** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Thursday, October 8, 2026

जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांनी पन्हाळा तालुक्यातील विविध पिकांची केली पाहणी

 


कोल्हापूर दि. 3 : यावर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी पिके करपली आहेत. ट्रिगर वन लागू केलेल्या तालुक्यांमधील पीक पंचनाम्याची कारवाई जलद गतीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासाठी शासकीय सुट्ट्यांच्या दिवशीही पीक पंचनाम्याचे काम अखंडितपणे सुरू ठेवण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी यांनी पन्हाळा तालुक्यातील मौजे दानेवाडी, जाफळे, केखले, माले , शहापूर अशा विविध ठिकाणी भेट देऊन भात, सोयाबीन, भाजीपाला, ज्वारी, भुईमूग  आदी पिकांची पाहणी केली.

 

या भेटींमध्ये जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करून शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन ठाम आहे. नुकसान भरपाई देण्याकरिता पंचनामे जलद गतीने करणे सुरू आहेत. शेतकरी बांधवांनी आवश्यक कागदपत्रे देऊन सहकार्य करावे असे आवाहन केले. तसेच सर्व संबंधित शासकीय कर्मचारी, अधिकारी यांना लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. क्षेत्रीय अधिकारी यांना चारा उपलब्ध बाबत नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

यावेळी त्यांच्या समवेत पन्हाळा प्रांताधिकारी डॉ. समीर शिंगटे, तालुका कृषी अधिकारी श्रीमती तापोळे यांच्यासह विविध कर्मचारी शेतकरी उपस्थित होते.

*****

 

 

जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड शाहूवाडी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर




कोल्हापूर दि. ७; जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये कमी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ . विजय राठोड यांनी शाहूवाडी तालूक्यातील मौजे मोळावडे येथील शेतकरी श्री. रामचंद्र शिवाजी पाटील यांचे  शेतावर भुईमूग  पिकाची  श्री. सयाजी शंकर पाटील यांचे शेतावर रताळी   पिकाची पाहणी केली. मौजे ससेगाव या गावात श्री. गुंगा आनंदा पारळे , श्री.तानाजी महिपती पारळे श्री. केशव गुंडा पारळे  या शेतकऱ्यांच्या शेतावर भात पिकाची पाहणी केली. 

जिल्हाधिकारी यांनी मोळावडे व ससेगावातील उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधून सध्य स्थितीतील पीक परिस्थिती संदर्भात चर्चा केली.


कमी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची पिके वाळून गेल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर विजय राठोड यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना दिलासा दिला.


     यावेळी त्यांच्या समवेत उपविभागीय अधिकारी डॉ. समीर शिंगटे, तालुका कृषि अधिकारी मा. निलम चाकणे , मंडळ कृषी अधिकारी संजय तांदळे , अशोक कोळेकर , सदर गावाचे सरपंच , पोलीस पाटील , शेतकरी , सहायक कृषी अधिकारी, तलाठी आदि. उपस्थित होते .

Thursday, October 1, 2026

ट्रिगर-१ लागू असलेल्या तालुक्यांत सुट्टीच्या दिवशीही पीक पंचनाम्याची कारवाई सुरू ठेवण्याचे आदेश

 

 

​            कोल्हापूर 1 (जिमाका) : दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील संबंधित तालुक्यांमध्ये ट्रिगर-१ (प्रथम कळ) लागू करण्यात आला आहे. केंद्र शासनाकडे मदतीचे ज्ञापन तातडीने सादर करावयाचे असल्याने पीक पंचनाम्याची कारवाई जलद गतीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासाठी २ ऑक्टोबर (सार्वजनिक सुट्टी) तसेच ३ व ४ ऑक्टोबर २०२६ (शासकीय सुट्ट्या) या दिवशीही पीक पंचनाम्याचे काम अखंडितपणे सुरू ठेवण्याचे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हास्तरीय दुष्काळ देखरेख समिती गजानन गुरव यांनी दिले आहेत. 

 

​            पीक परिस्थितीची वस्तुनिष्ठ माहिती, आवश्यक छायाचित्रे आणि GPS Coordinates संकलित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पंचनाम्याची कारवाई कोणत्याही परिस्थितीत प्रलंबित राहू नये, यासाठी तलाठी, ग्राम महसूल अधिकारी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक व संबंधित अधिकाऱ्यांची नियुक्ती सुनिश्चित करून सुट्टीच्या दिवशीही कामकाज सुरू ठेवले जाणार आहे.

 

​            ट्रिगर-१ लागू असलेल्या सर्व गावांमध्ये व क्षेत्रांमध्ये पीक पंचनाम्याची कारवाई तात्काळ सुरू ठेवून प्रत्यक्ष पाहणीद्वारे वस्तुनिष्ठ नोंद करावी.​ पंचनाम्यादरम्यान आवश्यक छायाचित्रांसह GPS Coordinates संकलित करणे बंधनकारक राहील. ​दररोज सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत दिवसअखेरची अद्ययावत आकडेवारी  जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करावी.

 

 महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभागाने आपापसात समन्वय ठेवून काम विहित कालमर्यादेत पूर्ण करावे. कोणतीही त्रुटी, दुबार नोंद किंवा चुकीची आकडेवारी राहणार नाही याची संयुक्त दक्षता संबंधित तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी व गट विकास अधिकारी यांनी घ्यावी. तसेच प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी दररोज तालुका स्तरावर आढावा घेतला जाईल.

           

​            २ ते ४ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत पूर्ण झालेल्या पंचनाम्यांची स्वतंत्र दैनंदिन आकडेवारी ठेवून ती पुढील अहवालात समाविष्ट केली जाईल. ​केंद्र शासनास सादर करावयाचे ज्ञापन अत्यंत तातडीचे व प्राधान्याचे असल्याने कोणत्याही स्तरावर विलंब होणार नाही याची काटेकोर दक्षता घेण्याचे निर्देश प्रशासनातर्फे देण्यात आले आहेत.

00000