इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

रविवार, ६ फेब्रुवारी, २०२२

ऑनलाईन नोंदणी न केलेल्या यंत्रमाग धारकांची वीज बील सवलत बंद करण्याच्या निर्णयास तात्पुरती स्थगिती - वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख

 






 

       कोल्हापूर, दि. 6 (जिमाका): वीज बील सवलतीसाठी वस्त्रोद्योग विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी न केलेल्या यंत्रमाग धारकांची वीज बीलातील सवलत बंद करण्याच्या निर्णयास तात्पुरती स्थगिती देण्यात येत असून ऑनलाईन अर्ज प्रणाली अधिक सुलभ करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांनी आज इचलकरंजी येथे बोलताना केले.

       इचलकरंजी येथील फुलचंद शहा गार्डन येथे वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांनी वस्त्रोद्योग व्यवसायातील अडचणी, समस्या संदर्भात यंत्रमाग संघटनांचे प्रतिनिधी, वस्त्रोद्योग विभागाचे अधिकारी तसेच विविध यंत्रमागधारकांचे प्रतिनिधी आणि वस्त्रोद्योग व्यवसायिक यांच्याशी संवाद साधला. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे, आमदार राजू आवळे यांच्यासह इंडस्ट्रीयल इस्टेटचे पदाधिकारी, यंत्रमागधारक उपस्थित होते.

            वस्त्रोद्योग मंत्री श्री. शेख म्हणाले, पुढील वर्षी जाहीर होणाऱ्या वस्त्रोद्योग धोरणापूर्वी  यंत्रमागधारकांच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आलेली आहे.  या समितीमध्ये  प्रत्येक यंत्रमाग बहुल जिल्ह्यातील प्रतिनिधींचा समावेश केला जाणार आहे. तसेच  वस्त्रोद्योग व्यावसायिकांचे  प्रश्न समजून घेण्यासाठी आपण त्या-त्या जिल्ह्यांचा दौरा करणार आहे. नवीन वस्त्रोद्योग धोरण ठरविताना वस्त्रोद्योगातील तज्ज्ञांच्या मताबरोबरच वस्त्रोद्योग व्यवसायात काम करणाऱ्या व्यावसायिकांची मते जाणून घेऊन राज्याचे सर्व समावेशक असे वस्त्रोद्योग धोरण ठरविले जाणार आहे. नवीन वस्त्रोद्योग धोरणात कोणत्याही उद्योग घटकांवर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेतली  जाणार आहे.

            वीज सवलतीसाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया कशी असावी या संदर्भात एका महिन्यात निर्णय घेतला जाईल. तोपर्यंत सर्वांनी जुन्या दराप्रमाणेच वीज बिले भरावीत. 27 अश्वशक्तीवरील यंत्रमाग धारकांना 75 पैसे अतिरिक्त वीज बील सवलत देण्याबाबत येत्या महिन्याभरात प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवला जाईल, असेही  वस्त्रोद्योग मंत्री श्री. शेख यंत्रमागधारकांशी संवाद साधताना म्हणाले.

            राज्यात वस्त्रोद्योग वाढीसाठी शासनामार्फत सकारात्मक प्रयत्न केले जात असल्याचे सांगून वस्त्रोद्योग मंत्री श्री. शेख म्हणाले,  कार्पोरेट क्षेत्राबरोबरच औद्योगिक क्षेत्राची वाढ होण्यसाठी आधुनिकतेची कास धरण्यास या घटकातील उद्योजकांनी प्राधान्य द्यावे.  शेतीनंतर रोजगार देणारा वस्त्रोद्योग हा घटक असून राज्यातील वस्त्रोद्योग वाढीसाठी जे-जे करावयास हवे ते-ते आवश्यक केले जाईल,अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

            पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, वस्त्रोद्योगातील प्रत्येक घटकांची माहिती एकत्रित संकलित झाल्यास या घटकांसाठी योजना राबविणे, त्यांना मदत करणे सुलभ होणार आहे. यासाठी प्रत्येक घटकांची नोंदणी असणे आवश्यक आहे. नोंदणीची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सर्वांशी चर्चा केली जाईल.. वस्त्रोद्योगाला बळ देण्याचे शासनाचे धोरण असून वस्त्रोद्योगाबरोबरच व्यापार, शेती यासारख्या क्षेत्रातील फसवेगिरीला चाप घालण्यासाठी  नवीन कायदा आणण्याचा मानस असल्याचे ते म्हणाले. यंत्रमागधारकांची वीज कनेक्शन खंडीत करु नयेत अशा सूचना महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या असल्याचे पालकमंत्री  श्री. पाटील यावेळी म्हणाले.

            यावेळी खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे, आमदार राजू आवळे, इंडस्ट्रियल इस्टेटचे राहूल खंजिरे, यंत्रमाग संघटनेचे  मदन कारंडे, विनय महाजन, सतीश कोष्टी, राजगोंड पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, सागर चाळके, रविंद्र माने, राहुल आवाडे, संजय कांबळे, कैश बागवान, महादेव कांबळे, नितीन जांभळे यांच्यासह यंत्रमागधारक संघटनांचे प्रतिनिधी, यंत्रमागधारक उपस्थित होते.

            या कार्यक्रमापूर्वी भारतरत्न लता मंगेशकर आणि एन. डी. पाटील यांना उपस्थितांनी श्रद्धांजली वाहिली.

000000

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.