शुक्रवार, ११ जून, २०२१

दिव्यांगांसाठी आज लसीकरण सत्राचे आयोजन

 


          कोल्हापूर, दि. 11 (जिल्हा माहिती कार्यालय):  दिव्यांगासाठी कोविड लसीकरणाच्या अनुषंगाने  जिल्हाधिकारी दौलत देसाई व मुख्य कार्यकारी संजयसिंह चव्हाण यांच्या संकल्पनेतून जिल्हयातील 100 दिव्यांग लाभार्थींना प्रातिनिधीक स्वरुपात प्राथमिक आरोग्य उपकेंद्र शेजारी विकास विद्या मंदिर सरनोबतवाडी, करवीर, कोल्हापूर येथे उद्या शनिवार दि. 12 रोजी  सकाळी 11 ते 2 या वेळेत लसीकरण  सत्राचे आयोजन  करण्यात येणार आहे.

जिल्हयातील दिव्यांगाची कोविड लसीकरणाबाबतची भीती कमी होवून जास्तीत- जास्त दिव्यांगांचे लसीकरण व्हावे, हा या लसीकरण सत्राचा उद्देश आहे. जिल्ह्यातील दिव्यांगाची कोविड लसीकरणाबाबत भीती कमी होवून जास्तीत-जास्त दिव्यांगांचे लसीकरण होण्यासाठी मनोबल वाढावे हा या शुभारंभचा उददेश आहे. तसेच रोग प्रतिकारक शक्ती कमी असते यामुळे दिव्यांगाना कोविड आजार झाल्यास उपचारासाठी रुग्णालयात वास्तव्य करणे तसेच उपचार व्यवस्थापन करणे दिव्यांगाना जिकीरीचे असते.  याअनुषंगाने कोविड प्रतिबंधात्मक उपायांवर भर देणे गरजेचे आहे. दिव्यांग व्यक्तींना हालचालीची मर्यादा असल्यामुळे जास्तीत-जास्त दिव्यांगांचे कोविड लसीकरण  होण्यामध्ये मर्यादा येवू शकतात. यामुळे सर्व दिव्यांगाचे स्थानिक स्तरावर लसीकरण सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये दिव्यांग व्यक्तींना स्थानिक स्तरावर कोविड लसीकरण करण्याचे नियोजन करुन प्राध्यान्याने लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींच्या संस्था व संघटनांनी तालुक्याच्या यंत्रणेशी समन्वय साधुन दिव्यांगांचे लसीकरण प्राधान्याने होण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे व दिव्यांगांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य व बांधकाम समिती सभापती हंबीरराव पाटील यांनी केले आहे.

000000

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.