शुक्रवार, १८ जून, २०२१

मे 22 अखेर काळम्मवाडी धरणातून कोल्हापूरवासियांना विपुल पाणी पुरवठा - मंत्री हसन मुश्रीफ

 



            कोल्हापूर, दि. 18 (जिल्हा माहिती कार्यालय) : कोल्हापूर शहरातील जनतेला शुध्द, मुबलक आणि थेट पाणी पुरवठा व्हावा, या उद्देशाने काळम्मवाडी धरणातून पाणी पुरवठा करण्याची योजना शासनाने हाती घेतली होती. काही तांत्रिक आणि वन विभागाच्या जाचक नियमांमुळे या योजनेला विलंब झाला. मात्र मे 2022 अखेर कोल्हापूर वासियांना या योजनेचे पाणी उपलब्ध होईल याची खात्री नागरिकांनी बाळगावी, अशा निसंदिग्ध शब्दात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ग्वाही दिली. श्री. मुश्रीफ यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृह येथे काळम्मवाडी धरणाच्या अनुषंगाने बैठक घेण्यात आली यावेळी ते बोलत होते.

       व्यासपीठावर जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, माजी महापौर निलोफर आजरेकर, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, आर.के.पवार उपस्थित होते. ते पुढे म्हणाले, शहराला थेट पाणी पुरवठा करणाऱ्या पाईप लाईनचे 80 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम येत्या दोन महिन्यात पूर्ण होईल. सुमारे 450 कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी तरतुद करण्यात आली असून या कामाकरिता निधीची अजिबात कमतरता जाणवणार नाही. जॅकवेलचे काम प्राधान्याने करण्यात यावे, असे ठेकेदाराला निर्देश देवून श्री. मुश्रीफ यांनी 2022 साली येणारी दिपावली तमाम कोल्हापूरवासियांच्या जीवनात आनंद निर्माण करेल असा आशावाद व्यक्त केला. त्याचबरोबर 2021 च्या दिपावली सणामध्ये आपण कोल्हापूर वासियांना पाणी देण्याचा शब्द पूर्ण करु शकलो नसल्याबद्दल शहरवासियांची क्षमा मागितली.  लवकरच ठेकेदार आणि या योजनेच्या मुख्य सल्लागारांची संयुक्त बैठक घेण्यात येईल, असेही श्री. मुश्रीफ म्हणाले.

          या योजनेच्या जलशुध्दीकरण केंद्राचे 95 टक्के इतके काम पूर्ण झाले आहे. तसेच कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईप लाईनचे केवळ तीन किलो मीटरचे काम अपूर्ण आहे. योजना पुर्णत्वाच्या विलंबामुळे ठेकेदाराला आतापर्यंत सुमारे 5 कोटी 30 लाख रुपये इतका दंड ठोठावण्यात आल्याची माहिती महानगरपालिका प्रशासक श्रीमती बलकवडे यांनी दिली. तर हर्षजीत घाटगे यांनी या योजनेचे सादरीकरण केले. यावेळी महानगरपालिकेचे नगरसेवक उपस्थित होते.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.