बुधवार, १६ जून, २०२१

ज्येष्ठ नागरिकांप्रती सामाजिक आस्था जपणे आवश्यक -अरूण रोडे

 


 

कोल्हापूर, दि. 16 (जिल्हा माहिती कार्यालय): समाजाने वृध्दांप्रती सामाजिक आस्था जपावी. ज्येष्ठांप्रती होत असलेल्या छळा संदर्भातील घटनांचा व कारणांचा मागोवा घेऊन कुटुंबाने सामंजस्याची भुमिका घ्यावी, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अरूण रोडे यांनी केले.

सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय व सायबर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने  जागतिक ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंध दिनानिमित्त आयोजित ऑनलाईन राज्यस्तरीय कार्यशाळेत ते  बोलत होते.  

माजी उपाध्यक्ष नारायण इंगळे (अकोला) यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या छळ प्रतिबंधासाठी आवश्यक उपाय योजनांबाबत विवेचन केले. यामध्ये सरकारी संस्था, निम सरकारी संस्था, स्वयंसेवी संस्था, जागरूक नागरिक कुटुंब हे सामुहिकरित्या प्रमुख भुमिका बजावू शकतील, असे प्रतिपादन श्री. इंगळे यांनी केले. ॲड. प्रमोद ढोकळे (ठाणे) यांनी ज्येष्ठांविषयी असलेल्या कायदेशीर तरतूदी विषद करून कायद्याची अंमलबजावणी नागरिकांच्या सतर्कतेवर अवलंबून असल्याचे सांगितले.

सहायक आयुक्त्‍ा विशाल लोंढे यांनी मार्गदर्शनपर भाषणात समाज कल्याण खात्यामार्फत ज्येष्ठांसाठी विविध योजना राबविल्या जात असून भविष्य काळात समाज कल्याण विभागामार्फत अधिकाधिक योजना राबविण्यात येतील, असे सांगितले.

                स्वागत प्रास्ताविक सायबर महाविद्यालयाचे प्रा.डॉ.दिपक भोसले यांनी केले,  राजर्षी शाहू ज्येष्ठ नागरिक संघाचे प्रा.मानसिंग जगताप यांनी ज्येष्ठांच्या वाढत असलेल्या समस्यांबद्दल जनजागृती  होण्यासाठी या प्रकारच्या कार्यशाळा उपयुक्त असल्याचे सांगितले. सायबर महाविद्यालयाचे विद्यार्थी प्रतिनिधी भाग्यश्री पाटील यांनी आभार मानले.

कार्यशाळेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील शासकीय प्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक, संस्थांचे प्रतिनिधी महाविद्यालयीन विद्यार्थी -विद्यार्थिंनी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी समाज कल्याण विभागाचे निरिक्षक दत्तात्रय पाटील, कनिष्ठ लिपीक निलम गायकवाड, तालुका समन्वयक सचिन कांबळे, सचिन परब, सुरेखा डवर  सायबरचे विद्यार्थी प्रतिनिधी रामेश्वर राजगुरू चंद्रकांत आडसूळ यांचे सहकार्य केले.

000000

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.