कोल्हापूर,
दि. 20 (जिल्हा माहिती कार्यालय): आरटीई अंतर्गत सन 2021-22 साठी 25 टक्के
विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. 11 ते 30 जून या कालावधीत प्रत्यक्ष
प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. विहीत
कालावधीत संबंधित पालकांनी शाळांमध्ये प्रवेश निश्चित न केल्यास त्यांना पुढील
फेऱ्यांमध्ये पुन्हा संधी दिली जाणार नाही. त्यामुळे पालकांनी शाळा प्रवेशाच्या
बाबतीत दक्ष राहून विहीत मुदतीत शाळेमध्ये जाऊन प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन
शिक्षणाधिकारी (प्राथमिक) आशा उबाळे यांनी केले आहे.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अन्वये
दरवर्षीप्रमाणे 25 टक्के विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात ऑनलाईन
पध्दतीने राबविण्यात येत आहे. त्यानुसार सोडत (लॉटरी) दि. 7 एप्रिल रोजी काढण्यात
आली आहे. ज्या विद्यार्थ्यांना लॉटरी लागलेली आहे
अशा विद्यार्थ्यांची निवड यादी व पुढील फेरीसाठी प्रतिक्षा यादी RTE
पोर्टलवरील होमपेजवर अपलोड करण्यात आली आहे.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांची
शाळेतील प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया 11 ते 30 जून या कालावधीत राबविण्यात येणार
आहे. या प्रक्रियेंतर्गत प्रवेशपात्र शाळांकडून निवड यादीतील आपल्या शाळेच्या
विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठीचा दिनांक आरटीई पोर्टलवर देण्यात येईल.
त्यानुसार संबंधित पालकांनी मूळ कागदपत्रे व छायांकित प्रती घेवून शाळेत जाऊन
आपल्या पाल्याचा तात्पुरता प्रवेश निश्चित करावयाचा आहे. कागदपत्रे चुकीची अथवा
अपुरी असल्यास तसेच रहिवासी दाखला/पुराव्यावरून पालकांनी आरटीई प्रवेश फॉर्म
भरताना शाळेपासून चुकीचे अंतर दाखविल्याचे निदर्शनास आल्यास प्रवेश नाकारण्यात
येईल. अशा पालकांनी तालुका स्तरावर पंचायत समिती व शहरी क्षेत्रासाठी म.न.पा.
येथील पडताळणी समितीकडे अर्ज करावयाचा आहे. पडताळणी समितीकडून आलेले अर्ज व
तक्रारींची शहानिशा करून विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा किंवा देऊ नये याबाबतचा
आदेश संबंधित शाळांना देण्यात येईल. त्यानुसार शाळांनी विहीत मुदतीत प्रवेशाची
कार्यवाही करावयाची आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता पालकांनी शाळेत
गर्दी करू नये. जे पालक कोरोना प्रादुर्भाव व लॉकडाऊन कारणांमुळे प्रत्यक्षरित्या
शाळेत प्रवेशासाठी जाऊ शकत नाहीत, अशा पालकांनी विहीत मुदतीत दूरध्वनी, ई-मेल अथवा
व्हॉट्ॲपव्दारे शाळेशी संपर्क साधून प्रवेशाची कार्यवाही पूर्ण करावयाची आहे.
निवड यादीतील विद्यार्थ्यांनी
प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शाळांमधील रिक्त असलेल्या जागांवर प्रतिक्षा
यादीतील विद्यार्थ्यांना अनुक्रमे प्राधान्य देण्यात येईल. त्याबाबतच्या सविस्तर
सूचना पोर्टलवर देण्यात येतील. आरटीई 25 टक्के विद्यार्थी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया
सुरू झाली असल्याबाबतची सूचना शाळांनी प्रवेशव्दारावर लावायची आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.