** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Wednesday, September 30, 2026

सेवा संकल्प अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन

 

 

कोल्हापूर, दि. 30 (जिमाका) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत राज्यभर राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत ‘सेवा माझे योगदान’या उपक्रमातून करिअर मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात येत आहे.

 

या उपक्रमांतर्गत 29 सप्टेंबर रोजी छत्रपती शाहू शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कळंबा येथे जिल्हा रोजगार समन्वय समितीचे समन्वयक संजय पेंडसे यांनी जिल्ह्यातील उद्योगांमधील रोजगाराच्या संधींबाबत मार्गदर्शन केले. या सत्रास 67 विद्यार्थी उपस्थित होते.

 

30 सप्टेंबर रोजी न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कोल्हापूर येथे आयोजित करिअर मार्गदर्शन सत्रात एनसीएस पोर्टल, मुलाखतीची तयारी, बायोडाटा तयार करणे, सॉफ्ट स्किल्स आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. या सत्रास सुमारे 139 विद्यार्थी उपस्थित होते. यंग प्रोफेशनल अझरुद्दीन शेख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी इलेक्ट्रिकल विभागप्रमुख श्री. राजगिरे व जिल्हा कौशल्य विकास सहाय्यक पराग जोशी उपस्थित होते.

 

तसेच, शिवाजी तांत्रिक विद्यालय, कोल्हापूर येथे आयोजित सत्रात ‘महास्वयंम’पोर्टल, एनसीएस पोर्टल, करिअर म्हणजे काय?, दहावी-बारावीनंतरच्या करिअरच्या संधी आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. या सत्रास सुमारे 38 विद्यार्थी उपस्थित होते.

 

17 ऑक्टोबरपर्यंत करिअर मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात येणार असून, या उपक्रमाचा जास्तीत जास्त उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त जमीर करीम यांनी केले.

0000


 

Tuesday, September 29, 2026

कोल्हापूरच्या ब्रँडिंगसाठी कोल्हापूर महोत्सवासारखे उपक्रम राबवा - राज्यपाल जिष्णु देव वर्मा



 

कोल्हापूर दि. 29 : कोल्हापूर जिल्हा अप्रतिम निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे, विपुल निसर्ग संपदा लाभलेली आहे, जिल्ह्याला धार्मिक तीर्थस्थळे, क्रीडा, व्यापार, उद्योग यांची गौरवी परंपरा आहे. कोल्हापूरचे समग्र, एकात्मिक ब्रॅण्डिंग करण्यासाठी कोल्हापूर महोत्सवासारखे उपक्रम राबवावेत, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.

 

राज्यपाल जिष्णु देव वर्मा हे कोल्हापूर दौऱ्यावर असताना त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील प्रमुख विकास प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, राज्यपालांचे परिवार प्रबंधक डॉ. निशिकांत देशपांडे,  जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड डॉ.कुलगुरू राजनिश कामत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जासमिन, राज्यपालांचे परिसहायक नवदीप अगरवाल, इचलकरंजी महानगरपालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

 

राज्यपाल जिष्णु देव वर्मा म्हणाले, कोल्हापूरला फार मोठी गौरवी परंपरा लाभलेली आहे. येथील कुस्ती, कबड्डी, सारखे खेळ प्रसिद्ध आहेत. येथील वने समृद्ध आहेत. निसर्ग सौंदर्याने हा जिल्हा नटलेला आहे. इचलकरंजीचा कापड उद्योग, हुपरीचा चांदी उद्योग सातासमुद्रापार पोहोचलेला आहे. या ठिकाणी श्री अंबाबाई, श्री जोतिबा यासारखी तीर्थस्थळे आहेत. कोल्हापुरी गुळ, कोल्हापुरी चप्पल यासह अनेक कृषी उत्पादने, हस्तकलांचा मोठा लौकिक आहे. या सर्व पार्श्वभूमीवर कोल्हापूरला जागतिक नकाशावर प्रमोट करण्यासाठी त्याचे ब्रॅण्डिंग आवश्यक आहे त्या दृष्टीने कोल्हापूर महोत्सवासारखे महोत्सव अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतील. त्यासाठी विमानतळाची कनेक्टिव्हिटी अधिक वाढली पाहिजे.

 

सुदृढ समाज आणि निकोप समाजमन घडविण्यासाठी नशा मुक्त भारत आणि टीबी मुक्त भारत ही अभियाने प्रशासनाने अत्यंत व्यापकपणे राबवावीत, असे सांगून राज्यपाल वर्मा म्हणाले, व्यसनमुक्ती केवळ कायदे, पोलीस प्रशासन अथवा शासकीय उपाययोजनांपुरती मर्यादित नसून, निरोगी आणि व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा, कुटुंबाचा आणि समाजाचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. नशा मुक्त पिढी घडविणे हे आज फार मोठे आव्हान आहे. नशा मुक्ती ला समाजातूनच नकार निर्माण झाला पाहिजे, समाजातील खेळाडू, कलाकार, प्रभावी व्यक्तिमत्वे यांनीही या कार्यात पुढे येऊन जनजागृती व प्रबोधनासाठी योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

 

यावेळी जिल्ह्यात राबविण्यात येत असणाऱ्या महत्त्वाच्या प्रकल्पांचे सादरीकरण जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले. महापालिकेतर्फे डॉ.राजेंद्र भारूड यांनी केले. तर जिल्हा परिषदेतर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.जासमिन यांनी केले. यामध्ये महामार्ग विकास, राज्यस्तरीय रस्ते विकास, विमानतळ विस्तार, सांस्कृतिक वारसा आणि तीर्थक्षेत्र विकास, श्री महालक्ष्मी अंबाबाई विकास आराखडा, श्री क्षेत्र जोतिबा विकास आराखडा, शिक्षण, संशोधन आणि प्रशासन यामधील विविध उपक्रम, वैद्यकीय पायाभूत सुविधा, पुर नियंत्रण आणि प्रदूषण मुक्तीसाठीचे प्रकल्प, प्रस्तावित कोल्हापूर आयटी पार्क, पवणार ते पत्रादेवी महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग, विभागीय क्रीडा संकुल आधुनिकीकरण आणि विस्तार, आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, रिंग रोड व चार पदरी उन्नत मार्गीका, वैभववाडी- कोल्हापूर रेल्वे मार्ग प्रकल्प आदी विषयांबाबतचे सादरीकरण जिल्हाधिकारी यांनी केले.

 

संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह, राजर्षी शाहू खासबाग मैदान, राजर्षी शाहू महाराज समाधी स्थळ, मेकॅनिकल कार पार्किंग, रंकाळा म्युझिकल फाउंटन, ॲस्ट्रो टर्फ हॉकी स्टेडियम, श्री अंबाबाई मंदिर पार्किंग आणि भक्तनिवास यासह शहराच्या विविध सौंदर्यकरणाचे उपक्रम, कोल्हापूर इलेव्हेटर कॉरिडॉर, घनकचरा व्यवस्थापन आणि प्रक्रिया प्रकल्प, जीआयएसबेस्ड मालमत्ता सर्वे आदी विषयांबाबतचे सादरीकरण महापालिका आयुक्त यांनी केले. प्राथमिक शिक्षण क्षेत्रातील जिल्हा परिषदेचे विविध उपक्रम, पिजीआय ग्रेडिंग, समृद्ध शाळा पिंक रूम उपक्रम याबद्दल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सादरीकरण केले.

 

यावेळी राज्यपाल वर्मा यांनी पिंक रूम उपक्रमाचे कौतुक करून याची गरज व महत्त्व अधोरेखित केले. तसेच आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यात उभी करण्यात आलेली ट्रान्सजेंडर यांची रेस्क्यू टीम या संकल्पनेचेही राज्यपाल महोदयांनी कौतुक केले.

0000

 

 


राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी घेतले श्री अंबाबाईचे दर्शन

 





कोल्हापूर, दि. 29 (जिमाका) : राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी श्री अंबाबाई महालक्ष्मीचे दर्शन घेऊन वेदोक्त संकल्प पूजा केली. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्यावतीने समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी श्री अंबाबाईची प्रतिमा देऊन त्यांचे स्वागत केले. यानंतर राज्यपाल श्री वर्मा यांनी मातुर्लिंग श्री महादेव व श्री गणेशाचे दर्शन घेऊन प्रार्थना केली.

 

यानंतर पुरातत्व विभागाच्या वतीने अंबाबाई मंदिर परिसरात सुरु असलेल्या जतन आणि संवर्धन कामाची पाहणी त्यांनी केली. याकामाच्या सद्यस्थितीबाबत जिल्हाधिकारी डॉ. राठोड व धर्मशास्त्र मार्गदर्शक गणेश नेर्लेकर यांनी माहिती दिली.

 

यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, परिवार प्रबंधक डॉ. निशिकांत देशपांडे, राज्यपालांचे परिसहायक नवदीप अगरवाल, करवीर उपविभागीय अधिकारी मोसमी चौगुले, तहसीलदार स्वप्नील पवार, देवस्थान समितीच्या सचिव वर्षा साळुंखे, व्यवस्थापक महादेव दिंडे, तसेच देवस्थानचे पुरोहित प्रमोद उपाध्ये, बाळासाहेब दादरणे आदी उपस्थित होते.

***


कोल्हापूर विमानतळावर राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे स्वागत

 




कोल्हापूर, दि. 29 (जिमाका) : राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे आज सकाळी 10 वा. कोल्हापूर विमानतळावर आगमन झाले.

 

यावेळी त्यांचे प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी स्वागत केले. यावेळी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. राजनिश कामत, कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड, जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, शिवाजी विद्यापीठाचे प्र. कुलगुरु डॉ. ज्योती जाधव, वारणा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के, करवीर उपविभागीय अधिकारी मौसमी चौगुले उपस्थित होते. विमानतळावर आगमन होताच राज्यपालांना पोलीस दलाच्या वतीने 'गार्ड ऑफ ऑनर' (सलामी) देऊन मानवंदना देण्यात आली.

00000

 


Monday, September 28, 2026

हातकणंगले येथे सेवा संकल्प अभियानाचा उत्साहात प्रारंभ

 


 

कोल्हापूर, दि. 28 (जिमाका) : ‘सेवा परमो धर्म:’ या भावनेतून सेवा संकल्प अभियानाचा मुलींचे शासकीय वसतिगृह, हातकणंगले येथे आज उत्साहात प्रारंभ झाला. यानिमित्त विविध सेवाभावी व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. वसतिगृहातील मुलींनी प्रवेशद्वारावर आकर्षक रांगोळी साकारून परिसराची सजावट केली.

मुलींमध्ये सेवा, समर्पण आणि सामाजिक बांधिलकीची भावना रुजविण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बालपणातील जीवनमूल्ये व सेवाभावावर आधारित ‘चलो जीते हैं’ हा प्रेरणादायी लघुपट दाखविण्यात आला.

अभियानांतर्गत वसतिगृह व परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मुली व कर्मचाऱ्यांनी श्रमदानातून परिसराची स्वच्छता केली. तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वसतिगृह परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

मुली व कर्मचाऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे अभियानाचा प्रारंभ कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

0000

दानोळीत छत्रपती प्रतिष्ठानच्यावतीने आरोग्य शिबीर संपन्न


 

कोल्हापूर, दि. 28 (जिमाका) : दानोळी (ता. शिरोळ) येथे छत्रपती प्रतिष्ठानच्यावतीने गणेशोत्सवानिमित्त आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात सेवा संकल्प अभियानांतर्गत BP, शुगर, ECG, नेत्र तपासणीसह आभा व गोल्डन कार्डची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. शिबिराचे उदद्याटन सरपंच सुनिता वाळकुंजे यांच्या हस्ते करण्यात आले.

 

शिबिरात रक्तदाब, रक्तातील साखर, ECG, नेत्र तपासणी करण्यात आले. तपासणीनंतर आवश्यकतेनुसार औषध उपचार, आरोग्य विषयक सल्ला व मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी उदय राऊत, मंडळाचे अध्यक्ष भरत मुळीक, उपाध्यक्ष सुनिल चौगुले, अभय राऊत, सुजय राऊत, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पांडुरंग खटावकर, प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. ए.एन. मोघे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्चना यादव आदी उपस्थित होते.

00000

कर्णबधिरता प्रतिबंध व नियंत्रणाबाबत विद्यार्थिनींमध्ये जनजागृती

 

 

कोल्हापूर, दि. 28 (जिमाका) : राष्ट्रीय कर्णबधिरता प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत ‘कर्णबधिर लोकांचा आंतरराष्ट्रीय सप्ताह’ निमित्त 24 सप्टेंबर रोजी परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालय, कोल्हापूर येथे विद्यार्थिनींसाठी जनजागृतीपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

 

यावेळी बालरोगतज्ज्ञ डॉ. थोरात यांनी नवजात बालकांमधील श्रवणदोषाची कारणे, श्रवणदोषाचे लवकर निदान व त्याचे महत्त्व तसेच सांकेतिक भाषेचे महत्त्व या विषयांवर विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. नवजात बालकांमधील श्रवणदोषाचे वेळेत निदान झाल्यास आवश्यक उपचार व पुनर्वसनाच्या माध्यमातून त्यांचे भवितव्य अधिक सक्षम करता येते, याबाबत त्यांनी माहिती दिली. सांकेतिक भाषेचे महत्त्वही त्यांनी स्पष्ट केले.

 

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सरिता थोरात व सेवा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. निलिमा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यशाळेत बालरोगतज्ज्ञ डॉ. थोरात, परिचर्या प्रशिक्षण केंद्राच्या शिक्षिका सुरवसे, माने तसेच एनपीपीसीडी कार्यक्रमातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

0000


Saturday, September 26, 2026

कोल्हापूरातील सहा तालुक्यांना दुष्काळाची ‘प्रथम कळ’लागू जिल्ह्यात बाधितांना मिळणार विविध सवलती

 


 

कोल्हापूर, दि. २६ (जिमाका) : खरीप हंगाम २०२६ मधील पर्जन्यमानातील तूट व अन्य घटकांच्या आधारे राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती असल्याचे शासनाच्या निदर्शनास आल्याने महाराष्ट्र शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाने २५ सप्टेंबर २०२६ रोजी याबाबत शासन निर्णय निर्गमित केला आहे. राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा, राधानगरी, गगनबावडा, भूदरगड, आजरा व चंदगड या तालुक्यांचा समावेश झाल्याने या सहा तालुक्यांमध्ये ‘Trigger-1’ (प्रथम कळ) लागू करण्यात आली आहे. 

 

‘Trigger-1’ लागू झाल्यामुळे दुष्काळग्रस्त भागासाठी शासनाने विशेष बाब म्हणून विविध सवलती व उपाययोजना लागू केल्या आहेत. यामध्ये जमीन महसूलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती तसेच ७.५ हॉर्सपॉवरपेक्षा अधिक क्षमतेच्या कृषी पंपांच्या चालू वीजबिलात सूट यांचा समावेश आहे. याशिवाय शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोजगार हमी योजनेंतर्गत कामांच्या निकषांमध्ये शिथिलता आणून जास्तीत जास्त कामे सुरू करणे, आवश्यकतेनुसार टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, टंचाई जाहीर केलेल्या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतीपंपांची वीज जोडणी खंडित न करणे, शेतकरी व शेतमजुरांना अन्नधान्याची टंचाई भासणार नाही याची व्यवस्था करणे, जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देणे तसेच जलसंधारणाची कामे सुरू करणे आदी उपाययोजनांचा यामध्ये समावेश आहे. 

 

 सर्वेक्षण केलेल्या क्षेत्रातील पिकांची स्थिती दर्शविणारी छायाचित्रे व GPS कोऑर्डिनेट्स संकलित करून पीक परिस्थितीचा अहवाल शासनास सादर करण्यात येणार आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शेत पिकांच्या नुकसानीपोटी देण्यात येणारी आर्थिक मदत विहित कार्यपद्धती पूर्ण झाल्यानंतर स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे जाहीर करण्यात येणार असल्याचे या शासन निर्णयात नमूद आहे. शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचे सर्वेक्षण व पंचनाम्याची कार्यवाही करण्यात येणार असून, बाधित शेतकऱ्यांना शासनाच्या सवलती व मदतीचा लाभ मिळण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून लवकरच आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल.

०००००

सेवा संकल्प अभियानांतर्गत शाहूवाडी तालुक्यात विविध योजनांचा आढावा


कोल्हापूर, दि. २६ : सेवा संकल्प अभियानांतर्गत शाहूवाडी तालुक्यातील सांबू, शिरगाव व सवते ग्रामपंचायतींना भेट देऊन विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा व प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.

यावेळी प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण, ‘आशीर्वादचा दिवा’ उपक्रम, ‘सूर्यघर’ योजना तसेच मुख्यमंत्री पंचायतराज अभियानांतर्गत सुरू असलेल्या कामांची माहिती घेण्यात आली. योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा वेळेत लाभ मिळवून देण्याच्या दृष्टीने आवश्यक सूचना करण्यात आल्या.

या पाहणीवेळी पंचायत समिती शाहूवाडीचे सांख्यिकी विस्तार अधिकारी श्री. कानडे, ग्रामीण गृहनिर्माण अभियंता  करण कांबळे, संबंधित ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी तसेच लाभार्थी उपस्थित होते.

**

गडहिंग्लज येथे सेवा संकल्प अभियानांतर्गत शिकाऊ अनुज्ञप्ती शिबिर संपन्न

 

कोल्हापूर, दि.26 (जिमाका) : प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांच्या वतीने सेवा संकल्प अभियानांतर्गत दि. 25 सप्टेंबर रोजी गडहिंग्लज येथे शिकाऊ अनुज्ञप्ती संदर्भातील नियमित शिबिर आयोजित करण्यात आले.

या शिबिरात नागरिकांना शिकाऊ अनुज्ञप्ती मिळविण्याची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया तसेच संबंधित नियम व तरतुदींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ऑनलाइन पोर्टलवर अर्ज करताना येणाऱ्या अडचणींबाबत उमेदवारांना आवश्यक माहिती देऊन त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.

या शिबिराचा एकूण 103 नागरिकांनी लाभ घेतला असून त्यांना शिकाऊ अनुज्ञप्तीची सेवा उपलब्ध करून देण्यात आली.

**


सेवा संकल्प अभियान व आयुर्वेद दिनानिमित्त विविध उपक्रम

 


 

कोल्हापूर, दि. 26 (जिमाका) : सेवा संकल्प अभियान, श्रीगणेशा आरोग्याचा अभियान व ११ वा आयुर्वेद दिन साजरा करण्याच्या अनुषंगाने २१ ते २४ सप्टेंबरदरम्यान जिल्ह्यातील विविध आयुष्मान आरोग्य मंदिरे, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांच्या माध्यमातून आरोग्य तपासणी, आयुर्वेद, योग, प्राणायाम, आहार-विहार व दिनचर्येबाबत जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात आले.

 २१ सप्टेंबर रोजी आयुष्मान आरोग्य मंदिर, मगळी आयुष  तालुका गडहिंग्लज येथे ६१ लाभार्थ्यांचे एनसीडी स्क्रीनिंग करण्यात आले. यावेळी दिनचर्या, ऋतुचर्या, हितकर-अहितकर आहार-विहार व व्यसनांच्या दुष्परिणामांची माहिती देण्यात आली. सर्व लाभार्थ्यांचे प्रकृती परीक्षण करून आयुर्वेदिक वनस्पती पुस्तिका देण्यात आली. उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज येथील ए.आर.टी. विभागात ३५ उपस्थितांना डॉ. सचिन कोगनोळे यांनी आहार व दिनचर्येबाबत माहिती दिली. तसेच ग्रामीण रुग्णालय सोळांकुरतर्फे आकणूर येथे आरोग्य शिबिर घेऊन १०४ रुग्णांची तपासणी करण्यात आली.

उपजिल्हा वसाहत रुग्णालय गांधीनगरमार्फत २२ सप्टेंबर रोजी बजरंग तालीम मंडळ, वळीवडे येथे आरोग्य शिबिर घेण्यात आले. यामध्ये ६५ रुग्णांची तपासणी करण्यात आली. आयुष्मान आरोग्य मंदिर, तारदाळ येथे महिलांसाठी योग व ध्यान शिबिर घेण्यात आले. योग प्रशिक्षक पांडुरंग गोळे यांनी योग प्रात्यक्षिके करून योगाचे महत्त्व सांगितले व आयुर्वेदिक वनस्पती पुस्तिकांचे वाटप करण्यात आले.

ग्रामीण रुग्णालय चंदगडतर्फे साई गणेश मंडळ, चंदगड येथे महाआरोग्य शिबिर घेण्यात आले. यामध्ये ८० नागरिकांची तपासणी करून औषधोपचार करण्यात आले. तसेच आयुष कक्ष, ग्रामीण रुग्णालय सोळांकुरतर्फे तुरंबे येथे दिनचर्या, ऋतुचर्या व योगाबाबत माहिती देण्यात आली. यावेळी ७६ रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले.

२३ सप्टेंबर रोजी ११ वा आयुर्वेद दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. सेवा रुग्णालय येथे ‘स्वस्थ भविष्यासाठी आयुर्वेद याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. गरोदर मातांना पोषण आहार व काळजी तसेच आयुर्वेदिक उपचाराबाबत माहिती देण्यात आली. यामध्ये ४६ महिलांची तपासणी करण्यात आली.

उपजिल्हा रुग्णालय गारगोटी येथे ११ वा आयुर्वेद दिन उत्साहात साजरा करण्यात आला. डॉ. स्नेहल कुलकर्णी यांनी ‘स्वस्थ भविष्यासाठी आयुर्वेद’याविषयी मार्गदर्शन केले. डॉ. सविता शेट्टी यांनी आयुर्वेद चिकित्सा प्रणालीची माहिती दिली. या व्याख्यानाचा ११० जणांनी लाभ घेतला. यावेळी ४८ रुग्णांची तपासणी करून आयुर्वेदिक औषधोपचार करण्यात आले.

ग्रामीण रुग्णालय कागल येथे ‘निरोगी उद्यासाठी आयुर्वेद’ या संकल्पनेनुसार आयुर्वेदाचे महत्त्व, दैनंदिन जीवनातील उपयोग तसेच निरोगी जीवनशैलीतील आयुर्वेदाची भूमिका याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

उपजिल्हा रुग्णालय कोडोली येथे आयुष गार्डनमध्ये आयुर्वेदिक वनौषधींची लागवड, आरोग्य प्रतिज्ञा, योग व स्वयंपाकघरातील आयुर्वेद या विषयांवरील पोस्टर प्रदर्शन आयोजित करण्यात आले. डॉ. सुलेखा साळुंखे यांनी आयुर्वेदाचे प्रयोजन, समतोल आहार, व्यायाम, ऋतुचर्या व दिनचर्येबाबत माहिती दिली. आयुर्वेदिक कॅम्पमध्ये ६५ रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले.

ग्रामीण रुग्णालय दत्तवाड येथे ११ वा राष्ट्रीय आयुर्वेद दिवस साजरा करण्यात आला. यावेळी आयुर्वेद संकल्पनेची माहिती व चित्रमय प्रदर्शन करण्यात आले. यावेळी ५१ रुग्णांची तपासणी करण्यात आली. तर ग्रामीण रुग्णालय मलकापूर येथे ४२ रुग्णांची तपासणी करून औषधोपचार करण्यात आले.

ग्रामीण रुग्णालय हातकणंगले येथे ‘स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम्, आतुरस्य विकार प्रशमनम्’ या संकल्पनेनुसार आयुर्वेद दिन साजरा करण्यात आला. आयुष कॅम्पमध्ये ४३ रुग्णांची तपासणी करण्यात आली. आयुष्मान आरोग्य मंदिर, तारदाळ येथे पाककला स्पर्धा, गरोदर माता तपासणी शिबिर व योग शिबिर घेण्यात आले.

प्राथमिक आरोग्य पथक सातवे, ता. पन्हाळा येथे योग शिबिर घेण्यात आले. महिला व पुरुष असे एकूण २७ जणांनी योगाचे शिक्षण घेतले. तसेच पोषण आहार, उपलब्ध आरोग्य सुविधा व आयुर्वेदिक उपचाराबाबत माहिती देण्यात आली.

ग्रामीण रुग्णालय खुपीरे यांच्यावतीने अजित स्पोर्ट्स, वाकरे येथे आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. जनरल तपासणी, उच्च रक्तदाब, रक्तनमुना तपासणी व इतर संदर्भसेवा देण्यात आल्या. एकूण ५३ नागरिकांनी या शिबीराचा लाभ घेतला.

उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज येथे धन्वंतरी प्रतिमेचे पूजन करण्यात आले. आयुष विभागामार्फत सुमारे १४० रुग्णांची तपासणी तर चंद्रसेन गणेश मंडळ, चंदगड येथे ९० रुग्णांची तपासणी करण्यात आली.

ग्रामीण रुग्णालय नेसरी येथे ‘निरोगी उद्यासाठी आयुर्वेद’ व योगाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी ७२ रुग्णांची तपासणी करण्यात आली. वसाहत रुग्णालय गांधीनगर येथे आयुर्वेदाचे महत्त्व, दैनंदिन जीवनातील उपयोग व निरोगी जीवनशैलीतील भूमिका याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

आयुष्मान आरोग्य मंदिर, नांदगाव येथे दिनचर्या, ऋतुचर्या, योग, प्राणायाम, आहार-विहार, मानसिक ताण-तणाव, मुखरोग, कर्करोग, मधुमेह व रक्तदाबाबाबत माहिती देण्यात आली. आयुर्वेद प्रतिज्ञा, योग सत्र, प्रकृती परीक्षण व हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली. आयुर्वेदिक वनस्पती व औषधी वनस्पती पुस्तिकांचे वाटप करण्यात आले. एकूण ६५ रुग्णांची तपासणी करण्यात आली.

आयुष्मान आरोग्य मंदिर, कुंभवडे येथे आयुर्वेद दिनानिमित्त आयुर्वेद, दिनचर्या, ऋतुचर्या, योग, प्राणायाम, आहार-विहार, मानसिक ताण-तणाव, मधुमेह व रक्तदाबाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. आयुर्वेद प्रतिज्ञा, योग सत्र व प्रकृती परीक्षण करण्यात आले. ४८ रुग्णांची तपासणी करण्यात आली.

२४ सप्टेंबर रोजी आयुष्मान आरोग्य मंदिर, मुगळी, एनयूएल पीएचसी अंतर्गत आशा स्वयंसेविकांना आयुर्वेद चिकित्सा पद्धती, आहार-विहार, योग चिकित्सा व वार्धक्यासाठी आयुर्वेद याबाबत माहिती देण्यात आली. आयुर्वेद माहिती व सूर्यनमस्कार पोस्टरचे वाटप करण्यात आले. तसेच आयुष आरोग्य मंदिर, मुगळी, ऑर्थोपेडिक अँड मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल, गडहिंग्लज व जयगणेश तरुण मंडळ, मुगळी यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिक व वयोवृद्ध नागरिकांसाठी अस्थिरोग तपासणी शिबिर घेण्यात आले. यावेळी आयुर्वेदिक उपचार व पंचकर्म उपचाराबाबत माहिती देण्यात आली.

या विविध उपक्रमांच्या माध्यमातून आयुर्वेद, योग, संतुलित आहार, दिनचर्या व ऋतुचर्येचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासोबतच आरोग्य तपासणी व उपचाराच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.

0000

 

भुदरगड पंचायत समितीतर्फे सेवा संकल्प अभियानात विविध लोक कल्याणकारी उपक्रमांचा हजारो नागरिकांनी घेतला लाभ

  

 

कोल्हापूर दि. २६ (जिमाका): पंचायत समिती भुदरगड अंतर्गत दिनांक २४ सप्टेंबर रोजी 'सेवा संकल्प अभियान' मोठ्या उत्साहात पार पडले. "सेवा माझे योगदान" या मुख्य संकल्पनेखाली राबविण्यात आलेल्या या अभियानात आरोग्य, पर्यावरण, स्वच्छता, महिला-बालविकास आणि पशुसंवर्धन या क्षेत्रांत विविध गतिमान उपक्रम राबवून तालुक्यातील हजारो नागरिकांना प्रत्यक्ष लाभ प्रदान करण्यात आल्याची माहिती गट विकास अधिकारी डॉ. शेखर जाधव यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली.

 

 सेवा माझे योगदान अंतर्गत ८५३ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींमध्ये ३ हजार ७५८ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये आभा कार्ड – ५१०, 

 गोल्डन कार्ड- ३४२, रक्त तपासणी- ३७३, नेत्र तपासणी- ४३१, अवयवदान - १२६, वयोवंदना योजना- ७१, NCD तपासणी- १ हजार ६१४, ईसीजी- २१९, एक्स-रे -७२ लाभार्थ्यांची वैद्यकीय सेवा व कार्ड वाटप करण्यात आले.

 

तालुक्यातील ९७ ग्राम पंचायतीमध्ये स्वच्छता ही सेवा अभियान सुरुवात करण्यात आले. पर्यवारण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यात आला यामध्ये २० हजार २८८ मूर्ती संकलित करण्यात आल्या तर ४ हजार ६३८ किलो निर्माल्य संकलन करण्यात आले. ९७ ग्राम पंचायतींमध्ये मध्ये प्लास्टिक वापरावर बंदी घालण्याबाबतचे ठराव मंजूर करण्यात आले. ६९ अंगणवाडी मध्ये पोषण अभियान मध्ये पाककृती, पोषण पंगत हे उपक्रम राबविले. २२ शाळांमधील २०४ विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्ती जनजागृती उपक्रमात सक्रीय सहभाग घेतला. दि. १ ते १० ऑक्टोबर या कालावधीत चित्रकला/वक्तृत्व स्पर्धा घेण्यात नियोजन केले आहे.

 

 तालुक्यातील ९७ ग्रामपंचायतींमधील २७० अंगणवाड्यांमध्ये वृक्षारोपण उत्सव पार पडला. अंगणवाड्यांमध्ये CBE कार्यक्रम व गृहभेटी देऊन १ हजार ३०३ लाभार्थ्यांनी सहभाग घेतला. दि.१७ सप्टेंबर २०२६ रोजी ९७ ग्रामपंचायतींमध्ये 'संकल्पाची रांगोळी' काढून अभियानाचा प्रचार करण्यात आला. ७ ग्रामपंचायतींमध्ये लसीकरण मोहीम राबवण्यात आली. यामध्ये ४१० पशूंची तपासणी, ४४० डोस लसीकरण, २६५ पशुपालकांची उपस्थिती आणि २७० पशुपालकाचे NDLM प्रणालीवर आधार अपडेट करण्यात आले.  जल सेवा यात्रा / जल अर्पण दिवस हे दिनांक २ ऑक्टोबर २०२६ रोजी ४ ग्रामपंचायतींमध्ये आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

***


सेवा संकल्प अभियानांतर्गत १७ ते २० सप्टेंबरदरम्यान विविध आरोग्य उपक्रम

 


 

कोल्हापूर, दि. २6 (जिमाका) : सेवा संकल्प अभियानांतर्गत राष्ट्रीय आयुष अभियान, सार्वजनिक आरोग्य विभाग, जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत जिल्ह्यातील आयुष्मान आरोग्य मंदिर, आयुष, उपजिल्हा रुग्णालये व ग्रामीण रुग्णालयांमध्ये विविध आयुर्वेदिक आरोग्य शिबिरे, योग, ध्यान व जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहेत. ११ वा आयुर्वेद दिवस २३ सप्टेंबर आणि जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन १ ऑक्टोबरच्या अनुषंगाने ‘निरोगी उद्यासाठी आयुर्वेद’ हा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे.

१७ सप्टेंबर रोजी सन्मती हायस्कूल, तारदाळ येथे सेवा संकल्प अभियानांतर्गत २५० शालेय मुलांसाठी योग व ध्यान शिबिर घेण्यात आले. तसेच उपजिल्हा रुग्णालय गारगोटीच्या आयुष विभागामार्फत सुदर्शन नगर मित्रमंडळ, गारगोटी येथे आरोग्य शिबिर घेण्यात आले. यामध्ये ५२ रुग्णांची तपासणी करण्यात आली. डॉ. स्नेहल कुलकर्णी यांनी शारीरिक व मानसिक आरोग्याबाबत, तर डॉ. सविता शेट्टी यांनी ज्येष्ठ नागरिकांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. एकूण ३८ रुग्णांची रक्ततपासणी करण्यात आली.

१८ सप्टेंबर रोजी उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लजमार्फत महावितरण कार्यालयात ‘श्रीगणेशा आरोग्याचे’ अभियान राबविण्यात आले. यावेळी आयुर्वेद व योगाबाबत माहिती देण्यात आली. शिबिरात ८१ रुग्णांची तपासणी करण्यात आली.

१९ सप्टेंबर रोजी सेवा संकल्प अभियान व आयुर्वेद दिनांतर्गत आयुष्मान आरोग्य मंदिर (आयुष), तारदाळ आणि श्री गणेश मंडळ, श्रीरामनगर, तारदाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिर घेण्यात आले. यामध्ये ५३ लाभार्थ्यांना सेवा देण्यात आली. तसेच रक्तदान शिबिर घेण्यात आले असून २० नागरिकांनी रक्तदान केले.

याच दिवशी नांदगाव येथे गणेश तरुण मंडळ, नांदगाव येथे आयुर्वेद, दिनचर्या, ऋतुचर्या, योग, प्राणायाम व असंसर्गजन्य आजारांबाबत माहिती देण्यात आली.

२० सप्टेंबर रोजी ग्रामीण रुग्णालय सोळांकुरतर्फे ‘श्रीगणेशा आरोग्याचे’अभियान राबविण्यात आले. यावेळी आयुर्वेद व योगाबाबत माहिती देण्यात आली. शिबिरात १३० रुग्णांची तपासणी करण्यात आली.

0000

Tuesday, September 22, 2026

दुष्काळी स्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने घेतली बैठक

 


 

कोल्हापूर, दि. 22 (जिमाका) : यंदा अल् निनोच्या प्रभावामुळे सर्वत्र पर्जन्यमान कमी आहे.कोल्हापूर जिल्ह्यात सरासरीच्या साधारणता 51 टक्के इतकाच पाऊस झाला आहे . या पार्श्वभूमीवर विजय राठोड यांनी बैठक घेऊन आढावा घेतला.

      जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात जिल्ह्यातील पर्जन्यमान,खरीप हंगामातील पिकांची सद्यस्थिती,पीक विमा तसेच आगामी रब्बी हंगामाच्या नियोजनाबाबत जिल्हास्तरीय दुष्काळ देखरेख समितीची आढावा बैठक आज संपन्न झाली.

     यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, उपसंचालक नामदेव परीट, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, उपजिल्हाधिकारी शक्ती कदम, आत्मा प्र.संचालक रक्षा शिंदे, पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त डॉ महेश शेजाळ, पाटबंधारे विभागाचे उपअभियंता मिलिंद किटवाडकर, भूजलचे वरिष्ठ भूवैज्ञानिक शशिकांत निंबाळकर प्रामुख्याने उपस्थित होते.

           जिल्हाधिकारी म्हणाले, पाटबंधारे विभागाने जिल्ह्यातील धरण निहाय पाणीसाठा तपासून पाण्याचे नियोजन करावे. तर पशुसंवर्धन विभागाने चारा नियोजनाच्या अनुषंगाने आत्तापासूनच तयारी करावी. तसेच संबंधित कृषी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळावर जाऊन पीक स्थितीची पाहणी करावी असे निर्देश त्यांनी या बैठकीत दिले. तत्पूर्वी कृषी अधीक्षक श्री पांगारे यांनी जिल्ह्यातील कृषी क्षेत्राच्या अनुषंगाने सद्यस्थितीचा आढावा पीपीटीद्वारे सादर केला.

२१ सप्टेंबर अखेर जिल्ह्यात ८८२.६ मि.मी.इतक्या पर्जन्यमानाची नोंद झाली आहे तर सुमारे १.५८ लाख हेक्टरवर खरीप पिकांची पेरणी झाली आहे.पेरणीची टक्केवारी सुमारे ८७.३८ इतकी आहे.कमी पर्जन्यमानामुळे हलक्या जमिनीवरील काही भागात जमिनीतील ओलावा कमी झाल्यामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम होत असून,पुढील काळात समाधानकारक पाऊस न झाल्यास उत्पादनात घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कृषी विभागामार्फत आवश्यक पीक संरक्षण उपाययोजनांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत असल्याची माहितीही श्री पांगारे यांनी या बैठकीत दिली.

     या स्थितीत जिल्हा प्रशासन व कृषी विभागाकडून पिकांची सद्यस्थिती पर्जन्यमान आणि जमिनीतील ओलावा यावर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. शेतकऱ्यांना आवश्यक त्या ठिकाणी तांत्रिक मार्गदर्शन व पीक संरक्षण उपाययोजना उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार असल्याचे कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. या बैठकीसाठी करवीर उप विभागीय कृषी अधिकारी अरुण भिंगारदिवे, किरण पाटील, करवीर तालुका कृषी अधिकारी युवराज पाटील, पशुसंवर्धन सहाआयुक्त पी पी कुलकर्णी यांच्यासह इतर तालुक्यातील संबंधित उपविभागीय व तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते .

0000

 

Monday, September 21, 2026

बालकांनी सोशल मीडियाचा वापर टाळावा -सहायक पोलीस निरीक्षक स्वाती यादव

 



 

 * बालकांनी संकटसमयी 112 व 1098 क्रमांकावर संपर्क साधावा

* पालक, शिक्षक व पोलीसांपासून कोणतेही सिक्रेट लपवू नका

 

•  "लोकसंवाद" कार्यक्रमाद्वारे कायदा व सुव्यवस्थेविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

 

  कोल्हापूर दि.21 (जिमाका): समाजात वावरताना आपल्यासोबत कोणताही अनुचित प्रकार घडला तर त्याबद्दल आई-वडील, पालक, शिक्षक किंवा पोलीस दीदीला मोकळेपणाने वस्तुस्थिती सांगा, म्हणजे अनुचित प्रकारांना वेळेत आळा घालून गुन्हा रोखता येतो. अडचणीच्या वेळी, संकटकालीन परिस्थितीत पोलीस विभागाच्या 1098 किंवा 112 क्रमांकावर संपर्क साधा. अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. मोबाईल आणि सोशल मीडियाचा वापर टाळा, अशा शब्दांत पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या भरोसा सेलच्या प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक स्वाती यादव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

 

     माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने राज्यभरात गणेशोत्सवाच्या कालावधीत लोकसंवाद हे अभियान राबवण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने "लोकसंवाद" कार्यक्रमांतर्गत छत्रपती शाहू विद्यालयातील विद्यार्थ्यांना कायदा व सुव्यवस्थेविषयी मार्गदर्शन करण्यात आले, यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी मुख्याध्यापिका जयंती इंदुलकर, विभागीय माहिती कार्यालयाच्या सहायक संचालक वृषाली पाटील सहायक मुख्याध्यापिका गीता पिल्लई व अन्य मान्यवर उपस्थित होते.

 

     स्वाती यादव म्हणाल्या, विद्यार्थी दशेत विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित करुन उज्वल भविष्य घडवावे. अभ्यासासाठी हातात घेतलेल्या मोबाईलचा वापर विद्यार्थ्यांकडून सोशल मीडियासाठी केला जातो. परंतु चुकीच्या लिंक उघडल्या गेल्यास त्यातून आर्थिक फसवणूक, मानसिक फसवणूक व अन्य गंभीर गुन्ह्यात अडकले जाण्याची शक्यता असते. विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा वापर काळजीपूर्वक करावा. समाजात वावरताना ओळखीच्या किंवा अनोळखी व्यक्तीकडून "सिक्रेट गोष्ट सांगू नको" असे सांगून फसवणूक किंवा छळ होऊ शकतो. म्हणूनच कोणतेही सिक्रेट असले तरी ते सर्वप्रथम आपल्या आई-वडिलांना किंवा शिक्षकांना सांगा. गरज भासल्यास तातडीने पोलीसांची मदत घ्या, चांगल्या मित्रांची संगत निवडा, वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्याशिवाय वाहन चालवू नका. पॉक्सो सारख्या बाल गुन्हेगारीच्या घटनांमध्ये कडक शिक्षा होत असल्यामुळे आपल्या हातून कधीही चुकीचे वर्तन घडणार नाही, याची दक्षता घ्या. शाळेत आणि समाजात वावरताना एकमेकांशी मैत्रीपूर्ण नाते जपा, असे आवाहन त्यांनी केले.

 

यावेळी त्यांनी सुरक्षितता, सोशल मीडियामुळे होणारे गुन्हे, निर्भया पथक, पोलीस हेल्पलाइन, पॉक्सो कायदा 2012, बालगुन्हेगारी आदी विषयांवर मार्गदर्शन केले.

 

    सुरुवातीला विभागीय माहिती कार्यालयाच्या सहायक संचालक (माहिती) वृषाली पाटील यांनी ‘लोकसंवाद’ उपक्रमाचा उद्देश स्पष्ट करुन कार्यक्रमाची माहिती दिली.

 

     मुख्याध्यापिका जयंती इंदुलकर यांनी स्वागत तर अश्विनी चौगुले यांनी प्रास्ताविक केले. आभार उपमुख्याध्यापिका गीता पिल्लई यांनी मानले. कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

           ***

 

‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ महाराष्ट्र’ रोजगार मेळाव्यांमध्ये युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे-कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

 



राज्यातील युवकांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत २९ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात एक हजार रोजगार मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. या ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ महाराष्ट्र’ रोजगार मेळाव्यांमध्ये युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मलबार हिल येथील मीनल क्रीडा मंडळात आयोजित लोकसंवाद अभियान कार्यक्रमात केले.

माहिती व जनसंपर्क विभागाच्या ‘लोकसंवाद–२०२६’ अभियानांतर्गत गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. याच उपक्रमांतर्गत मुंबई शहर व मुंबई उपनगरातील विविध गणेश मंडळांमध्ये नागरिकांशी संवाद साधून रोजगार मेळावे आणि उपलब्ध रोजगाराच्या संधींबाबत माहिती देण्यात आली. याबरोबरच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि महिला व बालकांच्या संरक्षण, पोषण, शिक्षण व सक्षमीकरणासाठीच्या विविध योजना आणि सेवांची माहिती यावेळी देण्यात आली.
यावेळी मीनल क्रीडा मंडळाचे अध्यक्ष प्रशांत जाधव, उपाध्यक्ष निंगेश कोरे, राजीव मेहता, सागर पेंढारकर, आयेशा कुरेशी इतर पदाधिकारी, सदस्य व भक्तगण उपस्थित होते. यावेळी मुंबई शहर जिल्ह्यातील रोजगार मेळाव्याबाबत कौशल्य विकास अधिकारी विद्या शिंगे, समन्वयक अजय कांबळे, तसेच माहिती व जनसंपर्क विभागाच्या विभागीय संपर्क अधिकारी संध्या गरवारे, श्रद्धा मेश्राम आणि अश्विनी पुजारी यांनी नागरिकांशी संवाद साधून रोजगार महाकुंभाची माहिती दिली.

सेवा संकल्प अभियानांतर्गत समाज कल्याण विभागामार्फत विविध उपक्रमांचे आयोजन


 

कोल्हापूर, दि. 21 (जिमाका) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील कारकीर्दीस 25 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयानुसार 7 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत राज्यभर "सेवा संकल्प अभियान" राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत समाज कल्याण विभागाच्या अधिनस्त असलेल्या 18 शासकीय वसतिगृहे व 4 निवासी शाळांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

या अभियानांतर्गत पुढील शालेय उपक्रम राबविण्यात येणार आहेत - "विकसित भारत" या संकल्पनेवर आधारित चित्रकला स्पर्धा व चित्र प्रदर्शन, "मुलांच्या स्वप्नातील भारत" व "विकसित भारत 2047" या विषयांवर वक्तृत्व स्पर्धा.

जनजागृती व सेवा योगदान - वसतिगृह व शाळा नजीकच्या गावात / वाडीत केंद्र व राज्य शासनाच्या जनकल्याणकारी योजनांची माहिती कला पथकाद्वारे देण्यात येणार आहे. तसेच स्थानिक गरजेनुसार अनाथालय / वृद्धाश्रम भेट, वृक्षारोपण अभियान, स्वच्छता ही सेवा, आरोग्य तपासणी शिबिर, योग आणि ध्यान सत्र, प्लास्टिक मुक्ती जागरूकता, महिलांचे आरोग्य आणि स्वच्छता, वंचित मुलांसाठी शिक्षण सहकार्य, करिअर कौन्सिलिंग सत्र, ज्येष्ठ नागरिकांसाठी डिजिटल साक्षरता, व्यसनमुक्त भारत जागरूकता, पोषण आणि अॅनिमिया जागरूकता, कचरा वर्गीकरण आणि कंपोस्टिंग, सायबर सुरक्षा जागरूकता, वीर गाथा आणि सैनिकांचा सन्मान, विद्यार्थ्यांना आवश्यक असणारी सर्व प्रमाणपत्रे वाटप इ. सेवा उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

या अभियानामध्ये युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग घेण्यात येणार असून, स्वच्छता मोहीम विशेषत्वाने राबविण्यात येणार आहे. त्याचबरोबर या कार्यालयाचे तालुका समन्वयक व समता दुत यांच्यामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती समाज कल्याण विभागातर्फे देण्यात आली.

0000 

Sunday, September 20, 2026

पशुसंवर्धन विभागाच्या योजनांची माहिती घ्या; योजनांचा लाभ घेऊन पशुपालन व्यवसायाला चालना द्या -पशुवैद्यकिय अधिकारी डॉ. दीपाली भुतकर


 



पशुसंवर्धन विभागाच्या योजनांची माहिती घ्या;

 योजनांचा लाभ घेऊन पशुपालन व्यवसायाला चालना द्या

 -पशुवैद्यकिय अधिकारी डॉ. दीपाली भुतकर

 

 कोल्हापूर, दि. 20 (जिमाका) : ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याबरोबरच शेतकरी व पशुपालकांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत. पशुपालन, दुग्धव्यवसाय, शेळी-मेंढी पालन, कुक्कुटपालन तसेच पशुधन उद्योजकतेला प्रोत्साहन देणाऱ्या योजनांची माहिती घेऊन पात्र लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन   पशुवैद्यकिय अधिकारी  डॉ. दीपाली भुतकर यांनी केले.

पट्टणकोडोली, हुपरे नगर येथील सिद्धिविनायक गणेश  उत्सव मंडळ येथे आयोजित ‘लोकसंवाद’ कार्यक्रमावेळी त्या बोलत होत्या. यावेळी  मंडळाचे अध्यक्ष ओमकार सावंत, खजिनदार श्रीकांत आवटे मंडळाचे पदाधिकारी तसेच स्थानिक युवक, महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रामीण भागात पशुधनावर आधारित व्यवसायाच्या माध्यमातून स्वयंरोजगार व उद्योजकतेला चालना देणे हा पशुसंवर्धन खात्याचा महत्त्वाचा उद्देश आहे. ONE HEALTH संकल्पने नुसार सुदृढ पशु आरोग्य, शास्त्रीय अतिउत्पादनक्षम पशुपैदास, सकस पौष्टिक पशु आहार, व सुयोग्य पशु व्यवस्थापन या चतु:सूत्रीवर भविष्यातील दुग्धव्यवसाय अधिक फायदेशीर होऊ शकतो.  त्याकरिता आपले दुग्धव्यवसायात तयार होणारे इतर दुग्धजण्य पदार्थ जे "Value addable product " आहेत ते भविष्यातील लोकसंख्येला सकस अन्न पुरविणे करिता व परदेशात निर्यात करण्या करिता आवश्यक मानकानुसार गरजेचे असणारे लाळखुरकत रोग मुक्त होणेकरिता पशुसंवर्धन विभागामार्फत व्यापक स्वरूपात लसीकरण मोहीम राबविली जाते. पशुधन रोगमुक्त राहून  प्राणिजण्य आजार टाळून त्यातून सकस दूध, दुग्धजण्य पदार्थ, मांस, अंडी निर्मिती करणेसाठी PPR, लम्पि चर्मरोग, ब्रुसेल्ला, अँटिरॅबीज लसीकरण या योजनांचा पशुपालकांनी लाभ घ्यावा, असे सांगून श्रीमती भूतकर पुढे म्हणाल्या, आधुनिक शास्त्रीय पशुपैदास करिता पशुसंवर्धन विभागामार्फत अत्यल्प दराने उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या "लिंग निर्धारित वीर्यमात्रा " वापरून अधिक उत्पादनक्षम पशुधन निर्मितीसाठी या योजनेचा ही पशुपालकांनी लाभ घ्यावा.

अल निनो प्रभावामुळे भविष्यातील वैरण तूट लक्षात घेऊन पशुसंवर्धन विभागाचे चारा साक्षरता अभियान व वैरण विकास योजनेंतर्गत वाटप होणारे 100% अनुदानवरील बियाणे या योजनामधून तयार होणारा अतिरिक्त चारा आज मुरघास, युरिया व ओझोन ट्रीटमेंट सारखे आधुनिक शास्त्रीय उपाय वापरून तरुण पिढी यामधून रोजगार व व्यवसाय निर्मिती करू शकते. त्यातून उपलब्ध सकस पशु चारा वैरण टंचाई असलेल्या भागात उपलब्ध करून देता येईल.

तसेच आपले बहुमूल्य पशुधनाचे अकाली अथवा आपत्ती मुळे होणारे आर्थिक नुकसान टाळण्या करिता 85 % अनुदानावर विमा योजनेचा लाभ घेण्या करिता आपल्या नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधून त्यांच्या कानातील बिल्ला व पशुधन मालकीच्या आधार क्रमांकाच्या आपल्या नोंदी   अद्ययावत करून घेऊन सदर योजनेचाही तत्पर लाभ घ्यावा, अशी सूचना त्यांनी केली.

पशुपालकांनी आपल्या गरजेनुसार उपलब्ध योजनांची माहिती घेऊन पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, अनुदानाचे निकष व अंतिम मुदत याबाबत जवळच्या पशुवैद्यकीय दवाखाना, तालुका पशुसंवर्धन कार्यालय किंवा संबंधित पशुसंवर्धन अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध योजना व शासन निर्णयांची माहिती पाहूनच अर्ज करावा.

पशुपालन व्यवसायातून आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी पशुपालक, शेतकरी, महिला बचत गट व पात्र उद्योजकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही श्रीमती भूतकर यांनी यावेळी  केले.

राज्य शासनाने गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित केले आहे. सार्वजनिक लोकसहभागातून शासनाच्या विविध योजना, उपक्रम आणि धोरणात्मक निर्णयांची माहिती जनतेपर्यंत थेट पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागाच्यावतीने राज्यभर ‘लोकसंवाद-2026’ हा विशेष जनजागृती उपक्रम  16 ते 24 सप्टेंबर 2026 या कालावधीत राबविण्यात येत आहे.

शासनाच्या योजनांची माहिती देण्याबरोबरच नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधणे, आणि पात्र लाभार्थ्यांना संबंधित योजनांचा लाभ घेण्यासाठी मार्गदर्शन करणे, हा ‘लोकसंवाद-2026’चा प्रमुख उद्देश आहे.

*****

Wednesday, September 9, 2026

भरती परीक्षा पद्धतीच्या सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती गठीत

 


कोल्हापूर, दि. 7 (जिमाका) : राज्यातील भरती परीक्षा अधिक पारदर्शक, सुरक्षित, विश्वासार्ह आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी विद्यमान परीक्षा पद्धतीचा सर्वंकष अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचविण्यासाठी शासनाने उच्चस्तरीय समिती गठित केली आहे.

मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या महिन्यात झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाने ४ सप्टेंबर २०२६ रोजी शासन निर्णय जारी करून समिती गठित केली आहे.

अपर मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभाग (सेवा) श्रीमती व्ही. राधा या समितीच्या अध्यक्ष आहेत. पोलीस महासंचालक सदानंद दाते, सचिव वीरेंद्र सिंह, सचिव डॉ. एन. रामास्वामी, विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, संघ लोकसेवा आयोगाचे (UPSC) माजी सदस्य एअर मार्शल अजित शंकरराव भोसले (सेवानिवृत्त) आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) मुंबईचे प्रा. श्यामप्रसाद करगड्डे यांचा समितीत सदस्य म्हणून समावेश आहे. डॉ. एन. रामास्वामी हे समितीचे सदस्य सचिव आहेत.

राज्य शासनाच्या विविध विभाग, प्राधिकरणे आणि परीक्षा घेणाऱ्या संस्थांकडून राबविण्यात येणाऱ्या भरती परीक्षांच्या विद्यमान प्रणाली व कार्यपद्धतीचा समिती आढावा घेणार आहे. प्रश्नपत्रिका तयार करणे, परीक्षण व मॉडरेशन, प्रश्नसंच तयार करणे, मुद्रण अथवा डिजिटल वितरण, गोपनीयता, अभिरक्षा, प्रश्नपत्रिका वाहतूक, परीक्षा संचालन, मूल्यमापन आणि निकाल जाहीर करण्याच्या प्रक्रियेचा सखोल अभ्यास करण्यात येणार आहे.

प्रश्नपत्रिका फुटणे, गोपनीयता भंग, तोतया उमेदवार, संगनमत तसेच प्रतिबंधित इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर अशा अनुचित प्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी या समितीतर्फे उपाययोजना सुचविण्यात येतील. परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेत माहिती तंत्रज्ञान, डिजिटल प्रणाली आणि सुरक्षा तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याबाबतही समिती शिफारसी करणार आहे.

परीक्षा केंद्रांची निवड, पायाभूत सुविधा, सुरक्षा, मनुष्यबळ आणि कार्यसज्जतेसाठी किमान मानके सुचविण्यासोबतच जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त/पोलीस अधीक्षक, शिक्षण विभाग, परीक्षा घेणाऱ्या संस्था आणि इतर संबंधित यंत्रणांमध्ये प्रभावी समन्वयासाठी संस्थात्मक कार्यपद्धती सुचविण्यात येणार आहे.

समिती राज्यातील प्रत्येक महसुली विभागास भेट देऊन विद्यार्थी व उमेदवार, शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी आणि इतर हितधारकांशी प्रत्यक्ष किंवा ऑनलाइन माध्यमातून चर्चा व सल्लामसलत करणार आहे.

0000

Monday, September 7, 2026

भरती परीक्षा अधिक पारदर्शक, सुरक्षित व विश्वासार्ह करण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठित विद्यमान परीक्षा पद्धतीचा सर्वंकष अभ्यास करून शासनास सुधारणा सुचविणार


 

मुंबई, दि. ६ : राज्य शासनामार्फत घेण्यात येणाऱ्या भरती परीक्षा अधिक पारदर्शक, सुरक्षित, विश्वासार्ह, निष्पक्ष आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी विद्यमान परीक्षा पद्धतीचा सर्वंकष अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचविण्याकरिता उच्चस्तरीय समिती गठित करण्यात आली आहे. याबाबत सामान्य प्रशासन विभागाने शासन निर्णय जारी केला आहे.

मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली 12 ऑगस्ट 2026 रोजी झालेल्या बैठकीत राज्यातील भरती परीक्षा पद्धतीचे संपूर्ण पुनर्विलोकन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव (सेवा) श्रीमती व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे.

समितीमध्ये पोलीस महासंचालक सदानंद दाते, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाचे सचिव वीरेंद्र सिंह, नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, संघ लोकसेवा आयोगाचे माजी सदस्य एअर मार्शल अजित शंकरराव भोसले (सेवानिवृत्त) आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी), मुंबई येथील यांत्रिकी अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक श्यामप्रसाद करगड्डे यांचा सदस्य म्हणून समावेश आहे. पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास आणि मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव डॉ. एन. रामास्वामी हे समितीचे सदस्य सचिव असतील.

परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेचा अभ्यास

राज्य शासनाचे विविध विभाग, प्राधिकरणे आणि परीक्षा घेणाऱ्या संस्थांकडून राबविण्यात येणाऱ्या भरती परीक्षांच्या विद्यमान प्रणाली व कार्यपद्धतीचा समिती आढावा घेईल. भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह व निष्पक्ष करण्यासाठी सर्वंकष उपाययोजना सुचविण्यात येणार आहेत.

प्रश्नपत्रिका तयार करणे, परीक्षण व मॉडरेशन, एकापेक्षा अधिक प्रश्नसंचांची निर्मिती, मुद्रण किंवा डिजिटल वितरण, गोपनीयता, अभिरक्षा, प्रश्नपत्रिकांची वाहतूक, परीक्षा संचालन, प्रतिसाद नोंदणी, मूल्यमापन आणि निकाल जाहीर करण्यापर्यंतच्या सर्व प्रक्रियांचा अभ्यास करून योग्य सुरक्षा उपायांची शिफारस समिती करेल.

परीक्षा प्रक्रियेत माहिती तंत्रज्ञान, डिजिटल प्रणाली आणि सुरक्षा तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, प्रमाणीकरण, प्रवेश नियंत्रण, लेखापरीक्षण नोंदी (ऑडिट ट्रेल्स), देखरेख तसेच अन्य तंत्रज्ञानाधारित सुरक्षा उपायांबाबतही समिती शिफारसी करणार आहे.

गैरप्रकारांना प्रतिबंधासाठी उपाय

प्रश्नपत्रिका फुटणे, गोपनीयतेचा भंग, तोतया उमेदवार, संगनमत आणि प्रतिबंधित इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर यांसारख्या अनुचित प्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी अस्तित्वात असलेल्या यंत्रणेचा समिती आढावा घेईल. अशा गैरप्रकारांचा शोध घेणे, प्रतिबंधात्मक व पर्यवेक्षणात्मक उपाययोजना राबविणे आणि उत्तरदायित्व निश्चित करण्याबाबतही उपाय सुचविले जाणार आहेत.

परीक्षा केंद्रांची निवड, पायाभूत सुविधा, देखरेख, सुरक्षा, मनुष्यबळ आणि कार्यसज्जता यांसाठी किमान मानके निश्चित करण्याबाबत समिती शिफारसी करेल. जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त किंवा पोलीस अधीक्षक, शिक्षण विभागातील प्राधिकरणे, परीक्षा घेणाऱ्या संस्था आणि अन्य संबंधित यंत्रणांमध्ये प्रभावी समन्वयासाठी संस्थात्मक कार्यपद्धतीही सुचविण्यात येईल.

प्रत्येक महसुली विभागाला भेट

समिती राज्यातील प्रत्येक महसुली विभागाला भेट देऊन विद्यार्थी, उमेदवार, शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी आणि अन्य संबंधित हितधारकांशी चर्चा व सल्लामसलत करेल. त्यांची मते आणि सूचना विचारात घेऊन परीक्षा पद्धतीतील सुधारणा सुचविण्यात येणार आहेत. आवश्यकता भासल्यास इतर राज्यांतील उत्तम पद्धती तसेच अन्य देशांतील परीक्षा प्रणालींचाही अभ्यास केला जाईल.

प्रभावी तक्रार निवारण, उमेदवारांशी सुसंवाद आणि परीक्षा प्रक्रियेची निष्पक्षता व प्रामाणिकतेबाबत उमेदवारांचा विश्वास अधिक दृढ करण्यासाठीही समिती उपाय सुचवेल. संबंधित हितधारकांशी प्रत्यक्ष अथवा ऑनलाइन माध्यमातून संवाद साधून सूचना व अभिप्राय प्राप्त केल्यानंतर समिती सर्वसमावेशक अंतिम अहवाल शासनास सादर करणार आहे.

यासंदर्भातील शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेतांक २०२६०९०५१३५४४७३३०७ असा आहे.

०००