** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Thursday, January 26, 2017

देशाच्या प्रगतीसाठी जातीभेद विसरुन एकजुट व्हा - पालकमंत्री चंद्रकांत पाटील






            कोल्हापूर, दि. 26 : विविधता में एकता यहीं भारत की विशेषता असे आपण म्हणतो. पण व्यवहारात अडनावावरुन जात  शोधतो ही विसंगती दूर करुन जाती, धर्म, पंथ विसरुन देशाच्या प्रगतीसाठी  एकजुट व्हा. विविधतेमध्ये सुध्दा आपण एक आहोत ही जाणीव बळकट करा, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
                प्रजासत्ताक दिनाच्या 67 व्या वर्धापन दिन समारंभात महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. छत्रपती शाहू स्टेडियम येथे झालेल्या या ध्वजारोहण समारंभात पालकमंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते. यावेळी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विमल पाटील, महापौर हसिना फरास, विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, जिल्हा पोलीस अधीक्षक महादेव तांबडे, महापालिका आयुक्त पी.शिवशंकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, अतिरिक्त जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सदाशिव साळुंखे,  निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू तेजेस्वीनी सावंत, लंडन विद्यापीठाचे प्राध्यापक ॲड्रेन मेहर, विभागीय कृषि सहसंचालक नारायण शिसोदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
                भारतीय राज्य घटनेत प्रत्येक घटकाचा अत्यंत सुक्ष्म विचार केलेला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या या संविधानात अत्यंत सुत्रबध्दता असल्याने कुठलाही गोंधळ नसतो, कुठलीही संदिग्धता नसते असे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घटनेने दिलेले अधिकार आणि कर्तव्य याची जाणीव प्रत्येकाने ठेवावी. अधिकार उपभोगत असतानाच कर्तव्यात कसूर करु नये, असेही सांगितले.  भारतीय राज्य घटनेने प्रत्येकाला मतदानाचा अधिकार दिलेला आहे हा अधिकार लोकशाहीचा गाभा आहे. कुठलीही निवडणूक असो आपल्या या अमुल्य मताचा अधिकार बजावा, असे आवाहनही त्यांनी केले.
                या कार्यक्रमामध्ये पोलीस अधीक्षक एम.बी.तांबडे व हातकणंगले पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार शिवाप्पा मोर्ती यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रपती पोलीस पथक जाहिर झाल्याबद्दल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते  गौरविण्यात आले.
                ध्वजवंदनाच्या मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पोलीस मुख्यालय, सशस्त्र पोलीस पथक, सशस्त्र पोलीस पथक महिला, गृहरक्षक दल, अग्निशमन दल, प्रादेशिक परिवहन पथक, वनरक्षक, एन. सी. सी., आर. एस. पी. विद्यार्थी, नेव्ही एन.सी.सी., तारा कमांडो फोर्स, आर.एस.पी. पथक, वायू एन. सी. सी. पथक, कमांडिंग फोर्स, भारत गर्ल्स गाईड पथक,  व्हाईट आर्मी, निरीक्षण गृह पथक, पोलीस बँड, श्वान पथक, कॉलेज ऑफ फायर इंजिनिअरींग, सह्याद्री कॅडेट फोर्स, दंगल नियंत्रण तसेच शहर व जिल्ह्यातील विविध शालेय विद्यार्थी-विद्यार्थींनीच्या विविध पथकांकडून मानवंदना स्वीकारली.
                यावेळी विविध विभागांनी आकर्षक व लक्षवेधी चित्ररथ सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. यामध्ये निर्भया पथकाचा चित्ररथ यावर्षीचे आर्कषण ठरला.  यामध्ये मोबाईल फॉरेन्सीक इन्वीस्टीगेशन विभागाचे वाहन, महात्मा गांधी तंटामुक्ती योजनेचा चित्ररथ, दंगल नियंत्रण पथक वाहन, कॅशलेस इंडियाचा बँक ऑफ इंडियाचा चित्ररथ, आरोग्य, आपत्ती व धोके व्यवस्थापन, सामाजिक वनीकरण व वन विभाग, स्वच्छ भारत अभियान, बेटी बचाओ बेटी पढाओ, एडस् नियंत्रण, केंद्रांच्या विविध योजना, शिक्षण विभागाचा ज्ञानरथ, 108 रुग्णवाहिका, व्हाईट आर्मी, विविध शाळांच्या लक्षवेधी चित्ररथांचा समावेश होता.
                याप्रसंगी सिध्दीगिरी गुरुकुल कणेरीमठाने लाठी काठी प्रात्यशिके दाखविली तर महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळातील मुलांनी माझे कोल्हापूर हे सादर केलेले समुह नृत्य विशेष लक्षवेधी ठरले. पालकमंत्री पाटील यांनी स्वत: जावून या चिमुकल्यांचे कौतुक केले. उषाराजे हायस्कुलच्या विद्यार्थींनी शेतकरी नृत्य सादर केले तर सुमारे अडीच हजार विद्यार्थी, विद्यार्थींनीनी सारे जहांसे अच्छा आणि आनंद कंद ऐसा हा हिंद देश माझा ही समुह गीते सादर केली.   
               


0 0 0 0 0 0

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.