** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Tuesday, January 17, 2012

पन्हाळा तालुक्यात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ लागू

         कोल्हापूर दि. १७ : राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सार्वत्रिक निवडणूका २०१२ जाहीर केल्या आहेत. निवडणुका निर्भय व शांततामय वातावरणात होणे आवश्यक असून निवडणूक प्रक्रियेत होणारा सार्वजनिक उपद्गव टाळण्याची गरज असल्याने पन्हाळ्याचे तालुका कार्यकारी दंडाधिकारी शरद पाटील यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये असलेल्या अधिकारास अनुसरुन जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०१२ चे कालावधीत पन्हाळा तालुका हद्दीमध्ये पुढील आदेश जारी  केले आहेत.
        कोणत्याही कारणासाठी सार्वजनिक सभा संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्‍यांची किंवा पोलीस अधीक्षकांच्या पूर्व परवानगी शिवाय घेता येणार नाही. कोणत्याही प्रकारची मिरवणूक संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रभारी पोलीस अधिकार्‍यांच्या किंवा पोलीस अधीक्षकांच्या पूर्व परवानगी शिवाय घेता येणार नाही. कोणत्याही व्यक्तीस/संस्थेस लाऊड स्पिकरचा वापर सक्षम पोलीस अधिकार्‍यांच्या परवानगीशिवाय करता येणार नाही. निवडणुकाबाबत लाऊड स्पिकरचा वापर सकाळी ६ वाजण्यापूर्वी व रात्रौ १० वाजल्यानंतर करता येणार नाही. शस्त्र अधिनियम १९५९ खालील धारण केलेल्या कोणत्याही परवाना धारकांना पन्हाळा तालुका हद्दीमध्ये आपली हत्यारे एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी नेण्यास तसेच अंगावर बाळगण्यास या आदेशान्वये बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कायदेशीर कर्तव्य बजावत असलेल्या शासकीय कर्मचार्‍यांना (पोलीस अधिकारी व कर्मचारी ) यांना लागू राहणार नाही. तसेच ज्या परवानाधारकांना रुढीप्रमाणे बंदूक डिस्पले करण्याचा अधिकार आहे त्यांना हा आदेश लागू राहणार नाही. निवडणुकीच्या कालावधीत मोटार गाड्या वाहने ही कोणत्याही परिस्थितीत तीन पेक्षा अधिक वाहनांच्या ताफ्यात चालविण्यात येऊ नयेत. मात्र सदर आदेश सर्व मोठ्या संरक्षक गाड्याच्या ताफ्यास तो केंद्ग किंवा राज्य शासनाचे मंत्री किंवा कोणत्याही व्यक्तीस घेवून जात असल्यास तेंव्हा त्यांचे सुरक्षिततेविषयी लागू असलेल्या वाहनांच्या संदर्भात लागू राहणार नाही.
 निवडणुकीचे कालावधीत सर्व शासकीय किंवा निमशासकीय कार्यालयाच्या आवारात किंवा शासकीय विश्रामगृहात व त्यांच्या आवारात, विश्रामगृहात कोणत्याही उपरोक्त संस्थेच्या आवारात खालील बाबी करण्यास मनाई करण्यात येत आहे.  
            कोणत्याही प्रकारची मिरवणूक काढणे किंवा सभा घेणे, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे अथवा निवडणुकविषयक वाद्य वाजविणे, गाणी म्हणणे, कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करणे, निवडणुकीचे नामनिर्देशन भरताना उमेदवारासोबत राज्य निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार दोन पेक्षा अधिक लोकांना तहसिल कार्यालयाच्या आवारातील निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या कक्षात जाता येणार नाही. निवडणुकीचे नामनिर्देशन भरताना उमेदवारासोबत येणार्‍या मोटार इतर वाहने यांचेवर एकापेक्षा अधिक ध्वज (झेंडे) लावता येणार नाही. सदरचे बंधन निवडणुकीचे काळामध्ये प्रचार सभा, मेळावे वगैरे कार्यक्रम स्थळी लागू असतील. तसेच अशा कार्यक्रमाच्या स्थळी विनापरवाना बॅनर्स, कटआऊटस्‌ वगैरे लावण्याचे नाहीत. परवानगी घेऊन लावलेला बॅनर्स, कटआऊटस्‌ कार्यक्रम संपताच काढून घेण्याचे आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०१२ चे कालावधीत पन्हाळा तालुक्यातील सर्व हॉटेल, रेस्टॉरंट, धाबे हे रात्रौ दहा नंतर सुरु ठेवता येणार नाहीत. हा आदेश दि. १६ जानेवारी २०१२ रोजीपासून दि. ८ फेब्रुवारी २०१२ रोजीपर्यंत लागू राहील, असेही पन्हाळ्याच्या कार्यकारी दंडाधिकार्‍यांनी म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.