शुक्रवार, २५ जून, २०२१

शासकीय सुट्टीच्या दिवशी दस्त नोंदणी कार्यालय सुरु

 

 


 

कोल्हापूर, दि. 25 (जिल्हा माहिती कार्यालय): मुद्रांकीत व निष्पादित दस्तांवर प्रथम महिन्यासाठी देय होणारी शास्ती कमी करुन ती  एक हजार रूपये इतकी निश्चित करण्यात आलेली आहे. या सवलतीचा लाभ घेण्याकरिता दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये दस्त नोंदणीच्या कामकाजासाठी पक्षकारांची गर्दी होण्याची शक्यता आहे. तसेच सवलतीची मुदत 30 जून 2021 अखेरपर्यंत असल्याने उपरोक्त सवलतीचा लाभ संबंधितांना मिळावा यासाठी जिल्ह्यातील सर्व सह दुय्यम निबंधक वर्ग-2 व दुय्यम निबंधक श्रेणी-1 कार्यालये शनिवार दि.26 व रविवार  27 जून  रोजी शासकीय सुट्टीच्या दिवशी दस्त नोंदणीसाठी सुरु ठेवण्यात येणार असल्याची माहिती सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी साहेबराव दुतोंडे यांनी दिली.

नोंदणी अधिनियम 1908 व महाराष्ट्र नोंदणी नियम 1961 च्या प्रचलित तरतुदी तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 नुसार कोवीडमुळे उद्भवलेल्या अभुतपुर्व परिस्थितीमुळे एप्रिल व मे महिन्यात लॉकडाऊनमुळे  विहित कालावधीत नोंदणी न झालेल्या दस्तांवर देय होणारी शास्ती महाराष्ट्र नोंदणी नियम 27 च्या प्रचलित तरतुदीनुसार माहे डिसेंबर 2020 मध्ये पुर्ण मुद्रांकीत व निष्पादित अभिहस्तांतरण, विक्री करारनामा तसेच महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमातील 36 (4) मधील दस्तांवर प्रथम दोन महिन्यासाठी, तर माहे जानेवारी 2021 मध्ये पुर्ण मुद्रांकीत व निष्पादित दस्तांवर प्रथम महिन्यासाठी देय होणारी शास्ती कमी करुन ती  एक हजार रूपये इतकी निश्चित करण्यात आलेली आहे. परंतु, सदर कालावधीत यापुर्वी शास्तीचा भरणा करुन दस्त नोंदणी केलेली असल्यास उक्त शास्तीचा परतावा अनुज्ञेय असणार नाही.

जिल्ह्यातील नागरीकांनी कोवीड-19 चा प्रादुर्भाव लक्षात घेता दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये गर्दी न करता, उपरोक्त सवलतीचा लाभ घ्यावा तसेच शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार सुरक्षात्मक उपाययोजनांचे पालन करावे, असे आवाहनही श्री. दुतोंडे  यांनी केले आहे.

000000

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.