** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, November 27, 2026

महात्मा जोतीराव फुले : शिक्षण आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी आयुष्य समर्पित करणारे विचारवंत

 



 

महात्मा जोतीराव फुले यांची पुण्यतिथी 28 नोव्हेंबर रोजी आहे. समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लेखन करणारे विचारवंत म्हणून त्यांचे कार्य महाराष्ट्राच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्यांच्या विचारांचा केंद्रबिंदू शिक्षण, समता, श्रमाची प्रतिष्ठा आणि शेतकऱ्यांचे हित हा होता.

महात्मा जोतीराव फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी पुणे येथे झाला. तत्कालीन समाजात शिक्षणाची संधी सर्वांना समान नव्हती. विशेषतः शेतकरी, कष्टकरी, महिला आणि वंचित घटक शिक्षणापासून दूर होते. शिक्षणाअभावी समाजाची प्रगती होऊ शकत नाही, ही महात्मा फुले यांची ठाम भूमिका होती. त्यामुळेच त्यांनी शिक्षण प्रसाराला आपल्या कार्याची सुरुवात मानली.

विद्या हेच प्रगतीचे साधन

महात्मा फुले यांनी सांगितले की, “विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नितीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले...”  याचा अर्थ असा की, शिक्षण नसेल तर योग्य विचार करता येत नाही, योग्य विचार नसेल तर योग्य आचरण घडत नाही आणि त्यामुळे आर्थिक प्रगतीही होत नाही. शिक्षण हेच व्यक्तीच्या आणि समाजाच्या उन्नतीचे मूळ साधन आहे, असे त्यांचे मत होते. या विचारातूनच त्यांनी पत्नी सावित्रीबाई फुले यांच्यासोबत 1848 साली पुणे येथे मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. त्याकाळी मुलींना शाळेत पाठवणे ही सामान्य बाब नव्हती. अनेक अडचणींना सामोरे जात त्यांनी हे शिक्षणाचे महत्वपूर्ण कार्य सातत्याने सुरू ठेवले. पुढे त्यांनी अनेक शाळा सुरू केल्या. शिक्षण सर्वांसाठी खुले असावे आणि मुलींनाही मुलांइतकीच शिक्षणाची संधी मिळावी, यासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले.

 

शेतकऱ्याचा असूड : शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे विवेचन

महात्मा जोतीराव फुले यांनी शेतकऱ्यांच्या जीवनावर ‘शेतकऱ्याचा असूड’ हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथात त्यांनी शेतकऱ्यांची तत्कालीन स्थिती, त्यांच्या अडचणी आणि त्यांच्या प्रगतीसाठी शिक्षणाचे महत्त्व यावर प्रकाश टाकला आहे. महात्मा फुले यांच्या मते, शेतकरी हा समाजाचा मूळ आधार आहे. शेतीवर देशाची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. मात्र शेतकरी अनेक अडचणींना तोंड देत होता. शिक्षणाचा अभाव, माहितीचा अभाव, आर्थिक अडचणी आणि पारंपरिक रूढी यामुळे शेतकऱ्यांची प्रगती थांबली होती. शेतकऱ्यांना आधुनिक ज्ञान, शेतीविषयक माहिती आणि शिक्षण मिळाले तर त्यांची स्थिती सुधारू शकेल, असे त्यांनी आपले मत मांडले.

शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथात महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांचे विविध प्रकार सांगितले आहेत. शेतीवर निर्वाह करणारे कुणबी, बागाईत करणारे माळी आणि पशुपालन करणारे धनगर अशा सर्व कष्टकरी घटकांचा त्यांनी शेतकरी म्हणून उल्लेख केला आहे. हे सर्व घटक शेती आणि श्रमावर आधारित जीवन जगत होते. त्यांच्या कष्टाला योग्य प्रतिष्ठा आणि शिक्षणाची जोड मिळावी, ही त्यांची अपेक्षा होती.

 

शेती सोडून स्थलांतराची समस्या

यात महात्मा जोतीराव फुले यांनी एक महत्त्वाची बाब नमूद केली आहे. अनेक शेतकऱ्यांना शेती परवडत नसल्याने त्यांनी शेती सोडून इतर व्यवसायाकडे वळावे लागले. कोणी व्यापार, कोणी मजुरी, कोणी नोकरी अशा विविध मार्गांनी उदरनिर्वाह करू लागले. शेतीतून मिळणारे उत्पन्न अपुरे असल्याने आणि शिक्षणाचा अभाव असल्याने कुटुंबाची आर्थिक स्थिती खालावत गेली. काही कुटुंबांनी पूर्वी संपत्ती, जहागिरी, इनामे मिळवली होती. मात्र शिक्षणाअभावी पुढील पिढ्यांना ती संपत्ती सांभाळता आली नाही. त्यामुळे अनेक कुटुंबे कर्जबाजारी झाली. यावरून शिक्षण आणि आर्थिक नियोजन यांचे महत्त्व महात्मा फुले यांनी अधोरेखित केले.

सत्यशोधक समाज आणि सामाजिक प्रबोधन

दि. 24 सप्टेंबर 1873 रोजी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सर्व मानव समान आहेत, हा या समाजाचा मुख्य संदेश होता. अंधश्रद्धा दूर कराव्यात, शिक्षणाचा प्रसार करावा, बालविवाह, हुंडा यासारख्या अनिष्ट प्रथा बंद व्हाव्यात, यासाठी त्यांनी प्रबोधन केले. त्यांनी विधवा पुनर्विवाहाला पाठिंबा दिला. बालहत्या प्रतिबंधासाठी गृह सुरू केले. सर्वांसाठी पाण्याची सार्वजनिक विहीर खुली केली. या कार्यातून सामाजिक समतेचा संदेश त्यांनी कृतीतून दिला.

शासन आणि समाज यांच्यासाठी प्रेरणा

महात्मा जोतीराव फुले यांच्या कार्याची दखल तत्कालीन समाजाने आणि शासनानेही घेतली. १८८८ साली त्यांना ‘महात्मा’ ही पदवी देण्यात आली. त्यांच्या कार्याचा गौरव विविध स्तरांतून करण्यात आला.            दि 28 नोव्हेंबर 1890 रोजी त्यांचे निधन झाले. मात्र त्यांचे विचार आजही मार्गदर्शक आहेत. शिक्षणाचा प्रसार, शेतकऱ्यांचे हित, महिलांचे सक्षमीकरण आणि सामाजिक समता ही उद्दिष्टे आज शासनाच्या विविध योजना आणि धोरणांमध्ये दिसून येतात.

महात्मा जोतीराव फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या विचारांचे स्मरण करणे म्हणजे केवळ अभिवादन करणे नव्हे, तर शिक्षणाचा प्रसार करणे, शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रयत्न करणे आणि समाजात समता निर्माण करण्यासाठी योगदान देणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.


 

 

-रणजित पवार,

उपसंपादक,

विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूर

 

000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.