** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Saturday, September 26, 2026

सेवा संकल्प अभियान व आयुर्वेद दिनानिमित्त विविध उपक्रम

 


 

कोल्हापूर, दि. 26 (जिमाका) : सेवा संकल्प अभियान, श्रीगणेशा आरोग्याचा अभियान व ११ वा आयुर्वेद दिन साजरा करण्याच्या अनुषंगाने २१ ते २४ सप्टेंबरदरम्यान जिल्ह्यातील विविध आयुष्मान आरोग्य मंदिरे, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांच्या माध्यमातून आरोग्य तपासणी, आयुर्वेद, योग, प्राणायाम, आहार-विहार व दिनचर्येबाबत जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात आले.

 २१ सप्टेंबर रोजी आयुष्मान आरोग्य मंदिर, मगळी आयुष  तालुका गडहिंग्लज येथे ६१ लाभार्थ्यांचे एनसीडी स्क्रीनिंग करण्यात आले. यावेळी दिनचर्या, ऋतुचर्या, हितकर-अहितकर आहार-विहार व व्यसनांच्या दुष्परिणामांची माहिती देण्यात आली. सर्व लाभार्थ्यांचे प्रकृती परीक्षण करून आयुर्वेदिक वनस्पती पुस्तिका देण्यात आली. उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज येथील ए.आर.टी. विभागात ३५ उपस्थितांना डॉ. सचिन कोगनोळे यांनी आहार व दिनचर्येबाबत माहिती दिली. तसेच ग्रामीण रुग्णालय सोळांकुरतर्फे आकणूर येथे आरोग्य शिबिर घेऊन १०४ रुग्णांची तपासणी करण्यात आली.

उपजिल्हा वसाहत रुग्णालय गांधीनगरमार्फत २२ सप्टेंबर रोजी बजरंग तालीम मंडळ, वळीवडे येथे आरोग्य शिबिर घेण्यात आले. यामध्ये ६५ रुग्णांची तपासणी करण्यात आली. आयुष्मान आरोग्य मंदिर, तारदाळ येथे महिलांसाठी योग व ध्यान शिबिर घेण्यात आले. योग प्रशिक्षक पांडुरंग गोळे यांनी योग प्रात्यक्षिके करून योगाचे महत्त्व सांगितले व आयुर्वेदिक वनस्पती पुस्तिकांचे वाटप करण्यात आले.

ग्रामीण रुग्णालय चंदगडतर्फे साई गणेश मंडळ, चंदगड येथे महाआरोग्य शिबिर घेण्यात आले. यामध्ये ८० नागरिकांची तपासणी करून औषधोपचार करण्यात आले. तसेच आयुष कक्ष, ग्रामीण रुग्णालय सोळांकुरतर्फे तुरंबे येथे दिनचर्या, ऋतुचर्या व योगाबाबत माहिती देण्यात आली. यावेळी ७६ रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले.

२३ सप्टेंबर रोजी ११ वा आयुर्वेद दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. सेवा रुग्णालय येथे ‘स्वस्थ भविष्यासाठी आयुर्वेद याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. गरोदर मातांना पोषण आहार व काळजी तसेच आयुर्वेदिक उपचाराबाबत माहिती देण्यात आली. यामध्ये ४६ महिलांची तपासणी करण्यात आली.

उपजिल्हा रुग्णालय गारगोटी येथे ११ वा आयुर्वेद दिन उत्साहात साजरा करण्यात आला. डॉ. स्नेहल कुलकर्णी यांनी ‘स्वस्थ भविष्यासाठी आयुर्वेद’याविषयी मार्गदर्शन केले. डॉ. सविता शेट्टी यांनी आयुर्वेद चिकित्सा प्रणालीची माहिती दिली. या व्याख्यानाचा ११० जणांनी लाभ घेतला. यावेळी ४८ रुग्णांची तपासणी करून आयुर्वेदिक औषधोपचार करण्यात आले.

ग्रामीण रुग्णालय कागल येथे ‘निरोगी उद्यासाठी आयुर्वेद’ या संकल्पनेनुसार आयुर्वेदाचे महत्त्व, दैनंदिन जीवनातील उपयोग तसेच निरोगी जीवनशैलीतील आयुर्वेदाची भूमिका याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

उपजिल्हा रुग्णालय कोडोली येथे आयुष गार्डनमध्ये आयुर्वेदिक वनौषधींची लागवड, आरोग्य प्रतिज्ञा, योग व स्वयंपाकघरातील आयुर्वेद या विषयांवरील पोस्टर प्रदर्शन आयोजित करण्यात आले. डॉ. सुलेखा साळुंखे यांनी आयुर्वेदाचे प्रयोजन, समतोल आहार, व्यायाम, ऋतुचर्या व दिनचर्येबाबत माहिती दिली. आयुर्वेदिक कॅम्पमध्ये ६५ रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले.

ग्रामीण रुग्णालय दत्तवाड येथे ११ वा राष्ट्रीय आयुर्वेद दिवस साजरा करण्यात आला. यावेळी आयुर्वेद संकल्पनेची माहिती व चित्रमय प्रदर्शन करण्यात आले. यावेळी ५१ रुग्णांची तपासणी करण्यात आली. तर ग्रामीण रुग्णालय मलकापूर येथे ४२ रुग्णांची तपासणी करून औषधोपचार करण्यात आले.

ग्रामीण रुग्णालय हातकणंगले येथे ‘स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम्, आतुरस्य विकार प्रशमनम्’ या संकल्पनेनुसार आयुर्वेद दिन साजरा करण्यात आला. आयुष कॅम्पमध्ये ४३ रुग्णांची तपासणी करण्यात आली. आयुष्मान आरोग्य मंदिर, तारदाळ येथे पाककला स्पर्धा, गरोदर माता तपासणी शिबिर व योग शिबिर घेण्यात आले.

प्राथमिक आरोग्य पथक सातवे, ता. पन्हाळा येथे योग शिबिर घेण्यात आले. महिला व पुरुष असे एकूण २७ जणांनी योगाचे शिक्षण घेतले. तसेच पोषण आहार, उपलब्ध आरोग्य सुविधा व आयुर्वेदिक उपचाराबाबत माहिती देण्यात आली.

ग्रामीण रुग्णालय खुपीरे यांच्यावतीने अजित स्पोर्ट्स, वाकरे येथे आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. जनरल तपासणी, उच्च रक्तदाब, रक्तनमुना तपासणी व इतर संदर्भसेवा देण्यात आल्या. एकूण ५३ नागरिकांनी या शिबीराचा लाभ घेतला.

उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज येथे धन्वंतरी प्रतिमेचे पूजन करण्यात आले. आयुष विभागामार्फत सुमारे १४० रुग्णांची तपासणी तर चंद्रसेन गणेश मंडळ, चंदगड येथे ९० रुग्णांची तपासणी करण्यात आली.

ग्रामीण रुग्णालय नेसरी येथे ‘निरोगी उद्यासाठी आयुर्वेद’ व योगाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी ७२ रुग्णांची तपासणी करण्यात आली. वसाहत रुग्णालय गांधीनगर येथे आयुर्वेदाचे महत्त्व, दैनंदिन जीवनातील उपयोग व निरोगी जीवनशैलीतील भूमिका याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

आयुष्मान आरोग्य मंदिर, नांदगाव येथे दिनचर्या, ऋतुचर्या, योग, प्राणायाम, आहार-विहार, मानसिक ताण-तणाव, मुखरोग, कर्करोग, मधुमेह व रक्तदाबाबाबत माहिती देण्यात आली. आयुर्वेद प्रतिज्ञा, योग सत्र, प्रकृती परीक्षण व हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली. आयुर्वेदिक वनस्पती व औषधी वनस्पती पुस्तिकांचे वाटप करण्यात आले. एकूण ६५ रुग्णांची तपासणी करण्यात आली.

आयुष्मान आरोग्य मंदिर, कुंभवडे येथे आयुर्वेद दिनानिमित्त आयुर्वेद, दिनचर्या, ऋतुचर्या, योग, प्राणायाम, आहार-विहार, मानसिक ताण-तणाव, मधुमेह व रक्तदाबाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. आयुर्वेद प्रतिज्ञा, योग सत्र व प्रकृती परीक्षण करण्यात आले. ४८ रुग्णांची तपासणी करण्यात आली.

२४ सप्टेंबर रोजी आयुष्मान आरोग्य मंदिर, मुगळी, एनयूएल पीएचसी अंतर्गत आशा स्वयंसेविकांना आयुर्वेद चिकित्सा पद्धती, आहार-विहार, योग चिकित्सा व वार्धक्यासाठी आयुर्वेद याबाबत माहिती देण्यात आली. आयुर्वेद माहिती व सूर्यनमस्कार पोस्टरचे वाटप करण्यात आले. तसेच आयुष आरोग्य मंदिर, मुगळी, ऑर्थोपेडिक अँड मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल, गडहिंग्लज व जयगणेश तरुण मंडळ, मुगळी यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिक व वयोवृद्ध नागरिकांसाठी अस्थिरोग तपासणी शिबिर घेण्यात आले. यावेळी आयुर्वेदिक उपचार व पंचकर्म उपचाराबाबत माहिती देण्यात आली.

या विविध उपक्रमांच्या माध्यमातून आयुर्वेद, योग, संतुलित आहार, दिनचर्या व ऋतुचर्येचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासोबतच आरोग्य तपासणी व उपचाराच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.

0000

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.