** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Monday, October 17, 2022

शेतकऱ्यांना अनुदानित दरात मिळणार महाबीजचा हरभरा शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आवाहन

 


 

           कोल्हापूर, दि. 17 (जिमाका) : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान व ग्रामबिजोत्पादन योजनेंतर्गत शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी महाबीजचे हरभरा बियाणे अनुदानित दरात मिळणार आहे. या योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन कोल्हापूर व सांगली जिल्ह्याचे महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक एन. जी. इनामदार यांनी केले आहे.

सोयाबीन व भात कापणी व मळणीला सुरुवात झाल्याने रब्बी हंगामाची लगबग दिसून येत आहे. त्या अनुषंगाने शासनातर्फे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान व ग्रामबिजोत्पादन योजना जिल्ह्यात कृषी विभागातर्फे राबविण्यात येत आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान योजनेमध्ये जिल्ह्याला ४२८ क्विंटल बियाणे वितरित करण्याचे उद्दिष्ट आहे. या योजनेअंतर्गत तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत परमिट वाटप होणार आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान योजनेंतर्गत हरभरा (दहा वर्षाआतील वाण) ४५  रुपये प्रति किलो या अनुदानित दराप्रमाणे तर ग्रामबिजोत्पादन योजनेंतर्गत हरभरा (दहा वर्षाआतील वाण) ४५ रुपये प्रति किलो व (दहा वर्षावरील वाण) ५२ रुपये प्रति किलो या अनुदानित दराप्रमाणे महाबीजच्या वितरकांकडे उपलब्ध होणार आहे. या योजनेंतर्गत दहा वर्षाआतील हरभरा फुले विक्रम, राजविजय- २०२, एकेजी ११०९, BGM -१०२१६  व दहा वर्षावरील विजय, दिग्वीजय, विशाल व जॅकी- ९२१८ हे वाण उपलब्ध होणार आहेत.

या योजनेत एका शेतकऱ्याला सातबारा, आधारकार्ड घेऊन एक बॅग वितरित करण्यात येणार असून शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असेही श्री. इनामदार यांनी कळविले आहे.

00000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.