इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

बुधवार, २६ जानेवारी, २०२२

स्वातंत्र्य सैनिकांच्या निवासस्थानच्या नामफलकाचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते अनावरण

 स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त

कोल्हापूर जिल्हा प्रशासनाचा अनोखा उपक्रम

पालकमंत्र्यांच्या हस्ते उपक्रमाचा शुभारंभ

 




स्वातंत्र्य सैनिकांच्या निवासस्थानच्या नामफलकाचे

पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते अनावरण

 

·         स्वातंत्र्य सैनिक श्री. गोविंद सदाशिव जोशी व श्री. वसंतराव ज्ञानदेव माने यांच्या निवासस्थानी जाऊन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केला त्यांचा सन्मान

 

          कोल्हापूर, दि.26(जिमाका): स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा प्रशासनातर्फे कोल्हापूर जिल्ह्यातील हयात 9 स्वातंत्र्यसैनिकांचा प्रजासत्ताक दिनी गौरव करुन त्यांच्या निवासस्थानी नामफलकाचे अनावरण करण्यात येत आहे. कोल्हापूर शहरातील स्वातंत्र्य सैनिक श्री. गोविंद सदाशिव जोशी (बापट कॅम्प), श्री. वसंतराव ज्ञानदेव माने (टेंबलाई हिल साईट) यांच्या निवासस्थानी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण करुन या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, तहसीलदार शीतल मुळ्ये- भामरे, स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंबिय तसेच पर्यटन क्षेत्रासह विविध क्षेत्रातील मान्यवर, परिसरातील नागरिक उपस्थित होते.

यावेळी जिल्हा प्रशासनाच्या वतीने पालकमंत्री सतेज पाटील व जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते स्वातंत्र्य सैनिक श्री. जोशी व श्री. माने  यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पालकमंत्री श्री पाटील यांनी त्यांच्याशी संवाद साधून आस्थेवाईकपणे विचारपूस केली.

जिल्हा प्रशासनाच्या वतीने टप्प्या-टप्प्याने जिल्ह्यातील सर्व स्वातंत्र्य सैनिकांच्या निवासस्थानाबाहेर त्यांच्या नावाचा फलक लावण्यात येणार आहे, असे सांगून या उपक्रमामुळे स्वातंत्र्य सैनिकांच्या कार्याची माहिती होवून त्यातून सर्वांना प्रेरणा मिळेल, असे पालकमंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्ह्याचे पालकमंत्री व जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यात ऑगस्ट 2023 पर्यंत विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. स्वातंत्र्य संग्रामामध्ये योगदान दिलेल्या स्वातंत्र्य सैनिकांचे नाव, त्यांच्या कार्याची ओळख सर्वांना परिचित होण्याच्या उद्देशाने विविध उपक्रम घेण्यात येणार आहेत. 

स्वातंत्र्य सैनिकांच्या सन्मानाप्रित्यर्थ त्यांच्या निवासस्थानाबाहेर जिल्हा प्रशासनातर्फे त्यांच्या नावाच्या फलकाचे अनावरण करुन त्यांचा सन्मान करण्यात येत आहे. यामध्ये कागल तालुक्यात -3, शिरोळ तालुक्यात- 3, करवीर तालुक्यात- 2 व राधानगरी तालुक्यात -1 अशा 9 ठिकाणी कार्यक्रम होत आहे. हा कार्यक्रम स्थानिक आमदार, प्रांताधिकारी, तहसीलदार, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होईल.

स्वातंत्र्य सैनिकांचे जिल्हा स्तरावरील प्रश्न मार्गी

लावण्यासाठी लवकरात लवकर बैठक घ्यावी

-पालकमंत्री सतेज पाटील

स्वातंत्र्य सैनिकांचे जिल्हा स्तरावरील प्रश्न मार्गी लावण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी लवकरात लवकर बैठक घ्यावी, अशी सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली. तसेच कोरोना परिस्थिती निवळल्यावर जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्वातंत्र्य सैनिकांना विमानप्रवासाची सोय उपलब्ध करुन देण्यासाठी कार्यवाही करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

ध्वजारोहणाच्या मुख्य कार्यक्रमानंतर पालकमंत्री श्री. पाटील यांनी स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात स्वातंत्र्य सैनिकांना शासनाच्या वतीने सन्मानपत्र मिळावे, अशी अपेक्षा उपस्थित स्वातंत्र्य सेनानींनी केल्यावर यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करु, असे पालकमंत्री श्री. पाटील यांनी सांगितले. 

000000 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.