कोल्हापूर, दि. 16 (जिल्हा माहिती
कार्यालय) :
राज्यातील इ. १ ली ते इ. १२ वी च्या सर्व विद्यार्थ्यांसाठी विविध
माध्यमांची पाठ्यपुस्तके बालभारतीच्या विभागीय भांडारात खुल्या विक्रीसाठी उपलब्ध
आहेत. मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था तसेच पुस्तक
विक्रेते यांनी इ. १ ली ते इ. १२ वीची पाठ्यपुस्तके मंडळाच्या भांडारांतून
खरेदी करून शाळेमध्ये/दुकानांमध्ये विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करुन द्यावीत, असे
आवाहन बालभारतीचे संचालक दिनकर पाटील
यांनी केले आहे.
शैक्षणिक संस्था, विद्यार्थी, पालक, शिक्षक यांनाही
पाठ्यपुस्तके उपलब्ध होण्यासाठी मंडळाच्या सर्व विभागीय भांडारांत किरकोळ विक्री
सुरू ठेवण्यात आली आहे. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता सर्व वर्गांच्या सर्व
माध्यमांची पाठ्यपुस्तके मंडळाच्या मुंबई (गोरेगाव), पनवेल, पुणे, नाशिक,
औरंगाबाद, लातूर, अमरावती, नागपूर व कोल्हापूर या ९ विभागीय भांडांरामध्ये
विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
उपलब्ध
माध्यमे इ. १ ली ते इ. ८ वी – १० माध्यम (मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू,
गुजराती, कन्नड, सिंधी, तेलुगु, तमिळ व बंगाली), इ. ९ वी व इ. १० वी – ८ माध्यम
(मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू, गुजराती, कन्नड, सिंधी व तेलुगु), इ. ११ वी व इ.
१२ वी – विज्ञान शाखा (इंग्रजी माध्यम), वाणिज्य व कला शाखा - २ माध्यम (मराठी व
इंग्रजी).
कोरोनाच्या
साथीमुळे नियमीत व्यवहार बंद असून काही शहरांतील दुकाने अद्याप सुरू झालेली नाहीत.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी सर्व पाठ्यपुस्तके
मंडळाच्या www.ebalbharati.in या
संकेतस्थळावर पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांना आवश्यक असणारी सर्व
पाठ्यपुस्तके मंडळाच्या संकेतस्थळावरुन विनामूल्य डाऊनलोड करून घ्यावीत.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.