** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Monday, September 21, 2026

बालकांनी सोशल मीडियाचा वापर टाळावा -सहायक पोलीस निरीक्षक स्वाती यादव

 



 

 * बालकांनी संकटसमयी 112 व 1098 क्रमांकावर संपर्क साधावा

* पालक, शिक्षक व पोलीसांपासून कोणतेही सिक्रेट लपवू नका

 

•  "लोकसंवाद" कार्यक्रमाद्वारे कायदा व सुव्यवस्थेविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

 

  कोल्हापूर दि.21 (जिमाका): समाजात वावरताना आपल्यासोबत कोणताही अनुचित प्रकार घडला तर त्याबद्दल आई-वडील, पालक, शिक्षक किंवा पोलीस दीदीला मोकळेपणाने वस्तुस्थिती सांगा, म्हणजे अनुचित प्रकारांना वेळेत आळा घालून गुन्हा रोखता येतो. अडचणीच्या वेळी, संकटकालीन परिस्थितीत पोलीस विभागाच्या 1098 किंवा 112 क्रमांकावर संपर्क साधा. अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. मोबाईल आणि सोशल मीडियाचा वापर टाळा, अशा शब्दांत पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या भरोसा सेलच्या प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक स्वाती यादव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

 

     माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने राज्यभरात गणेशोत्सवाच्या कालावधीत लोकसंवाद हे अभियान राबवण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने "लोकसंवाद" कार्यक्रमांतर्गत छत्रपती शाहू विद्यालयातील विद्यार्थ्यांना कायदा व सुव्यवस्थेविषयी मार्गदर्शन करण्यात आले, यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी मुख्याध्यापिका जयंती इंदुलकर, विभागीय माहिती कार्यालयाच्या सहायक संचालक वृषाली पाटील सहायक मुख्याध्यापिका गीता पिल्लई व अन्य मान्यवर उपस्थित होते.

 

     स्वाती यादव म्हणाल्या, विद्यार्थी दशेत विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित करुन उज्वल भविष्य घडवावे. अभ्यासासाठी हातात घेतलेल्या मोबाईलचा वापर विद्यार्थ्यांकडून सोशल मीडियासाठी केला जातो. परंतु चुकीच्या लिंक उघडल्या गेल्यास त्यातून आर्थिक फसवणूक, मानसिक फसवणूक व अन्य गंभीर गुन्ह्यात अडकले जाण्याची शक्यता असते. विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा वापर काळजीपूर्वक करावा. समाजात वावरताना ओळखीच्या किंवा अनोळखी व्यक्तीकडून "सिक्रेट गोष्ट सांगू नको" असे सांगून फसवणूक किंवा छळ होऊ शकतो. म्हणूनच कोणतेही सिक्रेट असले तरी ते सर्वप्रथम आपल्या आई-वडिलांना किंवा शिक्षकांना सांगा. गरज भासल्यास तातडीने पोलीसांची मदत घ्या, चांगल्या मित्रांची संगत निवडा, वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्याशिवाय वाहन चालवू नका. पॉक्सो सारख्या बाल गुन्हेगारीच्या घटनांमध्ये कडक शिक्षा होत असल्यामुळे आपल्या हातून कधीही चुकीचे वर्तन घडणार नाही, याची दक्षता घ्या. शाळेत आणि समाजात वावरताना एकमेकांशी मैत्रीपूर्ण नाते जपा, असे आवाहन त्यांनी केले.

 

यावेळी त्यांनी सुरक्षितता, सोशल मीडियामुळे होणारे गुन्हे, निर्भया पथक, पोलीस हेल्पलाइन, पॉक्सो कायदा 2012, बालगुन्हेगारी आदी विषयांवर मार्गदर्शन केले.

 

    सुरुवातीला विभागीय माहिती कार्यालयाच्या सहायक संचालक (माहिती) वृषाली पाटील यांनी ‘लोकसंवाद’ उपक्रमाचा उद्देश स्पष्ट करुन कार्यक्रमाची माहिती दिली.

 

     मुख्याध्यापिका जयंती इंदुलकर यांनी स्वागत तर अश्विनी चौगुले यांनी प्रास्ताविक केले. आभार उपमुख्याध्यापिका गीता पिल्लई यांनी मानले. कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

           ***

 

‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ महाराष्ट्र’ रोजगार मेळाव्यांमध्ये युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे-कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

 



राज्यातील युवकांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत २९ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात एक हजार रोजगार मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. या ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ महाराष्ट्र’ रोजगार मेळाव्यांमध्ये युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मलबार हिल येथील मीनल क्रीडा मंडळात आयोजित लोकसंवाद अभियान कार्यक्रमात केले.

माहिती व जनसंपर्क विभागाच्या ‘लोकसंवाद–२०२६’ अभियानांतर्गत गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. याच उपक्रमांतर्गत मुंबई शहर व मुंबई उपनगरातील विविध गणेश मंडळांमध्ये नागरिकांशी संवाद साधून रोजगार मेळावे आणि उपलब्ध रोजगाराच्या संधींबाबत माहिती देण्यात आली. याबरोबरच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि महिला व बालकांच्या संरक्षण, पोषण, शिक्षण व सक्षमीकरणासाठीच्या विविध योजना आणि सेवांची माहिती यावेळी देण्यात आली.
यावेळी मीनल क्रीडा मंडळाचे अध्यक्ष प्रशांत जाधव, उपाध्यक्ष निंगेश कोरे, राजीव मेहता, सागर पेंढारकर, आयेशा कुरेशी इतर पदाधिकारी, सदस्य व भक्तगण उपस्थित होते. यावेळी मुंबई शहर जिल्ह्यातील रोजगार मेळाव्याबाबत कौशल्य विकास अधिकारी विद्या शिंगे, समन्वयक अजय कांबळे, तसेच माहिती व जनसंपर्क विभागाच्या विभागीय संपर्क अधिकारी संध्या गरवारे, श्रद्धा मेश्राम आणि अश्विनी पुजारी यांनी नागरिकांशी संवाद साधून रोजगार महाकुंभाची माहिती दिली.

सेवा संकल्प अभियानांतर्गत समाज कल्याण विभागामार्फत विविध उपक्रमांचे आयोजन


 

कोल्हापूर, दि. 21 (जिमाका) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील कारकीर्दीस 25 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयानुसार 7 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत राज्यभर "सेवा संकल्प अभियान" राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत समाज कल्याण विभागाच्या अधिनस्त असलेल्या 18 शासकीय वसतिगृहे व 4 निवासी शाळांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

या अभियानांतर्गत पुढील शालेय उपक्रम राबविण्यात येणार आहेत - "विकसित भारत" या संकल्पनेवर आधारित चित्रकला स्पर्धा व चित्र प्रदर्शन, "मुलांच्या स्वप्नातील भारत" व "विकसित भारत 2047" या विषयांवर वक्तृत्व स्पर्धा.

जनजागृती व सेवा योगदान - वसतिगृह व शाळा नजीकच्या गावात / वाडीत केंद्र व राज्य शासनाच्या जनकल्याणकारी योजनांची माहिती कला पथकाद्वारे देण्यात येणार आहे. तसेच स्थानिक गरजेनुसार अनाथालय / वृद्धाश्रम भेट, वृक्षारोपण अभियान, स्वच्छता ही सेवा, आरोग्य तपासणी शिबिर, योग आणि ध्यान सत्र, प्लास्टिक मुक्ती जागरूकता, महिलांचे आरोग्य आणि स्वच्छता, वंचित मुलांसाठी शिक्षण सहकार्य, करिअर कौन्सिलिंग सत्र, ज्येष्ठ नागरिकांसाठी डिजिटल साक्षरता, व्यसनमुक्त भारत जागरूकता, पोषण आणि अॅनिमिया जागरूकता, कचरा वर्गीकरण आणि कंपोस्टिंग, सायबर सुरक्षा जागरूकता, वीर गाथा आणि सैनिकांचा सन्मान, विद्यार्थ्यांना आवश्यक असणारी सर्व प्रमाणपत्रे वाटप इ. सेवा उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

या अभियानामध्ये युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग घेण्यात येणार असून, स्वच्छता मोहीम विशेषत्वाने राबविण्यात येणार आहे. त्याचबरोबर या कार्यालयाचे तालुका समन्वयक व समता दुत यांच्यामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती समाज कल्याण विभागातर्फे देण्यात आली.

0000 

Sunday, September 20, 2026

पशुसंवर्धन विभागाच्या योजनांची माहिती घ्या; योजनांचा लाभ घेऊन पशुपालन व्यवसायाला चालना द्या -पशुवैद्यकिय अधिकारी डॉ. दीपाली भुतकर


 



पशुसंवर्धन विभागाच्या योजनांची माहिती घ्या;

 योजनांचा लाभ घेऊन पशुपालन व्यवसायाला चालना द्या

 -पशुवैद्यकिय अधिकारी डॉ. दीपाली भुतकर

 

 कोल्हापूर, दि. 20 (जिमाका) : ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याबरोबरच शेतकरी व पशुपालकांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत. पशुपालन, दुग्धव्यवसाय, शेळी-मेंढी पालन, कुक्कुटपालन तसेच पशुधन उद्योजकतेला प्रोत्साहन देणाऱ्या योजनांची माहिती घेऊन पात्र लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन   पशुवैद्यकिय अधिकारी  डॉ. दीपाली भुतकर यांनी केले.

पट्टणकोडोली, हुपरे नगर येथील सिद्धिविनायक गणेश  उत्सव मंडळ येथे आयोजित ‘लोकसंवाद’ कार्यक्रमावेळी त्या बोलत होत्या. यावेळी  मंडळाचे अध्यक्ष ओमकार सावंत, खजिनदार श्रीकांत आवटे मंडळाचे पदाधिकारी तसेच स्थानिक युवक, महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रामीण भागात पशुधनावर आधारित व्यवसायाच्या माध्यमातून स्वयंरोजगार व उद्योजकतेला चालना देणे हा पशुसंवर्धन खात्याचा महत्त्वाचा उद्देश आहे. ONE HEALTH संकल्पने नुसार सुदृढ पशु आरोग्य, शास्त्रीय अतिउत्पादनक्षम पशुपैदास, सकस पौष्टिक पशु आहार, व सुयोग्य पशु व्यवस्थापन या चतु:सूत्रीवर भविष्यातील दुग्धव्यवसाय अधिक फायदेशीर होऊ शकतो.  त्याकरिता आपले दुग्धव्यवसायात तयार होणारे इतर दुग्धजण्य पदार्थ जे "Value addable product " आहेत ते भविष्यातील लोकसंख्येला सकस अन्न पुरविणे करिता व परदेशात निर्यात करण्या करिता आवश्यक मानकानुसार गरजेचे असणारे लाळखुरकत रोग मुक्त होणेकरिता पशुसंवर्धन विभागामार्फत व्यापक स्वरूपात लसीकरण मोहीम राबविली जाते. पशुधन रोगमुक्त राहून  प्राणिजण्य आजार टाळून त्यातून सकस दूध, दुग्धजण्य पदार्थ, मांस, अंडी निर्मिती करणेसाठी PPR, लम्पि चर्मरोग, ब्रुसेल्ला, अँटिरॅबीज लसीकरण या योजनांचा पशुपालकांनी लाभ घ्यावा, असे सांगून श्रीमती भूतकर पुढे म्हणाल्या, आधुनिक शास्त्रीय पशुपैदास करिता पशुसंवर्धन विभागामार्फत अत्यल्प दराने उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या "लिंग निर्धारित वीर्यमात्रा " वापरून अधिक उत्पादनक्षम पशुधन निर्मितीसाठी या योजनेचा ही पशुपालकांनी लाभ घ्यावा.

अल निनो प्रभावामुळे भविष्यातील वैरण तूट लक्षात घेऊन पशुसंवर्धन विभागाचे चारा साक्षरता अभियान व वैरण विकास योजनेंतर्गत वाटप होणारे 100% अनुदानवरील बियाणे या योजनामधून तयार होणारा अतिरिक्त चारा आज मुरघास, युरिया व ओझोन ट्रीटमेंट सारखे आधुनिक शास्त्रीय उपाय वापरून तरुण पिढी यामधून रोजगार व व्यवसाय निर्मिती करू शकते. त्यातून उपलब्ध सकस पशु चारा वैरण टंचाई असलेल्या भागात उपलब्ध करून देता येईल.

तसेच आपले बहुमूल्य पशुधनाचे अकाली अथवा आपत्ती मुळे होणारे आर्थिक नुकसान टाळण्या करिता 85 % अनुदानावर विमा योजनेचा लाभ घेण्या करिता आपल्या नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधून त्यांच्या कानातील बिल्ला व पशुधन मालकीच्या आधार क्रमांकाच्या आपल्या नोंदी   अद्ययावत करून घेऊन सदर योजनेचाही तत्पर लाभ घ्यावा, अशी सूचना त्यांनी केली.

पशुपालकांनी आपल्या गरजेनुसार उपलब्ध योजनांची माहिती घेऊन पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, अनुदानाचे निकष व अंतिम मुदत याबाबत जवळच्या पशुवैद्यकीय दवाखाना, तालुका पशुसंवर्धन कार्यालय किंवा संबंधित पशुसंवर्धन अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध योजना व शासन निर्णयांची माहिती पाहूनच अर्ज करावा.

पशुपालन व्यवसायातून आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी पशुपालक, शेतकरी, महिला बचत गट व पात्र उद्योजकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही श्रीमती भूतकर यांनी यावेळी  केले.

राज्य शासनाने गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित केले आहे. सार्वजनिक लोकसहभागातून शासनाच्या विविध योजना, उपक्रम आणि धोरणात्मक निर्णयांची माहिती जनतेपर्यंत थेट पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागाच्यावतीने राज्यभर ‘लोकसंवाद-2026’ हा विशेष जनजागृती उपक्रम  16 ते 24 सप्टेंबर 2026 या कालावधीत राबविण्यात येत आहे.

शासनाच्या योजनांची माहिती देण्याबरोबरच नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधणे, आणि पात्र लाभार्थ्यांना संबंधित योजनांचा लाभ घेण्यासाठी मार्गदर्शन करणे, हा ‘लोकसंवाद-2026’चा प्रमुख उद्देश आहे.

*****

Wednesday, September 9, 2026

भरती परीक्षा पद्धतीच्या सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती गठीत

 


कोल्हापूर, दि. 7 (जिमाका) : राज्यातील भरती परीक्षा अधिक पारदर्शक, सुरक्षित, विश्वासार्ह आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी विद्यमान परीक्षा पद्धतीचा सर्वंकष अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचविण्यासाठी शासनाने उच्चस्तरीय समिती गठित केली आहे.

मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या महिन्यात झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाने ४ सप्टेंबर २०२६ रोजी शासन निर्णय जारी करून समिती गठित केली आहे.

अपर मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभाग (सेवा) श्रीमती व्ही. राधा या समितीच्या अध्यक्ष आहेत. पोलीस महासंचालक सदानंद दाते, सचिव वीरेंद्र सिंह, सचिव डॉ. एन. रामास्वामी, विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, संघ लोकसेवा आयोगाचे (UPSC) माजी सदस्य एअर मार्शल अजित शंकरराव भोसले (सेवानिवृत्त) आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) मुंबईचे प्रा. श्यामप्रसाद करगड्डे यांचा समितीत सदस्य म्हणून समावेश आहे. डॉ. एन. रामास्वामी हे समितीचे सदस्य सचिव आहेत.

राज्य शासनाच्या विविध विभाग, प्राधिकरणे आणि परीक्षा घेणाऱ्या संस्थांकडून राबविण्यात येणाऱ्या भरती परीक्षांच्या विद्यमान प्रणाली व कार्यपद्धतीचा समिती आढावा घेणार आहे. प्रश्नपत्रिका तयार करणे, परीक्षण व मॉडरेशन, प्रश्नसंच तयार करणे, मुद्रण अथवा डिजिटल वितरण, गोपनीयता, अभिरक्षा, प्रश्नपत्रिका वाहतूक, परीक्षा संचालन, मूल्यमापन आणि निकाल जाहीर करण्याच्या प्रक्रियेचा सखोल अभ्यास करण्यात येणार आहे.

प्रश्नपत्रिका फुटणे, गोपनीयता भंग, तोतया उमेदवार, संगनमत तसेच प्रतिबंधित इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर अशा अनुचित प्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी या समितीतर्फे उपाययोजना सुचविण्यात येतील. परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेत माहिती तंत्रज्ञान, डिजिटल प्रणाली आणि सुरक्षा तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याबाबतही समिती शिफारसी करणार आहे.

परीक्षा केंद्रांची निवड, पायाभूत सुविधा, सुरक्षा, मनुष्यबळ आणि कार्यसज्जतेसाठी किमान मानके सुचविण्यासोबतच जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त/पोलीस अधीक्षक, शिक्षण विभाग, परीक्षा घेणाऱ्या संस्था आणि इतर संबंधित यंत्रणांमध्ये प्रभावी समन्वयासाठी संस्थात्मक कार्यपद्धती सुचविण्यात येणार आहे.

समिती राज्यातील प्रत्येक महसुली विभागास भेट देऊन विद्यार्थी व उमेदवार, शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी आणि इतर हितधारकांशी प्रत्यक्ष किंवा ऑनलाइन माध्यमातून चर्चा व सल्लामसलत करणार आहे.

0000

Monday, September 7, 2026

भरती परीक्षा अधिक पारदर्शक, सुरक्षित व विश्वासार्ह करण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठित विद्यमान परीक्षा पद्धतीचा सर्वंकष अभ्यास करून शासनास सुधारणा सुचविणार


 

मुंबई, दि. ६ : राज्य शासनामार्फत घेण्यात येणाऱ्या भरती परीक्षा अधिक पारदर्शक, सुरक्षित, विश्वासार्ह, निष्पक्ष आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी विद्यमान परीक्षा पद्धतीचा सर्वंकष अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचविण्याकरिता उच्चस्तरीय समिती गठित करण्यात आली आहे. याबाबत सामान्य प्रशासन विभागाने शासन निर्णय जारी केला आहे.

मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली 12 ऑगस्ट 2026 रोजी झालेल्या बैठकीत राज्यातील भरती परीक्षा पद्धतीचे संपूर्ण पुनर्विलोकन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव (सेवा) श्रीमती व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे.

समितीमध्ये पोलीस महासंचालक सदानंद दाते, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाचे सचिव वीरेंद्र सिंह, नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, संघ लोकसेवा आयोगाचे माजी सदस्य एअर मार्शल अजित शंकरराव भोसले (सेवानिवृत्त) आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी), मुंबई येथील यांत्रिकी अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक श्यामप्रसाद करगड्डे यांचा सदस्य म्हणून समावेश आहे. पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास आणि मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव डॉ. एन. रामास्वामी हे समितीचे सदस्य सचिव असतील.

परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेचा अभ्यास

राज्य शासनाचे विविध विभाग, प्राधिकरणे आणि परीक्षा घेणाऱ्या संस्थांकडून राबविण्यात येणाऱ्या भरती परीक्षांच्या विद्यमान प्रणाली व कार्यपद्धतीचा समिती आढावा घेईल. भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह व निष्पक्ष करण्यासाठी सर्वंकष उपाययोजना सुचविण्यात येणार आहेत.

प्रश्नपत्रिका तयार करणे, परीक्षण व मॉडरेशन, एकापेक्षा अधिक प्रश्नसंचांची निर्मिती, मुद्रण किंवा डिजिटल वितरण, गोपनीयता, अभिरक्षा, प्रश्नपत्रिकांची वाहतूक, परीक्षा संचालन, प्रतिसाद नोंदणी, मूल्यमापन आणि निकाल जाहीर करण्यापर्यंतच्या सर्व प्रक्रियांचा अभ्यास करून योग्य सुरक्षा उपायांची शिफारस समिती करेल.

परीक्षा प्रक्रियेत माहिती तंत्रज्ञान, डिजिटल प्रणाली आणि सुरक्षा तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, प्रमाणीकरण, प्रवेश नियंत्रण, लेखापरीक्षण नोंदी (ऑडिट ट्रेल्स), देखरेख तसेच अन्य तंत्रज्ञानाधारित सुरक्षा उपायांबाबतही समिती शिफारसी करणार आहे.

गैरप्रकारांना प्रतिबंधासाठी उपाय

प्रश्नपत्रिका फुटणे, गोपनीयतेचा भंग, तोतया उमेदवार, संगनमत आणि प्रतिबंधित इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर यांसारख्या अनुचित प्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी अस्तित्वात असलेल्या यंत्रणेचा समिती आढावा घेईल. अशा गैरप्रकारांचा शोध घेणे, प्रतिबंधात्मक व पर्यवेक्षणात्मक उपाययोजना राबविणे आणि उत्तरदायित्व निश्चित करण्याबाबतही उपाय सुचविले जाणार आहेत.

परीक्षा केंद्रांची निवड, पायाभूत सुविधा, देखरेख, सुरक्षा, मनुष्यबळ आणि कार्यसज्जता यांसाठी किमान मानके निश्चित करण्याबाबत समिती शिफारसी करेल. जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त किंवा पोलीस अधीक्षक, शिक्षण विभागातील प्राधिकरणे, परीक्षा घेणाऱ्या संस्था आणि अन्य संबंधित यंत्रणांमध्ये प्रभावी समन्वयासाठी संस्थात्मक कार्यपद्धतीही सुचविण्यात येईल.

प्रत्येक महसुली विभागाला भेट

समिती राज्यातील प्रत्येक महसुली विभागाला भेट देऊन विद्यार्थी, उमेदवार, शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी आणि अन्य संबंधित हितधारकांशी चर्चा व सल्लामसलत करेल. त्यांची मते आणि सूचना विचारात घेऊन परीक्षा पद्धतीतील सुधारणा सुचविण्यात येणार आहेत. आवश्यकता भासल्यास इतर राज्यांतील उत्तम पद्धती तसेच अन्य देशांतील परीक्षा प्रणालींचाही अभ्यास केला जाईल.

प्रभावी तक्रार निवारण, उमेदवारांशी सुसंवाद आणि परीक्षा प्रक्रियेची निष्पक्षता व प्रामाणिकतेबाबत उमेदवारांचा विश्वास अधिक दृढ करण्यासाठीही समिती उपाय सुचवेल. संबंधित हितधारकांशी प्रत्यक्ष अथवा ऑनलाइन माध्यमातून संवाद साधून सूचना व अभिप्राय प्राप्त केल्यानंतर समिती सर्वसमावेशक अंतिम अहवाल शासनास सादर करणार आहे.

यासंदर्भातील शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेतांक २०२६०९०५१३५४४७३३०७ असा आहे.

०००

Thursday, August 20, 2026

जलसंधारण : जलसमृद्ध, दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा भक्कम पाया - संजय राठोड मंत्री, मृद व जलसंधारण, महाराष्ट्र शासन

 

जलसंधारण दिन विशेष


 

पाणी म्हणजे शेतीचा श्वास आणि विकासाचा आधार आहे. बदलते हवामान आणि घटती भूजल पातळी यामुळे जलसंधारणाचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले आहे. पावसाच्या प्रत्येक थेंबाचे जतन करून तो जमिनीत मुरवणे, ही काळाची गरज आहे. जलसंधारणातून मातीला नवजीवन, शेतीला आधार आणि भावी पिढ्यांना सुरक्षित भविष्य देण्याची ताकद आहे.

 

महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र ३०७.५८ लाख हेक्टर असून, त्यापैकी १७४.७३ लाख हेक्टर क्षेत्र शेतीखाली आहे. राज्यातील सुमारे ८२ टक्के शेती पावसावर अवलंबून असल्याने पावसाच्या पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे संवर्धन करणे ही काळाची गरज बनली आहे. राज्यातील २४१ लाख हेक्टर क्षेत्र पाणलोट विकासासाठी पात्र असून, त्यापैकी १८२.४७ लाख हेक्टर क्षेत्रावर मृद व जलसंधारणाची विविध कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित क्षेत्रावरही नियोजनबद्ध पद्धतीने कामे सुरू आहेत.

महाराष्ट्र शासनाने जलसंधारणाला विकासाच्या केंद्रस्थानी ठेवून विविध प्रभावी योजना राबविल्या आहेत आणि राबवत आहे. राज्याला जलसुरक्षिततेच्या दिशेने सक्षमपणे पुढे नेण्यासाठी मृद व जलसंधारण विभाग सातत्याने कार्यरत असून जलस्रोतांचे संवर्धन, भूजल पुनर्भरण, विकेंद्रित जलसाठ्यांची निर्मिती आणि शाश्वत जलव्यवस्थापनाला प्राधान्य दिले जात आहे.

 

जलयुक्त शिवारातून गावांच्या जलसमृद्धीकडे

जलयुक्त शिवार अभियानामुळे राज्यातील अनेक गावांमध्ये जलसाठे वाढले, विहिरींच्या पाणीपातळीत सुधारणा झाली आणि संरक्षित सिंचनाला चालना मिळाली. ज्या शेतकऱ्यांना पूर्वी वर्षातून एकच पीक घेता येत होते, अशा अनेक भागांत दुबार पिकांच्या संधी निर्माण झाल्या आहेत. जलसंधारणामुळे निर्माण होणारे संरक्षित सिंचन केवळ शेतीपुरते मर्यादित राहत नाही, तर ग्रामीण बाजारपेठ, रोजगार, दुग्धव्यवसाय आणि लघुउद्योगांनाही चालना देते.

            जलयुक्त शिवार अभियानाच्या पहिल्या टप्प्यातील यशानंतर जलयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गत राज्यातील ५,८५८ गावांमध्ये सुमारे १.४३ लाखांहून अधिक कामे प्रस्तावित झाली आहेत. त्यापैकी १.२४ लाखांपेक्षा अधिक कामे पूर्ण झाली आहेत. जुलै २०२६ अखेर या अभियानावर २,३०० कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी खर्च करण्यात आला आहे.

 

गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार-पाण्यासोबत मातीलाही नवजीवन

‘गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार’ ही योजना पर्यावरण आणि शेती यांचा सुंदर समन्वय साधणारी आहे. धरणातील गाळ काढल्यामुळे पाणीसाठवण क्षमता वाढते, तर तोच सुपीक गाळ शेतात टाकल्यामुळे जमिनीची गुणवत्ता आणि उत्पादन क्षमता सुधारण्यास मदत होते.

२०२३-२४ ते २०२५-२६ या कालावधीत राज्यातील ३,३०५ जलाशयांमधून ९८०.५० लक्ष घनमीटर गाळ काढण्यात आला असून, तो सुमारे १ लाख ९३ हजार एकर क्षेत्रावर पसरविण्यात आला आहे. यासाठी सुमारे ३४५ कोटी रुपये खर्च करण्यात आले असून, ८१,११४ स.घ.मी. पाणीसाठा पुनर्स्थापित झाला आहे. म्हणजेच जलसंधारण हे शेतीला केवळ पाणी देत नाही, तर जमिनीलाही नवजीवन देते.

 

भूजल पुनर्भरण-भविष्याच्या जलसुरक्षेची गुरुकिल्ली

भूजल पुनर्भरण हा जलसंधारणाचा अत्यंत महत्वाचा नैसर्गिक फायदा आहे. गेल्या काही दशकांत भूजलाचा मोठ्या प्रमाणावर उपसा झाल्यामुळे अनेक भागांत विहिरी कोरड्या पडणे, बोअरवेलची खोली वाढणे आणि उन्हाळ्यात पाण्याची उपलब्धता कमी होणे अशा समस्या निर्माण झाल्या आहेत. याचा शेतीसोबतच संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होतो.

पावसाचे पाणी योग्य पद्धतीने अडवून जमिनीत मुरविले, तर भूजल पातळी सुधारण्यास मदत होते. ही प्रक्रिया केवळ शेतीसाठी नव्हे, तर पिण्याच्या पाण्याच्या दीर्घकालीन उपलब्धतेसाठीही अत्यंत महत्त्वाची आहे. भविष्यातील गंभीर पाणीटंचाईचे संकट टाळायचे असेल, तर भूजल संवर्धन आणि पुनर्भरणाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे लागेल.

 

जलसंधारण म्हणजे पर्यावरणाचेही संवर्धन

जलसंधारणाचा पर्यावरणावरही अत्यंत सकारात्मक परिणाम होतो. एखाद्या भागात पाणी टिकून राहिले, तर तेथील जैवविविधतेला आधार मिळतो. वृक्षसंवर्धनाला चालना मिळते, जमिनीतील ओलावा टिकतो आणि नैसर्गिक परिसंस्था मजबूत होण्यास मदत होते. अनेक ठिकाणी जलसंधारणाच्या कामांनंतर स्थानिक जैवविविधता आणि जलचरांसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याची उदाहरणे दिसून येतात. त्यामुळे जलसंधारण ही केवळ विकासाची योजना नसून निसर्गाशी असलेले आपले नाते अधिक दृढ करण्याची प्रक्रिया आहे.

 

हवामान बदलाच्या आव्हानाला जलसंधारणाचे उत्तर

आज हवामान बदल हे जगासमोरील सर्वात गंभीर आव्हानांपैकी एक आहे. पावसाचे स्वरूप बदलत आहे. काही दिवसांत अतिवृष्टी आणि त्यानंतर दीर्घ काळ पावसाचा खंड असे चित्र अनेक भागांत दिसून येते. अशा परिस्थितीत केवळ मोठी धरणे किंवा पारंपरिक सिंचन व्यवस्था पुरेशी ठरणार नाही.

            गाव पातळीवर पाणी अडवणे, पाणलोट विकास करणे, नैसर्गिक जलमार्ग जिवंत ठेवणे, पावसाचे पाणी जमिनीत मुरवणे आणि स्थानिक जलस्रोत मजबूत करणे हा शाश्वत मार्ग आहे. हवामान बदल आणि पर्जन्यमानातील अनिश्चिततेचा विचार करून मृद व जलसंधारण विभागाने जलयुक्त शिवार अभियान २.०, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार आणि लघु सिंचन प्रकल्पांच्या कामांना गती दिली आहे. आवश्यक दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्यावरही भर दिला जात आहे.

 

गुणवत्तापूर्ण कामे आणि कालबद्ध अंमलबजावणी

या सर्व उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या नेतृत्वाची महत्वपूर्ण भूमिका आहे. विभागाच्या नव्या प्रशासकीय आकृतिबंधाला मंजुरी मिळाल्यानंतर प्रकल्पांच्या अंमलबजावणीला अधिक गती मिळाली आहे. मंजूर कामे मूळ आराखड्यानुसार आणि निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. गुणवत्तापूर्ण कामांसाठी स्वतंत्र मार्गदर्शक सूचना तयार करण्यात आल्या असून, मालगुजारी तलावांच्या पुनरुज्जीवनासारख्या महत्त्वाच्या उपक्रमांनाही प्राधान्य दिले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशांची प्रभावी अंमलबजावणी करून जलसंधारण अधिक परिणामकारक करण्यासाठी विभाग सातत्याने प्रयत्नशील आहे.

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून ५.२५ लाख हेक्टर क्षेत्रावर कामे

केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नांतून प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना-पाणलोट विकास घटक २.० अंतर्गत राज्यातील ३० जिल्ह्यांमध्ये १४० प्रकल्प राबविण्यात येत आहेत. या माध्यमातून सुमारे ५.२५ लाख हेक्टर क्षेत्रावर जलसंधारण, भूजल पुनर्भरण, नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन आणि शेतकऱ्यांच्या उपजीविकेला चालना देणारी विविध कामे सुरू आहेत. या योजनेचे एकूण प्रकल्पमूल्य १,२५१.११ कोटी रुपये असून, जुलै २०२६ अखेर सुमारे १,००३ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे.

मालगुजारी तलावांचे पुनरुज्जीवन, सिमेंट बंधारे, पाणलोट विकास, नाला खोलीकरण, भूजल पुनर्भरण आणि लोकसहभागातून राबविण्यात येणाऱ्या जलसंवर्धन उपक्रमांची प्रभावी सांगड घालत महाराष्ट्र जलसुरक्षिततेच्या दिशेने भक्कम वाटचाल करत आहे. नाला खोलीकरणाबरोबरच बांबू लागवडीसारख्या पर्यावरणपूरक उपक्रमांवरही भर देण्यात आला आहे. विदर्भातील मालगुजारी तलावांची कामे वेळेत पूर्ण करण्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. हा दृष्टिकोन केवळ पाणी साठविण्यापुरता मर्यादित नसून जलस्रोतांचे दीर्घकालीन संवर्धन सुनिश्चित करणारा आहे.

जलसंधारण दिनातून राज्यव्यापी लोकचळवळ

महाराष्ट्राच्या जलसंधारण क्षेत्राला दूरदृष्टी आणि व्यापक दिशा देणारे माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने राज्यात १५ ते २१ ऑगस्ट २०२६ दरम्यान ‘जलसंधारण सप्ताह’, तर १५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत ‘जलसंधारण अभियान’ राबविण्यात येत आहे.

            या अभियानाचा महत्वाचा भाग म्हणून आज २१ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यांत ‘महा वॉकेथॉन २०२६ — वॉक फॉर वॉटर’ आयोजित करण्यात आली आहे. “माती वाचवा , पाणी जपा , सुरक्षित भविष्य घडवा” हा या अभियानाचा मुख्य संदेश आहे. सर्व जिल्ह्यांत ३ कि.मी. ‘वॉक फॉर वॉटर’ आणि सामूहिक मृद व जलसंधारण शपथ आयोजित करण्यात आली आहे. नागरिक, युवक, विद्यार्थी, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था आणि विविध क्षेत्रांतील नागरिकांना या उपक्रमातून जलसंधारणाच्या लोकचळवळीशी जोडण्याचा प्रयत्न आहे.

युवकांच्या सर्जनशीलतेला व्यासपीठ देत त्यांना या लोकचळवळीशी डिजिटल माध्यमातून जोडण्यासाठी ‘रील चॅलेंज’ स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले. माती संवर्धन, पाणी बचत, पावसाच्या पाण्याचे संकलन, पाणलोट विकास आणि जलसंधारणाच्या नाविन्यपूर्ण कल्पना समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी युवकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे.

प्रत्येक थेंब जपूया, महाराष्ट्र जलसमृद्ध करूया

जलसंधारण ही केवळ शासनाची योजना नाही, तर शासन आणि समाजाच्या सामूहिक सहभागातून यशस्वी होणारी लोकचळवळ आहे. शासन योजना आखू शकते, निधी उपलब्ध करून देऊ शकते, जलसंधारणाची कामे उभी करू शकते; पण त्या जलस्रोतांचे संवर्धन आणि पाण्याचा जबाबदारीने वापर करण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग आवश्यक आहे.

शासनाचे दूरदृष्टीचे धोरण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रभावी नेतृत्व, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे सहकार्य, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या बळावर जलसमृद्ध, दुष्काळमुक्त आणि शाश्वत महाराष्ट्र घडविण्याचा आपला संकल्प अधिक दृढ होत आहे.

जलसंधारण दिन हा केवळ एका दिवसाचा उत्सव ठरू नये. तो प्रत्येक नागरिकाच्या दैनंदिन जीवनातील संकल्प बनला पाहिजे. घरातील पाणी असो, शेतातील पाणी असो किंवा गावातील जलस्रोत-प्रत्येक थेंब जपणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.

चला, जलसंधारण दिनानिमित्त आपण सर्वजण संकल्प करूया—

पाणी अडवूया… पाणी जिरवूया…

माती वाचवूया… पाणी जपूया…

आणि जलसमृद्ध, दुष्काळमुक्त महाराष्ट्र घडवूया!

0000

 

जलसंधारण दिनानिमित्त 21 ऑगस्टला ‘महा वॉकेथॉन- वॉक फॉर वॉटर’

 

 

कोल्हापूर, दि. 20 (जिमाका) : मृद व जलसंधारण विभागामार्फत जलसंधारण दिनानिमित्त 15 ते 21 ऑगस्टदरम्यान जलसंधारण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहांतर्गत मृद व जलसंधारणाबाबत युवा पिढीमध्ये जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच अभियानाचा एक भाग म्हणून 21 ऑगस्ट रोजी जिल्ह्यात सकाळी 6.30 वाजता ‘महा वॉकेथॉन- वॉक फॉर वॉटर’चे आयोजन करण्यात आले आहे. या वॉकेथॉनचे उद्घाटन व ‘Reel for Soil and Water Conservation’ Instagram Reel स्पर्धेतील विजेत्यांचा बक्षीस वितरण समारंभ शुक्रवार, 21 ऑगस्ट रोजी महा वॉकेथॉन स्पर्धा समाप्तीनंतर वारणा भवन, ताराबाई पार्क येथे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

 

कार्यक्रमास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, नगर विकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण व अल्पसंख्यांक राज्यमंत्री तथा सहपालकमंत्री माधुरीताई मिसाळ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, महापौर रुपाराणी निकम, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिल्पा खोत यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच खासदार सर्वश्री शाहू छत्रपती, धनंजय महाडीक, धैर्यशील माने, आमदार सर्वश्री सतेज पाटील, अरुण लाड, जयंत आसगांवकर, डॉ. विनय कोरे, राजेंद्र पाटील-यड्रावकर, चंद्रदीप नरके, अमल महाडीक, डॉ. अशोकराव माने, शिवाजी पाटील, राहुल आवाडे यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड आणि पोलीस अधीक्षक नीलोत्पल आदी उपस्थितत राहणार आहेत.

 

दरम्यान, 15 ते 30 वयोगटातील युवक-युवतींसाठी 15 ते 21 ऑगस्टदरम्यान राज्यव्यापी ‘Reel for Soil and Water Conservation’ Instagram Reel स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. युवकांनी या माध्यमातून मृद व जलसंधारणाचा संदेश समाजापर्यंत पोहोचवावा व जास्तीत जास्त नागरिकांनी या महावॉकेथॉनमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन मृद व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता स्वप्निल पवार यांनी केले.

0000

Wednesday, August 19, 2026

रील बनवा अन् २५ हजारांचे बक्षीस जिंका! मृद व जलसंवर्धनासाठी ‘रील फॉर सॉईल अँड वॉटर कन्झर्वेशन’ स्पर्धेत कोल्हापूरातील युवकांना सहभागी होण्याचे आवाहन

 




कोल्हापूर, दि. १९ (जिमाका) : माती आणि पाण्याच्या संवर्धनावर भन्नाट रील बनवा आणि जिल्हास्तरावर २५ हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक जिंका ! मृद व जलसंधारण विभागाच्यावतीने १५ ते २१ ऑगस्ट या जलसंधारण सप्ताहादरम्यान राज्यातील सर्व जिल्ह्यांत ‘रील फॉर सॉईल अँड वॉटर कन्झर्वेशन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील १५ ते ३० वयोगटातील युवक-युवतींच्या कल्पकतेच्या माध्यमातून Instagram च्या माध्यमातून मृद व जल संधारणाबाबत व्यापक जनजागृती करण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील युवकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

स्पर्धेसाठी सहभागी युवकांनी ३० ते ६० सेकंदांची Instagram Reel तयार करून ती स्वतःच्या Public Instagram Account वर पोस्ट करावी. रीलच्या सुरुवातीला रीलचा उद्देश, सहभागीचे संपूर्ण नाव आणि जिल्ह्याचे नाव नमूद करणे आवश्यक असून, मृद व जलसंधारण विभागाच्या अधिकृत Instagram Account ला Tag करणे तसेच #SaveSoilSaveWater हा अधिकृत हॅशटॅग वापरणे बंधनकारक आहे. माती संवर्धन, पाणी बचत, मातीची धूप रोखणे, पावसाचे पाणी संकलन, शेततळे, बंधारे, पाणलोट विकास, वृक्षारोपण, पर्यावरण संरक्षण, गावातील यशस्वी जलसंधारण कामे, पारंपरिक पद्धती आणि माती-पाणी वाचविण्याच्या नाविन्यपूर्ण कल्पना आदी विषयांवर रील तयार करता येणार आहे.

                ‘एक Reel… मातीसाठी! एक Reel… पाण्यासाठी! एक Reel… सुरक्षित भविष्यासाठी!’ हा या अभियानाचा मुख्य संदेश आहे.

रील्सचे परीक्षण विषय व संदेश – ३० गुण, कल्पकता – २५, प्रभावी सामाजिक संदेश – २०, सादरीकरण व तांत्रिक गुणवत्ता – १५ आणि Instagram Engagement – १०, अशा एकूण १०० गुणांवर करण्यात येणार आहे. केवळ Likes किंवा Followersच्या आधारे विजेता निश्चित न करता तज्ज्ञ परीक्षण आणि Social Media Engagement यांचा समतोल साधून विजेत्यांची निवड केली जाणार आहे.                                   जिल्हास्तरावर प्रथम क्रमांकासाठी २५ हजार रुपये व गौरवचिन्ह, द्वितीय क्रमांकासाठी १५ हजार रुपये व गौरवचिन्ह आणि तृतीय क्रमांकासाठी १० हजार रुपये व गौरवचिन्ह देण्यात येणार असून पात्र सहभागींना ई-प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

          विजेत्यांचा ‘युवा मृद-जलदूत’ म्हणून विशेष गौरव करण्यात येणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील युवकांनी आपल्या कल्पकतेला डिजिटल व्यासपीठ देत जास्तीत जास्त रील्स तयार करून या जनजागृती अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

0000


४ हजार पावले माती पाण्यासाठी! २१ ऑगस्टला महाराष्ट्रभर ‘महा वॉकेथॉन’

 



मुंबई, दि. १९ : “एक पाऊल तुमचे, एक थेंब भविष्यासाठी!” या संदेशासह महाराष्ट्र आता पाण्यासाठी चालणार आहे. २१ ऑगस्टला ३ किलोमीटर म्हणजेच सुमारे ४ हजार पावले जलसंधारणाच्या जनजागृतीसाठी टाकली जाणार असून, महा वॉकेथॉन २०२६ – वॉक फॉर वॉटर’च्या माध्यमातून राज्यभर जलसंधारणाची लोकचळवळ उभी करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. मुंबईसह राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी आयोजित होणाऱ्या या उपक्रमात नागरिक, विद्यार्थी, युवक, महिला, लोकप्रतिनिधी, अधिकारी-कर्मचारी आणि विविध सामाजिक संघटना मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. ही केवळ तीन किलोमीटरची चाल नसून, महाराष्ट्राच्या जलसुरक्षित भविष्यासाठी उचललेली चार हजार पावले ठरणार आहेत.

मुंबईतील या मुख्य कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील मान्यवर, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, कलाकार, खेळाडू, सामाजिक संस्था आणि नागरिक सहभागी होणार आहेत. राज्यभरातही जिल्हानिहाय वॉकेथॉनचे आयोजन करण्यात येणार आहे.

या महा वॉकेथॉनमध्ये सहभागी नागरिकांना ३ किलोमीटरचे अंतर चालायचे आहे. साधारणपणे ३ किलोमीटर अंतर म्हणजे जवळपास ४ हजार पावलांचा प्रवास होतो. त्यामुळे ‘४ हजार पावले पाण्यासाठी’ हा संदेश या अभियानाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.

पावसाच्या प्रत्येक थेंबाचे संधारण, पाणी अडविणे, पाणी जमिनीत जिरविणे, भूजल पातळी वाढविणे, मातीची धूप रोखणे आणि उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन याबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.

*महाराष्ट्रभर एकाच दिवशी जलसंधारणाचा जागर*

मुंबईपुरता मर्यादित न राहता राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये २१ ऑगस्ट रोजी महा वॉकेथॉन आयोजित केली जाणार आहे. जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हास्तरावर या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.

लोकप्रतिनिधी, अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी, युवक-युवती, महिला, शेतकरी, खेळाडू, कलाकार, स्वयंसेवी संस्था, एनसीसी, एनएसएस, नेहरू युवा केंद्र, माय भारत, भारत स्काऊट्स अँड गाईड्स, रेड क्रॉस, होमगार्ड तसेच विविध सामाजिक आणि क्रीडा संघटनांचा सहभाग या उपक्रमात राहणार आहे.
राज्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन जलसंधारणाचा संदेश घराघरात पोहोचवावा, यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करण्यात येत आहे.

*QR कोडद्वारे ऑनलाइन नोंदणी*

महा वॉकेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी ऑनलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांनी आयोजकांकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या QR कोडद्वारे नोंदणी करावी.

नोंदणी केल्यानंतर २१ ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष वॉकेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या नागरिकांना या उपक्रमाचा भाग होता येणार आहे. सहभागी नागरिकांना ई-प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

*विजेत्यांसाठी रोख बक्षिसे*

नागरिकांचा उत्साह वाढविण्यासाठी जिल्हास्तरावर विविध बक्षिसांची व्यवस्था करण्यात आली आहे.

• प्रथम क्रमांक : ₹२५,०००
• द्वितीय क्रमांक : ₹१५,०००
• तृतीय क्रमांक : ₹१०,०००
• विशेष बक्षिसे : ७ जणांना प्रत्येकी ₹३,०००

अशा प्रकारे प्रत्येक जिल्ह्यात ₹७१,००० पर्यंतची रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत. तसेच प्रथम दहा विजेत्यांना गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

*सहभागी प्रत्येकाचा होणार सन्मान*

या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ विजेत्यांचाच नव्हे, तर जलसंधारणासाठी सहभागी होणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा सहभाग महत्त्वाचा मानला जाणार आहे. वॉकेथॉनमध्ये सहभागी नागरिकांना ई-प्रमाणपत्र देऊन त्यांच्या सहभागाची नोंद केली जाणार आहे.

त्यामुळे ही स्पर्धा केवळ बक्षिसांसाठीची वॉकेथॉन न राहता, जलसंधारणाच्या व्यापक जनजागृतीसाठी नागरिकांना जोडणारे व्यासपीठ ठरणार आहे.

*जलसंधारण सप्ताहातून लोकचळवळीला सुरुवात*

महा वॉकेथॉन हा व्यापक जलसंधारण अभियानाचा महत्त्वाचा भाग आहे. राज्यात १५ ते २१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत जलसंधारण सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. याशिवाय १५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत व्यापक जलसंधारण अभियान राबविण्यात येणार आहे.

या कालावधीत पाणी अडविणे, पाणी जिरविणे, जलस्रोतांचे पुनरुज्जीवन, भूजल पुनर्भरण, मृदसंधारण आणि पाण्याचा काटकसरीने वापर याबाबत जनजागृती केली जाणार आहे.

*पाण्यासाठी चालूया, भविष्यासाठी थांबूया!*

बदलते हवामान, अनियमित पाऊस, वाढती लोकसंख्या आणि भूजलाचा वाढता वापर या पार्श्वभूमीवर जलसंधारणाचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब जपण्यासाठी शासनासोबत समाजाचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे.

याच भावनेतून २१ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता मुंबईतील बिंदू माधव प्रवेश द्वार, वरळी सी फेस, प्रोमेनेड, वरळी समुद्र किनारा येथे होणाऱ्या राज्यस्तरीय महा वॉकेथॉनमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

तीन किलोमीटरची ही वाटचाल महाराष्ट्राच्या जलसुरक्षित भविष्याकडे नेणारी ठरो, चार हजार पावले पाण्यासाठी पडू देत आणि जलसंधारणाची लोकचळवळ अधिक बळकट होऊ दे!

*कार्यक्रमाची थोडक्यात माहिती*

कार्यक्रम : महा वॉकेथॉन २०२६ – Walk for Water
दिनांक : २१ ऑगस्ट २०२६
वेळ : सकाळी ६ वाजता
स्थळ : बिंदू माधव प्रवेश द्वार, वरळी सी फेस
मार्ग : प्रोमेनेड, वरळी समुद्र किनारा
अंतर : ३ किलोमीटर
संकल्प : ४ हजार पावले पाण्यासाठी
नोंदणी : QR कोडद्वारे ऑनलाइन
सहभागींसाठी : ई-प्रमाणपत्र
प्रथम क्रमांक : ₹२५,०००
द्वितीय क्रमांक : ₹१५,०००
तृतीय क्रमांक : ₹१०,०००
विशेष बक्षिसे : ७ जणांना प्रत्येकी ₹३,०००
००००

Tuesday, August 18, 2026

कोल्हापूर जिल्ह्यातील हरित जल क्रांती

 






 

मृदूसंधारण जलसंधारण हा शाश्वत विकासाचा पाया आहे.राज्यातील अनेक भागात खालावलेली भूजल पातळी लक्षात घेता पाणलोट विकास आणि भूजल पुनर्भरणावर भर देण्यासाठी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी 'पाणी आडवा - पाणी जिरवा' हा मूलमंत्र देऊन राज्यात एकेकाळी जलसंधारणाची मोठी चळवळ उभारली.त्यांच्या या अतुलनीय योगदानाचे राज्यातील जनतेला कायमस्वरूपी स्मरण रहावे यासाठी राज्य शासनाने 3 जुलै 2026 रोजी शासन निर्णय निर्गमित करून माजी मुख्यमंत्री श्री नाईक यांचा जन्मदिवस म्हणजेच 21 ऑगस्ट हा दिवस " जलसंधारण दिन " म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला.

 

      बदलते हवामान,बदलत्या पावसाच्या स्वरूप आणि वाढती पाण्याची गरज याचा ताळमेळ घालत जलसंधारणाला केवळ पाण्याच्या व्यवस्थापनापुरते मर्यादित न ठेवता ग्रामीण विकासाचा महत्त्वाचा आधार मानले जाऊ लागले. उपलब्ध पावसाचे पाणी अडविणे ते जमिनीत मुरवणे त्याचबरोबर उपलब्ध जलसाठ्यांची क्षमता वाढविणे आणि शेतीसाठी कायमस्वरूपी पाण्याची उपलब्धता निर्माण करणे ही काळाची गरज बनली आहे.

 

          कोल्हापूर जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र सात लाख 68 हजार 500 हेक्टर इतके असून त्यापैकी पाच लाख 22 हजार 160 हेक्टर क्षेत्र लागवडी लायक आहे .जिल्ह्याचा संपूर्ण भाग कृष्णा खोऱ्यामध्ये समाविष्ट असून यामध्ये वारणा, कृष्णा, कडवी, जांभळी, पंचगंगा, कासारी, कुंभी, धामणी, तुळशी, भोगावती, दूधगंगा, वेदगंगा, चिकोत्रा, हिरण्यकेशी, घटप्रभा आणि ताम्रपर्णी या पूर्व वाहिनी व तिलारी पश्चिम वाहिनी अशा एकूण 17 नद्या आणि इतर उपनद्या वाहतात. या जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान सुमारे 1800 ते 1900 मिमी आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा विचार करता या जिल्ह्याची सुमारे दोन लाख 71 हजार 428 हेक्टरी इतकी प्रकल्पीय सिंचन क्षमता आहे. जिल्ह्यात दोन लाख 32 हजार 362 हेक्टर इतकी सिंचन क्षमता निर्माण झालेली असून प्रत्यक्ष सिंचन क्षमता ही दोन लाख 12 हजार 750 हेक्टर इतकी आहे.

 

                  मृद व जलसंधारण विभाग कोल्हापूर यांच्यामार्फत द्वारयुक्त बंधारा, कोल्हापूर पद्धतीचा बंधारा ,पाझर तलाव , साठवण तलाव , लघु पाटबंधारे तलाव या प्रकारची 0 ते 600 हेक्टर सिंचन क्षमतेची कामे करण्यात आली आहेत.गत वर्षात जलयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गत द्वारयुक्त बंधारे पूर्ण करून 111.54 सगळी इतका पाणीसाठा करून अंदाजे 23.42 हेक्टर क्षेत्रास याचा लाभ झाला आहे.त्याचबरोबर महामंडळ अंतर्गत चार कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे पूर्ण करण्यात आल्यामुळे 380.50 सघमी इतका पाणीसाठा पूर्ण करून 85 हेक्टर क्षेत्रास अप्रत्यक्ष सिंचनाचा लाभ झाला आहे.जिल्हा नियोजन समिती अंतर्गत तीन कोल्हापूर पद्धतीचे बंधारे व तीन द्वारयुक्त बंधारे पूर्ण करून 225.19 सघमी इतक्या पाणीसाठ्याद्वारे 41.13 हेक्टर इतक्या क्षेत्रास सिंचनाचा लाभ झाला आहे.गाळमुक्त धरण - गाळयुक्त शिवार अंतर्गत सहा जलाशयातील अंदाजे 88.66 इतका गाळ काढण्यात येऊन 88 हजार 660 सघमी इतका पाणीसाठा पूनर्स्थापित करण्यात आला आहे. नाला खोलीकरण व रुंदीकरण अंतर्गत जिल्ह्यात 19 नाल्यांमधील गाळ काढण्यात येऊन या नाल्याची पाणी वाहून नेण्याची साठवण क्षमता पूनर्स्थापित करण्यात आलेली आहे.जिल्ह्यातील विविध गावांमध्ये पाणलोट क्षेत्रामध्ये मृद व जलसंधारणाची कामे केल्यामुळे स्थानिक विहिरी कुपनलिका यांना बारमाही पाण्याचा स्तोत्र उपलब्ध झाला आहे .

 

कोल्हापूर जिल्हातील पन्हाळा, गगनबावडा, शाहूवाडी करवीर आणि राधानगरी हे तालुके नैसर्गिक साधनसामुग्रीने संपन्न आहेत.तसेच या तालुक्यात मुसळधार पाऊस होतो परंतु या ठिकाणी पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा मोठा भाग वाहून जात असल्याकारणाने नागरिकांना उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवते तसेच शेती विषयक त्याचबरोबर पर्यावरणासमोरही अनेक समस्या उभ्या राहत असल्याचे दिसून येते.मात्र जिल्ह्यात उभारण्यात आलेली अनेक धरणे , कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, लघु-मध्यम सिंचन प्रकल्प आणि जलसंधारण विभागाच्यावतीने राबविण्यात येणारी पाणी आडवा - पाणी जिरवा यासारखी योजना. त्यामुळे जल साठ्यात तसेच भूजल पातळी वाढण्याच्या प्रक्रियेत आमूलाग्र बदल झाला आहे.ही भूजल पातळी वाढल्यामुळे बळीराजाला चांगले दिवस आले आहेत.पर्यायाने ग्रामीण अर्थव्यवस्थेला उभारी मिळाल्याचे दिसून येते.

 

पन्हाळा तालुक्यात तुळशी प्रकल्प कार्यरत असून त्याची सिंचन क्षमता सुमारे 5 हजार 500 हेक्टर क्षेत्रावर पसरलेली आहे.त्याचबरोबर या तालुक्यात 25 हून अधिक कोल्हापूर पद्धतीचे बंधारे - तलाव  बांधल्यामुळे जवळपास अडीच हजार हेक्टर्स शेती ओलीताखाली येण्यास मदत झाली आहे.

 

कोल्हापूर जिल्ह्याची वरदायिनी म्हणून पंचगंगा नदीचा उल्लेख आपणाला करावा लागेल.करवीर तालुक्यात पंचगंगा नदीबरोबरच कुंभी,कासारी आणि भोगावती या प्रमुख नद्या कार्यरत आहेत . त्यामुळे करवीर तालुका हा सिंचनाच्या बाबतीत अत्यंत समृद्ध ठरला असून या तालुक्यात सुमारे 25 हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र हे सिंचनाखाली येण्यासाठी मदत झाली आहे.

 

छत्रपती शाहू महाराजांच्या दूरदृष्टीचा उत्तम नमुना म्हणजे राधानगरी धरण होय. या स्वयंचलित धरणात साधारणता 8.36 टीएमसी इतका पाणीसाठा जमा होतो. या धरणामुळे राधानगरी व कोल्हापूरवासियांचा शेती विषयक व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत झाली .

 

शाहूवाडी तालुक्यात सिंचनासाठी अनेक मध्यम व लघु प्रकल्प उभारण्यात आले आहेत .कासारी नदीवरील गेळवडे येथील कासारी धरण तसेच कुंभी आणि कडवी नदीच्या खोऱ्यातील लघु सिंचन प्रकल्पामुळे शाहूवाडी व पन्हाळा या तालुक्यातील सुमारे 6 ते 7 हजार हेक्टर इतके क्षेत्र सिंचनाखाली येण्यास मदत झाली आहे.

 

कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस होणारे ठिकाण म्हणजे गगनबावडा तालुका होय.वास्तविक या तालुक्यात डोंगराळ भूप्रदेशामुळे पावसाचे प्रमाण सर्वाधिक आहे. या ठिकाणी बंधारे, नालेबांधणी, शेततळे त्याचबरोबर जलसाठे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पाणी आडवा पाणी जिरवा या संकल्पनेवर आधारित केलेल्या विविध उपाययोजनांमुळे या ठिकाणी पावसाच्या पाण्याचे प्रभावी व्यवस्थापन झाले आहे.या तालुक्यात धामणी प्रकल्प कार्यरत असून त्याची सिंचन क्षमता सुमारे 4 हजार 800 हेक्टरहून अधिक आहे त्याचबरोबर गगनबावडा तालुक्यात 12 हून अधिक लघु सिंचन तलाव आहेत.त्यामुळे या ठिकाणी भूजल पातळी स्थिर राहण्यास मदत होते.

 

जलसंधारणाची ही वाटचाल म्हणजे केवळ बंधारे, नाला खोलीकरण किंवा गाळ काढण्याची कामे नव्हेत तर पावसाच्या पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे योग्य नियोजन करून भविष्यातील जल सुरक्षेचा पाया मजबूत करण्याचा प्रयत्न आहे . जलसंधारण दिनाच्या निमित्ताने या कामांकडे केवळ आकडेवारीचा भाग म्हणून न पाहता भविष्यातील पाणी सुरक्षिततेचा सुरू असलेल्या व्यापक प्रयत्नांचा एक भाग म्हणून पाहणे गरजेचे आहे. इतकच ....!

 

(माहिती स्तोत्र :- मृद व जलसंधारण आणि पाटबंधारे विभाग)

                                  फारुख रमजान बागवान

                                  माहिती अधिकारी,                                          

                              जिल्हा माहिती कार्यालय,                               

                                      कोल्हापूर

                                 9881400405

00000