मंगळवार, १ सप्टेंबर, २०२०

बचत गटातील महिलांसाठी ऑनलाईन उखाणे स्‍पर्धा

 


    कोल्हापूर, दि. 1 (जिल्हा माहिती कार्यालय): उखाणा घेणे हा महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेच्या जीवनातील जिव्हाळ्याचा व आवडीचा विषय आहे. याच गोष्टीला नजरेसमोर ठेऊन कोविडच्या या निराशामय काळात महिलांचा उत्साह वाढविण्यासाठी गौरी गणपती सणानिमित्‍त महिला बचत गटातील महिलांसाठी महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे ऑनलाईन उखाणे स्‍पर्धा आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा समन्वय अधिकारी बाळासाहेब झिंजाडे यांनी दिली.

 स्‍पर्धा सर्व महिलांसाठी खुली राहील. ज्या महिलांना या स्पर्धेत भाग घ्यावयाचा असेल त्यांनी नाविण्‍यपूर्ण, जनजागृती करणारे, सामाजिक आशय असणारे तसेच काही तिहासिक मूल्य असणारा, दीड ते जास्तीत-जास्त तीन मिनिटांचा उखाण्याचा व्हिडीओ तयार करून महिला आर्थिक विकस महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाकडे 10 सप्‍टेंबरपर्यंत पाठवावा.

उखाणे निवडीचे निकष -उखाणे नाविण्यपूर्ण असावेत. त्यांचा आशय सामाजिक, ऐतिहासिक व प्रबोधनात्मक असावा. उखाणा हा मौखिक साहित्यिक प्रकार असला तरी त्यातील आशय हा फक्त प्रागतिक विचारांना पुढे नेणारा असावा. आपण सर्वसाधाणपणे आपल्या यजमानांच्या नावाभोवती उखाणे गुंफत असतो, पण या स्पर्धेत आपल्याला उखाणे समाजसुधारक,ऐतिहासिक व्यक्तीरेखा( विशेषत: स्त्री व्यक्तीरेखा )यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी असल्याने उखाणा या व्यक्तिमत्तवांच्या भोवती गुंफणे अपेक्षित आहे. उखाणा स्त्री- पुरुष समानता या मुल्यांचा पुरस्कार करणारा असावा. उखाणा कमीत कमी दीड ते जास्तीत-जास्त तीन मिनीटांचा लांब असावा. खाणा मुखोदगत /पाठ असावा.

प्राप्त उखाण्याची जिल्हास्तरावर परीक्षकांकडून छाननी करून त्यापैकी पात्र माविमच्‍या महिलांचे 3 व माविमेत्‍तर महिलांचे 3 क्रमांक काढून 6 व्हिडीओ विभागीय स्तरावर पाठविण्यात येतील. प्रति जिल्हा 6 याप्रमाणे साधारण एकूण 36 पात्र व्हिडीओ एका विभागीय स्तरावर प्राप्त होतील ज्यामधून परीक्षकांकडून छाननी करून त्यापैकी पात्र माविमच्‍या महिलांचे 3 व माविमेत्‍तर महिलांचे 3 असे 6 व्हिडीओ मुख्यालयाकडे पाठविले जातील. 36 पात्र व्हिडीओमधून राज्यस्तरावर केवळ माविमच्‍या महिलांचे क्रमांक काढले जातील. विभागीयस्तरावर 36 पात्र महिलांना स्‍पर्धेत सहभागाबाबत प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देण्‍यात येईल आणि राज्‍यस्‍तरीय विजेत्या 6  महिलांना राज्य साहित्य संमेलनात उखाणा सादरीकरणासाठीची संधी देण्‍यात येर्इल.

अधिक माहितीसाठी जिल्हा समन्वय अधिकारी, महिला आर्थिक विकास महामंडळ,जिल्हा कार्यालय, कोल्हापूर येथे ०२३१-२६६७२४२ या दूरध्वनी क्रमांकावर व kolhapur.mavim@gmail.com या ई-मेल वर संपर्क साधावा.

000000

 

 

 

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.