विशेषता असे आपण म्हणतो. पण व्यवहारात अडनावावरुन जात  शोधतो ही विसंगती दूर करुन जाती, धर्म, पंथ विसरुन देशाच्या प्रगतीसाठी  एकजुट व्हा. विविधतेमध्ये सुध्दा आपण एक आहोत ही जाणीव बळकट करा, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
                प्रजासत्ताक दिनाच्या 67 व्या वर्धापन दिन समारंभात महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. छत्रपती शाहू स्टेडियम येथे झालेल्या या ध्वजारोहण समारंभात पालकमंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते. यावेळी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विमल पाटील, महापौर हसिना फरास, विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, जिल्हा पोलीस अधीक्षक महादेव तांबडे, महापालिका आयुक्त पी.शिवशंकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, अतिरिक्त जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सदाशिव साळुंखे,  निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू तेजेस्वीनी सावंत, लंडन विद्यापीठाचे प्राध्यापक ॲड्रेन मेहर, विभागीय कृषि सहसंचालक नारायण शिसोदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
                भारतीय राज्य घटनेत प्रत्येक घटकाचा अत्यंत सुक्ष्म विचार केलेला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या या संविधानात अत्यंत सुत्रबध्दता असल्याने कुठलाही गोंधळ नसतो, कुठलीही संदिग्धता नसते असे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घटनेने दिलेले अधिकार आणि कर्तव्य याची जाणीव प्रत्येकाने ठेवावी. अधिकार उपभोगत असतानाच कर्तव्यात कसूर करु नये, असेही सांगितले.  भारतीय राज्य घटनेने प्रत्येकाला मतदानाचा अधिकार दिलेला आहे हा अधिकार लोकशाहीचा गाभा आहे. कुठलीही निवडणूक असो आपल्या या अमुल्य मताचा अधिकार बजावा, असे आवाहनही त्यांनी केले.
                या कार्यक्रमामध्ये पोलीस अधीक्षक एम.बी.तांबडे व हातकणंगले पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार शिवाप्पा मोर्ती यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रपती पोलीस पथक जाहिर झाल्याबद्दल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते  गौरविण्यात आले.
                ध्वजवंदनाच्या मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पोलीस मुख्यालय, सशस्त्र पोलीस पथक, सशस्त्र पोलीस पथक महिला, गृहरक्षक दल, अग्निशमन दल, प्रादेशिक परिवहन पथक, वनरक्षक, एन. सी. सी., आर. एस. पी. विद्यार्थी, नेव्ही एन.सी.सी., तारा कमांडो फोर्स, आर.एस.पी. पथक, वायू एन. सी. सी. पथक, कमांडिंग फोर्स, भारत गर्ल्स गाईड पथक,  व्हाईट आर्मी, निरीक्षण गृह पथक, पोलीस बँड, श्वान पथक, कॉलेज ऑफ फायर इंजिनिअरींग, सह्याद्री कॅडेट फोर्स, दंगल नियंत्रण तसेच शहर व जिल्ह्यातील विविध शालेय विद्यार्थी-विद्यार्थींनीच्या विविध पथकांकडून मानवंदना स्वीकारली.
                यावेळी विविध विभागांनी आकर्षक व लक्षवेधी चित्ररथ सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. यामध्ये निर्भया पथकाचा चित्ररथ यावर्षीचे आर्कषण ठरला.  यामध्ये मोबाईल फॉरेन्सीक इन्वीस्टीगेशन विभागाचे वाहन, महात्मा गांधी तंटामुक्ती योजनेचा चित्ररथ, दंगल नियंत्रण पथक वाहन, कॅशलेस इंडियाचा बँक ऑफ इंडियाचा चित्ररथ, आरोग्य, आपत्ती व धोके व्यवस्थापन, सामाजिक वनीकरण व वन विभाग, स्वच्छ भारत अभियान, बेटी बचाओ बेटी पढाओ, एडस् नियंत्रण, केंद्रांच्या विविध योजना, शिक्षण विभागाचा ज्ञानरथ, 108 रुग्णवाहिका, व्हाईट आर्मी, विविध शाळांच्या लक्षवेधी चित्ररथांचा समावेश होता.
                याप्रसंगी सिध्दीगिरी गुरुकुल कणेरीमठाने लाठी काठी प्रात्यशिके दाखविली तर महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळातील मुलांनी माझे कोल्हापूर हे सादर केलेले समुह नृत्य विशेष लक्षवेधी ठरले. पालकमंत्री पाटील यांनी स्वत: जावून या चिमुकल्यांचे कौतुक केले. उषाराजे हायस्कुलच्या विद्यार्थींनी शेतकरी नृत्य सादर केले तर सुमारे अडीच हजार विद्यार्थी, विद्यार्थींनीनी सारे जहांसे अच्छा आणि आनंद कंद ऐसा हा हिंद देश माझा ही समुह गीते सादर केली.   
               


0 0 0 0 0 0

गुरुवार, १९ जानेवारी, २०१७

नामनिर्देशनपत्र ऑनलाईन भरण्यासाठी निवडणूक आयोगामार्फत टेस्ट साईट - जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी



कोल्हापूर, दि. 19 : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र व शपथपत्र ऑनलाईन भरणे बंधनकारक केले आहे. यासाठी राज्य निवडणूक आयोगाने www.testsecgp.mahaonlinegov.in  ही टेस्ट साईट सुरु केली असून या टेस्ट साईटवर राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी सराव करावा, जेणेकरुन नामनिर्देशनपत्र भरतेवेळी अडचण येणार नाही, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी केले.
जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हा पुरवठा अधिकारी तथा निवडणूक नोडल ऑ‍फिसर विवेक आगवणे, प्रांताधिकारी किर्ती नलवडे यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे अधिकारी आणि राजकीय पक्षांचे पदाधिकारी तसेच प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी यावेळी नामनिर्देशन पत्र व शपथपत्र ऑनलाईन भरण्यात येणार असून या फॉर्मची प्रत स्वाक्षरी करुन निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे विहित वेळेत व विहित पध्दतीने दाखल करणे आवश्यक आहे. अशा प्रकारे भरलेला व स्वाक्षरी केलेला नामनिर्देशन पत्राचा अर्ज नामनिर्देशन पत्र म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे.  यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मदत कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. या शिवाय राज्य निवडणूक आयोगाने राजकीय पक्ष आणि उमेदवारांसाठी www.testsecgp.mahaonlinegov.in  ही टेस्ट साईट सुरु केली असून या टेस्ट साईटसाठी विभाग औरंगाबाद व जिल्हा बीडचा वापर करुन सराव करण्यास प्राधान्य द्यावे. या बाबतीत काही अडचणी असल्यास संबंधित तालुक्याच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी केले. या निवडणुकीमध्ये नामनिर्देश पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारांनी ए.बी. फॉर्म देणे बंधनकारक केले असल्याचेही डॉ. सैनी यांनी स्पष्ट केले.
यंदाच्या निवडणुकीत उमेदवारांनी शपथपत्रामध्ये सादर केलेली स्थावर मालमत्ता, जंगम मालमत्ता, गुन्हेगारी पार्श्वभुमी तसेच शिक्षण याबाबी मतदान केंद्राबाहेर लावण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी सांगितले. राजकीय पक्ष अथवा उमेदवारांनी परस्परांमध्ये द्वेष किंवा तणाव निर्माण होईल अशी कोणतीही कृती करु नये, सोशल मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया, प्रिंट मिडिया यांचा वापर करुन प्रलोभने किंवा लाच देता येणार नाही, पोस्टर्स, बॅनर, फलक लावण्यासाठी महाराष्ट्र मालमत्ता विरुपन प्रतिबंध अधिनियम 1995 चे काटेकोर पालन करावे, तसेच निवडणूक प्रचाराकरीता प्राण्यांच्या वापरास प्रतिबंध केला आहे. निवडणूक प्रचाराच्या मिरवणूका तसेच निवडणूक प्रचाराशी संबंधित कार्यक्रमामध्ये 14 वर्षा खालील मुलांचा वापर करता येणार नसल्याचेही  यावेळी स्पष्ट करण्यात आले. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमध्ये इलेक्ट्रॉनिक, प्रिंट आणि सोशल मिडिया वरील पेड जाहिरातीसाठी परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आल्याचेही जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी यावेळी स्पष्ट केले.
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका निर्भय, मुक्त आणि पारदर्शी  वातावरणात पार पाडव्यात यासाठी सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी निवडणूक आयोगाच्या आदर्श आचारसंहितेचे काटेकोटरपणे पालन करुन निवडणूक यंत्रणेला सहकार्य करावे.   असे आवाहन करुन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी म्हणाले, या निवडणुकीसाठी जिल्हास्तरावर आचारसंहिता कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून त्याचा नंबर 0231-2651950 असा आहे. याबरोबरच तालुकास्तरावरही नियंत्रण कक्ष, तक्रार निवारणकक्ष,  व्हिडीओ ग्राफी सर्व्हेलियन्स पथक, भरारी पथक, स्टॅटिक सर्व्हेलन्स  पथक  सुरु करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.  
यावेळी जिल्हा परिषद, पंचयात समिती निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी, ऑनलाईन नामनिर्देशनपत्र व शपथपत्र भरणे, निवडणूक खर्चाची मर्यादा व हिशोब आदीबाबींवर माहिती देण्यात आली व चर्चा करण्यात आली.            
               

000000

बुधवार, १८ जानेवारी, २०१७

आचारसंहिता भंगाच्या तक्रारींवर कठोर कारवाई करा - जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी तालुकास्तरावरही संनियंत्रण समिती कार्यान्वित करा



कोल्हापूर, दि. 18 : आचारसंहितेचे कटाक्षाने पालन करण्याबरोबरच आचारसंहिता भंगाच्या तक्रारींवर तात्काळ आणि कठोर कारवाई करा, असे  निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी दिले.
जिल्ह्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून या निवडणूका मुक्त, निर्भय आणि पारदर्शी  वातावरणात पार पाडव्यात यासाठी सर्व निवडणूक यंत्रणांनी सज्ज आणि सतर्क राहून निवडणूक विषयक जबाबदारी काटेकोरपणे पारपाडावी, निवडणुकीच्या कामात टाळाटाळ आणि हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी दिला.
            जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीची बैठक महाराणी ताराबाई सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या अध्यक्षतेखाली  झाली.   त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस पोलीस अधीक्षक महादेव तांबडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, अतिरिक्त जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा पुरवठा अधिकारी तथा निवडणूक नोडल ऑ‍फिसर विवेक आगवणे यांच्यासह सर्व निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तसेच संबंधित  विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
 जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात संनियंत्रण समिती तात्काळ सुरु करण्याचे निर्देश देऊन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी म्हणाले, प्रत्येक तालुक्यात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कार्यान्वित केलेल्या व्हिडीओ ग्राफी सर्व्हेलियन्स पथक, स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम,  भरारी पथक, चेक पोस्ट पथक यामध्ये योग्य समन्वय ठेऊन त्यांना दिलेल्या जबाबदाऱ्या कार्यक्षमपणे पार पाडल्या जातील याची दक्षता घ्या.  बोर्ड, बॅनर, होर्डिग अशा जाहिराती तात्काळ काढण्याची कार्यवाही करण्याची सूचनाही त्यांनी केली. जिल्हास्तरावर आचारसंहिता कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून त्याचा नंबर 0231-2651950 असा आहे.
पाहणी करुनच मतदान केंद्रे निश्चित करा-जिल्हाधिकारी
  जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदान केंद्रांची पाहणी करुनच ती निश्चित करा, असे स्पष्ट निर्देश देऊन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी म्हणाले, मतदान केंद्रे आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार सुस्थितीत असतील याची दक्षता घ्यावी. पाणी, लाईट, रॅम्प आणि  सुरक्षितता आदी गोष्टींची व्यवस्था करण्याची सूचनाही त्यांनी केली.
जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 67  गटासाठी तर पंचायत समितीच्या 134 गणांसाठी 21 फेब्रुवारी 2017 रोजी मतदान होत असून या निवडणूका मुक्त, निर्भय, शांततेत आणि सुव्यवस्थेत पार पडाव्यात यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी आपआपली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, अशी सूचना करुन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी म्हणाले, आचारसंहिता कालावधीमध्ये निवडणूकीच्या क्षेत्रात घडणाऱ्या महत्वाच्या घटना, मिरवणूका, प्रचार फेऱ्या, सभा अथवा आचारसंहितेचा भंग होईल अशा घटनांचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात यावे. भरारी पथक स्थापन करुन पैशाच्या व मद्याची अवैध मार्गाने वाहतूक, मतदारांना प्रलोभन ठरतील अशा व अन्य संशयास्पद हलचालींवर लक्ष ठेवून आयोगाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.
नामनिर्देशन पत्र व शपथपत्र ऑनलाईन
 जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये नामनिर्देश पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारांनी ए.बी. फॉर्म देणे बंधनकारक केले असल्याचे सांगून जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी म्हणाले, या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र व शपथपत्र ऑनलाईन भरण्यात येणार असून या फॉर्मची प्रत स्वाक्षरी करुन निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे विहित वेळेत व विहित पध्दतीने दाखल करणे आवश्यक आहे. अशा प्रकारे भरलेला व स्वाक्षरी केलेला नामनिर्देशन पत्राचा अर्ज नामनिर्देशन पत्र म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे.  यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मदत कक्षांची स्थापना करण्यात आली असून त्याचाही यावेळी आढावा घेण्यात आला. याबाबत अधिक दक्ष राहण्याची सूचनाहीत्यांनी केली.
जिल्हाभर मतदार जागृतीचे कार्यक्रम राबविणार-जिल्हाधिकारी
यंदाच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदार जागृती अभियान गतीमान करण्याची सूचना करुन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी म्हणाले, मतदार जागृतीसठी नव मतदार तसेच विद्यार्थ्यांच्या तालुकास्तरावर मोठ्यां गावामध्ये रॅली काढण्याबरोबरच मतदान जागृतीचे विविध कार्यक्रम आयोजित करण्याची सूचना त्यांनी केली.
कोल्हापुरात 25 जानेवारीला मतदार जागृती रॅली
          येत्या 25  जानेवारी या राष्ट्रीय मतदार दिनी कोल्हापूर शहरासह सर्व तालुक्याच्या ठिकाणी  मतदार जागृती रॅलीचे आयोजन करावे. या रॅलीमध्ये नवमतदारांबरोबरच सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी केले. कोल्हापूर शहरात 25 जानेवारी रोजी
 मतदार जागृती रॅली काढण्यात येणार असून  या रॅलीमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी, एनसीसी, एनएसएस विद्यार्थी, विद्यार्थींनी व महिला बचत गट, नेहरु युवा केंद्राचे युवक, बीएलओ तसेच नागरिकांचा सहभाग घेतला जाणार असल्याचेही ते म्हणाले. ही रॅली बिंदू चौकातून निघून पुढे शिवाजी पुतळा, महानगरपालिकामार्गे दसरा चौक येथे येऊन या रॅलीचा समारोप होईल. याच दिवशी सकाळी 10 वाजता शाहू स्मारक येथे नवमतदारांना मतदान ओळखपत्रांचे वितरण, उत्कृष्ठ काम केलेल्या बीएलओ तसेच मतदार जागृतीसाठी घेण्यात आलेल्या निबंध, वक्तृत्व, चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 
          यावेळी जिल्हा परिषद, पंचयात समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता व अन्य निवडणूक  कामकाजाबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली.
            या बैठकीस पोलीस निरीक्षक एन.एच.भुजबळ, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वर्मा, जिल्हा कोषागार अधिकारी रमेश लिथडे, शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव विलास नांदवडेकर, विक्रीकर उप आयुक्त सुनिल कानगुडे, अग्रणी बँकेचे अधिकारी रवींद्र बार्शीकर यांच्यासह सर्व संबंधित  विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
           

000000

सोमवार, ९ जानेवारी, २०१७

सुदृढ आरोग्यासाठी प्रत्येकाने खेळासाठी एक तास द्यावा -- जिल्हा परिषद अध्यक्षा विमलताई पाटील



        




कोल्हापूर दि. 9 : सुदृढ आरोग्य जपण्यासाठी प्रत्येकाने खेळासाठी एक तास द्यावा असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विमलताई पाटील यांनी केले.
जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचारी यांच्या क्रीडा स्पर्धा -2017 चे येथील पोलीस क्रीडांगणावर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विमलताई पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, जिल्हा पोलीस अधीक्षक महादेव तांबडे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शशिकांत खोत यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विमलताई पाटील म्हणाल्या, खिलाडूवृत्ती जोपासल्यास खेळाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांचे आरोग्य चांगले राहते. यासाठी कर्मचाऱ्यांनी खेळांमध्ये लक्ष द्यावे.
जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार प्रास्ताविकात म्हणाले, नवीन वर्षाची जोशपूर्ण सुरुवात क्रीडा स्पर्धेने होत आहे. अधिकारी, कर्मचारी यांचे शारिरीक, मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी क्रीडा स्पर्धांचे गेल्या तीन वर्षापासून आयोजन करण्यात येत आहे. हा उपक्रम करणारी राज्यात कोल्हापूरची जिल्हा परिषद एकमेव आहे. देशात प्रथम शिंगणापूर येथे संकुल उभारले आहे असे उपक्रम चांगले आहेत.
क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विमल पाटील यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलन करुन सार्वजनिक क्रीडा शपथ घेण्यात आली तसेच क्रीडा ध्वज फडकविण्यात आला. 3 दिवस चालणाऱ्या या क्रीडास्पर्धेचा 11 जानेवारीस बक्षीस वितरण समारंभ होणार आहे. 
यावेळी लहान मुलाने हलगीचा ठेका धरताच सर्वजण मंत्रमुग्ध झाले. जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी या मुलांचे कौतुक करुन त्यांचा विशेष सत्कार केला. यावेळी जिल्हा परिषदेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी क्रीडा संचलन करुन मान्यवरांना मानवंदना दिली.
फुटबॉल, कुस्ती, कबड्डी नसानसात भिनलेल्या कोल्हापूरवासियांच्या तिसऱ्या वर्षीच्या या क्रीडा संचलनात जिल्हा परिषदेचे कृषि, लेखा व वित्त, आरोग्य, ग्रामीण विकास यंत्रणा, पशुसंवर्धन, बांधकाम, ग्रामपंचायत, पंचायत समिती, महिला व बाल कल्याण, शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. पन्हाळा पंचायत समिती बहिरेवाडीच्यावतीने केलेल्या संचलनात घोड्यावर बसलेले छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, मावळे तसेच हातकणंगले पंचायत समितीच्या मल्हारी मार्तंड वेशभूषेतील कर्मचारी, पन्हाळ्याच्या चव्हाणवाडीचे हलगीपथक, भारताच्या विविध जिल्ह्याच्या भागातील नागरिकांचे विविधतेतून एकता दशर्विणारे पेहराव परिधान केलेले स्त्री-पुरुष कर्मचारी, अजित मगदूम लिखित तुमच्यासंग मला येवू द्या की.. मलाबी खेळाला येवू द्या की.. या गाण्यावर धनगरी वेशभूषेतील नाच करीत संचलन करणारे कर्मचारी, लहान मुलींचे झांज पथक, टाळ मृदुंगाच्या गजरात वारकरी वेशभूषेतील कर्मचाऱ्यांमुळे वेगळे चैतन्य निर्माण झाले होते.
यावेळी जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचे मान्यवर पदाधिकारी, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

000000

आई-वडिलांनी, पालकांनी सज्ञान मुलांना वाहनाबरोबर स्वयंशिस्तीचे धडे द्यावेत -- जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी





       
कोल्हापूर दि. 9 : आई-वडिलांनी, पालकांनी सज्ञान मुलांकडे वाहन देताना स्वयंशिस्तीचे धडे देणे आवश्यक व गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी केले.
28 वा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह व राज्य रस्ता सुरक्षा अभियान 9 जानेवारी ते 23 जानेवारी पंधरवड्यांतर्गत आपली सुरक्षा, कुटुंबाची रक्षा, रस्ता सुरक्षेवर लक्ष द्या या जनजागृती कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या हस्ते येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या सभागृहात करण्यात आले.
            योवळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी पुढे म्हणाले, रस्त्यावरील अपघातात प्रत्येक तासाला 2 मृत्यू हे प्रमाण महाराष्ट्रात आहे. दुसऱ्यांच्या चुकांमुळे अपघात होण्याचे प्रमाण अधिक असल्यामुळे वाहनचालकांनी स्वयंशिस्त पाळणे आवश्यक आहे. वाहनमालकांनी त्यांच्या वाहनचालकांची मानसिकता विचारात घेणे महत्वाचे आहे. प्रत्येक नागरिकांची सुरक्षा त्याच्या कुटुंबाची सुरक्षा ही जाणीव लक्षात घेवून वाहन चालविण्याचा परवाना देतांना काटेकोर तपासणी गरजेची आहे.
            जिल्हा पोलीस अधीक्षक महादेव तांबडे म्हणाले, प्रत्येकाला आपल्या जीवाची काळजी असली पाहिजे, अतिघाई, व्यसनाधिनता, अहंकार,स्वयंशिस्तीचा अभाव ही अपघाताची प्रमुख कारणे आहेत. कायद्याची जाणीव जागृती होण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
            प्रादेशिक परिवहन अधिकारी डी. टी. पवार म्हणाले, वाहनांना ओव्हरटेकप्रसंगी अहंकाराच्या प्रभावामुळे वाहनचालकाची एकाग्रता भंग होऊन बुध्दीची स्थिरता राहत नाही त्यामुळे अहंकार हे अपघाताचे मोठे कारण आहे. यासाठी सहदारीच्या नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.
            राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुनिल रामानंद म्हणाले, बहुतांशी अपघातात डोक्यास गंभीर इजा झाल्याने मृत्यू असून, 20 ते 35 वयोगटात पुरुषांमध्ये हे मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. आयुष्यात प्रत्येक वळणावर शिस्तबद्धपणा, अनुशासन, वैयक्तिक जीवनात स्वयंशिस्त आवश्यक असून, दुचाकी वाहन चालविताना डोक्यास हेल्मेट वापरणे अत्यंत गरजेचे आहे. जनजागृतीसाठी कार्यक्रमांचे आयोजन ही चळवळ होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
            सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सदाशिव साळुंखे म्हणाले, 2 लाख 94 हजार किलोमीटर रस्त्यांचे जाळे आहे. स्त्यावरच्या अपघातात, वाढती लोकसंख्या, वाहनांची वाढती संख्या ही काळजीची बाब आहे. 85 टक्के अपघात चालकांच्या चुकीमुळे होतात. 1995 पासून अपघात प्रवण क्षेत्रे निश्चित करण्यास सुरुवात करण्यात आली असून, अपघात टाळण्यासाठी ट्रॅफिक सेफ्टी ऑडीटचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. कोल्हापूरमध्ये 18 ठिकाणे अपघात प्रवण ठिकाण म्हणून निश्चित केली आहेत या ठिकाणी टेस्टींग ट्रप ही नवीन प्रणाली सुरु करण्यात येत असून याप्रणालीतून चालकांच्या चुका निदर्शनास येतील. त्यामुळे चांगले चालक निर्माण होतील.
            उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वर्मा प्रस्ताविकात म्हणाले, आपली सुरक्षा कुटुंबाची रक्षा या कार्यक्रमात 80 कार्यक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. यातील 20 कार्यक्रम शाळा, महाविद्यालय स्तरावर घेण्यात येणार असून, 22 कार्यक्रम साखर कारखाने, 10 शिबिरे याबरोबरच  विविध कार्यक्रमात रस्ते तपासणी, हेल्मेट, शिटबेल्ट, रिफ्लेक्टर, रिक्षा तपासणी, नगरपालिकेमार्फत विशेष प्रबोधन कार्यक्रम, विविध स्पर्धा, निबंध, चित्रकला पोस्टर्स स्पर्धा अशा जलजागृती कार्यक्रमांचे आयेाजन करण्यात आले आहे.
यावेळी रस्ता सुरक्षा अभियानाबाबतच्या चिन्हांचे व साहित्याचे प्रकाशन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभदा हिरेमठ यांनी केले. शहर पोलीस वाहतूक निरीक्षक अशोक धुमाळ यांनी आभार मानले.

000000

सोमवार, २ जानेवारी, २०१७

विशेष घटकमधील खर्चीत निधीची त्रयस्थ यंत्रणेमार्फत तपासणी करणार- पालकमंत्री चंद्रकांत पाटील



* समाज कल्याणमध्ये पालकमंत्र्यांची पहिल्यांदाच आढावा बैठक
* योजनेचा डिसेंबर अखेर केवळ 43 टक्के निधी खर्च
* विशेष घटकमधील सर्व निधी खर्च करण्याचे पालकमंत्र्याचे निर्देश

        कोल्हापूर, दि. 2 : अनुसूचित जाती उपयोजना सन 2016-17 साठी 100 कोटी 81 लाख रुपये मंजूर नियतव्यय असून डिसेंबर 2016 अखेर 40 कोटी 99 लाख रुपये खर्च झाला आहे. उपलब्ध निधीच्या केवळ 43 टक्के खर्च झाला असून सर्व यंत्रणांनी मार्चअखेर पर्यंत 100 टक्के निधी खर्च होईल, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश देऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अनुसूचित उपयोजनेंतर्गत उपलब्ध निधीतून झालेल्या खर्चाची त्रयस्थ यंत्रणेमार्फत तपासणी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.
            अनुसूचित जाती उपयोजनेचा (विशेष घटक योजना) कार्यान्विन यंत्रणा निहाय आढावा बैठक पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय येथे घेतली. 1981 पासून अनुसूचित जातीतील घटकांच्या विकासासाठी ही योजना सुरु झाली असून आजपर्यंत यामधील योजनांचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा वार्षिक योजनेच्या बैठकी सोबतच घेतला जात होता. पण यावेळी पहिल्यांदाच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सदरची बैठक समाज कल्याण कार्यालयात घेऊन नवा पायंडा पाडला. या योजनेशी संबंधित बैठक दर तीन महिन्यांनी स्वतंत्रपणे घेण्यात येईल, असे सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, सहायक समाज कल्याण आयुक्त विशाल लोंढे, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सदाशिव साळुंखे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजीत देशमुख, प्रकल्प संचालक डॉ. हरिष जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.
            अनुसूचित जाती घटकांच्या विकासासाठी विशेष घटक योजनेंतर्गत विविध योजना राबविण्यात येतात. या सर्व योजनांचा लाभ संबंधित घटकांपर्यंत पोहचविण्यासाठी कार्यान्विन यंत्रणांनी तत्पर रहावे, असे सांगून अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत यावर्षी खर्च होणाऱ्या निधीतून किती आणि कोणत्या लाभार्थ्यांना लाभ मिळाला, कोणती कामे पूर्ण झाली याची माहिती संबंधित यंत्रणांनी द्यावी. यासर्वांची त्रयस्थ यंत्रणेमार्फत खातरजमा करण्याचे निर्देशही पालकमंत्री पाटील यांनी दिले.
            यावर्षी समाज कल्याण विभागाने 15 कोटी रुपये, सार्वजनिक बांधकाम विभागाने 24 कोटी 26 लाख रुपये आणि क्रिडा विभागाने 3 कोटी 40 लाख रुपये असा 100 टक्के निधी खर्च केला आहे. तर सन 2017-18 साठी 169 कोटी 12 लाख एवढी असून 113 कोटी 41 लाख रुपयांचा आराखडा मंजूर झाला आहे. यामधील नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी 3 कोटी 40 लाखांचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे.
            यंत्रणानिहाय खर्चाचा आढावा घेत असताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यापुढे प्रत्येक विभागाने या योजनेशी संबंधित खर्चाचा अहवाल दरमहा  सहायक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडे पाठवावा. यामध्ये हलगर्जी करणाऱ्या यंत्रणांवर कारणे दाखवा नोटीसा बजावण्याचे निर्देश त्यांनी दिले. जिल्हा परिषदेच्या निवडणूकानंतर संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांच्या घरी भेट द्यावी व योजनेच्या लाभाची परिणामकारकता पहावी, असेही त्यांनी यावेळी सूचित केले.
            जिल्ह्यात अद्यापही दलित वस्त्यांमध्ये साकव बांधकामे होत आहेत. इतकी वर्ष साकव बांधकामे सुरु असूनही अद्यापही  या कामांची आवश्यकता का आहे, असा प्रश्न उपस्थित केला. सार्वजनिक बांधकाम विभागाने या योजनेशी संबंधित 89 कोटी रुपयांची कामे केली आहेत. तथापी यांचा निधी येणे बाकी असल्याचेही याबैठकीत सांगण्यात आले. ज्या कामांना निधी उपलब्ध नाही ती कामे थांबवावीत अशा सूचनाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.
            विशेष घटक योजनेमधील निधीचे वितरण हे मंत्रालय स्तरावरुन होत असल्याने आणि प्रशासकीय मान्यतांचे अधिकार मंत्रालयस्तरावर असल्याने पुनर्विलोकनानंतर निधीचे वितरण करणे व कामांची पूर्तता करणे यांचे नियोजन करता येत नसल्याने अनेकदा निधी समर्पित करावा लागतो. यासाठी निधी वितरण आणि प्रशासकीय मान्यता यांचे अधिकारी जिल्हास्तरावर असावेत, अशी विनंती जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी केली.
            या बैठकीत कृषि विभाग, पशु संवर्धन, मत्स्य व्यवसाय, मृद संधारण, माहिती व प्रसिध्दी, एकात्मिक ग्रामीण विकास, नगरपालिका प्रशासन, एमएसएबी, उद्योग, क्रिडा, तंत्र शिक्षण, स्वच्छता व पाणी पुरवठा, नगर विकास, महिला व बाल विकास, माध्यमिक शिक्षण आदींकडील खर्चाचा आढावा घेण्यात आला. यावेळी , कार्यकारी अभियंता आर.एस.पाटील, एन.एम.वेदपाठक, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बसवराज मास्तोळी, जिल्हा परिषदेचे कृषि अधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल कल्याण) शिल्पा पाटील,  वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक,  संतोष चिकणे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
 00  00 0 0 0 0 0

रविवार, १ जानेवारी, २०१७

शेतकरी वर्गाला केंद्रबिंदू ठेवून विकास सोसायट्या सक्षम करणे आवश्यक सहकार मंत्री – सुभाष देशमुख





कृषिवर आधारीत पुरक उद्योधंद्याच्या निर्मितीला चालना मिळणे आवश्यक
                                           - मसहूल मंत्री चंद्रकांत पाटील
कोल्हापूर दि 01- सहकारातून महाराष्ट्र समृद्ध करावयाचा असेल तर ग्रामीण भागातील शेतकरी वर्गाला केंद्रबिंदू ठेवून विकास सोसायट्या सक्षम करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केले.
केशवराव नाट्यगृह येथे आयोजित दि. महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि. मुंबई  शेड्युल्ड बँक शाखेच्या उद्घाटन सोहळा समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. दि. महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि. मुंबई या शिखर बँकेच्या व्हीनस कॉर्नर येथील नूतन शाखेचे सहकारमंत्री सुभाष देशमुख तसेच  महसूल मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उदघाटन करण्यात आले.
शेतकरी हा अर्थकारणाचा कणा आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना विकास सोसायटीच्या  माध्यमातून सुलभ अल्पदरात कर्ज उपलब्ध होणे गरजेचे आहे. मात्र सहकार क्षेत्र अडचणीत असल्यामुळे याबाबत योग्य नियोजन करून विकास सोसायट्या सक्षमपणे उभा करणे आवश्यक आहे. यादृष्टीने शिखर बँकेने विशेष प्रयत्न करायला हवेत. कृषि उत्पन्न बाजार समिती, खरेदी विक्री केंद्र यांच्या मुलभूत व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता शिखर बँकेने प्रयत्न करावेत. यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल. शासनाने शेतमाल तारण योजना सुरु केली आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. यांसारख्या योजनांना चालना मिळणे आवश्यक असून या पार्श्वभूमीवर दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि. मुंबई  शेड्युल्ड बँक या शिखर बँकेची शाखा कोल्हापूर सारख्या कृषिप्रधान जिल्ह्यात सुरु होत आहे हे अभिनंदनीय आहे. सभासद हे सहकारी संस्थांचे खऱ्या अर्थाने मालक आहेत. त्यामुळे सभासदांनी जागृत राहणे आवश्यक असल्याचे मत यावेळी बोलताना सहकार मंत्र सुभाष देशमुख यांनी व्यक्त केले.
कृषिवर आधारीत पुरक उद्योधंद्याच्या निर्मितीला चालना मिळणे आवश्यक
                                           - मसहूल मंत्री चंद्रकांत पाटील
महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, शेतकऱ्याच्या आर्थिक स्थितीत  सुधारणा झाली, शेतकरी समृद्ध झाला तर देशाच्या उत्पादनविकासात वाढ होणार आहे. त्यासाठी कृषीवर आधारित पूरक उद्योगधंदे व कारखान्यांना चालना मिळणे आवश्यक आहे. दक्षिण महाराष्ट्रात ज्याप्रमाणे उसावर आधारित साखर उद्योग विकसित झाला त्याच प्रमाणे केवळ उसच  नव्हेतर इतरही कृषीउत्पादनांवर आधारित उद्योगधंद्यांची निर्मिती होणे आवश्यक आहे. दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि. मुंबई  या शिखर बँकेने कृषीवर आधारित उद्योगधंद्यांसाठी त्यादृष्टीने विविध प्रोजेक्ट तयार करून  अल्पदरात कर्ज उपलब्ध करून द्यावे. यासाठी शिखर बँकेने स्वत: पुढाकार घेवून  ग्रामीण भागातील तरुणांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. असे मत महसूल मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

 00 0 0 0 0 0