इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

गुरुवार, १६ नोव्हेंबर, २०१७

माध्यमांमधील विविध प्रवाह एकमेकांना पूरक - आलोक जत्राटकर




            कोल्हापूर, दि. 16 :    स्वयंनियमन, गुणवत्तापूर्ण पत्रकारिता आणि विश्वासार्हता ही आजच्या काळात माध्यमांची फार मोठी गरज आहे. काल सुसंगतता टिकवत ज्या माध्यमांनी नवं तंत्रज्ञानाचा झपाट्याने स्वीकार केला अशीच माध्यमे काळाच्या ओघात टिकून आहेत. माध्यमामध्ये एकीकडे स्पर्धा वाढत असली तरी मुद्रीत, इलेक्ट्रॉनिक व सामाजिक हे माध्यम प्रवाह एकमेकांना परस्पर पुरक ठरत आहेत, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी आलोक जत्राटकर यांनी केले.
            राष्ट्रीय प्रेस दिनानिमित्त विभागीय व जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूर येथे 'माध्यमासमोरील आव्हाने'  या विषयावरील कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माहिती उपसंचालक सतीश लळीत होते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे, सहायक संचालक एस.आर.माने, विश्वास पाटील, गुरुबाळ माळी, समीर मुजावर, विजय कुंभार यांच्या अन्य मान्यवर उपस्थित होते.
            वाढत्या गतीमानतेशी जुळवून घेण्याबरोबरच गुणवत्ता, वैशिष्ट्यपूर्ण, मुल्याधिष्ठीत आशय जपणे हे आज प्रत्येक माध्यमासमोरील आव्हान असल्याचे सांगून आलोक जत्राटकर म्हणाले, प्रत्येक व्यवस्थापनासमोर बदल हा अपरिहार्य झाला आहे. सध्याच्या काळत इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा पगडा वाढत असला तरी मुद्रीत माध्यमांचे महत्व अबाधित आहे. प्रत्येक टप्यावर आलेल्या आव्हानांना समर्थपणे तोंड देत मुद्रीत माध्यमे टप्याटप्याने वाढतच गेली आहेत. ज्या वर्तमानपत्रांचे जनमानसात स्थान टिकून आहे त्यामध्ये नव तंत्रज्ञानाची स्वीकारार्हता हा भाग अत्यंत महत्वाचा ठरला आहे. सध्याच्या काळात साखळी वर्तमान पत्रे मोठ्या संख्येने वाढत आहेत त्याचा फायदा वाचक, जाहिरातदार या साऱ्यांच होत आहे. पण त्याचवेळी गुणवत्तापूर्ण वार्तामुल्यासाठी उत्तम विश्लेषण क्षमता असणाऱ्या माध्यमांची नितांत गरज निर्माण झाली आहे.  शब्दमर्यादांमुळे व्यक्त होण्यांवरही मर्यादा येत आहेत. अनेक प्रकारची कामे हाताळू शकणाऱ्या मनुष्यबळाची माध्यम जगताला गरज असून सोशल मिडिया हे फार मोठे व्यासपीठ म्हणून उदयाला येत आहे. यातून माहितीचा प्रस्फोट होत असतानाच अत्यंत संवेदनशील असणारे हे माध्यम कसे हाताळावे याबाबतचे ज्ञान देणे आवश्यक आहे.
            गतीमानता हा आजच्या जीवनाचा स्थायीभाव असला तरी माणसाच्या जीवनाची सुरुवात आणि शेवट हा माध्यमांच्या गराड्यातच होणे ही माध्यमांची ताकद असल्याचे सांगून माहिती उपसंचालक सतीश लळीत म्हणाले, सशक्त लोकशाहीसाठी समर्थ माध्यमांचे महत्व फार मोठे आहे. वृत्तपत्रांची आर्थिक उतरंड सध्याच्या काळात महत्वाची ठरत असून अशावेळी लहान, जिल्हा वर्तमान पत्रांना टिकून राहण्यासाठी आधार देणे हे शासनाबरोबरच वाचकाचे कर्तव्य आहे. माध्यमे ही सरकारला दिशा देण्याचे, लोकमत अधोरेखित करण्याचे महत्वाचे काम करीत असतात त्यामुळे चांगल्या लोकशाहीसाठी वर्तमानपत्राचे अस्तित्व महत्वाचे आहे.
            इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या तुलनेत मुद्रीत माध्यमांनी आपली विश्वासहर्याता मोठ्या प्रमाणात जपली आहे, असे सांगून सतीश लळीत म्हणाले सध्याचा सोशल मिडिया हा मोठ्या चर्चेचा विषय आहे. या माध्यमाने गांभिर्य आणि विश्वासार्हता जपली नाही तर ते फार मोठी झेप घेवू शकणार नाही. अत्यंत चांगले व्यासपीठ असूनही अनेकदा निष्काळजीपणे हाताळल्याने अनेक गंभीर प्रसंग निर्माण होवू शकतात.
            कार्यक्रमाचे प्रस्ताविक जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांनी केले. सूत्रसंचालन सहायक संचालक एस.आर.माने यांनी केले.

         000000

शनिवार, ११ नोव्हेंबर, २०१७

गरिबी दूर करण्यासाठी विविध घटकांनी एकत्र यावे - पालकमंत्री चंद्रकांत पाटील



कोल्हापूर, दि. 11 : समाजातील दुर्बल घटक सक्षम होवून गरिबी दूर व्हावी यासाठी विविधस्तरातील  घटकांनी निरपेक्ष भावनेने एकत्र येवून प्रयत्न करणे आवश्यक आहे. सर्वसामान्य, गरीब कुटुंबाला हक्काचे घर मिळावे यासाठी कोल्हापूर शहरानजिक मोठी निवासी वसाहत लवकरच उभी करण्यासाठी प्रयत्नशिल असून या प्रकल्पाचे अध्यक्ष म्हणून सी.ए. शरद सामंत या निष्कलंक, चारित्र्यवान व्यक्तीमत्वाने काम पहावे, अशी इच्छा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.
दि महाराष्ट्र इन्स्टिट्युट ऑफ रिसर्च ॲन्ड डेव्हलपमेंट या विश्वस्थ संस्थेच्या सामंत परिवार समाज सेवा निधीतर्फे सी.ए. शरद सामंत शैक्षणिक पुरस्कारांचे सुमारे 40 दिव्यांग, मतिमंद, अनाथ, ग्रामीण विद्यार्थी, विद्यार्थींनीना 2 लाखांच्या शैक्षणिक शिष्यवृत्तीचे वितरण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छत्रपती शाहू इन्सिटट्यूट (सायबर) चे अध्यक्ष डॉ. रणजितसिंह शिंदे होते. यावेळी संस्थेचे नुतन अध्यक्ष सी.ए. गिरीष सामंत, शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार, अरुण नरके, बाळ पाटणकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
सी.ए. शरद सामंत हे निष्कलंक आणि चारित्र्यवान व्यक्तीमत्व असून त्यांच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे असे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, सामाजातल्या दुर्बल घटकांना मदत करण्याचे  शरद सामंत यांचे काम आदर्शवत आहे. समाजातल्या विविधस्तरातील घटकांनी गरिबी दूर करण्यासाठी निरपेक्ष भावनेने एकत्र येणे व त्यासाठी टार्गेट ओरिएंटेड काम करणे आवश्यक आहे. कोल्हापूर शहराच्या जवळपास सर्व सामान्य माणसाला स्वत:चे हक्काचे घर उपलब्ध व्हावे यासाठी मोठी निवासी वसाहत उभी करण्यासाठी आपण प्रयत्नशिल असून त्यामध्ये शरद सामंत यांनी अध्यक्ष म्हणून काम करावे अशी इच्छाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. दि महाराष्ट्र इन्स्टिट्युट ऑफ रिसर्च ॲन्ड डेव्हलपमेंट या संस्थेच्या इमारतीसाठी जागेचा प्रश्नही लवकरच मार्गी लावू असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते शरद सामंत यांचा सपत्नीक सत्कार झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. रणजितसिंह शिंदे यांनी शरद सामंत यांचे मार्गदर्शन सदैव महत्वाचे असल्याचे सांगून त्यांच्या प्रदिर्घ सामाजिक कार्याचा गौरव केला.
शरद सामंत यांनी सामाजिक संस्थांमध्ये वर्षानुवर्षे कार्यरत ज्येष्ठांनी स्वत: बाजूला होवून तरुण, उत्साही कार्य करणाऱ्यांचा मार्ग मोकळा करुन देणे आवश्यक असल्याचे सांगितले. यावेळी त्यानी संस्थेच्या इमारतीसाठी 35 लाख  रुपयांची तरतुद करण्यात आल्याचे सांगून आपल्या 66 व्या वाढदिवसानिमित्त मातृ संस्थेस 66 हजारांची देणगी दिली.
यावेळी चेतना विकास संस्थेच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. सी.ए. गिरीष सामंत यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. चेतना संगीत शास्त्र विभागासाठी 40 हजार रुपयाचा निधी देण्यात आला तर हेल्पर्स ऑफ दि हँडीकॅप्ड संस्थेचे 10, अवनी संस्थेचे 5, सायबरचे 6, बाल संकुलातील 10 यांच्यासह अत्यंत दुर्बल घटकातील विद्यार्थी, विद्यार्थींना शैक्षणिक प्राविण्य व गुणवत्ता यासाठी प्रोत्सहानात्मक पुरस्कार देण्यात आले. यावेळी कोल्हापूर शहरातील सामाजिक क्षेत्रातील विविध नामवंत उपस्थित होते.

000000

अद्ययावत क्रीडा संकुल लवकरच सुरु होणार - पालकमंत्री चंद्रकांत पाटील


·         शुटींग रेंज साहित्य लवकरच उपलब्ध होणार
·         जलतरण तलावाचा प्रश्नही मार्गी लागणार

 कोल्हापूर, दि. 11 : शुटींग रेंज व जलतरण तलाव वगळता अन्य क्रीडा प्रकारांची क्रीडांगणे तयार आहेत त्यांच्या वापरासाठी विविध क्रीडा संस्थांशी समन्वय साधून ती खेळाडूंना वापरण्यास द्यावीत.  त्यामुळे तेथे खेळाडूंचा वावर वाढून क्रीडांगणांचा वापर सुरु होईल, असे सांगून खेळाडूंसाठी विभागीय क्रीडा संकुलाच्या रुपाने अद्ययावत क्रीडा संकुल लवकरच सुरु होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
विभागीय क्रीडा संकुल समितीची बैठक पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी        डॉ. कुणाल खेमणार, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर.एस.पाटील, क्रीडा उपसंचालक अनिल चोरमले, केएसडीआयचे सुजय पित्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.
क्रीडा क्षेत्रात अधिक गुंतवणूक केल्यास अनेक गुणवंत खेळाडू उदयास येतील व ते राष्ट्रीय, अंतरराष्ट्रीयस्तरावर गौरवशील कामगिरी करतील असे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर येथे उभारण्यात आलेल्या विभागीय क्रीडा संकुलातील शुटींग रेंज व जलतरण तलाव वगळता सर्व क्रीडांगणांची कामे पूर्ण झाली आहेत त्यांच्या वापर होणे आवश्यक असून त्यासाठी क्रीडा संस्थांमार्फत या क्रीडागणांचा वापर खेळाडूंसाठी व्हावा. जस जशी या ठिकाणी खेळाडूंची संख्या वाढेल तसे काही त्रुटी समोर आल्यास त्या त्रुटीही दुर करणे सोईचे होईल, असे सांगितले.
तसेच कोल्हापूर स्पोर्टस डेव्हलपेंट इनिशिएटीव्ह (केएसडीआय) या संस्थेने जलतरण तलावातील पाण्याचा निचरा करुन तज्ञांकडून मत घ्यावे व हा प्रश्न कायम स्वरुपी सोडविण्यासाठी प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करुन सादर करावा. त्यावर शासकीय समितीने त्यांच्या निर्णय घ्यावा व तद्नंतरच जलतरण तलावाचे पुढील काम करावे असे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी खेळाडूंसाठी अडथळा ठरत असल्यास रनिंग ट्रॅकवर फिरण्यास बंदी घालावी, असेही सांगितले. महानगरपालिकेने दुधाळी शुटींग रेंजचा प्रस्ताव सादर करावा अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी म्हणाले, 10 मीटर शुटींग रेंज लवकरात लवकर कार्यान्वित होणे आवश्यक असून यासाठी शुटींग साहित्य खरेदीबाबत नियुक्त केलेल्या तंज्ञसमितीतील तेजस्वीन सावंत, राही सरनोबत, युवराज साळुंखे, अजित पाटील यांच्यामध्ये एकमत करुन त्यानुसार साहित्य खरेदीचा प्रस्ताव तयार करण्यात येईल व एकल पध्दतीने खरेदी होणार असल्याने तो प्रस्ताव शासनाच्या मान्यतेसाठी पाठविण्यात येईल यासाठी पुढच्या आठ दिवसात विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे तज्ञ समितीची बैठक घेण्यात येईल.  25 व 50 मीटर शुटींग रेंजचेही सर्व स्ट्रक्चर तयार असून या रेंजचाही वापर होऊ शकतो तशी मागणीही आहे. त्यामुळे या शुटींग रेंजसाठीही साहित्य खरेदीचे प्रस्ताव मार्गी लावण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी मुख्य प्रवेशद्वार व स्वच्छता गृह, कंत्राटी पध्दतीने कर्मचारी नियुक्ती, पहिल्या टप्यातील निविदेतील अपूर्ण कामे आदींचा सविस्तर आढावा घेवून ही सर्व कामे 1 डिसेंबरच्या आत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसेच पहिल्या टप्याच्या निविदाबाह्य परंतु अत्यावश्यक कामांचाही त्यांनी यावेळी आढावा घेतला.
याबैठकीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी शिंगणापूर येथील राजर्षी शाहू क्रीडा प्रशालेसाठी आवश्यक असणाऱ्या मल्टी पर्पज हॉलसाठी नाविन्यपूर्ण योजनेतून निधी उपलब्ध व्हावा अशी मागणी केली.

0 0  0 0 0 0 0 0

शुक्रवार, १० नोव्हेंबर, २०१७

45 वी कोल्हापूर परिक्षेत्रिय पोलीस क्रीडा स्पर्धा महिलांमध्ये कोल्हापूर तर पुरुषांमध्ये सांगलीला सर्वसाधरण विजेतेपद महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते पारितोषिक देवून खेळाडूंचा गौरव





कोल्हापूर, दि. 10 : 45 वी कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा कोल्हापूर येथे  उत्साहात पार पडली या स्पर्धेत पुरुष गटामध्ये सांगली जिल्ह्याला तर महिला गटामध्ये कोल्हापूर जिल्ह्याला सर्वसाधारण विजेते पदाचा मान मिळाला. या स्पर्धेत सांगली जिल्ह्यातील संतोष विजय माळी तर कोल्हापूर जिल्ह्यातील जयश्री शिवशंकर बोरगी हे बेस्ट ॲथलेट ठरले. सोलापूर शहरच्या संघाने शिस्तबध्द संघाचा मान मिळविला. ॲथलॅटीक्स चँम्पियनशिपचा मान पुरुष गटात  सांगली जिल्ह्याने तर महिला गटात कोल्हापूर जिल्ह्याने मिळविला. या सर्वांना महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते पारितोषिक देवून गौरविण्यात आले.
यावेळी विविध विभागांतर्गत कार्यरत कर्मचारी क्रीडा क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी करतील तर अशा खेळाडूंनी अंतरराष्ट्रीयस्तरावर कांस्यपदकापर्यंतची कामगिरी केल्यास त्यांना वर्ग एक व राष्ट्रीयस्तरावरील क्रिडास्पर्धांमध्ये कांस्यपदकापर्यंतची कामगिरी केल्यास वर्ग दोनची नियुक्ती कोणत्याही लोकसेवा अथवा राज्य सेवा परीक्षांशिवाय मिळावी यासाठी निश्चितपणे प्रयत्न करु असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
 45 व्या कोल्हापूर परिक्षेत्रिय पोलीस क्रीडा स्पर्धेचा समारोप समारंभ कोल्हापूर पोलीस मुख्यालयातील पोलीस क्रीडांगणावर झाला. यावेळी आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी छत्रपती शाहू महाराज, खासदार धनंजय महाडिक, महापौर हसिना फरास, पुणे म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, आमदार अमल महाडिक, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, पोलीस अधीक्षक संजय मोहिते, साताऱ्याचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, अपर पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, रुस्तम ए हिंद अमल बुचडे, अविनाश धस यांची प्रमुख उपस्थिती होती.

अत्यंत उत्साहत व शिस्तबध्द झालेल्या या क्रीडा स्पर्धेमधील विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करुन कोल्हापूर परिक्षेत्रातील खेळाडूंनी राज्यस्तरावरील जनरल चॅंम्पियनशिप जिंकून राष्ट्रीयस्तरावरही उज्वल कामगिरी करावी यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. तसेच कोल्हापूर जिल्ह्याने उत्कृष्टपणे यजमानपद सांभाळल्याबद्दल पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांचे अभिनंदनही केले. 

रविवार, ५ नोव्हेंबर, २०१७

गेल्या तीन वर्षात पोलीस दल अधिक सक्षम आणि अद्ययावत करण्यावर भर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील





       कोल्हापूर, दि. 5 : राज्याचे पोलीस दल अधिक सक्षम आणि अद्ययावत करण्याबरोबरच पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासही राज्य शासनाने गेल्या तीन वर्षात सर्वाधिक भर दिला असल्याचे महाराष्ट्राचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे सांगितले.
          स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सभागृहात निवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी कल्याणकारी असोसिएशनच्या मेळाव्याचे उदघाटन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते दिपप्रज्वलनाने करण्यात आले त्याप्रसंगी आयोजित समारंभात ते बोलत होते. या मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून खासदार संभाजीराजे छत्रपती हे उपस्थित होते. या समारंभास स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अभयकुमार साळुंखे, असोसिएशनचे राज्य अध्यक्ष निवृत्त पोलीस उप महासंचालक डी.एन.जाधव, कार्याध्यक्ष तथा निवृत्त अप्पर पोलीस महासंचालक खंडेराव शिंदे, असोसिएशनचे अन्य पदाधिकारी रामराव वाघ, गुलाबराव पोळ, पी.टी.लोहार, सिताराम न्यायनिर्गुने, सुखानंद सापते आदी मान्यवर उपस्थित होते.
          पोलीस हा समाज व्यवस्थेतील महत्वाचा घटक असल्याचे सांगून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, पोलीस दलासाठी आवश्यक पायभुत सेवा सुविधा आणि साधन सामुग्री उपलब्ध करुन देण्याबरोबरच पोलीसांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यास मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्राधान्य दिले आहे. कोल्हापूर पोलीस वसाहतीतील पोलीसांच्या घरांच्या दुरुस्तीसाठी गेल्या वर्षी 10 कोटीचा निधी मंजूर करुन ही घरे अद्ययावत करण्यात आली आहेत. तसेच पोलीसांच्या मुला-मुलींसाठी स्पर्धा परीक्षा केंद्र कार्यान्वित केले आहे.
          निवृत्त पेालीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्यांच्या सोडवणुकीसाठी लवकरच असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची मा. मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेवून निश्चितपणे मार्ग काढला जाईल, अशी ग्वाही महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिली. निवृत्त पोलीसांचे घर आणि आरोग्याचा प्रश्न महत्वचा असून निवृत्त पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य विमा ही योजना राबविण्याबाबत काय उपाययोजना करता येतील याबाबत पाठपुरावा करु असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
          पोलीस दलासाठी शासन सदैव कटिबध्द आहे मात्र पोलीस दलानेही आपल्या कार्यकर्तुत्वाने आाणि अपुलकीच्या वागणुकीने समाजात वेगळी प्रतिष्ठा निर्माण करण्याची गरज असल्याचेही महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.
          खासदार संभाजीराजे छत्रपती याप्रंसगी बोलताना म्हणाले, निवृत्त पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रश्नांच्या सोडविणुकीसाठी शासनस्तरावर पाठपुरावा करु. कोल्हापुरातील शिवाजी पुलाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी युध्दापातळीवर प्रयत्न सुरु असल्याचेही यावेळी स्पष्ट केले.
       असोसिएशनचे राज्य अध्यक्ष निवृत्त पोलीस उप महासंचालक डी.एन.जाधव म्हणाले, पोलीसांनी आपल्या चांगल्या वागण्यातून नवी संस्कृती निर्माण करणे गरज आहे. समाजात पोलीसा विषयी आदर आणि अपुलकी निर्माण होईल यादृष्टीने वाचन, लेखन यासह चांगल्या वागण्याची सवय जोपासावी असे आवाहन केले. निवृत्त पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या समस्या आणि प्रश्न सनदशिल मार्गाने सोडविण्याचा प्रयत्न राहील.
          प्रारंभी कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष मदन चव्हाण यांनी स्वागत केले. महासचिव सुखानंद सापने यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी सिताराम न्यायनिर्गुने, सचिन कुंभार आदींचे भाषणे झाली. शेवटी श्री. पांढरे यांनी आभार मानले. समारंभास निवृत्त पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

0 00 0 0 0 0 0