राज्यातील युवकांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत २९ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात एक हजार रोजगार मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. या ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ महाराष्ट्र’ रोजगार मेळाव्यांमध्ये युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मलबार हिल येथील मीनल क्रीडा मंडळात आयोजित लोकसंवाद अभियान कार्यक्रमात केले.
माहिती व जनसंपर्क विभागाच्या ‘लोकसंवाद–२०२६’ अभियानांतर्गत गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. याच उपक्रमांतर्गत मुंबई शहर व मुंबई उपनगरातील विविध गणेश मंडळांमध्ये नागरिकांशी संवाद साधून रोजगार मेळावे आणि उपलब्ध रोजगाराच्या संधींबाबत माहिती देण्यात आली. याबरोबरच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि महिला व बालकांच्या संरक्षण, पोषण, शिक्षण व सक्षमीकरणासाठीच्या विविध योजना आणि सेवांची माहिती यावेळी देण्यात आली.
यावेळी मीनल क्रीडा मंडळाचे अध्यक्ष प्रशांत जाधव, उपाध्यक्ष निंगेश कोरे, राजीव मेहता, सागर पेंढारकर, आयेशा कुरेशी इतर पदाधिकारी, सदस्य व भक्तगण उपस्थित होते. यावेळी मुंबई शहर जिल्ह्यातील रोजगार मेळाव्याबाबत कौशल्य विकास अधिकारी विद्या शिंगे, समन्वयक अजय कांबळे, तसेच माहिती व जनसंपर्क विभागाच्या विभागीय संपर्क अधिकारी संध्या गरवारे, श्रद्धा मेश्राम आणि अश्विनी पुजारी यांनी नागरिकांशी संवाद साधून रोजगार महाकुंभाची माहिती दिली.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.