इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शुक्रवार, २८ जानेवारी, २०२२

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा संपन्न

 


 

कोल्हापूर, दि. 28 (जिमाका):  जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रमुख व्ही. व्हि.जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव पंकज देशपांडे यांच्या सूचनेनुसार ज्येष्ठ कवी. वि.वा.शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मशताब्दी निमित्त मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमाचे आज विधी सेवा प्राधिकरण येथे आयोजन करण्यात आले होते.

विधी सेवा प्राधिकरणाचे सहा.अधिक्षक राजीव माने यांनी सुत्रसंचलन केले.

विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव पंकज देशपांडे म्हणाले, सर्व भाषांचे ज्ञान असणे काळानुसार गरजेचे आहे, परंतु मराठी भाषेला  दोष देऊन इतर भाषेचा सन्मान करणे चुकीचे आहे. मराठी भाषेचा वापर कायम केला तर ती भाषा जिवंत व समृध्द होईल व इतर भाषेप्रमाणे मराठी भाषेलाही महत्व दिले पाहिजे. घरामध्ये मुलांच्या समोर तसेच इतर ठिकाणी सुद्धा मराठी भाषेचा जास्तीत-जास्त वापर केला पाहिजे. मराठी भाषेविषयी जनजागृती केली पाहिजे. तसेच पत्रव्यवहार, संवाद, मराठी परिपत्रके नियमित वाचन करणे, मराठी साहित्याची ओळख मुलांना लहानपणापासूनच करून देणे अतिशय गरजेचे आहे तर आणि तरच मराठी भाषेची उन्नती होईल, अशा शब्दांत  त्यांनी यावेळी मार्गदर्शन केले.

यावेळी जिल्हा न्यायालयातील अधिकारी कर्मचारी व विधी सेवा प्राधिकरणातील  विधी स्वयंसेवक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार  सहा. अधिक्षक श्री. माने यांनी मानले.

000000

गुरुवार, २७ जानेवारी, २०२२

ध्वनीक्षेपक व ध्वनिवर्धक वापरास बंद जागा खेरीज इतर ठिकाणी ध्वनीची विहित मर्यादा राखून मान्यता -जिल्हाधिकारी राहुल रेखावार

 


कोल्हापूर, दि. 27 (जिमाका)  : ध्वनीक्षेपक व ध्वनिवर्धक यांचा वापर श्रोतगृहे, सभागृहे, सामुहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागांखेरीज इतर ठिकाणी फक्त ध्वनीची विहित मर्यादा राखून  सकाळी  6  वाजल्यापासून  रात्री  12 वाजेपर्यंत जिल्ह्यामध्ये वापर करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी मान्यता दिली आहे. कोणत्याही ध्वनी प्रतिबंधीत क्षेत्राच्या परिसरामध्ये कोणतीही सुट राहणार नाही. तसेच ध्वनीवर्धक / ध्वनीक्षेपक लावण्यासाठी पोलीस विभागाची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक आहे.

ध्वनीक्षेपक व ध्वनिवर्धक यांच्या वापरासाठी सुट घोषित केलेले सण/उत्सव-    

शिवजयंती (पारंपारिक) -1 दिवस, ईद-ए-मिलाद-1 दिवस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती-1 दिवस, दहीहंडी (गोपाळकाला)- 1 दिवस, मोहरम (दि. 31 जुलै ते 9 ऑगस्ट) मोहरम- नववा दिवस (कत्तलरात्र), गणपती  उत्सव (दि. 31 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर) गणेशोत्सव -  4 दिवस (सहावा, आठवा, नववा व दहावा दिवस) नवरात्री  उत्सव (अष्टमी  व नवमी) -2 दिवस, दिपावली (लक्ष्मीपुजन)- 1 दिवस, ख्रिसमस- 1 दिवस, 31 डिसेंबर -1 दिवस, उर्वरित 1 दिवस आवश्यकतेनुसार महत्वाच्या कामासाठी.

00000

 

 

स्वातंत्र्य सैनिक व स्वातंत्र्य सैनिक विधवा पत्नी यांनी समस्या निराकरणासाठी तहसिलदार, जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित रहावे

 

 

 


 

कोल्हापूर, दि. 27 (जिमाका): जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक व स्वातंत्र्य सैनिक विधवा पत्नी यांना त्यांच्या काही समस्या/प्रश्न असल्यास त्यांच्या समस्या/ प्रश्नांवर योग्य ती कार्यवाहीस्तव चर्चा व निराकरणासाठी जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक व स्वातंत्र्य सैनिक विधवा पत्नी यांनी ते ज्या तालुक्यात सद्यस्थितीत राहत आहेत, त्या तालुक्याच्या तहसिलदार यांच्या कार्यालयात तहसिलदारा समक्ष उद्या दि. 28 जानेवारी 2022 रोजी दुपारी 4 वाजता उपस्थित राहून आपले प्रश्न व समस्या मांडाव्यात, असे आवाहन उपजिल्हाधिकारी (महसूल) श्रावण क्षीरसागर यांनी केले आहे.

 त्याचप्रमाणे करवीर तालुक्यातील जे स्वातंत्र्य सैनिक व स्वातंत्र्य सैनिक विधवा पत्नी करवीर तालुक्यात व कोल्हापूर शहरात राहतात त्यांनी ताराराणी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे उद्या दि. 28 जानेवारी 2022 रोजी दुपारी 4 वा. समक्ष उपस्थित राहून आपले प्रश्न व समस्या सांगाव्यात, असे आवाहनही करण्यात आले आहे.

0000000

नारी शक्ती पुरस्कारासाठी 31 जानेवारीपर्यंत प्रस्ताव सादर करावेत

 


 

कोल्हापूर, दि. 27 (जिमाका):  केंद्र शासनाच्या नारी शक्ती पुरस्कारासाठी महिला कल्याणाच्या क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या महिला, महिला गट, शैक्षणिक, सामाजिक संस्था यांच्याकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. यासाठी अर्जदाराने आपले अर्ज/ नामनिर्देशन योग्य त्या कागदपत्रासह www.awards.gov.in  या संकेतस्थळावर ऑनलाईन  भरावयाचे आहे. प्रस्ताव दि. 31 जानेवारीपर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शिल्पा पाटील यांनी केले आहे.

 

 

 

नामनिर्देशनासाठी  पात्रता-

सर्व व्यक्ति आणि संस्थांसाठी पुरस्कार खुला आहे. वैयक्तिक श्रेणीच्या बाबतीत नामांकन मिळाल्याच्या तारखेच्या शेवटच्या तारखेस किमान वय 25 वर्षे असणे आवश्यक आहे. अर्जदार संस्थेने संबंधित क्षेत्रात किमान 5 वर्षे काम केलेले असावे. यापूर्वी नारी शक्ती पुरस्कार व स्त्री शक्ती पुरस्कार प्राप्त व्यक्ति अथवा संस्था अर्ज करु शकणार नाहीत. व्यक्ति, संस्था, अशासकीय संस्था यांनी महिलांच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीकरिता तसेच महिलांसाठीच्या पारंपारिक व आधुनिक क्षेत्रामध्ये काम केलेले असावे. तसेच महिलांचे आरोग्य, शिक्षण, संरक्षण व काळजी व उन्नती, आदर व महिलांच्या सन्मानाकरिता काम केलेले असावे.

दोन लाख रुपये रोख रक्कम, स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

0000000

बुधवार, २६ जानेवारी, २०२२

मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये ध्वजारोहण

 



कोल्हापूर, दि. 26 (जिल्हा माहिती कार्यालय): भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये उपविभागीय अधिकारी  सुशांत बनसोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

ध्वजारोहणाच्या कार्यक्रमास सहकार न्यायालयाच्या न्यायाधीश अनुसया पाटील, स्वाती पाटील, राज्य गुप्त विभागाचे अपर उपायुक्त उमेश हजारे, मुख्य गुप्तवार्ता अधिकारी सचिन पाटील, नायब तहसिलदार मनोजकुमार ऐतवडे यांच्यासह प्रशासकीय इमारतीतील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

000000

जिल्हा परिषदेत अध्यक्षांच्या हस्ते ध्वजारोहण

 


कोल्हापूर दि. 26(जिल्हा माहिती कार्यालय): भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या प्रांगणात  जिल्हा परिषद अध्यक्ष  राहूल पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. 

ध्वजारोहणाच्या कार्यक्रमास शिक्षण सभापती रसिका पाटील, समाज कल्याण सभापती कोमल मिसाळ, महिला व बालकल्याण सभापती शिवाणी भोसले, मुख्यकार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अतीरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, प्रकल्प संचालक रवी शिवदास यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य, अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

000000

 


जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते

जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

कोल्हापूर दि. 26(जिल्हा माहिती कार्यालय): भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते  ध्वजारोहण करण्यात आले.

कार्यक्रमास अतिरिक्त जिल्हाधिकरी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव, करवीरचे उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

000000

स्वातंत्र्य सैनिकांच्या निवासस्थानच्या नामफलकाचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते अनावरण

 स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त

कोल्हापूर जिल्हा प्रशासनाचा अनोखा उपक्रम

पालकमंत्र्यांच्या हस्ते उपक्रमाचा शुभारंभ

 




स्वातंत्र्य सैनिकांच्या निवासस्थानच्या नामफलकाचे

पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते अनावरण

 

·         स्वातंत्र्य सैनिक श्री. गोविंद सदाशिव जोशी व श्री. वसंतराव ज्ञानदेव माने यांच्या निवासस्थानी जाऊन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केला त्यांचा सन्मान

 

          कोल्हापूर, दि.26(जिमाका): स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा प्रशासनातर्फे कोल्हापूर जिल्ह्यातील हयात 9 स्वातंत्र्यसैनिकांचा प्रजासत्ताक दिनी गौरव करुन त्यांच्या निवासस्थानी नामफलकाचे अनावरण करण्यात येत आहे. कोल्हापूर शहरातील स्वातंत्र्य सैनिक श्री. गोविंद सदाशिव जोशी (बापट कॅम्प), श्री. वसंतराव ज्ञानदेव माने (टेंबलाई हिल साईट) यांच्या निवासस्थानी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण करुन या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, तहसीलदार शीतल मुळ्ये- भामरे, स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंबिय तसेच पर्यटन क्षेत्रासह विविध क्षेत्रातील मान्यवर, परिसरातील नागरिक उपस्थित होते.

यावेळी जिल्हा प्रशासनाच्या वतीने पालकमंत्री सतेज पाटील व जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते स्वातंत्र्य सैनिक श्री. जोशी व श्री. माने  यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पालकमंत्री श्री पाटील यांनी त्यांच्याशी संवाद साधून आस्थेवाईकपणे विचारपूस केली.

जिल्हा प्रशासनाच्या वतीने टप्प्या-टप्प्याने जिल्ह्यातील सर्व स्वातंत्र्य सैनिकांच्या निवासस्थानाबाहेर त्यांच्या नावाचा फलक लावण्यात येणार आहे, असे सांगून या उपक्रमामुळे स्वातंत्र्य सैनिकांच्या कार्याची माहिती होवून त्यातून सर्वांना प्रेरणा मिळेल, असे पालकमंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्ह्याचे पालकमंत्री व जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यात ऑगस्ट 2023 पर्यंत विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. स्वातंत्र्य संग्रामामध्ये योगदान दिलेल्या स्वातंत्र्य सैनिकांचे नाव, त्यांच्या कार्याची ओळख सर्वांना परिचित होण्याच्या उद्देशाने विविध उपक्रम घेण्यात येणार आहेत. 

स्वातंत्र्य सैनिकांच्या सन्मानाप्रित्यर्थ त्यांच्या निवासस्थानाबाहेर जिल्हा प्रशासनातर्फे त्यांच्या नावाच्या फलकाचे अनावरण करुन त्यांचा सन्मान करण्यात येत आहे. यामध्ये कागल तालुक्यात -3, शिरोळ तालुक्यात- 3, करवीर तालुक्यात- 2 व राधानगरी तालुक्यात -1 अशा 9 ठिकाणी कार्यक्रम होत आहे. हा कार्यक्रम स्थानिक आमदार, प्रांताधिकारी, तहसीलदार, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होईल.

स्वातंत्र्य सैनिकांचे जिल्हा स्तरावरील प्रश्न मार्गी

लावण्यासाठी लवकरात लवकर बैठक घ्यावी

-पालकमंत्री सतेज पाटील

स्वातंत्र्य सैनिकांचे जिल्हा स्तरावरील प्रश्न मार्गी लावण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी लवकरात लवकर बैठक घ्यावी, अशी सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली. तसेच कोरोना परिस्थिती निवळल्यावर जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्वातंत्र्य सैनिकांना विमानप्रवासाची सोय उपलब्ध करुन देण्यासाठी कार्यवाही करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

ध्वजारोहणाच्या मुख्य कार्यक्रमानंतर पालकमंत्री श्री. पाटील यांनी स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात स्वातंत्र्य सैनिकांना शासनाच्या वतीने सन्मानपत्र मिळावे, अशी अपेक्षा उपस्थित स्वातंत्र्य सेनानींनी केल्यावर यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करु, असे पालकमंत्री श्री. पाटील यांनी सांगितले. 

000000 

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या शुभेच्छा! जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील -पालकमंत्री सतेज पाटील

 





कोल्हापूर, दि. 26 (जिल्हा माहिती कार्यालय): विकासाच्या दिशेने वाटचाल करणारा आपला कोल्हापूर जिल्हा उद्योग, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, वैद्यकीय, सांस्कृतिक आणि पर्यटन क्षेत्रात चांगली प्रगती करत आहे, जिल्हयाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असून शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही देऊन पालकमंत्री सतेज पाटील यांनी प्रजासत्ताक दिनाच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्ह्यातील नागरीकांना शुभेच्छा दिल्या.

          येथील छत्रपती शाहू स्टेडीयमवर पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अतिरिक्त जिल्हाधिकारी किशोर पवार, अतिरीक्त पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. जिल्ह्यातील उपस्थित स्वातंत्र्य सैनिक-कुटुंबियांना पालकमंत्र्यांनी गुलाब पुष्प देवून त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली तसेच त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी महानगरपालिकेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या दिनदर्शिकेचे पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

              पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने 11 हजार हून अधिक बेडची उपलब्धता ठेवली आहे. यामध्ये साडेतीन हजार ऑक्सिजन बेड, साडेसातशे आयसीयू बेड तर साडेतीनशे व्हेंटीलेटर बेड उपलब्ध आहेत. जिल्ह्यात सीपीआर हॉस्पीटल, आयजीएम, इचलकरंजी, गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालय तसेच गांधीनगर, आजरा, राधानगरी, मलकापूर, मुरगूड, कोडोली, आसुर्ले-पोर्ले, आयसोलेशन हॉस्पीटल असे एकूण 15 पीएसए प्लँट व 8 एलएमओ प्लँट जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून कार्यान्वित करण्यात आले आहेत. सध्या जिल्ह्यात 147 मेट्रिक टन ऑक्सिजन साठा उपलब्ध आहे. तिसऱ्या लाटेचा प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचे ते म्हणाले.

          लसीकरणास प्राधान्य- पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत कोरोना लसीकरणाची मोहीम जानेवारी 2021 पासून जिल्ह्यात राबविण्यास सुरुवात केली आहे. आज पर्यंत जिल्ह्यातील सुमारे 30 लाख लाभार्थ्यांना पहिला डोस तर 21 लाखाहून अधिक नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. जिल्ह्यात 15 ते 18 वयोगटातील 91 टक्के विद्यार्थ्यांचे लसीकरण झाले आहे. यापुढील टप्पा बुस्टर डोसचीही जिल्ह्यात सुरुवात झाली आहे.

कोविड मृत्यू : 32 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर

              कोवीडमुळे मृत्यू झालेल्या प्रत्येक रुग्णाच्या नातेवाईकांना शासनाच्यावतीने प्रत्येकी 50 हजार असे एकूण 32 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर झाले असून नातेवाईकांच्या बँक खात्यावर थेट अनुदानाची रक्कम वर्ग करण्याची कार्यवाही सुरु असल्याचे ते म्हणाले.

पब्लिक ॲड्रेस सिस्टीम 615 ठिकाणी कार्यान्वित

              पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, पूर नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना करण्याबाबतचा कृती आराखडा करुन संपूर्ण राज्यासमोर पूर परिस्थितीत पूर व्यवस्थापनाचा कोल्हापूर पॅटर्न राबविण्यात आला आहे. जिल्ह्यातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीची माहिती तात्काळ होण्यासाठी पब्लिक ॲड्रेस सिस्टीम जिल्ह्यातील 615 ठिकाणी कार्यान्वित करण्यात आली आहे.

 

              कोल्हापूर जिल्ह्यात करवीर संस्थान कालावधीत 1947 च्या आदेशानुसार 5 हजार एकर लागवडीलायक क्षेत्र 1 हजार अनुसूचित जातीतील कुंटूंबाना व 10 हजार एकर पड जमीन अनुसुचित जातीच्या समाजातील कुटुंबांना वाटपासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या आदेशाची अंमलबजावणी काही तालुक्यात झाली नसल्याने त्याचा लाभ संबंधित कुंटूंबाना झाला नव्हता. या कुटुंबांना त्यांच्या जमिनी देण्याबाबतची कार्यवाही जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.

              राज्यातील शहीद जवानांच्या वीरमाता, वीरपत्नी यांना 5 एकर शेती योग्य जमिन वाटप करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामध्ये कोल्हापूर जिल्हयातील 13 वीर जवानांच्या कुंटूबांना जमीन देण्यात आली आहे. तसेच चंदगड तालुक्यातील मौजे-सडगुडवळे येथील 20 कुंटूबांना प्रत्येकी 5 एकर जमिनीचे शेतीयोग्य भूखंड तयार करून वाटप करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे.

              जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सन 2021-22 अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्याच्या विविध विकास कामासाठी 375 कोटी निधी प्राप्त झाला होता. या निधीतून कोविड-19 अंतर्गत उपाययोजना राबवण्यासाठी 112 कोटीचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे. त्यानुसार विविध आरोग्य सुविधांची उपलब्धता जिल्ह्यात करण्यात येत आहे.

              रमाई आवास योजनेअंतर्गत 2021-22 या वर्षामध्ये नागरी क्षेत्रातील 156, ग्रामीण क्षेत्रामध्ये 325 प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. सामाजिक न्याय भवनाच्या प्रांगणात मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी प्रशस्त अभ्यासिका बांधण्यात येत आहे. तसेच शासकीय निवासी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी याकरीता अद्ययावत डिजीटल क्लासरुम निर्माण करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील तृतीयपंथीय व्यक्तींना ओळखप्रमाणपत्र देण्यात येत आहे. तृतीयपंथीय व्यक्तींचे कल्याण व त्यांच्या हक्काच्या संरक्षणासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

              जिल्ह्यात शिवभोजन थाळी योजने अंतर्गत 44 सेंटर कार्यरत आहेत. या योजनेअंतर्गत 27 लाख शिवभोजन थाळीचे वाटप करण्यात आले आहे.

 

‘मिशन कोल्हापूर गोल्ड’उपक्रम क्रीडा क्षेत्रासाठी दिशादर्शक

          आंतरराष्ट्रीय पातळीवर जिल्ह्यातील खेळाडूंना अधिकाधिक संधी मिळावी, यासाठी क्रीडा विभागामार्फत ‘मिशन कोल्हापूर गोल्ड’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत खेळाडूंसाठी गोल्ड, सिल्व्हर आणि ब्रॉन्झ या तीन गटात सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. या गटा व्यतिरिक्त विशेष कौशल्य असणाऱ्या खेळाडूंसाठी मदत व सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्याने सुरु केलेला हा उपक्रम क्रीडा क्षेत्रासाठी दिशादर्शक असेल, असे पालकमंत्री श्री. पाटील यावेळी म्हणाले.

              जल जीवन मिशन अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात एक हजारहून अधिक योजनांसाठी 921 कोटीचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे. याअंतर्गत पाणीपुरवठ्याच्या विविध योजना राबवून सन 2024 पर्यंत प्रत्येक ग्रामीण कुटुंबास वर्षभर पाणी देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

पर्यटनासाठी 'डेस्टिनेशन कोल्हापूर'

              पर्यटनाच्या दृष्टीने कोल्हापूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी येथील पर्यटन स्थळांचा विकास करण्यात येत आहे. 'कोल्हापूर'ला जगाच्या नकाशावर पुढे घेऊन जाण्यासाठी 'डेस्टिनेशन कोल्हापूर' या महत्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत 'टुरिझम कोल्हापूर' उपक्रम सुरु करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटन समृध्द करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. आपल्या जिल्ह्याची नोंद जागतिक पर्यटन स्थळांच्या यादीत लवकरच होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विमानतळावरुन आता.. मालवाहतूक सेवा-

              कोल्हापूर विमानतळावर अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच विमानतळावर नाईट लँडिंग, कार्गो विमानसेवा, टर्मिनल इमारत आणि विमानतळ धावपट्टीच्या विकासासाठी आवश्यक 64 एकर जागेच्या हस्तांतरणाबाबत प्रयत्न सुरु आहेत. कोल्हापूर विमानतळावरून माल वाहतूक सेवेसाठी भारतीय नागरी विमान सुरक्षा ब्युरो ने मान्यता दिली असून यामुळे जिल्ह्याच्या शेती व शेतीपूरक व्यवसाय, स्थानिक उद्योग आणि व्यवसाय वाढीला तसेच पर्यटनाला चालना मिळणार आहे.

              औद्योगिक नगरी म्हणून प्रसिध्द असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात उद्योग व्यवसाय वाढीसाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. एमआयडीसीच्या माध्यमातून सुमारे 37 हेक्टर जमीन नवीन उद्योजकांना देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शिरोली, गोकुळ शिरगाव आणि फाईव्ह स्टार एमआयडीसी मध्ये सुमारे 870 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. त्यामुळे 4 हजार हून अधिक रोजगार निर्मिती होणार आहे. कोल्हापूरात आणखी उद्योग येण्यासाठी तयार आहेत. त्यांच्यासाठीही जमीन व अन्य सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील.

इलेक्ट्रिक वाहनांना चालना देणार

          इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेतर्फे प्रथमच इलेक्ट्रिक वाहनांकरिता चार्जिंग स्टेशन उभारणाऱ्या नागरिकांना, गृहनिर्माण संस्थांना मालमत्ता करात दोन ते तीन टक्के सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

भिलारच्या धर्तीवर आता प्रत्येक जिल्ह्यात पुस्तकाचे गाव उभे राहणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही लवकरच पुस्तकांचे गाव उभे करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

         देशाची, राज्याची तसेच आपल्या कोल्हापूर जिल्ह्याची सर्वांगीण प्रगती होण्यासाठी जागरुक नागरिक म्हणून आपण सर्वांनी एकत्रित येऊन काम करुया !  अशी अपेक्षा व्यक्त करुन पालकमंत्री श्री. पाटील यांनी पुनश्च: एकदा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा  दिल्या.

00000

मंगळवार, २५ जानेवारी, २०२२

जिल्हयाचे मनरेगा अंतर्गत लक्षांकाची पूर्तता मनुष्यदिवसांच्या लक्षांकाची पूर्तता केल्याबद्दल पालकमंत्र्यांनी केले कौतुक

 


 

कोल्हापूर, दि.25 (जिमाका) : मनरेगा आयुक्त, नागपूर यांच्याकडून जिल्हयासाठी 3 लाख 42 हजार  620 इतके मनुष्यदिवसाचे लक्षांक प्राप्त झाले होते. जिल्हयास प्राप्त मनुष्यदिवसांच्या लक्षांकाची 100 टक्के पूर्तता केली असल्याचे उपजिल्हाधिकारी (रोहयो) प्रशांत खेडेकर यांनी कळविले आहे.  

          पालकमंत्री सतेज पाटील यांनी मनरेगा अंतर्गत सन 2021-22 मध्ये दिलेल्या मनुष्यदिवसांच्या लक्षांकाची पूर्तता केल्याबद्दल जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उपजिल्हाधिकारी (रोहयो) यांचे कौतुक केले तसेच पुढील कामास शुभेच्छा दिल्या.

          सन 2021-22 मध्ये दिलेल्या मनुष्यदिवसाचे लक्षांकपूर्तीसाठी विविध यंत्रणांकडून घरकूल, नाडेप कंपोष्ट व्हर्मी कंपोष्ट, फळबाग लागवड, वैयक्तिक शौचालय, शौषखड्डा, पाणंद रस्ता, सिंचन विहीर, जनावरांचा गोठा, रेशीम किटक संगोपन, वृक्षलागवड, शाळा संरक्षक भिंत, सार्वजनिक शौचालय इत्यादी प्रकारची कामे हाती घेण्यात आली.

          जिल्हाधिकारी राहुल रेखावार, मुख्य कार्यकारी अधिकारी, संजयसिंह चव्हाण यांनी वेळोवेळी सर्व यंत्रणांचा आढावा घेवून लक्षाकपूर्तीसाठी मार्गदर्शन केले. पुणे विभागाच्या  उपायुक्त (रोहयो), नयना बोंदार्डे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरूण जाधव, आणि बीडाओ (नरेगा) शुभदा पाटील यांनी सर्व यंत्रणांशी समन्वय साधून लक्षांकपूर्तीसाठी प्रोत्साहीत केले.

          गटविकास अधिकारी- आजरा, भूदरगड, चंदगड, गडहिंग्लज, हातकणंगले, कागल, राधानगरी व शिरोळ, तालुका कृषी अधिकारी गगनबावडा, पन्हाळा व राधानगरी, वनक्षेत्रपाल (सा.वनिकरण) चंदगड आणि जिल्हा रेशिम अधिकारी कोल्हापूर यांनी सन 2021-22 मध्ये दिलेल्या लक्षांकापेक्षा जास्त लक्षांकपूर्ती केलेली आहे.

0 0 0 0 0 0

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव बोधचिन्हाच्या स्टँडीचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते अनावरण

 





 

कोल्हापूर, दि. 25 (जिमाका): भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करुन स्वातंत्र्य लढ्यातील आठवणींना उजाळा देण्यात येत आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त कोल्हापूर विभागीय माहिती कार्यालयाच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव बोधचिन्ह स्टँडी तयार करण्यात आली असून बोधचिन्ह स्टँडीचे अनावरण पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बोधचिन्ह स्टँडी अनावरण कार्यक्रमास जिल्हाधिकारी राहूल रेखावार, कोल्हापूर महापालिकेच्या प्रशासक कादंबरी बलकवडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, कोल्हापूर विभागाचे माहिती उपसंचालक  डॉ. संभाजी खराट यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमास सहायक संचालक फारुक बागवान, माहिती अधिकारी, वृषाली पाटील, माहिती सहायक एकनाथ पोवार यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालय, माहिती कार्यालयातील कर्मचारी व पत्रकार उपस्थित होते.

000000

 

 

 

कोल्हापूर जिल्हा सर्वसाधारण वार्षिक योजनेची राज्यस्तरीय नियोजन बैठक संपन्न कोल्हापूर जिल्ह्याच्या वार्षिक योजनेसाठी उपमुख्यमंत्र्यांनी मंजूर केला 400 कोटींचा निधी

 







  पालकमंत्री सतेज पाटील यांच्या प्रयत्नामुळे 78 कोटींच्या अतिरिक्त निधीला मंजुरी

कोल्हापूर जिल्ह्यातील नाविन्यपूर्ण योजनांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले कौतुक

नवनवीन संकल्पनांचा वापर करुन लोकसहभागातून नाविन्यपूर्ण योजना राबविण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन

 

कोल्हापूर, दि.25(जिमाका): कोल्हापूर जिल्हा सर्वसाधारण वार्षिक योजनेंतर्गत सन 2022-23 साठी  322  कोटींचा आराखडा राज्यस्तरीय समितीपुढे सादर करण्यात आला होता. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या प्रयत्नामुळे कोल्हापूर जिल्हा वार्षिक योजनेच्या वित्तीय मर्यादेत 78 कोटींची अतिरिक्त भर पडून सन 2022-23 साठी  400 कोटींच्या निधीस राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी राज्यस्तरीय बैठकीत मंजुरी दिली.

 कोल्हापूर जिल्ह्यात सुरु असलेली आणि प्रस्तावित कामे नाविन्यपूर्ण  असल्याबद्दल कौतुक करुन उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, नवनवीन संकल्पनांचा वापर करुन कोल्हापुरकरांच्या गरजेनुसार नाविन्यपूर्ण योजना राबवाव्यात. सामाजिक उत्तरदायित्व निधी, जिल्हा वार्षिक योजना आणि लोकसहभागातून अशी कामे करण्यासाठी प्राधान्य द्यावे.

कोल्हापूर जिल्हा वार्षिक योजना 2022-23 च्या आराखड्याला मान्यता देण्यासाठी राज्यस्तरीय बैठक उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन पद्धतीने झाली. या बैठकीला मुंबईतून पालक सचिव राजगोपाल देवरा तसेच वित्त विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पुण्यातून विभागीय आयुक्त सौरभ राव सहभागी झाले. कोल्हापूर मधून कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील, आमदार प्रकाश आवाडे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार यांच्यासह जिल्ह्यातील संबंधित यंत्रणांचे अधिकारी सहभागी झाले.

कोल्हापूर जिल्ह्याची  लोकसंख्येची घनता अधिक आहे.  मानव विकास निर्देशांकात राज्यात कोल्हापूर जिल्हा पाचव्या क्रमांकावर तर दरडोई उत्पन्नात सहाव्या क्रमांकावर आहे. पूरपरिस्थितीमुळे जिल्ह्याची मोठ्या प्रमाणावर हानी झाली असून रस्ता दुरुस्ती, जॅकवेलसह बऱ्याच बाबींवर जिल्हा वार्षिक योजनेतून निधी खर्च होतो. तर महिला व बाल विकासासाठी 3 टक्के राखीव निधी ठेवावा लागतो. राज्यस्तरावर राबविण्यात येणाऱ्या बऱ्याच योजनांचे जिल्हास्तरावरील सर्वसाधारण योजनेत हस्तांतर झाले आहे. पण या प्रमाणात जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीत वाढ झाली नाही. आदी सर्व बाबींचा विचार होवून कोल्हापूर जिल्ह्याला निधी वाढवून मिळावा, अशी मागणी पालकमंत्री सतेज पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली.

पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले,  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यात येत आहे.  सन  2022-23 च्या आराखड्यात क्लिनिकल स्किल लॅब, सुसज्ज व आधुनिक ग्रंथालय, मत्स्यालय बांधकाम, वन्यजीव संक्रमण व उपचार केंद्र, सौर कुंपण, जिल्हा परिषदेच्या शाळांचा विकास आदी कामे प्रस्तावित आहेत. 

जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती, पर्यटन विकास आणि लोकसंख्या लक्षात घेता कोल्हापूर जिल्ह्यासाठी भरीव तरतूद करण्याची विनंती पालकमंत्री सतेज पाटील यांनी उपमुख्यमंत्री श्री.पवार यांना केली.

जिल्ह्याला आणखी वाढीव निधी देण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत चर्चा करु, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

राज्यस्तरीय बैठकीत पालकमंत्री सतेज पाटील यांनी मांडलेले मुद्दे अभ्यासपूर्ण असून याबाबींवर राज्यस्तरावर बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. 

पालकमंत्री सतेज पाटील यांनी सादर केलेले मुद्दे-

* सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना निधी वाटपासाठी नियोजन विभागाच्या शासन निर्णयानुसार निधी वाटपासाठी सुत्र निश्चित केले आहे. कोल्हापूर जिल्हा राज्याच्या उत्पन्नात भर घालत आहे, त्यामुळे जिल्हयाच्या उत्पन्नाच्या तुलनेत जिल्हयाला निधी मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे निधी वाटपाचे सूत्र बदलणे आवश्यक आहे.

* राज्यस्तरावरील योजनांचे जिल्हा वार्षिक योजनेमध्ये हस्तांतरण झाल्याने त्या प्रमाणात निधीचे प्रमाण वाढवावे.

* वैदयकीय शिक्षण विभागाच्या शासकीय वैदयकीय महाविदयालय बांधकाम विस्तारीकरणासाठी डीपीसी मधून खर्च करण्यास मान्यता द्यावी. या अनुषंगाने राजर्षि छत्रपती शाहू महाराज शासकीय महाविदयालय व संलग्नित छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय बांधकाम, दुरुस्ती, अग्निशमन यंत्रणा खरेदी व देखभाल व औषधाकरीता जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करण्यासाठी मान्यता मिळावी.

* पोलीस व तुरुंग विभागाच्या आस्थापनेमधील पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी स्वतंत्र लेखाशीर्ष उपलब्ध करुन मिळावे.

* शासकीय कार्यालयातील देखभाल दुरुस्तीसाठी डीपीसी मधून निधी खर्च करण्यास परवानगी मिळावी.

* जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत सर्व योजनांच्या तांत्रिक मान्यता देण्याचे अधिकार जिल्हा स्तरावर मिळावेत.

    जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जिल्हा वार्षिक योजना 2022-23 च्या प्रारुप आराखड्याचे सादरीकरण केले. शासनाने सन 2022-23 वर्षाकरिता 322 कोटींची वित्तीय मर्यादा दिली होती. प्रस्तावित केलेल्या नियतव्ययानुसार रूपये 200 कोटींच्या वाढीव मागणीसह एकूण 522 कोटींचा प्रारुप आराखडा बैठकीसमोर ठेवण्यात आला.

जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले, जिल्ह्यात यावर्षी नाविन्यपूर्ण आणि इतर योजनांतर्गत सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली, शालेय शिक्षणात आभासी वास्तविकता तंत्रज्ञानाचा वापर, वन अमृत प्रकल्प आदी कामे सुरु आहेत. तर राधानगरी अभयारण्यात जंगल सफारीची सोय करण्यात आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम, कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना, अंगणवाडी इमारत बांधकाम आदी कामे सुरु आहेत.

00000000

नवभारत घडविण्यासाठी मतदारांनी पुढाकार घ्यावा -शंकरराव जाधव

 








कोल्हापूर, दि. 25 (जिमाका): नवभारत घडविण्यासाठी मतदारांसह, नवमतदारांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात 12 व्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी अश्विनी जिरंगे व करवीर तहसिलदार श्रीमती शितल मुळे-भामरे व्यासपीठावर उपस्थित होते.

जाधव पुढे म्हणाले, मतदान करणे हा केवळ मतदारांचा उत्सव नाही तर राज्यघटनेवर विश्वास असणाऱ्या प्रत्येक सुजाण नागरिकांचा पर्यायाने लोकशाहीचा महोत्सव आहे. कोणत्याही अमिषाला बळी न पडता मतदारांनो उत्स्फूर्त व सदसदविवेक बुध्दीने मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

तत्पूर्वी, गेल्या वर्षी सुमारे 88 हजार 106 नवमतदारांनी नोंदणी केली असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री. कांबळे यांनी प्रास्ताविकात दिली. राष्ट्रीय मतदान दिनाच्या अनुषंगाने यावेळी उपस्थित सर्व नवमतदारांना सामुहिक शपथ देण्यात आली. याप्रसंगी डॉ. आझाद नायकवडी  यांनी मतदान करण्याविषयी प्रबोधनात्मक पोवाडा सादर केला.

          या राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून दिव्यांग मतदार व तृतीयपंथी मतदारांना इपिक कार्ड देणे, निबंध स्पर्धेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना तसेच उत्कृष्ट पर्यवेक्षक, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांना श्री. जाधव यांच्या हस्ते गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रदीप पाटील तर आभार प्रदर्शन शितल मुळे-भामरे यांनी केले.

000000

 

शुक्रवार, २१ जानेवारी, २०२२

साहित्य उत्सव, वाचन कट्टा उपक्रम राबवून वाचन संस्कृती रुजवुया -पालकमंत्री सतेज पाटील ग्रंथालयांनी डिजिटल वाचनाची सुविधा देण्यास प्रयत्न करावेत

 





 

कोल्हापूर, दि.21 (जिमाका) : कोल्हापूर ही राजर्षी शाहूंची भूमी आहे, या भूमीला ऐतिहासिक वारसा आहे. अनेक साहित्यिक या भूमीत जन्मले आहेत. नवोदित वाचक, साहित्यिक तयार होण्यासाठी वाचनसंस्कृती वाढविणे आवश्यक आहे. 'साहित्य उत्सव', 'वाचन कट्टा' यांसारखे उपक्रम  जिल्ह्यात नियमितपणे राबवून वाचन संस्कृती रुजविण्यासाठी प्रयत्न करुया, असे आवाहन कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.

जिल्हा वार्षिक योजनेच्या नाविन्यपूर्ण योजनेतून कोल्हापूर जिल्ह्यात कार्यरत शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते ग्रंथ वाटप करण्यात आले, यावेळी श्री. पाटील बोलत होते. कार्यक्रमास जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकर, तांत्रिक सहायक उत्तम कारंडे उपस्थित होते.

 पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, मोबाईल, व्हाट्सअपसारख्या आधुनिक तंत्रज्ञान व साधन सामुग्रीमुळे पुस्तक वाचनाची सवय मोडत चालली आहे. वाचाल तर वाचाल’ या उक्तीप्रमाणे वाचनाची सवय पुनरुज्जीवित करण्याची गरज आहे. विचारांमुळे आयुष्याचा पाया तयार होतो. तर वाचनामुळेच प्रगल्भ विचार तयार होतात. सध्याची पिढी डिजिटल वाचनाकडे वळत चालली आहे, त्यामुळे ग्रंथालयांनी डिजिटल वाचनाचा पर्याय उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करायला हवेत.

कोल्हापूरच्या भूमीला ऐतिहासिक वारसा असून या पवित्र भूमीत जन्माला आल्याचं मला समाधान वाटतं असे ते म्हणाले. मी देखील वाचनाचा छंद जोपासला असून पाच ते साडेपाच हजार पुस्तके माझ्या घरच्या ग्रंथालयात आहेत. कितीही व्याप असला तरी देखील पुस्तक वाचण्यासाठी मी आवर्जून वेळ देतो, असे सांगून ते म्हणाले, माझ्या वैचारिक जडणघडणीत आई-वडिलांचे संस्कार आणि वाचनाचा सिंहाचा वाटा आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकर यांनी केले. कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे भीमराव पाटील व ग्रंथ मित्र बाबासाहेब कावळे यांनी मनोगत व्यक्त केले. आभार करवीर नगर वाचन मंदिरच्या ग्रंथपाल मनीषा शेणई यांनी मानले.

0000000