इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

सोमवार, १ मे, २०१७

303 फूट उंचीच्या ध्वजस्तंभावर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तिरंगा फडकवीला





                
कोल्हापूर, दि. 1 : वाघा बॉर्डरनंतर देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात ऊंच अशा 303 फूट उंचीच्या ध्वजस्त्ंभावर आज सकाळी 5 वाजून 48 मिनिटांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते तिरंगा डौलाने आसंमतात फडकला. हा क्षण डोळयात साठवतांना प्रत्येकजण उंच मान करुन आकाशात डौलाने फडकणाऱ्या राष्ट्रध्वजाकडे अभिमानाने पाहात होता.
                कोल्हापूर रस्ते सौदर्यीकरण प्रकल्पातंर्गत कोल्हापूर पोलीस उद्यानामध्ये 303 फूट उंचीच्या ध्वजस्त्ंभ उभारण्यात आला असून आज सकाळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते रिमोटव्दारे राष्ट्रध्वज फडकाविण्यात आला. यावेळी पालकमंत्र्यांच्या सुविद्य पत्नी सौ. अंजली चंद्रकांत पाटील, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक विश्वास नांगरे-पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. रुपाली विश्वास नांगरे-पाटील, पोलीस अधिक्षक महादेव तांबडे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक सुहेल शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, केएसबीपीचे सुजय पित्रे यांच्यासह अनेक मान्यवर, अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.
                दुरावस्था झालेल्या पोलीस उद्यानाचा कोल्हापूर रस्ते सौदर्यीकरण प्रकल्पातंर्गत कायापालट करण्यात आला असून या पोलीस उद्यानामध्ये देशातील दुसऱ्या क्रमांकाचा आणि राज्यातील सर्वात ऊंच असा 303 फूट उंचीचा भव्य ध्वजस्तंभ उभारण्यात आला आहे. या ध्वजस्त्ंभावर 90 फुट लांब व 60 फुट रुंद अशा 5 हजार 400 चौरस फुटाचा राष्ट्रध्वज आज फडकाविण्यात आला. कोल्हापूर शहराच्या सर्व बाजूंनी हा राष्ट्रध्वज सहज दिसू शकेल, इतका उंच असून उद्यानात 1857 ते 1947 या काळातील भारताच्या स्वातंत्र्यलढयाची मांडणी महालढयाचं महाकाव्य या रुपात जयगान अंतर्गत भव्य प्रदर्शन साकारण्यात आले आहे. याबरोबरच बलीदान, शांतता आणि समृध्दी याचं प्रतिक असणाऱ्या केशरी, पांढऱ्या आणि हिरव्या रंगातून भित्तीचित्र साकारण्यात आले आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांपासून देशासाठी बलीदान केलेल्या अनेक स्वातंत्र्यवीरांच्या प्रतिमा केशरी रंगामध्ये रेखाटल्या आहेत, तर पांढऱ्या रंगामध्ये महात्मा गांधी आणि गौतम बुध्द यांच्या शांतीचा संदेश देणाऱ्या प्रतिमा आहेत. तसेच हिरव्या रंगामध्ये समृध्दीने नटलेला भारत रेखाटला आहे. आय लव्ह कोल्हापूर या अक्षरांमधून कोल्हापूरची सर्व वैशिष्टे दर्शविणारा सेल्फी पॉईंट तयार करण्यात आला आहे. तसेच विविध राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमा विनायल प्रिंटींग करुन लावल्या आहेत. तर उद्यानातील विविध फुलझाडांनी उद्यान आकर्षक बनविले आहेच पण त्यातून केलेल्या रंगीबेरंगी रोषणाईने वातावरण अधिकच मोहक बनविले आहे.
                303 फूट उंचीच्या ध्वजस्त्ंभ हा कोल्हापूरच नव्हे तर देशातील जनतेचा अभिमान वाढविणाराच असून हा देखणा प्रकल्प कोल्हापूरात साकारला याचा सार्थ अभिमान वाटतो, अशा शब्दात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कोल्हापूर रस्ते सौदर्यीकरण प्रकल्पातंर्गत कोल्हापूर पोलीस उद्यान अधिक आकर्षक आणि देखणं झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.