** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, July 22, 2016


कन्यागत महापर्वकाळासह संपूर्ण जिल्ह्यात
आपत्ती व्यवस्थापनाचे सुक्ष्म नियोजन करा
-          जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी

कोल्हापूर, दि. 22 : ऑगस्ट महिन्यात मुसळधार पावसाची शक्यता गृहीत धरुन प्रत्येक विभागाने श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे होणाऱ्या कन्यागत महापर्वकाळ सोहळ्यासह संपूर्ण  जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापनाचे सुक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी दिले.
            कन्यागत महापर्वकाळ सोहळ्याची सुरुवात 12 ऑगस्ट 2016 पासून होत आहे. या निमित्ताने महाराष्ट्र आपत्ती धोके व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यातील दुसऱ्या दिवसाची कार्यशाळा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महाराणी ताराराणी सभागृहात घेण्यात आली.  यावेळी मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, आपत्ती व्यवस्थापन सेलचे संचालक निवृत्त कर्नल व्ही. एन. सुपनेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सदाशिव साळुंखे, अप्पर पोलीस अधीक्षक दिनेश बारी, अप्पर मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख, उप विभागीय अधिकारी अश्विनी जिरंगे, तहसिलदार सचिन गिरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
            ऑगस्ट महिन्यात मुसळधार पावसाची शक्यता असून जिल्ह्यातील धरणे जवळपास भरली आहेत. त्यामुळे पाऊस जास्त झाल्यास परिस्थिती बिकट उदभवू शकते, त्यासाठी श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे होणाऱ्या कन्यागत महापर्वकाळाबरोबरच जिल्ह्यात सर्व ठिकाणी प्रत्येक विभागाने आपत्ती व्यवस्थापनाचे सुक्ष्म नियोजन करावे, भूस्खलनप्रवण ठिकाणे सुमारे 20 आहेत. त्याची पाहणी आपत्ती ओढवल्यास पर्यायी नियोजन संबंधित विभागाने करावे. जिल्ह्यात एकही जिवित हानी होणार नाही याची सर्वांनी  दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी दिले.
            कन्यागत महापर्वकाळाचे श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे नियोजन करत असतांनाच गणेशवाडी, औरवाड, खिद्रापूर या ठिकाणीही नियोजन करा, व्यवस्था ठेवा असे सांगून कन्नड आणि मराठी भाषिक दोघांनाही समजतील असे  सायंनेजिस तयार करा. विद्युत, एस.टी. या विभागानी बॅकपचे नियोजन करावे. मंदीर परिसर अन्य भागात स्वच्छता राहील याची दक्षता घ्यावी. गणेशवाडी पालखी मार्गावरील अडथळा ठरणारा डी. पी. त्वरीत हटवा, असे आदेश देऊन जिल्हाधिकारी म्हणाले, व्यावसायिकांनी घरगुती सिलेंडरचा वापर व्यवसायिक कारणांसाठी करु नये. तसेच आग प्रतिबंधक उपकरणे तयार ठेवावीत.
            यावेळी सुपनेकर यांनी सर्व विभागाना 11 12 रोजी 24 तास काम करावे लागणार असल्याने प्रत्येक विभागाचे सुक्ष्म नियेाजन करावे. संबंधित सर्व घटकांनी दोन दिवस आधी संपूर्ण परिसर पायाखाली घालावा. श्री क्षेत्र नृसिंहवाडीसह गणेशवाडी, औरवाड, खिद्रापूर या ठिकाणीही कंट्रोल रुम असणे आवश्यक आहे. महालक्ष्मी,  पन्हाळा याठिकाणीही पर्यटक मोठ्या प्रमाणात जाऊ शकतील त्यामुळे तेथेही नियोजन आवश्यक आहे. प्रत्येक विभागाने आपली भूमिका समजून घेऊन नियोजन करावे. संवाद हा आपत्ती व्यवस्थापनाचा कणा असल्यामुळे सर्व यंत्रणांमध्ये सुसंवाद असणे आवश्यक आहे. घाट परिसरात दिव्यांची व्यवस्था, ध्वनीक्षेपण यंत्रणा, वॉच टॉवर आदी आवश्यकतेनुसार उपलब्ध असावेत.
             यावेळी सर्व विभागांचे प्रमुख, सामाजिक संस्था, देवस्थान समितीचे मान्यवर पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

0 0 0 0 0  0

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.