इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शुक्रवार, २१ जानेवारी, २०२२

साहित्य उत्सव, वाचन कट्टा उपक्रम राबवून वाचन संस्कृती रुजवुया -पालकमंत्री सतेज पाटील ग्रंथालयांनी डिजिटल वाचनाची सुविधा देण्यास प्रयत्न करावेत

 





 

कोल्हापूर, दि.21 (जिमाका) : कोल्हापूर ही राजर्षी शाहूंची भूमी आहे, या भूमीला ऐतिहासिक वारसा आहे. अनेक साहित्यिक या भूमीत जन्मले आहेत. नवोदित वाचक, साहित्यिक तयार होण्यासाठी वाचनसंस्कृती वाढविणे आवश्यक आहे. 'साहित्य उत्सव', 'वाचन कट्टा' यांसारखे उपक्रम  जिल्ह्यात नियमितपणे राबवून वाचन संस्कृती रुजविण्यासाठी प्रयत्न करुया, असे आवाहन कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.

जिल्हा वार्षिक योजनेच्या नाविन्यपूर्ण योजनेतून कोल्हापूर जिल्ह्यात कार्यरत शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते ग्रंथ वाटप करण्यात आले, यावेळी श्री. पाटील बोलत होते. कार्यक्रमास जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकर, तांत्रिक सहायक उत्तम कारंडे उपस्थित होते.

 पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, मोबाईल, व्हाट्सअपसारख्या आधुनिक तंत्रज्ञान व साधन सामुग्रीमुळे पुस्तक वाचनाची सवय मोडत चालली आहे. वाचाल तर वाचाल’ या उक्तीप्रमाणे वाचनाची सवय पुनरुज्जीवित करण्याची गरज आहे. विचारांमुळे आयुष्याचा पाया तयार होतो. तर वाचनामुळेच प्रगल्भ विचार तयार होतात. सध्याची पिढी डिजिटल वाचनाकडे वळत चालली आहे, त्यामुळे ग्रंथालयांनी डिजिटल वाचनाचा पर्याय उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करायला हवेत.

कोल्हापूरच्या भूमीला ऐतिहासिक वारसा असून या पवित्र भूमीत जन्माला आल्याचं मला समाधान वाटतं असे ते म्हणाले. मी देखील वाचनाचा छंद जोपासला असून पाच ते साडेपाच हजार पुस्तके माझ्या घरच्या ग्रंथालयात आहेत. कितीही व्याप असला तरी देखील पुस्तक वाचण्यासाठी मी आवर्जून वेळ देतो, असे सांगून ते म्हणाले, माझ्या वैचारिक जडणघडणीत आई-वडिलांचे संस्कार आणि वाचनाचा सिंहाचा वाटा आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकर यांनी केले. कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे भीमराव पाटील व ग्रंथ मित्र बाबासाहेब कावळे यांनी मनोगत व्यक्त केले. आभार करवीर नगर वाचन मंदिरच्या ग्रंथपाल मनीषा शेणई यांनी मानले.

0000000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.