** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Saturday, February 28, 2026

विभागीय माहिती कार्यालयाच्या हिंद-दी-चादर निबंध व घोषवाक्य स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद





कोल्हापूरदि. 27 (जिमाका) : विभागीय माहिती कार्यालयाच्या वतीने कोल्हापूरसांगलीसिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या विचार व कार्यावर आधारित निबंध व घोषवाक्य स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेला स्पर्धकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. विभागीय माहिती कार्यालयाकडे शेकडो प्रवेशिका प्राप्त झाल्या. विद्यार्थी व खुल्या गटामध्ये घेण्यात आलेल्या या निबंध व घोषवाक्य स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा आज मराठी भाषा गौरव दिनाच्या पार्श्वभूमीवर एका शानदार वातावरणात विभागीय माहिती कार्यालयात पार पडला.

28 फेब्रुवारी व 1 मार्च रोजी नवी मुंबईतील खारघर येथे गुरु तेग बहादूर साहेब जी यांच्या 350 व्या शहीदी समागम कार्यक्रमाचे महाराष्ट्र शासनाने आयोजन केले आहे. त्यासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यामध्ये विभागीय माहिती कार्यालयाने उपसंचालक प्रवीण टाके यांच्या मार्गदर्शनाखाली निबंध व घोषवाक्य स्पर्धेचे आयोजन केले होते. आज एका शानदार कार्यक्रमात मराठी भाषा अभ्यासक प्रा.डॉ. अरुण शिंदेविभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष पत्रकार समीर देशपांडेउर्दू व इंग्रजी भाषा अभ्यासक इनायत अली शेखउपसंचालक प्रवीण टाके आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले.

निबंध स्पर्धेसाठी खुल्या व विद्यार्थी गटातून मराठीहिंदीइंग्रजी व उर्दू भाषेमधून निबंध व घोषवाक्य स्पर्धेसाठी शेकडो प्रवेशिका प्राप्त झाल्या. या स्पर्धेतील दोन्ही गटातील विजेत्या स्पर्धकांची नावे पुढीलप्रमाणे -

 निबंध स्पर्धा (शालेय गट) प्रथम क्रमांक : आरती सागर नाईक (ज्योतिर्लिंग विद्यामंदिरवडणगेनिगवे दुमालाकोल्हापूर) द्वितीय : चेतना राजेंद्र चव्हाण (शां.कृ,.पंत वालावलकर हायस्कूलकोल्हापूर)तृतीय : आसिया इरफान बहादूर (अँग्लो उर्दू हायस्कुलऔरवाडता. शिरोळ) तर उत्तेजनार्थ क्रमांकासाठी अक्षरा जयकुमार पाटील (महात्मा गांधी विद्यालयरुकडी)जसविरसिंग पवित्रसिंग दुधानी (भारती विद्यापीठ इंग्लिश मिडीयम स्कूलकोल्हापूर)अक्षरा विभिषण यादव (अनंतराव देसाई विद्यालयपट्टणकोडोली- कोल्हापूर) या विद्यार्थ्यांनी पारितो‍षिक मिळविले.

निबंध स्पर्धा (खुला गट)- प्रथम क्रमांक : दीपक सर्जेराव पाटीलकोल्हापूर,  द्वितीय : अक्षय अरुण नलावडेकोल्हापूरतृतीय सुनील नातूबांदाता. सावंतवाडीजि. सिंधुदुर्गतर उत्तेजनार्थ क्रमांकासाठी सत्यजित शरद शिंदे (मु. पो. सांगडेवाडीता. पलूसजि. सांगली)वैष्णवी सुधाकर माळी ( मु. पो. कवलापूरता. मिरजजि. सांगली)साहिल रघुनाथ कासार ( मु.पो.माणगाव कासारवाडाता. सावंतवाडीजि. सिंधुदुर्ग)  यांनी पारितो‍षिक मिळविले.

घोषवाक्य स्पर्धा (शालेय गट)  : प्रथम क्रमांक: रेहान रियाज बागवान (निवासी शाळा जतजि. सांगली)द्वितीय : ईशा निलेश बळते (विद्यापीठ हायस्कूलकोल्हापूर),  तृतीय : अनुष्का मोरे (एसजीयु विद्यापीठहातकणंगले) तर उत्तेजनार्थ क्रमांकासाठी पायल वाघ, (एम.एस. पटेल इंग्लिश मिडीयम हायस्कूलकोल्हापूर),  सेजल सुनील परब (कलेश्वर विद्यामंदिर नेरुरजि. सिंधुदुर्ग)शाहीद शेख (रमजान शेठ बालदार विद्यालयशिरढोण) या विद्यार्थ्यांनी यश मिळवले.

 

घोषवाक्य स्पर्धा (खुला गट)- प्रथम क्रमांक : संजय  शामराव सौंदलगेकोल्हापूरद्वितीय :अनुराधा शरद व्हटकरकोल्हापूरतृतीय : डॉ.राधिका उदय पेंडसे यांनी तर  उत्तेजनार्थ क्रमांकासाठी मिनाज शरीफभाई बागवानकोल्हापूरउद्देश  सर्जेराव पाटीलपन्हाळाकोल्हापूर व प्रदीप  राजाराम देवरुखकरमु.पो. कुडाळजि. सिंधुदुर्ग यांनी उत्तेजनार्थ पारितो‍षिक मिळवले.

यावेळी हिंद -दी -चादर श्री गुरुतेग बहादुर साहेब जी यांच्या शहिदी समागम कार्यक्रमाच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांच्या प्रसिद्धी विषयक उत्कृष्ट कामाबद्दल  सिंधुदुर्गचे जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंतसहायक संचालक वृषाली पाटीलमाहिती अधिकारी फारुक बागवानतसेच लघुलेखक वृषाली कदम यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

0000000

Thursday, February 26, 2026

खारघर येथील ‘हिंद-दी-चादर’ शहीदी समागमासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हजारो भाविकांचा सहभाग



कोल्हापूर, दि. २६ : शिखांचे नववे गुरु, ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेगबहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमाचे आयोजन २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी नवी मुंबईतील खारघर येथे करण्यात आले आहे. या ऐतिहासिक आणि अभूतपूर्व सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून विविध समाजातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होणार असून, जिल्ह्यातील विविध तालुक्यांतून स्वतंत्र गाड्यांद्वारे भाविक मुंबईकडे रवाना होणार आहेत अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी दिली आहे.


दि. २८ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता कोल्हापूर जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून सर्व गाड्या एकाच वेळी निघणार असून रात्री खारघर येथे आगमन होणार आहे. करवीर तालुका पूर्व येथून अमित अवघडे यांच्या नेतृत्वाखाली १६० भाविक चार गाड्यांतून, तर करवीर तालुका पश्चिम येथून अनिल लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली ५२ भाविक एका गाडीतून सहभागी होणार आहेत. पन्हाळा तालुक्यातून शामराव मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ९० भाविक दोन गाड्यांतून, वडगाव तालुक्यातून अजित आवळे यांच्या नेतृत्वाखाली ५० भाविक एका गाडीतून रवाना होणार आहेत. शिरोळ तालुका उत्तर भागातून मधुकर तिवडे यांच्या नेतृत्वाखाली ८७ भाविक दोन गाड्यांतून, तर शिरोळ तालुका दक्षिण भागातून तुकाराम आवळे यांच्या मार्गदर्शनाखाली ६० भाविक एका गाडीतून प्रवास करणार आहेत. हातकणंगले तालुक्यातून तानाजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ११६ भाविक तीन गाड्यांतून (हुपरी, इचलकरंजी व चोकाक स्टॅण्ड) सहभागी होणार आहेत. याशिवाय रंकाळा स्टॅण्ड येथून एक गाडी व वाठार येथून दोन गाड्यांद्वारे भाविक खारघरकडे जाणार आहेत.


दि. १ मार्च रोजी खारघर येथे दर्शन व सत्संगानंतर सायंकाळी ९ वाजता कोल्हापूरकडे परतीचा प्रवास सुरू होणार आहे. प्रवासादरम्यान भाविकांनी स्वतःची खाद्य पदार्थ, पाणी बाटली व आवश्यक औषधे सोबत ठेवावीत, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. या संपूर्ण उपक्रमासाठी विद्या कदम, उपआयुक्त इचलकरंजी महानगरपालिका, परिवहन विभागाचे सचिन सवदेकर तसेच कोल्हापूर महानगरपालिकेचे उपयुक्त किरण धनवडे यांचेकडे प्रवास व व्यवस्थेची सर्व जबाबदारी सुरळीतपणे पार पाडली जात आहे.

गुरु तेगबहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे – पालकमंत्री प्रकाश आबिटकर


कोल्हापूर, दि. २६ : शिखांचे नववे गुरु, 'हिंद-दी-चादर' श्री गुरु तेगबहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमाचे आयोजन २८ फेब्रुवारी आणि १ मार्च रोजी नवी मुंबईतील खारघर येथे करण्यात आले आहे. या ऐतिहासिक आणि अभूतपूर्व सोहळ्याला कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांनी, विविध समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या क्षणाचे साक्षीदार व्हावे, असे जाहीर आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले आहे. हा सोहळा केवळ एक धार्मिक कार्यक्रम नसून तो सामाजिक एकोपा आणि सर्वसमावेशक संस्कृतीचे जिवंत दर्शन घडवणारा उत्सव आहे.


या ऐतिहासिक शहीदी समागमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याचे आयोजन राज्य शासनाचा अल्पसंख्याक विभाग आणि “हिंद-दी-चादर” श्री गुरु तेगबहादूर साहिबजी ३५० वी शहीदी समागम समिती यांच्या मार्गदर्शनाखाली नऊ प्रमुख समाजांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. यामध्ये शीख, सिकलीकर, बंजारा, लबाना, मोहियाल, सिंधी, वाल्मिकी, उदासीन संप्रदाय आणि भगत नामदेव वारकरी समाज या सर्व समाज घटकांनी एकत्र येत एकतेचा आणि समतेचा एक नवा आदर्श संपूर्ण समाजासमोर ठेवला आहे. 


या महासोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदीं, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह देशातील विविध राज्यांचे मुख्यमंत्री, आध्यात्मिक गुरु आणि राष्ट्रीय स्तरावरील सामाजिक नेते उपस्थित राहणार आहेत. खारघर येथील विस्तीर्ण ओवे मैदानावर होणाऱ्या या कार्यक्रमासाठी राज्य शासनाकडून भव्य नियोजन करण्यात आले असून, प्रशासकीय स्तरावरही याला मोठे महत्त्व दिले जात आहे. विविध सरकारी कार्यालये आणि सामाजिक संस्थांनी या कार्यक्रमाच्या जनजागृतीसाठी पुढाकार घेतला असून, कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांची उपस्थिती लक्षणीय असावी यासाठी पालकमंत्र्यांनी विशेष सूचना दिल्या आहेत.


कोल्हापूर जिल्हा हा नेहमीच पुरोगामी विचारांचा आणि सांस्कृतिक वारसा जपणाऱ्यांचा जिल्हा राहिला आहे. गुरु तेगबहादूर साहिबजी यांनी दाखवून दिलेला धैर्याचा आणि त्यागाचा मार्ग आजही आपल्याला प्रेरणा देणारा आहे, त्यामुळे या राष्ट्रीय स्तरावरील ऐतिहासिक शहीदी समागमात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी नियोजित वेळेत खारघर येथे उपस्थित राहावे, असे आवाहन प्रकाश आबिटकर यांनी शेवटी केले आहे.


०००००

Monday, February 16, 2026

घोषवाक्य व निबंध स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे -उपसंचालक (माहिती) प्रवीण टाके

 

 





हिंद - दी - चादर  श्री गुरु तेगबहादूर साहिब जी यांच्या शहीदी समागम कार्यक्रमाच्या

 अनुषंगाने आढावा बैठक संपन्न 

25 फेब्रुवारी पर्यंत निबंध व घोषवाक्य स्पर्धेसाठीचे साहित्य पाठवावे

 

कोल्हापूर दि. 16 : हिंद दी चादर अर्थात श्री गुरु तेग बहादूर यांच्या 350 व्या शहिदी समागमानिमित्त नवी मुंबई - खारघर या ठिकाणी 28 फेब्रुवारी व 1 मार्च रोजी कार्यक्रम संपन्न होत आहे. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील शीख , सिकलीकर , बंजारा, लबाना, मोहियाल, सिंधी आणि इतर समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. तसेच विभागीय माहिती कार्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या घोषवाक्य व निबंध स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कोल्हापूर विभागाचे उपसंचालक (माहिती) प्रवीण टाके यांनी केले.

 नवी मुंबई येथे 28 फेब्रुवारी व 1 मार्च रोजी होणाऱ्या हिंद दी चादर श्री गुरु तेगबहादूर साहिब जी यांच्या 350 व्या शहीदी समागम कार्यक्रमात कोल्हापूर जिल्ह्यातून सहभाग नोंदविला जाण्यासाठी तसेच या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाच्या अनुषंगाने उपसंचालक श्री टाके यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक झाली. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, सहायक संचालक वृषाली पाटील, माहिती अधिकारी फारुक बागवान तसेच विविध समाज बांधव उपस्थित होते.

तिसऱ्या टप्प्यात संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमात कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश आहे. उपसंचालक प्रवीण टाके यांनी ही बैठक आयोजित करण्यापाठीमागील भूमिका विशद केली.

 तर जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ यांनी निबंध व घोषवाक्य स्पर्धा आयोजनाबाबत माहिती दिली. या शताब्दी वर्षानिमित्त विभागीय माहिती कार्यालयाच्या वतीने खुल्या व महाविद्यालयीन अशा दोन गटांत निबंध व घोषवाक्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक स्पर्धकांनी आपले साहित्य २५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत hinddichadarkolhapur@gmail.com या ई-मेलवर पाठवावे. जिल्हयातील जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन बैठकीत करण्यात आले.

  कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील बंजारा समाजाचे अनेक समाज बांधव मोठया प्रमाणावर सहभागी होणार असल्याची माहिती लखन पोवार व रतन चव्हाण यांनी दिली. तर कार्यक्रमाच्या स्वरूपाबाबत वसंत नाईक यांनी माहिती दिली.

०००००

Friday, February 13, 2026

प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकाऱ्यांशी साधला जिल्हाधिकाऱ्यांनी संवाद

 


 





कोल्हापूर दि : 13 (जिमाका) मसूरी येथील ट्रेनिंग अकॅडमीमध्ये प्रशिक्षणार्थी आयएएस म्हणून प्रशिक्षण घेतलेल्या सन 2025 च्या वर्षातील बॅचच्या प्रशिक्षणार्थींनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांना भेट देत तेथील महसूली कामकाजा विषयक माहिती घेतली.

 

         या प्रशिक्षणार्थींशी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी त्यांच्या दालनात संवाद साधला. कोल्हापूर जिल्ह्यातील सहकार चळवळ अतिशय समृद्ध व सुस्थितीत असून या चळवळीचा जरूर मागोवा घ्या, अशी सूचना यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशिक्षणार्थींना केली. हे भारतीय प्रशासकीय सेवेतील प्रशिक्षणार्थी 15 फेब्रुवारी पर्यंत जिल्ह्यात राहणार असून जिल्ह्यातील विविध उद्योग समूह, शासकीय कार्यालये, ऐतिहासिक स्थळे या ठिकाणी समूहाने भेट देवून तेथील कार्यशैली समजावून घेणार आहेत. याप्रसंगी प्रशिक्षणार्थींनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना मसुरी येथील ट्रेनिंग सेंटरची प्रतिमा भेट म्हणून दिली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, मनपा उपायुक्त पारितोष कंकाल आदी उपस्थित होते .

 

00000

प्रत्येक वैद्यकीय सुविधांच्या बांधकामांवर योग्य सनियंत्रण ठेवून विहित वेळेत कामे पूर्ण करा - मंत्री हसन मुश्रीफ









कोल्हापूर जिल्ह्यातील वैद्यकीय शिक्षण विभागाच्या महत्त्वकांक्षी सर्व प्रकल्पांचा आढावा

 

कोल्हापूर, दि. 13 : वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत जिल्ह्यात सुरू असलेल्या सर्व बांधकामांवर योग्य सनियंत्रण ठेवून विहित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. यावेळी ते म्हणाले, सर्व कामे विहीत वेळेत पुर्ण झाली तर केवळ कोल्हापूर जिल्ह्यालाच नव्हे तर परिसरातील पाच-सहा जिल्ह्यांतील सामान्य रुग्णांना अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांचा मोठा दिलासा मिळणार आहे. शेंडा पार्क येथे जिल्ह्यातील वैद्यकीय शिक्षण व आरोग्य सेवेच्या क्षेत्रात क्रांती घडवणाऱ्या सर्व प्रकल्पांचा एकत्रित आढावा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून घेण्यात आला. बैठकीला अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे, अधिक्षक अभियंता तुषार बुरुड, कार्यकारी अभियंता रोहित तोंदले, डॉ. अजित लोकरे, डॉ. भूषण मिरजे, डॉ. गिरीश कांबळे, डॉ. शिशिर मिरगुंडे, डॉ. भाग्यश्री खोत यांच्यासह समाविष्ट आस्थापनांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, कागल तालुक्यातील सांगाव येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र, पिंपळगाव खुर्द येथील शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय व रुग्णालय, आजरा तालुक्यातील उत्तुर येथील शासकीय योग व निसर्गोपचार पदवी महाविद्यालय व रुग्णालय तसेच महाराष्ट्र विज्ञान विद्यापीठाच्या विभागीय कार्यालयाच्या नियोजित इमारतीच्या कामांचा सविस्तर आढावा मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासकीय इमारतीत घेण्यात आला. कामांबाबत अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे व कार्यकारी अभियंता रोहित तोंदले यांनी माहिती दिली.

 

बैठकीत छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय (सीपीआर) परिसरातील विविध इमारतींच्या नूतनीकरण कामांच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. मंत्री मुश्रीफ यांनी सर्व कामे मार्च अखेर पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. या रुग्णालयात अनेक सुविधा अद्ययावत करण्यात आल्या असून, उर्वरित कामे पूर्ण करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे. याशिवाय शेंडा पार्क येथील पाणी पुरवठा योजना व मलनिस्सरण प्रकल्पांचे आराखडे तातडीने अंतिम करून आवश्यक प्रक्रिया प्रस्ताव वेळेत सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले.

 

सांगाव येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र, पिंपळगाव खुर्द येथील शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय व रुग्णालय आणि उत्तुर येथील शासकीय योग व निसर्गोपचार पदवी महाविद्यालय येथील चालू असलेल्या बांधकामांच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. या सर्व कामांना विहित वेळेत पूर्ण करण्यासाठी योग्य सनियंत्रण ठेवण्याबाबत बांधकाम विभागाला सूचना देण्यात आल्या.

 

00000

 

 

हिंद -दी -चादर संदर्भात विभागीय माहिती कार्यालयात आढावा बैठक संपन्न

 



 

कोल्हापूर, दि.  13 ( जिमाका) : हिंद दी चादर अर्थात श्री गुरु तेग बहादुर यांच्या 350 व्या शहिदी समागम शताब्दी वर्षानिमित्त नवी मुंबई - खारघर या ठिकाणी 28 फेब्रुवारी व 1 मार्च रोजी कार्यक्रम संपन्न होत आहे. तिसऱ्या टप्प्यात संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमात कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश आहे. येथील शीख, सिकलीकर, बंजारा, लबाना, मोहियाल, सिंधी आणि इतर समाजाचा या कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविला जावा तसेच या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाच्या अनुषंगाने आढावा घेण्यासाठी आज विभागीय माहिती कार्यालय येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.

            प्रारंभी उपसंचालक प्रवीण टाके यांनी, ही बैठक आयोजित करण्यापाठीमागील भूमिका विशद केली . तर या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील बंजारा समाजाचे अनेक समाज बांधव मोठया प्रमाणावर सामील होणार असल्याची माहिती लखन पवार व रतन चव्हाण यांनी दिली. या बैठकीत वसंत नाईक हेही सहभागी झाले होते .या प्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, माहिती अधिकारी फारूक बागवान, सहाय्यक संचालक वृषाली पाटील, उपसंपादक रणजीत पवार आदी उपस्थित होते 00000

 

Thursday, February 12, 2026

जिल्ह्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी अतिरीक्त निधी मिळणार – पालकमंत्री प्रकाश आबिटकर







जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सन 2026-27 आर्थिक वर्षाचा 947 कोटींचा आराखडा राज्य शासनास सादर


कोल्हापूर,दि.12 : जिल्ह्यातील महत्त्वाच्या योजना तसेच विविध प्रकल्पांसाठी अतिरीक्त निधीची आवश्यकता असून जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण मधून 947.21 कोटींचा प्रारुप आराखडा राज्य शासनास सादर करण्यात आला. या प्रारूप आराखड्याच्या मंजुरीबाबत राज्यस्तरीय बैठक राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली दि. 12 फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे संपन्न झाली. बैठकीत राज्याचे आरोग्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी विभागीय क्रिडा संकुल, मनपा कार्यालयाची शेंडा पार्क येथील नवीन इमारत यासह जिल्ह्यातील लोकसंख्या वाढीमुळे आवश्यक सोयीसुविधांसाठी अतिरीक्त निधीची मागणी केली. यानुसार राज्य शासनाकडून तो निधी मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी मुंबई येथील बैठकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ उपस्थित होते.  


 जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथून या बैठकीसाठी पालकमंत्री आबिटकर यांच्यासह खासदार धैर्यशील माने, आमदार अमल महाडीक, आमदार चंद्रदीप नरके, आमदार राहुल आवाडे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलीस अधीक्षक योगेशकुमार, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील, उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुख यांच्यासह सर्व कार्यान्वयीन यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.


सन 2026-27 करिता राज्य शासनाने कोल्हापूर जिल्ह्याकरता 537.20 कोटीचे नियोजन दिले होते. त्यामध्ये कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त 410 कोटी रुपयाचा आराखडा तयार करून शासनास 947 कोटी रुपयांचा आराखडा आजच्या बैठकीमध्ये सादर करण्यात आला. बैठकीत जिल्ह्यातील प्रारुप आराखड्याचे सादरीकरण जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. तसेच उपस्थिती लोकप्रतिनिधींनीही वाढीव निधी मिळण्याची विनंती मुख्यमंत्री फडणवीस यांना केली.


०००००

'हिंद दी चादर' समागमासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून जाणाऱ्या भाविकांच्या नियोजनबद्ध प्रवासासाठी सहकार्य करा - जिल्हाधिकारी अमोल येडगे

 

                               

 






                       व्यापक जनजागृतीसह विविध कार्यक्रमांचे आयोजन


कोल्हापूर, दि. १२ : नवी मुंबईतील खारघर येथे दि. २८ फेब्रुवारी व १ मार्च २०२६ रोजी आयोजित 'हिंद दी चादर' श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर, सर्व समाजघटकांतील भाविकांचा प्रवास सुरक्षित व्हावा आणि त्यांना अनुषंगिक सर्व सहकार्य मिळावे, या दृष्टीने यंत्रणांनी चोख नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले. 


या ऐतिहासिक कार्यक्रमास देशाचे प्रधानमंत्री, गृहमंत्री आणि विविध राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार असून, त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात सिंधी, शीख, सिकलगीर यांसह नऊ विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींची विशेष बैठक पार पडली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, माहिती उपसंचालक प्रवीण टाके, जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.


श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचा गौरवशाली इतिहास आणि त्यांचे बलिदान नव्या पिढीला ज्ञात व्हावे, यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये त्यांच्या जीवनकार्यावर आधारित गीतगायन, चित्रकला, वक्तृत्व, निबंध स्पर्धा आणि प्रभात फेऱ्यांचे आयोजन करण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या. निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी या उपक्रमांच्या व्यापक प्रसिद्धीसाठी दररोजची छायाचित्रे संकेतस्थळावर अपलोड करण्याचे निर्देश दिले असून, शैक्षणिक संस्थांमध्ये सतिंदर सरताज यांचे गाणे व माहितीपट दाखवून जनजागृती करावी, असेही स्पष्ट केले. या संपूर्ण प्रक्रियेत स्थानिक लोकप्रतिनिधींना आमंत्रित करून सामाजिक संघटनांशी सातत्याने समन्वय राखण्यावर त्यांनी भर दिला.


या शताब्दी वर्षानिमित्त विभागीय माहिती कार्यालयाच्या वतीने खुली व महाविद्यालयीन अशा दोन गटांत निबंध व घोषवाक्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक स्पर्धकांनी आपले साहित्य २५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत hinddichadarkolhapur@gmail.com या ई-मेलवर पाठवावे, असे आवाहन करण्यात आले असून जिल्हयातील जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे प्रशासकीय प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.


०००००

हिंद -की - चादर कार्यक्रमानिमित्त विभागीय माहिती कार्यालयात आढावा बैठकीचे आयोजन

 

कोल्हापूर, दि  12 ( जिमाका) : हिंद - की - चादर अर्थात श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी समागम शताब्दीनिमित्त नवी मुंबईतील खारघर येथे दिनांक 28 फेब्रुवारी व 1 मार्च रोजी राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राज्य शासनाने क्षेत्रीय आयोजन समिती गठीत केली आहे. या समितीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील आठ सदस्यांचा समावेश आहे.

           खारघर येथे होणाऱ्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने कोल्हापूर वासियांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग कशा पद्धतीने नोंदविता येईल यासाठी विचारविनिमय करण्यासाठी विभागीय माहिती कार्यालय या ठिकाणी शुक्रवार दिनांक 13 फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीसाठी क्षेत्रीय समितीतील सर्व सदस्यांना निमंत्रित केले आहे. दरम्यान हिंद - की - चादर या कार्यक्रमाची व्यापक व विपुल प्रमाणावर प्रसिद्धी होण्याच्या अनुषंगाने आणि गुरु तेग बहादुर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकण्यासाठी विभागीय माहिती कार्यालयाकडून निबंध व घोषवाक्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. खुल्या व महाविद्यालयीन अशा दोन गटामध्ये होणाऱ्या या स्पर्धेत स्पर्धक आपले निबंध व घोषवाक्य हे 25 फेब्रुवारीपर्यंत विभागीय माहिती कार्यालयात hinddichadarkolhapur@gmail.com (हिंद दी चादर कोल्हापूर ॲट द रेट जी मेल डॉट कॉम) या ई-मेल वर पाठवू शकतील. इच्छुकांनी मोठ्या संख्येने यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन विभागीय माहिती कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

0000

विभागीय क्रीडा संकुलाच्या १९५ कोटींच्या सुधारित आराखड्यास विभागीय समितीची मंजुरी







कोल्हापूरच्या क्रीडा परंपरेला साजेसे अद्ययावत संकुल बनवा - पालकमंत्री प्रकाश आबिटकर

कोल्हापूर, दि. ११ (जिमाका): छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुलाचा १९५ कोटी रुपयांचा सुधारित आराखडा विभागीय समितीसमोर सादर करण्यात आला असून, पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या आराखड्याला मंजुरी दिली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात आयोजित विभागीय क्रीडा संकुलाच्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी बोलताना पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले की, कोल्हापूर ही खऱ्या अर्थाने क्रीडानगरी आहे. त्यामुळे या जिल्ह्याच्या क्रीडा परंपरेला साजेसे आणि खेळाडूंच्या सर्वांगीण क्षमतेला वाव मिळेल, असे अद्ययावत क्रीडा संकुल उभारण्यात यावे.


या संकुलासाठी खरेदी करण्यात येणारे क्रीडा साहित्य दर्जेदार आणि उच्च गुणवत्तेचे असावे, त्याबाबत कोणतीही तडजोड केली जाऊ नये, असे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले. बैठकीदरम्यान आमदार अमल महाडिक यांनी क्रीडा धोरणाबाबत दीर्घकालीन पॉलिसी बनवण्याची आणि संकुलाच्या स्वच्छता व सुरक्षिततेसाठी बाह्य स्रोतांची मदत घेण्याची सूचना केली. या सुधारित आराखड्यानुसार, विभागात चार खेळांची 'एक्सलन्स सेंटर' सुरू करण्यात येणार आहेत. यामध्ये कोल्हापुरात कुस्ती व शूटिंग, साताऱ्यात धनुर्विद्या, तर सांगली येथे रोइंग केंद्र सुरू केले जाईल.


'मिशन लक्षवेध' योजनेअंतर्गत बारा क्रीडा प्रकारांची निवड करण्यात आल्याची माहिती विभागीय क्रीडा संकुल समितीचे सचिव सुहास पाटील यांनी सादरीकरणाद्वारे दिली.

या विभागीय क्रीडा            संकुल समितीच्या 195 कोटीच्या आराखड्यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे                              सिंथेटिक ॲथलेटिक्स ट्रॅक ,2000 आसन क्षमतेची गॅलरी, फीफा स्टॅंडर्ड फुटबॉल मैदान, स्पोर्ट्स हॉस्टेल,  मल्टीपर्पज इनडोअर हॉल , विविध खेळांच्या प्रशिक्षणासाठी मल्टीपर्पज बिल्डिंग, लॉन टेनिस सिंथेटिक कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट विविध खेळांची मैदाने,  नागरिकांसाठी वॉकिंग ट्रॅक, भंडारगृह, स्पोर्ट्स सायन्स लॅब आदी सुविधांचा समावेश आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने या आराखड्याला दोन दिवसांत तांत्रिक मान्यता देण्याचे आश्वासित केले आहे. या बैठकीला जिल्हाधिकारी अमोल येडगे, माहिती उपसंचालक प्रवीण टाके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता तुषार बुरुड, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, कार्यकारी अभियंता रोहित तोंदले, मनपाचे कार्यकारी अभियंता हर्षजीत घाटगे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


००००००

जेव्हा पालकमंत्र्यांची कौतुकाची थाप पाठीवर पडते तेव्हा ...

 




 

कोल्हापूर, दि.  11 (जिमाका) : जिल्हा परिषदेचे मेन राजाराम हायस्कूल व जुनिअर कॉलेज येथील  विद्यार्थिनींनी नाशिक येथे पार पडलेल्या १९ वर्षाखालील राज्यस्तरीय खो- खो स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवत कोल्हापूरच्या क्रीडा नगरीचा नावलौकिक वाढविला. या विद्यार्थिनींच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकण्यासाठी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आपल्या व्यस्त दिनचर्येतून आवर्जून वेळ काढत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली आणि यापुढे मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, याची ग्वाही दिली.

            निमित्त होते....नाशिक येथे राज्यस्तरीय पार पडलेल्या खो-खो क्रीडा स्पर्धेत मुलींनी प्रथम क्रमांक मिळविला.यातील सानिका चाफे, श्रावणी पाटील व अमृता पाटील या तीन खेळाडूंची निवड राष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली.27 डिसेंबर रोजी मध्य प्रदेशातील जबलपूर या ठिकाणी पार पडलेल्या या स्पर्धेत या संघाने द्वितीय क्रमांक मिळवला.

           या निमित्ताने जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात पार पडलेल्या या छोटेखानी समारंभात पालकमंत्री श्री आबिटकर यांच्या हस्ते या संघातील १२ खेळाडूंनाना नामवंत कंपनीचे स्पोर्ट शूज भेट दिले . तर या मुलींच्या संघातील खेळाडूंना प्रत्येकी दोन ट्रॅक सूट किट हे भेट स्वरूपात देणार असल्याची घोषणा आ.अमल महाडिक यांनी केली.

         यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकीयेन , क्रीडा उपसंचालक सुहास पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर,क्रीडा अधिकारी विद्या शिरस, मेन राजाराम हायस्कूल व ज्यु. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ  गजानन खाडे आदी उपस्थित होते.

 

चौकट :- ग्रामीण भागात फाटके बूट घालून खो - खो चा सराव करणाऱ्या या विद्यार्थ्यांची ही परिस्थिती पाहून जिल्हा प्रशासनाने CSR निधीतून या बारा विद्यार्थ्यांना नामवंत कंपनीचे स्पोर्ट शूज भेट देऊन त्यांच्यातील खेळाप्रति असलेल्या समर्पणाचा गौरव केला.

0000

कामांना गती देत दर्जेदार सुविधा आणि सर्वसमावेशक विकासावर भर द्या - पालकमंत्री प्रकाश आबिटकर

 




• मंजूर निधी मार्च अखेर पूर्णपणे खर्च करावा - सहपालकमंत्री माधुरीताई मिसाळ

• सन २०२६-२७ साठी राज्याकडे १०९३ कोटी रुपयांची मागणी

• समृद्ध शाळा आणि समृद्ध प्राथमिक आरोग्य केंद्र राज्यासाठी आदर्शवत

 

कोल्हापूर, दि. ११ : मंजूर निधीचा प्रभावी आणि पारदर्शक वापर करून नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, तसेच सर्व विकासकामे वेळेत, गुणवत्तापूर्ण, सर्वसमावेशक आणि गतिमान पद्धतीने पूर्ण करावीत, असे स्पष्ट निर्देश सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. मंजूर असलेला सर्व निधी मार्च अखेर खर्च व्हावा, तसेच ज्या विभागांना अतिरिक्त निधीची गरज आहे त्यांनी प्रस्ताव सादर करावेत, असे नगरविकास परिवहन राज्यमंत्री तथा सहपालकमंत्री माधुरीताई मिसाळ यांनी सांगितले.

 

जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि सहपालकमंत्री माधुरीताई मिसाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत ताराराणी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे संपन्न झाली. बैठकीपूर्वी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर जिल्हा नियोजन अधिकारी यांनी विषयसूचीचे वाचन केले. मागील बैठकीतील विषयांच्या अनुपालनाचा आढावा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी घेतला व त्यावर सविस्तर चर्चा झाली.

 

बैठकीला खासदार धैर्यशील माने, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार अमल महाडीक, आमदार चंद्रदीप नरके, आमदार राहुल आवाडे, आमदार अशोकराव माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील, उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, उपायुक्त (नियोजन) संजय मरकळे, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुख यांच्यासह सर्व कार्यान्वयीन यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते. यावेळी श्री अंबाबाई मंदिर व श्री जोतिबा विकास आराखड्याबाबत सविस्तर माहिती सादर करण्यात आली.

 

पालकमंत्री आबिटकर यांनी सांगितले की, चालू आर्थिक वर्षात ७६४ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय निधीपैकी आतापर्यंत ३०७ कोटी रुपये खर्च झाले असून उर्वरित निधी विहीत कालावधीत खर्च करणे आवश्यक आहे. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत ६४२ कोटींपैकी २२९ कोटी, तर विशेष घटक योजनेतील १२० कोटींपैकी ७७ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. पुढील सन २०२६-२७ आर्थिक वर्षासाठी ५५४ कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी करत एकूण १०९३ कोटी रुपयांची मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली असून यासंदर्भात उद्या मुंबई येथे माननीय मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत बैठक होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

 

सहपालकमंत्री माधुरीताई मिसाळ यांनी मंजूर निधी मार्च अखेरपर्यंत पूर्णपणे खर्च करण्याचे निर्देश देत, ज्या विभागांना अतिरिक्त निधीची आवश्यकता आहे त्यांनी प्रस्ताव सादर करावेत, त्यासाठी राज्य पातळीवर पाठपुरावा केला जाईल, असे सांगितले. मंदिर विकास आराखडे, शाहू स्मारक तसेच केएमसी बसेससाठी आवश्यक निधी कमी पडू दिला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

 

 

बैठकीत जिल्ह्यात सहा नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या बांधकामासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यास समितीने मंजुरी दिली. यामध्ये निलेवाडी (हातकणंगले), टाकळीवाडी व संभाजीपूर (शिरोळ), कांडगाव (करवीर), बेलेवाडी काळम्मा (कागल) आणि मळगे बु. (कागल) या ठिकाणांचा समावेश आहे. तसेच ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्रांमध्ये नव्याने सहा यात्रास्थळांचा समावेश करण्यास मान्यता देण्यात आली. यामध्ये हालसिद्धनाथ मंदिर इस्पूर्ली, राम मंदिर वळीवडे, केदारलिंग मंदिर कडगाव, महादेव मंदिर देवर्डे, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर शिंदेवाडी मा., मल्लनाथ मंदिर कानूर खुर्द तसेच मुरिसिद्धेश्वर बिरदेव मंदिर हसुर चप्पू या ठिकाणांचा समावेश आहे.

 

जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२६-२७ साठीच्या प्रारूप आराखड्यात प्राथमिक शाळा, अंगणवाड्या, शासनाकडून प्राप्त १५० दिवसांच्या आराखड्यांतर्गत कार्यालयीन इमारतींचे नूतनीकरण, सर्वंकष आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण, पोलीस यंत्रणेसाठी पायाभूत सुविधा, साकव बांधकाम, जिल्हा व ग्रामीण रस्त्यांचे मजबुतीकरण, पूर नियंत्रण, महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियान तसेच क्रीडा विभागाच्या योजनांचा समावेश आहे. यासाठी राज्यस्तरीय बैठकीत ₹४१०.०१ कोटी इतक्या अतिरिक्त मागणीस सभागृहाने मान्यता दिली.

 

याव्यतिरिक्त आमदारांनी रोजगार हमी योजना, पाणंद रस्ते, पूरस्थिती, वन्यप्राण्यांपासून नागरिकांचे संरक्षण, नव्याने मंजूर क्रिकेट स्टेडियम, शाळा व अंगणवाड्या तसेच नागरी क्षेत्रातील शाळांना निधी उपलब्ध करून देण्याबाबत विविध विषयांवर चर्चा केली. जिल्ह्यात वन्यप्राण्यांमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी सर्वंकष आराखडा तयार करण्याचे निर्देश वनविभागाला देण्यात आले. रेस्क्यू फोर्समध्ये वाढ, टास्क फोर्सची नियुक्ती तसेच आवश्यक साहित्य जिल्हा वार्षिक निधीतून उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी जंगल परिसरात आवश्यक उपाययोजना व योजना राबविण्याबाबतही वनविभागाला सूचना देण्यात आल्या. बैठकीनंतर जिल्हा वार्षिक योजनेमधून महसूल विभागाला देण्यात आलेल्या चारचाकी वाहनांच्या चाव्यांचे हस्तांतरण पालकमंत्री व सहपालकमंत्री यांच्याहस्ते करण्यात आले.

 

समृद्ध शाळा आणि समृद्ध प्राथमिक आरोग्य केंद्र राज्यासाठी आदर्शवत

 

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या सर्व शाळांकरिता समृध्द शाळा योजना २०२५-२६ राबविण्यात आली. या करिता रूपये ६४.०० कोटी इतका भरघोस निधी देण्यात आला. मागील वर्षीपेक्षा निधीमध्ये १२८.०० टक्के वाढ झाली. यामध्ये २०२५-२६ मध्ये २१३ इतक्या शाळांचा समावेश आहे. २०२६-२७ मध्ये इतकाच निधी देण्याचे प्रयोजन आहे. समृध्द प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत २०२५-२६ मध्ये २२ प्राथमिक आरोग्य केंद्रांना मंजूरी दिली. या करिता रूपये ११.७९ कोटी निधी देण्यात आला. २०२६-२७ मध्ये ४० प्राथमिक आरोग्य केंद्राकरिता रूपये १६.०० कोटी देण्यात येणार आहेत. तसेच अंगणवाडी केंद्रही अद्ययावत करण्यात येत आहेत. या सुरु असलेल्या प्रकल्पाची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी बैठकीत दिली. यातून जिल्ह्यातील शाळा, अंगणवाड्या आणि प्राथमिक आरोग्य केंद्र समृद्ध होत असून हा प्रकल्प राज्यासाठी आदर्शवत ठरत आहे.

 

00000000

Tuesday, February 10, 2026

हिंद दी चादर: महाराष्ट्राच्या मातीत गुंजणारा मानवतेचा जयघोष



 

महाराष्ट्राची भूमी ही मुळातच क्रांती आणि अध्यात्माचा एक अपूर्व संगम राहिलेली आहे. ज्या मातीने संत ज्ञानेश्वर-तुकारामांची अभंगवाणी जपली, त्याच मातीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा हुंकारही ऐकला. आज याच भूमीत श्री गुरु तेग बहादूरजी यांच्या अजोड बलिदानाला ३५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या ऐतिहासिक औचित्यावर 'हिंद दी चादर' हा उपक्रम शासन स्तरावर राबवला जात आहे, तो केवळ एका धार्मिक उत्सवाचा भाग म्हणून नव्हे, तर महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक वारशातील एका विस्मृतीत गेलेल्या सुवर्णधड्याची उजळणी करण्यासाठी. शिखांचे नववे गुरू, श्री गुरु तेग बहादूरजी यांच्या ४०० व्या प्रकाश पर्वानंतर सुरू झालेला हा जागर राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्याचे मुख्य कारण म्हणजे या महामानवाचा आणि महाराष्ट्राचा असलेला एक अदृश्य पण अत्यंत घट्ट असा ऐतिहासिक बंध. नवी मुंबई येथे २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी भव्य शहीदी समागम कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे या निमित्ताने.

 

गुरु तेग बहादूरजींना 'हिंद दी चादर' म्हटले जाते, कारण त्यांनी धर्माच्या पलीकडे जाऊन मानवी हक्कांचे रक्षण केले. परकीय राजवटीत जेव्हा अत्याचार झाले, तेव्हा स्वतःच्या धर्मासाठी नव्हे, तर दुसऱ्याच्या श्रद्धेच्या रक्षणासाठी दिल्लीच्या चांदणी चौकात आपले शीर देणारा हा महान क्रांतिकारी संत होता. महाराष्ट्राच्या दृष्टीने ही घटना अत्यंत महत्त्वाची ठरते, कारण ज्या काळात दक्षिण भारतात छत्रपती शिवाजी महाराज अन्यायाविरुद्ध तलवार गाजवत होते, त्याच काळात उत्तर भारतात गुरुजी आपल्या बलिदानातून 'निर्भयता' पेरण्याचे काम करत होते. या दोन्ही महान विभूतींचे शत्रू आणि त्यांचे ध्येय - म्हणजेच 'धर्म आणि स्वराज्याचे रक्षण' - हे एकच होते. हा ऐतिहासिक समांतर प्रवास आजही महाराष्ट्रातील नागरिकांना प्रेरणा देणारा ठरतो.

 

या उपक्रमाचे महत्त्व आजच्या धकाधकीच्या आणि विखुरलेल्या समाजात अधिक अधोरेखित होते. 'हिंद दी चादर' उपक्रम केवळ शीख समुदायासाठी मर्यादित नाही, तर तो प्रत्येक भारतीयासाठी आहे. आजच्या पिढीला हे समजणे आवश्यक आहे की, आपण ज्या लोकशाहीत आणि धार्मिक स्वातंत्र्यात श्वास घेत आहोत, त्याची पायाभरणी अशा अनेक सर्वोच्च बलिदानांतून झाली आहे. इतर समाजातील लोकांसाठी या उपक्रमाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे 'सर्वधर्मसमभावा'ची प्रत्यक्ष कृती त्यांना पाहायला मिळते. जेव्हा कोणत्याही धर्माचा पाईक गुरुजींच्या बलिदानाचा इतिहास वाचतो, तेव्हा त्याला हे उमजते की मानवता हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे.

 

महाराष्ट्राचा गुरु तेग बहादूरजींच्या कार्याशी असलेला संबंध केवळ विचारांपुरता मर्यादित नसून तो भौगोलिक आणि आध्यात्मिकही आहे. शिखांचे दहावे गुरु, गुरु गोविंद सिंगजी यांनी आपले शेवटचे वास्तव्य महाराष्ट्रातील नांदेड येथे केले, जिथे आज 'तख्त सचखंड श्री हुजूर साहिब' विराजमान आहे. गुरु तेग बहादूरजींच्या तत्त्वांचा वारसा घेऊनच धाकटे गुरु महाराष्ट्रात आले. तसेच, शीख धर्माच्या पवित्र 'गुरु ग्रंथ साहिब' मध्ये महाराष्ट्राचे लाडके संत नामदेव महाराज यांची ६१ पदे समाविष्ट आहेत. हा भक्ती आणि शक्तीचा अनोखा संगम पंजाबला महाराष्ट्राशी आणि

 

 

महाराष्ट्राला शीख इतिहासाशी कायमचा जोडून ठेवतो. 'हिंद दी चादर' हा उपक्रम म्हणजे या ऐतिहासिक ऋणांची कृतज्ञतापूर्वक केलेली परतफेड आहे.

 

ज्या महाराष्ट्राने नेहमीच अन्यायाविरुद्ध दाद मागण्याची परंपरा जपली आहे, त्या महाराष्ट्रात गुरु तेग बहादूरजींचे विचार घराघरात पोहोचणे म्हणजे लोकशाही मूल्यांना बळकट करणे होय. हा उपक्रम आपल्याला शिकवतो की, जेव्हा न्याय आणि सत्याचा प्रश्न येतो, तेव्हा त्याग हाच सर्वात मोठा विजय असतो. म्हणूनच, 'हिंद दी चादर' हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक पटलावर उमटलेला एक असा ठसा आहे, जो येणाऱ्या अनेक पिढ्यांना धैर्याने आणि स्वाभिमानाने जगण्याची वाट दाखवत राहील.

 

लेखन - सचिन अडसूळ, जिल्हा माहिती अधिकारी, कोल्हापूर

जिल्हास्तरीय लोकशाही दिन 2 मार्च रोजी

 


 

कोल्हापूर, दि. 10 (जिमाका) : सोमवार दि. 2 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराराणी सभागृहात सकाळी 11 वाजता जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आपल्या शासकीय, निमशासकीय विषयांकीत कामांच्या प्रशासकीय स्तरावरील वैयक्तिक तक्रारींबाबत न्याय मिळण्यासाठी स्वत: उपस्थित राहून अर्ज सादर करावा. शासन परिपत्रकातील मार्गदर्शक तत्वानुसार अर्ज स्वीकारले जातील. तसेच सकाळी 11 ते दुपारी 1 पर्यंतच अर्ज स्विकारले जातील. दुपारी 1 नंतर कोणताही अर्ज स्विकारला जाणार नाही, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी केले आहे.

 

तालुकास्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचा तिसरा सोमवार, जिल्हाधिकारी/ महानगरपालिका आयुक्त स्तर प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवार, विभागीय आयुक्त स्तर प्रत्येक महिन्याचा दुसरा सोमवार व मंत्रालय स्तरावर प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवार याप्रमाणे आयोजित करण्यात येतो.

 

अर्ज स्वीकृतीचे निकष याप्रमाणे-

अर्ज विहित नमुन्यात असावा (नमुना प्रपत्र 1 अ ते 1 ड), तक्रार /निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी, चारही स्तरावरील लोकशाही दिनांकरिता अर्जदाराने अर्ज विहित नमुन्यात 15 दिवस आधी 2 प्रतीत पाठविणे आवश्यक राहिल. तालुका लोकशाही दिनानंतर एक महिन्याने जिल्हाधिकारी/ महानगरपालिका आयुक्त लोकशाही दिनात अर्ज करता येईल, जिल्हाधिकारी/ महानगरपालिका आयुक्त लोकशाही दिनानंतर दोन महिन्यांनी विभागीय आयुक्त लोकशाही दिनात व विभागीय आयुक्त लोकशाही दिनानंतर दोन महिन्यानी मंत्रालय लोकशाही दिनात अर्ज करता येईल.

 

चारही स्तरावरील लोकशाही दिनात खालील बाबींशी संबंधित अर्ज स्विकारले जाणार नाहीत-

न्यायप्रविष्ठ प्रकरणे, राजस्व/अपील, सेवाविषयक, आस्थापना विषयक बाबी, विहित नमुन्यात नसणारे व त्यासोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे/ देण्यात येणार आहे अशा प्रकरणी पुन्हा त्याच विषयासंदर्भात केलेले अर्ज, तक्रार/ निवेदन वैयक्तिक स्वरुपाची नसेल तर अशा प्रकारचे अर्ज लोकशाही दिनात स्विकारले जाणार नाहीत.

 

लोकशाही दिनापूर्वी 15 दिवस अगोदर विहीत नमुन्यात करमणूक शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे आपले तक्रार अर्ज करावेत, असेही पत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.

0000

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचे जिवंत प्रतीक म्हणजे हस्तकला - खासदार धैर्यशील माने

 











चप्पल कारागिरांच्या नोंदणीसाठी ‘मिशन जीआय’- जिल्हाधिकारी अमोल येडगे

भौगोलिक मानांकन (GI) वापरकर्त्यांसाठी एकदिवसीय परिसंवाद

 

कोल्हापूर, दि. १० : हस्तकला महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे आणि कुशल कारागिरीचे जिवंत प्रतीक असून पारंपारिक हस्तकलेच्या प्रसिद्धीमधून ग्रामीण भागातील रोजगाराला मोठी चालना मिळेल, असे मत खासदार धैर्यशील माने यांनी व्यक्त केले. कोल्हापूरमधील हजारो हस्तकला कारागिरांसाठी एकत्रित व्यासपीठ तयार करण्याच्या उद्देशाने, येत्या काळात दोन एकर जागेवर सुमारे २०० कोटी रुपयांच्या निधीतून प्रकल्प उभारण्याचे प्रयत्न लवकरच सुरू केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. भारत सरकार विकास आयुक्त (हस्तशिल्प), पश्चिम विभागीय कार्यालय, मुंबई यांच्या वतीने राष्ट्रीय हस्तशिल्प विकास कार्यक्रमांतर्गत भौगोलिक मानांकन (GI) वापरकर्त्यांसाठी एकदिवसीय परिसंवाद आणि चर्चासत्र आज कोल्हापूर येथे उत्साहात पार पडले.

 

पश्चिम विभागात एकूण ६१ जीआय -नोंदणीकृत हस्तकला आहेत. कोल्हापुरी चप्पलापासून ते इतर पारंपरिक कलाकुसरांपर्यंत अनेक हस्तकलांचा यात समावेश आहे. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार धैर्यशील माने आणि कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे उपस्थित होते. परिसंवादात तज्ज्ञांनी जीआयचे महत्त्व प्रभावीपणे मांडत पारंपरिक ज्ञानाचे संरक्षण, हस्तकलेचे बाजारमूल्य वाढवणे आणि कारागिरांच्या उपजीविकेच्या संधी अधिकाधिक समृद्ध करणे याबाबत माहिती दिली.

 

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पुढील १०० दिवसांच्या विशेष 'मिशन जीआय' च्या माध्यमातून, कोल्हापुरातील सर्व चप्पल कारागिरांचे अर्ज भरून घेऊन जीआय प्रमाणपत्राच्या प्रक्रियेला वेग देणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाला बेंगळुरू एनआयएफटीचे संचालक डॉ. यथिंद्र लख्खाना, मुंबईचे वरिष्ठ सहायक संचालक चंद्रशेखर सिंह, सहायक निदेशक पल्लवी जांभुळकर, मनोज राठी आणि हस्तशिल्प संवर्धन अधिकारी आकाश मुळीक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यशाळेत मान्यवरांच्या हस्ते कारागिरांना जीआय मानांकन प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.

 

कारागिरांना आपले अनुभव शेअर करण्याची, अडचणी मांडण्याची आणि पश्चिम विभागातील जीआय हस्तकलांच्या शाश्वत विकासासाठी नव्या संधी शोधण्याची सोनेरी संधी यातून मिळाली. याचवेळी खासदार आणि जिल्हाधिकारी यांच्या हस्ते पाच राज्यांतील विविध कुशल कारागिरांच्या हस्तकला वस्तूंचे विशेष प्रदर्शनाचे देखील भव्य उद्घाटन झाले. प्रदर्शनात कच्छ (राजस्थान), गोवा, मध्य प्रदेश, सावंतवाडी आणि तुळजापूर अशा विविध प्रांतांतील कारागिरांनी आपले स्टॉल्स लावले होते, ज्यात विविध कलाकृतींचे प्रदर्शन करण्यात आले.

 

000000