** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, January 13, 2023

दोन चाकी वाहनांची नवी नोंदणी मालिका 16 जानेवारीपासून सुरु

 



      कोल्हापूर, दि. 13
  (जिमाका) : खासगी दोनचाकी वाहनांची जुनी नोंदणी मालिका MH09-GE दि. 21 जानेवारी 2023 पर्यंत संपणे अपेक्षित आहे. त्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत नवीन दोन चाकी नोंदणी मालिका MH09-GG  दि. 16 जानेवारी 2023 रोजी सुरु करण्यात येत आहे. पसंती क्रमांकाचे अर्ज दि. 16 व 17 जानेवारी 2023 रोजी सकाळी 9.45 ते 2 या वेळेत खिडकी क्र. 9 येथे स्वीकारण्यात येतील, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी दिली.

            लिलाव पध्दतीव्दारे वाहन नोंदणी क्रमांकाची मागणी करतेवेळी खालील सूचनांचे पालन करावयाचे आहे.

 पसंतीचा नोंदणी क्रमांक घेण्यासाठी अर्जासोबत त्या क्रमांकासाठी असलेल्या मूळ रकमेचा डी.डी. (धनाकर्ष) जोडणे आवश्यक आहे. धनादेश किंवा पे ऑर्डर अर्जासोबत देऊ नये. धनाकर्ष काढताना SBI TRE. BRANCH KOLHAPUR GRAS या नावानेच काढलेला असावा. इतर कोणत्याही नावे काढलेला धनाकर्ष स्वीकारला जाणार नाही. पसंतीच्या क्रमांकाच्या मूळ रकमेचा एकच धनाकर्ष दि. 16 व 17 जानेवारी 2023 रोजी सकाळी 9.45 ते 2 या वेळेत आणून द्यावा. धनाकर्ष शक्यतो राष्ट्रीयकृत बँकेचाच असावा. STATE BANK OF INDIA (SBI) बसंत बहार रोड येथील शाखेचा धनाकर्ष काढू नये. धनाकर्षाच्या मागे अर्जदाराचे नाव, मोटार वाहनाचा प्रकार, मोबाईल क्रमांक व मागणी केलेली मालिका, पसंती क्रमांक लिहीणे आवश्यक आहे.

             एखाद्या नोंदणी क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्या क्रमांकाचा लिलाव करण्यात येईल. त्यासाठी अर्जदारांकडून दि. 18 जानेवारी रोजी जादा रकमेचा स्वतंत्र धनाकर्ष बंद लिफाप्यात सकाळी 9.45 ते 2 या कालावधीत जमा करणे बंधनकारक राहील. एका पेक्षा जास्त अर्ज असलेल्या नोंदणी क्रमांकाचा लिलाव दि. 18 जानेवारी रोजी दुपारी 4 वा. कार्यालयाच्या सभागृहात घेण्यात येईल. याची सर्वांनी नोंद घ्यावी. अर्जदार व प्राधिकृत प्रतिनिधी यांनाच लिलावास उपस्थित रहाण्याची परवानगी देण्यात येईल. अर्जदाराने ओळखपत्र आणणे आवश्यक आहे. तसेच प्राधिकृत प्रतिनिधी उपस्थित राहणार असेल तर त्याच्याकडे  प्राधिकार पत्रासह ओळखपत्र असणे अनिवार्य आहे याची नोंद घ्यावी. तसेच बंद लिफाफ्यात काढलेला धनाकर्ष हा एकापेक्षा जास्त नसावा अन्यथा तो अर्ज निकाली काढण्यात येईल. आकर्षक क्रमांकाचा फॉर्म भरताना आधार कार्डला लिंक असलेलाच मोबाईल क्रमांक लिहणे बंधनकारक आहे. नंतर मोबाईल क्रमांक बदलता येत नाही. दि. 19 जानेवारी पासून सिंगल क्रमांकाच्या पावत्या व दि. 21 जानेवारी पासून एका पेक्षा जास्त क्रमांकाच्या पावत्या खिडकी क्रमांक 9 ला वाटप केल्या जातील, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. पाटील यांनी कळविले आहे.

000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.