** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Wednesday, December 17, 2025

 जिल्ह्यातील नगरपालिका निवडणूक मतमोजणीसाठी तयारी पूर्ण


▪️ २१ डिसेंबर रोजी मतमोजणी

▪️ राज्य निवडणूक आयोगाकडून कोल्हापूरचे विशेष अभिनंदन

▪️ गडहिंग्लज नगरपरिषदेच्या एका जागेसाठी २० डिसेंबर रोजी मतदान



कोल्हापूर, दि. १७ : जिल्ह्यातील १३ नगरपालिकांमधील निवडणुका यशस्वीरीत्या पार पडल्यानंतर मतमोजणी २१ डिसेंबर रोजी होणार आहे. या अनुषंगाने सर्व ठिकाणी मतमोजणीसाठी आवश्यक सुविधांची तयारी पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली. ऑनलाईन बैठकीतून राज्य निवडणूक आयोगामार्फत तयारीबाबत सर्व जिल्ह्यांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, सहआयुक्त नगरप्रशासन नागेंद्र मुतकेकर यांच्यासह सर्व निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते.


कोल्हापूर जिल्ह्यातील १० नगरपरिषदा आणि ३ नगरपंचायतींमधील निवडणुका ३१८ मतदान केंद्रांवर पार पडल्या. या निवडणुकांची मतमोजणी संबंधित १३ नगरपालिका  ठिकाणी होणार आहे. या कामासाठी एकूण ७९० अधिकारी आणि कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व नियुक्त कर्मचाऱ्यांचे दोन प्रशिक्षण सत्र पूर्ण झाली असून तिसरे प्रशिक्षण प्रगतीपथावर आहे. मतमोजणीसाठी एकुण टेबल व कंसात मतमोजणी फेऱ्या पुढिल प्रमाणे - जयसिंगपूर १३ (५), मुरगूड ६(२), मलकापूर ५(२), वडगाव १०(३), गडहिंग्लज ११(४), कागल ६(७), पन्हाळा ५(२), कुरुंदवाड १०(३), हुपरी ५(७), शिरोळ ११(३), आजरा १०(२), चंदगड ९(२) आणि हातकणंगले ७(३).


फेरीनिहाय निकाल जाहीर करण्यासाठी लाऊडस्पीकरसह इतर सोयींची व्यवस्था करण्यात आली आहे. माध्यम कक्षाचीही व्यवस्था करण्यात आली असून आवश्यक सुविधा उभारण्यात आल्या आहेत. तसेच आवश्यक साहित्य त्या त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. गडहिंग्लज येथील प्रभाग क्रमांक ३ अ येथे निवडणूक २० डिसेंबर रोजी होणार आहे. यासाठी २४७९ मतदारांसाठी ३ मतदान केंद्रांवर मतदान होईल.


जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी बैठकीत जिल्ह्यातील सर्व मतमोजणी केंद्रांवर चोख नियोजनासह संबंधित राजकीय प्रतिनिधींना आवश्यक माहिती बैठकीतून देण्याच्या सूचना केल्या. त्यांनी सांगितले की, निकालानंतर काढण्यात येणाऱ्या विजयी मिरवणुकांबाबत कायदा आणि सुव्यवस्था योग्य प्रकारे अमलात आणावी. कुठेही मिरवणुका, रॅली निघणार नाहीत याची दक्षता घ्या. सर्व ईव्हीएमची सुरक्षितता, सुरक्षा आणि स्ट्राँग रूमबाबत आवश्यक काळजी घ्यावी.


पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना, तडीपार, समन्स, वॉरंट आणि गुन्ह्यांबाबत माहिती दिली. कोल्हापूरसह इचलकरंजी नियंत्रण कक्षामार्फत सर्व ठिकाणी कायदा व सुव्यवस्था राखण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. सर्व १३ स्ट्राँग रूम ठिकाणी सशस्त्र एसआरपीएफचे १ जवान तसेच ३ आर्मगार्ड तैनात करण्यात आले आहेत. बंदोबस्तासाठी ८ पोलीस उपविभागीय अधिकारी, १२ पोलीस निरीक्षक, ५५ सहाय्यक पोलीस निरीक्षक, ४६३ पोलीस अंमलदार आणि ८०० होमगार्ड नेमण्यात आले आहेत.


राज्य निवडणूक आयोगाकडून कोल्हापूरचे विशेष अभिनंदन



पार पडलेल्या १३ ठिकाणच्या निवडणुकांमध्ये जिल्ह्यात एकूण ७८.८७ टक्के मतदानाची नोंद झाली. यामध्ये मुरगूड – ८८.४३%, मलकापूर – ८६.९९%, आणि वडगाव – ८६.२४% या नगरपरिषदा राज्यात मतदान टक्केवारीत पहिल्या तीन क्रमांकांवर आहेत. या अनुषंगाने मतदार जनजागृती आणि मतदान प्रक्रिया प्रभावीपणे राबविल्याबद्दल जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता तसेच सर्व संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी आणि त्यांच्या टीमचे विशेष अभिनंदन राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी बैठकीत केले.

००००००००००००००००

Thursday, December 11, 2025

 कोल्हापुरी चपलांच्या जागतिक प्रसारासाठी प्राडा, लिडकॉम आणि लिडकार यांच्यात सामंजस्य करार

पारंपारिक कोल्हापुरी कौशल्याला प्राडाची आधुनिक साथ


मुंबई, दि.११ : भारतीय पारंपरिक चर्मकला कोल्हापुरी चपलांचा वारसा जगभर पोहोचवण्यासाठी जागतिक ब्रॅन्ड प्राडा, लिडकॉम (संत रोहिदास चर्मउद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ) आणि लिडकार (डॉ. बाबू जगजीवनराम चर्मउद्योग विकास महामंडळ) यांच्यात सामंजस्य करार झाला. मुंबईतील इटालियन वाणिज्य दूतावासात, इटली–भारत व्यापारी परिषदेनिमित्त या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. शतकांपासून वापरात असलेल्या पारंपरिक चप्पल निर्मितीच्या पद्धती, प्राडाच्या आधुनिक व समकालीन डिझाईन शैली या माध्यमातून चप्पल विकसित केल्या जात आहेत. पारंपरिक कौशल्य आणि आधुनिक लक्झरी फॅशनच्या मदतीने पारंपारिक कोल्हापुरी कौशल्याला प्राडाची आधुनिक साथ मिळणार आहे. विशेष चप्पला फेब्रुवारी २०२६ मध्ये प्राडाच्या ४० विक्री केंद्रांमध्ये तसेच अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होईल.


      या उपक्रमासाठी महाराष्ट्र शासनाचे ठोस पाठबळ लाभले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे सक्रिय मार्गदर्शन मिळाले आहे. हा करार प्रधान सचिव तथा लिडकॉमचे अध्यक्ष डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि लिडकॉमच्या व्यवस्थापकीय संचालक प्रेरणा देशभ्रतार यांच्या धोरणात्मक नियोजनामुळे शक्य झाला आहे.


      सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट म्हणाले, या कराराने भारतातील अनेक कारागीर, व्यावसायिक आणि उद्योजकांचा फायदा होणार आहे. या विशेष संकलनातून भारतीय कारागिरांच्या कलेला नवी दिशा मिळणार असून आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्या कौशल्याची ओळख अधिक दृढ होणार आहे.


लिडकॉमच्या व्यवस्थापकीय संचालक प्रेरणा देशभ्रतार म्हणाल्या, पारंपरिक कला जपणाऱ्या कारागिरांच्या पिढ्यांचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांच्या कौशल्याला जागतिक पातळीवर योग्य ओळख देण्यासाठी ही भागीदारी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. यात एक जागतिक ब्रँड थेट महाराष्ट्र आणि कर्नाटकातील कारागिरांसोबत काम करत असल्याने त्यांच्या या कौशल्याला एक ओळख मिळेल आणि कलेचे पूर्ण श्रेय या कारागिरांना मिळेल.

लिडकारच्या व्यवस्थापकीय संचालक संचालिका डॉ. के. एम. वसुंधरा म्हणाल्या, कोल्हापुरी चपलांची परंपरा म्हणजे महाराष्ट्र–कर्नाटकातील चप्पलकारांचे शतकांपासूनचे संचित कौशल्य या सहकार्यामुळे प्रशिक्षण, रोजगार आणि जागतिक संधींची विस्तृत दारे उघडणार आहेत.


    प्राडा समूहाच्या सामाजिक उत्तरदायित्व विभागाचे प्रमुख लोरेंझो बर्टेली म्हणाले, ही भागीदारी म्हणजे सांस्कृतिक आदानप्रदानाची नवी ओळख आहे. भारतीय कारागिरांच्या अतुलनीय कलेला आधुनिक जगात योग्य स्थान देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.

चपलांच्या कलेक्शनच्या माध्यमातून भारतीय कारागिरीचा 'प्राडा मेड इन इंडिया इन्स्पायर्ड बाय कोल्हापुरी चप्पल्स' प्रकल्पाचा आराखडा, अंमलबजावणी आणि त्या संदर्भातील मार्गदर्शक तत्वे या करारात नमूद करण्यात आली आहेत. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील पारंपरिक कोल्हापुरी चपला तयार करणाऱ्या कुशल कारागिरांच्या साह्याने या चपला भारतात बनवल्या जातील. या चपला बनवण्याच्या पारंपरिक पद्धती आणि प्राडाच्या समकालीन डिझाइन्स तसेच प्रीमिअम दर्जाच्या मटेरिअलच्या साह्याने या कलेक्शनच्या माध्यमातून भारतातील संपन्न वारसा आणि आधुनिक लक्झ्यरी फॅशनची अभिव्यक्ती यात एका नवा संवादाला सुरुवात केली जाणार आहे.

      

    पारंपरिक कोल्हापुरी चपला महाराष्ट्रातील चार जिल्हे (कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर) आणि कर्नाटकातील चार जिल्हे (बेळगावी, बागलकोट, धारवाड, बिजापूर) २०१९ या आठ जिल्ह्यांमध्ये बनवल्या जातात. मध्ये कोल्हापुरी चपलांना जिओग्राफिकल इंडिकेशन (जीआय) टॅग देण्यात आल्याने त्यांची अस्सलता जपली गेली आणि त्यांचे सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित झाले.


**

न.पा. मतमोजणी 21 डिसेंबरला; जिल्हाधिकाऱ्यांकडून 200 मीटर परिसरात निर्बंध लागू

विजयी उमेदवारांची मिरवणूक काढण्यास मनाई


कोल्हापूर, दि. 11 (जिमाका) : जिल्ह्यातील 10 नगरपरिषद व 3 नगरपंचायतींची निवडणुकीची प्रक्रिया सुरु असुन राज्य निवडणूक आयोगाच्या सुधारित आदेशान्वये रविवार, 21 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील पन्हाळा, मलकापूर, वडगांव, हुपरी, जयसिंगपुर, शिरोळ, कुरुंदवाड, गडहिंग्लज, कागल, मुरगूड या नगरपरिषद व हातकणंगले, आजरा व चंदगड नगरपंचायत मधील मतदार संघासाठी 2 डिसेंबर रोजी विनिर्दिष्ट ठिकाणी मतदान झाले असून रविवार, 21 डिसेंबर रोजी नगरपरिषद व नगरपंचायत मतदारसंघ निहाय मतमोजणी प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.


नगरपरिषद व नगरपंचायत व मतमोजणीचे ठिकाण -

पन्हाळा - पन्हाळा नगरपरिषद सांस्कृतिक हॉल, मयुर उद्यान

मलकापूर - मलकापूर नगरपरिषद कार्यालय, दुसरा मजला सभागृह

वडगांव - मराठा समाज सभागृह, छत्रपती  शिवाजी महाराज चौक

हुपरी - सभागृह, केंद्रीय प्राथमिक शाळा

हातकणंगले - पहिला मजला सभागृह, तहसिलदार कार्यालय 

जयसिंगपूर - सिध्देश्वर यात्री निवास येथील नगरपरिषद कार्यालय

शिरोळ - सभागृह पहिला मजला, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत

कुरुंदवाड - जिम्नॅशियम हॉल, तबक उद्यान

गडहिंग्लज - पॅव्हेलियन इमारत, गांधीनगर

आजरा (नगरपंचायत)- मुख्य सभागृह, नवीन प्रशासकीय इमारत

चंदगड (नगरपंचायत)-  चंदगड तहसिलदार कार्यालय

कागल (नगरपंचायत)-   सवित्रीबाई फुले मार्केट, जयसिंगराव पार्क

मुरगूड - डॉ. बाबासाहेब आंबडेकर बौध्द विहार


नगरपरिषद व नगरपंचायतीच्या मतदार संघनिहाय मतमोजणी ठिकाणच्या परिसरात जिल्हादंडाधिकारी अमोल येडगे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये रविवार, 21 डिसेंबर रोजी सकाळी 07.00 वाजल्यापासून ते मतमोजणी संपेपर्यंत निर्बंध लागू केले आहेत.

मतमोजणी  दिवशी मतमोजणी  ठिकाणापासून 200 मीटर सभोवतालच्या परीसरात मतमोजणी  कर्मचारी  पुरवठादार, उमेदवार व त्यांनी  नियुक्त केलेल्या प्रतिनिधी व्यतिरिक्त कोणाही व्यक्तीला प्रवेश करणे.  मतमोजणी कालावधीत अथवा मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या लाऊड स्पिकरचा वापर सक्षम पोलीस अधिका-यांच्या लेखी पूर्वपरवानगी शिवाय रस्त्यावर, व्यासपीठावर किंवा फिरत्या वाहनावर बसवून करणे. आदर्श आचारसंहितेचा भंग होईल अशा प्रकारचे भाषण करणे, नक्कल करणे, चित्रे/चिन्हे रेखाटणे अगर त्यांचे प्रदर्शन करणे अथवा तत्सम कृती करणे. मतमोजणी  ठिकाणापासून 200 मीटर परिसरामध्ये मोटरगाड्या, वाहनांचा वापर करणे अथवा थांबविणे. (निवडणुकीच्या अनुषंगाने वापरात असलेली  शासकीय वाहने वगळून)

मतमोजणी ठिकाणाच्या 200 मीटर परिसरामध्ये कोणत्याही व्यक्तिने मोबाईल फोन, कॉर्डलेस फोन, वायरलेस सेट किंवा तत्सम इलेक्ट्रॉनिक सहित्य बाळगणे, वापरणे. (भारत निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेले अधिकारी व मतमोजणीसाठीच्या कामाशी निगडित कर्मचारी वगळून) मतमोजणी  ठिकाणी  उमेदवार मतमोजणी  प्रतिनिधी  वा इतर प्रतिनिधी  यांनी मोबाईल वापरणे किवा फोटो काढणे अथवा चित्रीकरण करणे तसेच गोपनियतेचा भंग होईल अशी कृती करणे. मतमोजणी ठिकाणापासून 200 मीटर परिसरामध्ये कोणत्याही व्यक्तीने (शस्त्र अधिनियम 1959 व नियम 2016 मधील तरतुदी प्रमाणे) कोणत्याही प्रकारची शस्त्रे, अग्नी शस्त्रे व दारुगोळा इ. ची वाहतूक, जवळ बाळगणे अथवा वापर करणे. (सुरक्षेच्या कारणास्तव नेमले पोलीस अधिकारी कर्मचारी वगळून.)

या आदेशाचा कोणत्याही प्रकारे भंग केल्यास, ती व्यक्ती भारतीय न्याय संहितेच्या कलम 223 प्रमाणे तसेच मतमोजणीसाठीच्या गोपनियतेचा भंग झाल्यास लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील. 

00000

विजयी उमेदवारांची मिरवणूक काढण्यास मनाई

कोल्हापूर, दि. 11 (जिमाका) : जिल्ह्यातील 10 नगरपरिषद व 3 नगरपंचायतींची निवडणुकीची प्रक्रिया सुरु असुन राज्य निवडणूक आयोगाच्या सुधारित आदेशान्वये रविवार, 21 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून निवडणूक मतमोजणीची  प्रक्रिया विनाअडथळा व भयमुक्त वातावरणात पार पाडली जाणे आवश्यक आहे. यासाठी जिल्हादंडाधिकारी अमोल येडगे यांनी  भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये 21 डिसेंबर रोजी विजयी उमेदवारांची विजयी मिरवणूक काढणे. विजयी उमेदवारांच्या कार्यकर्ते / कोणत्याही व्यक्ती राजकीय पक्ष/संस्था यांनी गावातून / शहरातून मिरवणूक /रॅली काढणे. सार्वजनिक ठिकाणी गुलाल उधळणे अथवा त्याचा वापर करणे. फटाके लावणे/फोडणे, या कृती करण्यास मनाई केली आहे.

हा आदेश 21 डिसेंबर रोजी कोल्हापूर जिल्हा कार्यक्षेत्रासाठी लागू राहिल. हा आदेश तातडीचे प्रसंगी एकतर्फी देण्यात येत आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या विरोधात कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

00000

 नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा 2027


बोधचिन्ह स्पर्धेत सहभागासाठी आता राहिले फक्त दहा दिवस

जास्तीत जास्त नागरिकांनी 20 डिसेंबरपर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे प्राधिकरणाचे आवाहन

सर्वोत्कृष्ट बोधचिन्हास मिळणार तीन लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक


दि. 11 (जिमाका वृत्तसेवा) : श्रद्धा, पावित्र्य आणि अध्यात्माचा संगम असलेला सिंहस्थ कुंभमेळा नाशिक त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणार आहे. यानिमित्त नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणातर्फे बोध चिन्ह स्पर्धेचे (लोगो डिझाईन) आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभाग नोंदविण्यासाठी आता अवघे दहा दिवस राहिले आहेत. त्यामुळे या स्पर्धेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे अनुक्रमे तीन, दोन आणि एक लाख रुपयांच्या पारितोषिकांसह प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी २० डिसेंबर, २०२५ पर्यंत प्रवेशिका पाठविता येणार आहेत, असे विभागीय आयुक्त तथा नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांनी कळविले आहे.

नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणारा सिंहस्थ कुंभमेळा हा जगातील सर्वात मोठ्या आध्यात्मिक मेळाव्यांपैकी एक आहे. तो दर बारा वर्षांनी एकदा राज्यातील नाशिक जिल्ह्यातून वाहणाऱ्या दक्षिण गंगा अर्थात गोदावरी नदीच्या काठावर भरतो. अमृत मंथनाच्या आख्यायिकेत येणारा हा कुंभमेळा श्रद्धा, पवित्रता आणि नवनिर्माणाच्या शाश्वत चक्राचे प्रतीक आहे. बारा जोतिर्लिंगांपैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर, नाशिकची समृद्ध संस्कृती, मंदिरे आणि घाटांचे आध्यात्मिक आणि ऐतिहासिक प्रतिबिंब या कुंभमेळ्यात दिसते.

नाशिकमधील रामायण स्थळांची भव्यता, नाशिकचे घाट, त्र्यंबकेश्वर आणि गोदावरी नदीचा शाश्वत प्रवाह दोन्ही शहरांना एकत्र जोडतो. कुंभमेळा एक चैतन्यशील आणि जागतिकस्तरावर मान्यताप्राप्त आध्यात्मिक उत्सव म्हणून वाढत असताना २१ व्या शतकाच्या आकांक्षा प्रतिबिंबित करतो. देशाच्या परंपरेत रुजलेली एक ताजी आणि गतिमान दृश्य ओळख निर्माण करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. नवीन बोधचिन्हाची ओळख भूतकाळातील आवृत्त्यांच्या वारशावर आधारित असेल. भक्ती आणि एकतेची कालातीत भावना अशा स्वरूपात साकार करणारी पाहिजे. आधुनिक, संदर्भात्मक आणि भारत आणि जगभरातील विविध प्रेक्षकांसाठी दृश्यदृष्ट्या आकर्षक असे बोधचिन्ह असावे. एवढेच नव्हे, तर नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या संस्कृती, वारसा, स्थापत्य, विधी आणि नैसर्गिक सौंदर्यातून सहभागींना प्रेरणा मिळू शकेल. बोध चिन्ह संस्मरणीय असावे. ते सर्व व्यासपीठांवर श्रद्धा, उत्सव आणि कालातीत परंपरा व्यक्त करेल. ही रचना कुंभमेळा २०२७ साठी एक वेगळी दृश्य ओळख म्हणून काम करेल. नाशिक-त्र्यंबकेश्वरच्या आध्यात्मिक साराचे आणि भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे प्रतीक हे बोध चिन्ह असावे.


बोधचिन्हासाठी…

▪ कमाल आकार ५ एमबी (पीडीएफ) असावा.

▪ स्पर्धेत दिलेल्या ले-आउटनुसार बोधचिन्हाची डिझाइन ए १ आकाराच्या पोस्टरवर असावे.

▪ बोधचिन्हाची रंगीत, कृष्ण्धवल प्रतिमा आणि बोधचिन्हाबाबत माहिती देणारी १५० शब्दांची टिपणी असावी.

▪ स्वाक्षरी केलेल्या आणि स्कॅन केलेल्या अटी आणि शर्तींची कमाल आकार १ एमबी (पीडीएफ) फाइल.

▪ संकल्पना टीप, पोस्टर, प्रतिमा, फाइल नावासह, अर्जदाराची ओळख स्थापित करण्यासाठी नाव, संस्थेचे नाव किंवा कोणतेही संदर्भ यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती नसावी. 

▪ या निकषांचे पालन न करणाऱ्या नोंदी अपात्र ठरवल्या जातील.

▪ सहभागींनी वर नमूद केल्याप्रमाणे २ स्वतंत्र फाइल्स सादर कराव्यात. योग्यरित्या स्वाक्षरी केलेले घोषणापत्र नसल्यास, प्रवेशिका अपात्र ठरवली जाईल.

▪ ही स्पर्धा भारतातील प्रत्येक नागरिकांसाठी खुली आहे. डिझाइन, आर्किटेक्चर आणि कला क्षेत्रातील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. 

▪ ही स्पर्धा व्यावसायिक डिझायनर्स, कलाकार, ब्रॅण्ड डिझायनर्स आणि नाविन्यपूर्ण कल्पना मांडू शकणाऱ्या सर्वांसाठी खुली आहे. 

▪ प्रत्येक सहभागीला फक्त १ प्रवेशिका पाठविण्याची परवानगी राहील. सहभागी स्पर्धकाचे वय किमान १२ वर्षे असावे. एखाद्या गटाने प्रवेशिका दिली असेल, तर एका व्यक्तीला संघाचा प्रमुख आणि प्रवेशिका म्हणून मानले पाहिजे.

▪ बोधचिन्हाची दृश्य ओळख विशिष्ट ओळख घटकांसह प्रदर्शित केलेली पाहिजे.

▪ रंगांचा पॅलेट, दृश्य आकृतिबंध, टाइपफेस, दृश्य अँकर आणि त्याचे अनुप्रयोग जसे की, साइनेज, ब्रँडिंग, स्ट्रीट फर्निचर, प्रवेश पास, स्टेशनरी, झेंडे, व्यापारी माल इत्यादींवर दाखवले पाहिजे.


या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी अधिक माहितीसाठी www.mygov.in  किंवा ntkmalogocompetition@gmail.com  या ई-मेल आयडीवर संपर्क साधावा, असे आवाहन कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. गेडाम यांनी केले आहे. 


०००००

Wednesday, December 10, 2025

राज्यात ६०४ आपला दवाखाने सुरू - मंत्री प्रकाश आबिटकर


 


हिवाळी अधिवेशन -2025


उर्वरित ९६ दवाखाने जानेवारी अखेर सुरू – मंत्री प्रकाश आबिटकर

कोल्हापूर : ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’च्या माध्यमातून सर्व सामान्य माणसाला आरोग्याच्या सर्व सुविधा तत्काळ उपलब्ध होण्याच्या दृष्टीने ही योजना अधिक व्यापकपणे राबविण्यात येईल. राज्यात सध्या या योजनेंतर्गत ६०४ आपला दवाखाने सुरू असून उर्वरित ९६ दवाखाने येत्या जानेवारी अखेर सुरू करण्यात येतील, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधान परिषदेत दिली.

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना व आरोग्य वर्धिनी केंद्र राज्यात पूर्ण क्षमतेने सुरू करण्याबाबत सदस्य प्रवीण दरेकर यांनी विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य सर्वश्री अभिजीत वंजारी, सचिन अहिर, प्रसाद लाड, परिणय फुके, निरंजन डावखरे, रणजितसिंह मोहिते,  राजहंस सिंह, शशिकांत शिंदे, श्रीमती उमा खापरे, मनीषा कायंदे यांनी सहभाग घेतला. सर्वसामान्य व गरीब नागरिकांसाठी असल्याने ती अधिक प्रभावी आणि गतिमान करण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय करण्याचा शासनाचा निर्धार असल्याचे मंत्री प्रकाश आबिटकर यांनी स्पष्ट केले.

मंत्री आबिटकर म्हणाले, राज्य शासनामार्फत ७०० हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना व केंद्र शासनाच्या १५ वित्त आयोगाच्या निधीतून २,२३२ नागरी  आरोग्य वर्धिनी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला. यापैकी ६०४ हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना व १,६४३ नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र सुरू करण्यात आली आहेत.


आरोग्य मंत्री आबिटकर म्हणाले, राज्यात सुरू असलेल्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना व नागरी आरोग्य वर्धिनी केंद्राची संबंधित जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत देखरेख केली जात आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मध्ये फार्मसिस्ट नियुक्तीबाबत केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याचे सांगून मंत्री आबिटकर म्हणाले, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना व नागरी आरोग्य वर्धिनी केंद्राच्या प्रभावी कामकाजासाठी सर्व संबधित सदस्यांसमवेत बैठक घेतली जाईल.


0000000000