** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Thursday, November 12, 2026

मनपाडळे ल.पा. तलावाच्या जलाशयावर शेतीसाठी पाणी उपशास बंदी

 

 


 

कोल्हापूर, दि. 12 (जिमाका) : राज्यातील पर्जन्यमानातील घट, अल-निनोचा प्रभाव आणि संभाव्य दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध जलसाठ्याचे काटकसरीने व नियोजनबद्ध व्यवस्थापन करून पिण्याच्या पाण्याची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी मनपाडळे लघु पाटबंधारे तलावाच्या जलाशयातून शेतीसाठी पाणी उपसा करण्यास ठराविक कालावधीत बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी 31 ऑगस्ट 2027 पर्यंत उपलब्ध जलसाठ्याच्या व्यवस्थापनासाठी लागू करण्यात येत असल्याची माहिती वारणा पाटबंधारे उपविभाग, कोडोलीचे उपविभागीय अभियंता यांनी दिली.

 

महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे विभागाच्या आदेशानुसार, पाटबंधारे अधिनियम 1976 तसेच जलसंपदा विभागाच्या शासन निर्णयान्वये प्राप्त अधिकारांतर्गत ही उपसाबंदी लागू करण्यात आली आहे. मनपाडळे ल.पा. तलाव, ता. हातकणंगले येथील जलाशयावर शेतीसाठी पाणी उपसा करणाऱ्या यंत्रांवर पुढीलप्रमाणे बंदी राहणार आहे. दि. 16 ते 30 नोव्हेंबर-15 दिवस, 8 ते 22 डिसेंबर- 15 दिवस, 30 डिसेंबर ते 13 जानेवारी 2027- 15 दिवस, 21 जानेवारी ते 4 फेब्रुवारी 2027- 15 दिवस, 12 ते 26 फेब्रुवारी 2027- 15 दिवस व 6 मार्च 2027 पासून पुढील आदेशापर्यंत उपसाबंदी करण्यात येणार आहे.

 

मनपाडळे ल.पा.तलाव ता. हातकणंगले येथील वर नमुद केलेली उपसाबंदी अंमलात आणवयाच्या कार्यक्षेत्रातील महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळातील अधिकारी व क्षेत्रीय कर्मचारी यांनी मनपाडळे ल.पा. तलाव येथील जलाशयाच्या तीरावर वर नमुद कालावधीसाठी शेतीसाठी पाणी उपसा करणा-या विद्युत उपसा यंत्राची तारामंडळे काढुन घ्यावीत. तसेच या उपविभागांर्तगत शाखाधिकारी व कर्मचारी कोडोली पाटबंधारे शाखा क्रं.१. कोडोली यांनी उपसा यंत्र सिल करुन उपसा बंदीची अमंलबजावणी काटेकोरपणे करावी.

 

उपसाबंदी कालावधीत अनाधिकृत उपसा आढळून आल्यास. संबंधित उपसायंत्रधारकाचा उपसा परवाना एक वर्षाच्या कालावधीसाठी रद्द करण्यात येईल व होणा-या नुकसानीस जलसंपदा विभाग जबाबदार राहणार नाही, असेही वारणा पाटबंधारे उपविभागामार्फत पत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.

0000

Wednesday, October 28, 2026

पन्हाळा महसूल लोक अदालतीत ३० प्रकरणांमध्ये तडजोड; १४२ खातेदारांना लाभ

 


कोल्हापूर, दि. 28 (जिमाका) : महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत अभियानांतर्गत तहसिल कार्यालय पन्हाळा येथे नुकतेच महसूल लोक अदालतीचे आयोजन पार पडले . या लोक अदालतीसाठी एकूण ४५ प्रकरणांमध्ये संबंधितांना उपस्थित राहण्याबाबत नोटिसा देण्यात आल्या होत्या. त्यापैकी ३२ प्रकरणांमध्ये पक्षकार उपस्थित होते. यातील ३० प्रकरणांमध्ये दोन्ही पक्षकारांनी समक्ष परस्पर संमतीने तडजोड सादर केली. या महसूल लोक अदालतीमध्ये एकूण १४२ खातेदारांना लाभ दिल्या असल्याची माहिती तहसिलदार माधवी शिंदे यांनी दिली.

 

महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान १ सप्टेंबर २०२६ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीत राबविण्याबाबत निर्देश आहेत. त्यानुसार महसूल विषयक प्रकरणे सामोपचाराने निकाली काढण्यासाठी या अभियानांतर्गत लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे . नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले.

***

Tuesday, October 27, 2026

महात्मा फुले : कृतीशीलतेचे अग्रदूत




 

महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे जीवनकार्य महाराष्ट्राच्या समाजजीवनावर आणि एकूणच भारतीय सामाजिक विचारविश्वावर अत्यंत दूरगामी परिणाम करणारे ठरले. क्रांतीबा जोतीराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने त्यांच्या कार्याचे स्मरण करताना हे प्रकर्षाने जाणवते की, फुले दाम्पत्य केवळ एका काळापुरते मर्यादित नव्हते, तर त्यांनी नव्या युगाचा, नव्या सामाजिक जाणीवेचा आणि नव्या मानवतावादी मूल्यव्यवस्थेचा प्रारंभ केला. त्यांच्या कार्याचा गाभा बुद्धीप्रामाण्यवाद, कृतीशीलता आणि सामाजिक समतेवरील अढळ विश्वास हा होता.

महात्मा फुले यांनी सर्वप्रथम शब्दप्रामाण्यवादाला आणि ग्रंथप्रामाण्यवादाला ठाम नकार दिला. समाजात प्रचलित असलेल्या अंधश्रद्धा, कर्मकांडे, वर्णवर्चस्ववादी विचार आणि विषमतेच्या रचनेला त्यांनी केवळ वैचारिक विरोध केला नाही, तर त्याला पर्यायी सामाजिक कृतीशीलतेची जोड दिली. समतेच्या, बंधुत्वाच्या, धर्मनिरपेक्षतेच्या आणि सामाजिक न्यायाच्या मूल्यांना त्यांनी आपल्या कार्यातून मूर्त रूप दिले. आज आपण ज्या मूल्यांना संविधानिक मूल्ये म्हणतो, त्या मूल्यांचा हुंकार फुले यांनीच सर्वप्रथम भरला, असे म्हटले तर अतिशयोक्तीचे ठरणार नाही.

फुले यांचा सामाजिक विचार केवळ भाषणापुरता किंवा लेखनापुरता मर्यादित नव्हता; त्याला सातत्याने कृतीची जोड होती. समाजातील विषमता, विशेषतः वर्णवर्चस्व आणि स्त्रीदमन, यांना उत्तर देण्यासाठी त्यांनी अनेक पावले उचलली. शिक्षण हे त्यांच्या कार्यातील सर्वात महत्त्वाचे आणि क्रांतिकारी साधन होते. मुलींची शाळा सुरू करणे, सावित्रीबाईंना शिक्षित करून त्यांना शिक्षक म्हणून घडवणे, आणि समाजाचा प्रखर विरोध सहन करत शिक्षणाची ज्योत प्रज्वलित ठेवणे, हे केवळ एका कुटुंबाचे कार्य नव्हते, तर एका नव्या युगांतराची सुरुवात होती. सावित्रीबाई फुले या पहिल्या मुख्याध्यापिका ठरल्या, आणि चार मुलींपासून सुरू झालेली शाळा पुढे अठ्ठेचाळीस मुलींवर पोहोचली. त्या मुली केवळ साक्षर झाल्या नाहीत, तर विचार करणाऱ्या, विवेकी बनल्या. हा शिक्षणप्रवाहच पुढे या देशातील सामाजिक परिवर्तनाचा पाया ठरला.

शिक्षणाबरोबरच महात्मा फुले यांनी सामाजिक अनिष्ट रूढी आणि प्रथांविरुद्धही ठाम भूमिका घेतली. केशवपनाच्या अमानवी प्रथेच्या विरोधात त्यांनी नाभिकांचा संप घडवून आणला. आज जरी त्या प्रथेची तीव्रता आपल्या समाजातून जवळजवळ नाहीशी झाली असली, तरी त्या काळात ही कृती अत्यंत क्रांतिकारी होती. ज्या लोकांचा रोजीरोटीचा व्यवसाय या प्रथेशी जोडलेला होता, त्यांनाही विश्वासात घेऊन, त्यांना अन्यायकारी प्रथेविरुद्ध उभे करणे हे फुल्यांच्या सामाजिक समंजसतेचे आणि व्यावहारिक बुद्धिमत्तेचे उत्कृष्ट उदाहरण होते.

विधवांचे दुःख, स्त्रियांवरील अन्याय, बालविधवांची केविलवाणी अवस्था, परित्यक्त स्त्रियांचे प्रश्न, या सगळ्या समस्यांकडे फुल्यांनी अत्यंत संवेदनशीलतेने पाहिले. त्यांनी विधवा विवाहाचा विचार पुढे आणला. बालहत्या प्रतिबंधक गृहांची व्यवस्था उभी केली. ही सर्व कामे त्या काळच्या सामाजिक चौकटीला कडवे आव्हान देणारी होती. या समाजव्यवस्थेमध्ये स्त्रीला शूद्रातिशूद्रांहूनही हीनतेची वागणूक देण्यात येत असे. त्याला उच्चवर्णीय, ब्राह्मण वर्गातील स्त्रियाही अपवाद नव्हत्या. त्यामुळे जात-धर्मनिरपेक्ष पद्धतीने फुले दांपत्याने महिलांच्या प्रश्नांना कृतीशील पद्धतीने वाचा फोडण्याचे काम केले तसेच त्यांच्यावरील अन्याय निवारणासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले. फुले यांनी विरोध हा कोणा व्यक्ती अगर जातीधर्म यांना नव्हता, तर विषमतेला जन्म देणाऱ्या व्यवस्थेच्या विरोधात त्यांनी संघर्ष आरंभला होता.

महात्मा फुले यांचा दृष्टिकोन समग्र आणि समावेशक होता. त्यांच्या मित्रपरिवारात भिडे, भांडारकर, चिपळूणकर, न्यायमूर्ती रानडे इत्यादी अनेक ब्राह्मण विचारवंत, सुधारक आणि सहकारी होते. यावरून त्यांचा संघर्ष कोणत्याही जातीविरुद्ध नव्हता, तर वर्चस्ववादी मानसिकतेविरुद्ध असल्याचे सिद्ध होते. “ख्रिस्त, मांग, महंमद, ब्राह्मण” यांना बंधुपरी हृदयाशी धरावे, असे म्हणणारा हा महामानव व्यक्तिगत द्वेषाने प्रेरित होता, असे म्हणणेच चुकीचे ठरेल. फुले अत्यंत समतावादी, उदार आणि मानवतावादी विचारांचे पुरस्कर्ते होते.

फुले यांचे लेखनही तितकेच क्रांतिकारी होते. लेखन, चिंतन, वाचन आणि मनन हे त्यांच्या कार्याचे अविभाज्य अंग होते. त्यांनी मराठी भाषेत समाजाला समजेल, भिडेल आणि विचार करायला भाग पाडेल, अशा भाषेत लेखन केले. ‘गुलामगिरी’ या ग्रंथातून त्यांनी समाजातील बौद्धिक गुलामगिरीचे, अज्ञानाचे आणि शोषणाचे तटस्थ पण सूक्ष्म आणि तीक्ष्ण विश्लेषण केले. हा ग्रंथ त्यांनी अमेरिकेतील काळ्या (निग्रो) लोकांच्या लढ्याला अर्पण केला, ही बाब त्यांच्या आंतरराष्ट्रीय समतेच्या जाणिवेची साक्ष आहे. जगभर जिथे जिथे शोषित लढत होते, तिथे तिथे फुले मनाने उभे होते. त्या सर्व लढ्यांशी आपले माणुसकीचे नाते जोडत होते. म्हणूनच पुढे नेल्सन मंडेला किंवा बराक ओबामा यांना भारत भेटीदरम्यान ‘गुलामगिरी’ या ग्रंथाची प्रत भेट म्हणून दिली गेली, तेव्हा या विचारांची विश्वात्मकता अधिक ठळकपणाने अधोरेखित झाली.

त्यांचे ‘तृतीय रत्न’ हे आधुनिक मराठीतील पहिले नाटक मानले जाते. ‘शेतकऱ्याचा असूड’ या ग्रंथात शेतकऱ्यांचे दैन्य, सावकारी पाश आणि शेतीव्यवस्थेतील अन्याय यांचे सखोल विश्लेषण आढळते. म्हणूनच रामचंद्र गुहा यांनी फुले यांना आदराने “The Radical Agrarian” असे यथोचित संबोधले आहे. फुल्यांचे शेतकरीविषयक चिंतन केवळ सहानुभूतीपुरते नव्हते; ते व्यवस्थात्मक परिवर्तनाची मागणी करणारे होते.

फुल्यांच्या कार्यातील एक अत्यंत महत्त्वाचा, पण अनेकदा दुर्लक्षित राहणारा पैलू म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांविषयीचे त्यांचे कार्य. १८८० साली रायगडावर जाऊन शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढणे आणि शिवजयंती सुरू करणे हे त्यांचे राष्ट्रीय स्मृतीचे पुनरुज्जीवन करणारे कार्य होते. संभाजी महाराजांच्या काळानंतर सुमारे दीड-दोनशे वर्षे शिवराय विस्मरणात गेले होते. त्या पार्श्वभूमीवर फुल्यांनी शिवाजी महाराजांचा पहिला पोवाडा तथा काव्यमय चरित्र लिहून महाराष्ट्राला आपल्या सच्च्या स्वराज्यनायकाची नव्याने आठवण करून दिली. त्या अर्थाने महाराष्ट्रधर्म जागविणारे महात्मा फुले हे आद्य प्रवर्तकच म्हणायला हवेत. आज आपण जेव्हा जेव्हा शिवरायांचा अभिमानाने उद्घोष करतो, तेव्हा तेव्हा त्यासोबत महात्मा फुल्यांचेही स्मरण अनिवार्यपणे करायला हवे.

महात्मा फुले यांनी केवळ सामाजिक आणि वैचारिक क्षेत्रातच नव्हे, तर भौतिक बांधकामांमध्येही आपली कृतीशीलता सिद्ध केली. ते पुणे म्युनिसिपालिटीचे कमिशनर आणि बांधकाम ठेकेदारही होते. कात्रजचा जुना बोगदा, खडकवासला धरण, बंडगार्डन पूल अशी आजही भक्कम उभी असलेली कामे त्यांनी साकारली आहेत. त्यात भ्रष्टाचाराचा एकही ठिपका नव्हता. समाजाचा पैसा समाजासाठी वापरला गेला पाहिजे, ही त्यांची ठाम धारणा होती. बांधकाम कसे टिकाऊ, दर्जेदार आणि प्रामाणिक असावे, याची ही उदाहरणे त्यांनी जगाला उभी करून दाखविली आहेत.

फुल्यांच्या विचारविश्वात सत्यशोधक समाजाला विशेष स्थान आहे. हा समाज म्हणजे केवळ संघटना नव्हती, तर सत्याचा शोध घेणारी, विज्ञाननिष्ठा जपणारी आणि कर्मकांडांपासून समाजाला मुक्त करणारी चळवळ होती. फुले यांनी मांडलेली “निर्मिक” ही संकल्पना निसर्गाच्या निर्मितीक्षमतेला आणि नियंत्रणक्षमतेला मान्यता देणारी होती. सत्यधर्म म्हणजे माणुसकी, चांगुलपणा, सामाजिक बंधुभाव आणि वैज्ञानिक दृष्टिकोन हीच त्यामागची व्यापक भूमिका होती.

महात्मा फुल्यांच्या समग्र कार्यातून जे फलित दिसते, ते म्हणजे समता, बंधुता, सौहार्द, मानवता आणि विवेक यांची ठाम पायाभरणी. राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जी विज्ञानवादी आणि सामाजिक न्यायाधिष्ठित परंपरा पुढे नेली, तिचे मूळ महात्मा फुले यांच्या कार्यात खोलवर रुजलेले आहे. म्हणून फुले यांचे स्मरण केवळ ऐतिहासिक आदरांजली म्हणून नव्हे, तर आपल्या वर्तमान सामाजिक जबाबदारीची जाणीव म्हणून करायला हवे.

महात्मा फुले हे एका व्यक्तीचे नाव नाही, तर या देशात उदयास आलेल्या सामाजिक क्रांतीचे, विवेकाच्या उजेडाचे, मानवमुक्तीच्या आणि समतेच्या लढ्याचे नाव आहे. त्यांच्या विचारांचा, कार्याचा आणि कृतीशीलतेचा वारसा आजही तितकाच प्रेरणादायी आहे. आपण समाजात न्याय, समता आणि मानवी मूल्यांचा आग्रह धरत असू, तर त्या प्रत्येक आग्रहामागे फुल्यांचे स्मरण असलेच पाहिजे. कारण महात्मा फुले केवळ भूतकाळातील सुधारक नव्हेत; तर आजच्या आणि उद्याच्याही सामाजिक परिवर्तनाच्या वाटचालीचे दिशादर्शक आहेत.


                         -डॉ. आलोक जत्राटकर, कोल्हापूर                                   

alok.jatratkar@gmail.com           

                                8698928080                                                                                                          

                             (लेखक फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारकार्याचे अभ्यासक आहेत.)

- संकलन

जिल्हा माहिती कार्यालय, कोल्हापूर

--००--

 

Monday, October 26, 2026

जिल्ह्यात महसूल लोक अदालतीत १५९ प्रकरणे निकाली; ९०० नागरिकांना लाभ

 


 

 

कोल्हापूर, दि. २६ (जिमाका): महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान २०२६ अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील १५९ प्रलंबित महसुली प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्यात आली. या अभियानाचा ९०० नागरिकांना थेट लाभ झाला. जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अपर जिल्हाधिकारी अजय पवार यांच्या प्रयत्नांतून जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभाग आणि तालुका स्तरावर या लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते.

 

महसूल विभागाकडील प्रलंबित प्रकरणे जलदगतीने आणि परस्पर सामंजस्याने सोडविणे हा या अभियानाचा उद्देश होता. जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अपर जिल्हाधिकारी अजय पवार यांच्या प्रयत्नांतून या लोक अदालतीच्या माध्यमातून ९०० नागरिकांना थेट लाभ मिळाला. लोक अदालतीमुळे पक्षकारांना प्रलंबित प्रकरणांमुळे होणारा मानसिक त्रास, वेळेचा अपव्यय आणि आर्थिक खर्च यातून दिलासा मिळाला.

 

या अभियानात पन्हाळा तालुक्यातील ३०, भुदरगड २२, करवीर १९, कागल १८, राधानगरी १४, आजरा ११, चंदगड १०, गडहिंग्लज १०, हातकणंगले ८, शाहूवाडी ७, अपर जिल्हाधिकारी कार्यालयातील ३, शिरोळ ३, गगनबावडा २ आणि अपर तहसीलदार, इचलकरंजी येथील २ प्रकरणे निकाली काढण्यात आली. दोन्ही बाजूंच्या पक्षकारांच्या परस्पर संमतीने आणि तडजोडीतून ही प्रकरणे निकाली काढण्यात आली.

 

 पहिल्याच टप्प्यात मिळालेल्या या यशाबद्दल जिल्हा महसूल प्रशासनाकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. प्रलंबित महसुली वाद सामोपचाराने सोडवण्यासाठी शासनाच्या या महत्त्वपूर्ण मोहिमेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड  यांनी केले.

         00000

 

Friday, October 23, 2026

भुदरगड महसूल लोक अदालतीत २२ प्रकरणांमध्ये तडजोड; १७६ खातेदारांना लाभ


कोल्हापूर, दि. 23 (जिमाका) : महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत अभियानांतर्गत तहसिल कार्यालय भुदरगड येथे महसूल लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोक अदालतीसाठी एकूण २८ प्रकरणांमध्ये संबंधितांना उपस्थित राहण्याबाबत नोटिसा देण्यात आल्या होत्या. त्यापैकी २४ प्रकरणांमध्ये पक्षकार उपस्थित होते. यातील २२ प्रकरणांमध्ये दोन्ही पक्षकारांनी समक्ष परस्पर संमतीने तडजोड  केली. या महसूल लोक अदालतीमध्ये एकूण १७६ खातेदारांना लाभ दिल्या असल्याची माहिती भुदरगड तहसिलदार अर्चना पाटील यांनी दिली.


महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान १ सप्टेंबर २०२६ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीत राबविण्याबाबत निर्देश दिले आहे. त्यानुसार महसूल विषयक प्रकरणे सामोपचाराने निकाली काढण्यासाठी या अभियानांतर्गत लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते .

***

Thursday, October 8, 2026

जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांनी पन्हाळा तालुक्यातील विविध पिकांची केली पाहणी

 


कोल्हापूर दि. 3 : यावर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी पिके करपली आहेत. ट्रिगर वन लागू केलेल्या तालुक्यांमधील पीक पंचनाम्याची कारवाई जलद गतीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासाठी शासकीय सुट्ट्यांच्या दिवशीही पीक पंचनाम्याचे काम अखंडितपणे सुरू ठेवण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी यांनी पन्हाळा तालुक्यातील मौजे दानेवाडी, जाफळे, केखले, माले , शहापूर अशा विविध ठिकाणी भेट देऊन भात, सोयाबीन, भाजीपाला, ज्वारी, भुईमूग  आदी पिकांची पाहणी केली.

 

या भेटींमध्ये जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करून शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन ठाम आहे. नुकसान भरपाई देण्याकरिता पंचनामे जलद गतीने करणे सुरू आहेत. शेतकरी बांधवांनी आवश्यक कागदपत्रे देऊन सहकार्य करावे असे आवाहन केले. तसेच सर्व संबंधित शासकीय कर्मचारी, अधिकारी यांना लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. क्षेत्रीय अधिकारी यांना चारा उपलब्ध बाबत नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

यावेळी त्यांच्या समवेत पन्हाळा प्रांताधिकारी डॉ. समीर शिंगटे, तालुका कृषी अधिकारी श्रीमती तापोळे यांच्यासह विविध कर्मचारी शेतकरी उपस्थित होते.

*****

 

 

जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड शाहूवाडी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर




कोल्हापूर दि. ७; जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये कमी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ . विजय राठोड यांनी शाहूवाडी तालूक्यातील मौजे मोळावडे येथील शेतकरी श्री. रामचंद्र शिवाजी पाटील यांचे  शेतावर भुईमूग  पिकाची  श्री. सयाजी शंकर पाटील यांचे शेतावर रताळी   पिकाची पाहणी केली. मौजे ससेगाव या गावात श्री. गुंगा आनंदा पारळे , श्री.तानाजी महिपती पारळे श्री. केशव गुंडा पारळे  या शेतकऱ्यांच्या शेतावर भात पिकाची पाहणी केली. 

जिल्हाधिकारी यांनी मोळावडे व ससेगावातील उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधून सध्य स्थितीतील पीक परिस्थिती संदर्भात चर्चा केली.


कमी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची पिके वाळून गेल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर विजय राठोड यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना दिलासा दिला.


     यावेळी त्यांच्या समवेत उपविभागीय अधिकारी डॉ. समीर शिंगटे, तालुका कृषि अधिकारी मा. निलम चाकणे , मंडळ कृषी अधिकारी संजय तांदळे , अशोक कोळेकर , सदर गावाचे सरपंच , पोलीस पाटील , शेतकरी , सहायक कृषी अधिकारी, तलाठी आदि. उपस्थित होते .

Thursday, October 1, 2026

ट्रिगर-१ लागू असलेल्या तालुक्यांत सुट्टीच्या दिवशीही पीक पंचनाम्याची कारवाई सुरू ठेवण्याचे आदेश

 

 

​            कोल्हापूर 1 (जिमाका) : दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील संबंधित तालुक्यांमध्ये ट्रिगर-१ (प्रथम कळ) लागू करण्यात आला आहे. केंद्र शासनाकडे मदतीचे ज्ञापन तातडीने सादर करावयाचे असल्याने पीक पंचनाम्याची कारवाई जलद गतीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासाठी २ ऑक्टोबर (सार्वजनिक सुट्टी) तसेच ३ व ४ ऑक्टोबर २०२६ (शासकीय सुट्ट्या) या दिवशीही पीक पंचनाम्याचे काम अखंडितपणे सुरू ठेवण्याचे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हास्तरीय दुष्काळ देखरेख समिती गजानन गुरव यांनी दिले आहेत. 

 

​            पीक परिस्थितीची वस्तुनिष्ठ माहिती, आवश्यक छायाचित्रे आणि GPS Coordinates संकलित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पंचनाम्याची कारवाई कोणत्याही परिस्थितीत प्रलंबित राहू नये, यासाठी तलाठी, ग्राम महसूल अधिकारी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक व संबंधित अधिकाऱ्यांची नियुक्ती सुनिश्चित करून सुट्टीच्या दिवशीही कामकाज सुरू ठेवले जाणार आहे.

 

​            ट्रिगर-१ लागू असलेल्या सर्व गावांमध्ये व क्षेत्रांमध्ये पीक पंचनाम्याची कारवाई तात्काळ सुरू ठेवून प्रत्यक्ष पाहणीद्वारे वस्तुनिष्ठ नोंद करावी.​ पंचनाम्यादरम्यान आवश्यक छायाचित्रांसह GPS Coordinates संकलित करणे बंधनकारक राहील. ​दररोज सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत दिवसअखेरची अद्ययावत आकडेवारी  जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करावी.

 

 महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभागाने आपापसात समन्वय ठेवून काम विहित कालमर्यादेत पूर्ण करावे. कोणतीही त्रुटी, दुबार नोंद किंवा चुकीची आकडेवारी राहणार नाही याची संयुक्त दक्षता संबंधित तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी व गट विकास अधिकारी यांनी घ्यावी. तसेच प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी दररोज तालुका स्तरावर आढावा घेतला जाईल.

           

​            २ ते ४ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत पूर्ण झालेल्या पंचनाम्यांची स्वतंत्र दैनंदिन आकडेवारी ठेवून ती पुढील अहवालात समाविष्ट केली जाईल. ​केंद्र शासनास सादर करावयाचे ज्ञापन अत्यंत तातडीचे व प्राधान्याचे असल्याने कोणत्याही स्तरावर विलंब होणार नाही याची काटेकोर दक्षता घेण्याचे निर्देश प्रशासनातर्फे देण्यात आले आहेत.

00000

Wednesday, September 30, 2026

सेवा संकल्प अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन

 

 

कोल्हापूर, दि. 30 (जिमाका) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत राज्यभर राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत ‘सेवा माझे योगदान’या उपक्रमातून करिअर मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात येत आहे.

 

या उपक्रमांतर्गत 29 सप्टेंबर रोजी छत्रपती शाहू शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कळंबा येथे जिल्हा रोजगार समन्वय समितीचे समन्वयक संजय पेंडसे यांनी जिल्ह्यातील उद्योगांमधील रोजगाराच्या संधींबाबत मार्गदर्शन केले. या सत्रास 67 विद्यार्थी उपस्थित होते.

 

30 सप्टेंबर रोजी न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कोल्हापूर येथे आयोजित करिअर मार्गदर्शन सत्रात एनसीएस पोर्टल, मुलाखतीची तयारी, बायोडाटा तयार करणे, सॉफ्ट स्किल्स आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. या सत्रास सुमारे 139 विद्यार्थी उपस्थित होते. यंग प्रोफेशनल अझरुद्दीन शेख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी इलेक्ट्रिकल विभागप्रमुख श्री. राजगिरे व जिल्हा कौशल्य विकास सहाय्यक पराग जोशी उपस्थित होते.

 

तसेच, शिवाजी तांत्रिक विद्यालय, कोल्हापूर येथे आयोजित सत्रात ‘महास्वयंम’पोर्टल, एनसीएस पोर्टल, करिअर म्हणजे काय?, दहावी-बारावीनंतरच्या करिअरच्या संधी आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. या सत्रास सुमारे 38 विद्यार्थी उपस्थित होते.

 

17 ऑक्टोबरपर्यंत करिअर मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात येणार असून, या उपक्रमाचा जास्तीत जास्त उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त जमीर करीम यांनी केले.

0000


 

Tuesday, September 29, 2026

कोल्हापूरच्या ब्रँडिंगसाठी कोल्हापूर महोत्सवासारखे उपक्रम राबवा - राज्यपाल जिष्णु देव वर्मा



 

कोल्हापूर दि. 29 : कोल्हापूर जिल्हा अप्रतिम निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे, विपुल निसर्ग संपदा लाभलेली आहे, जिल्ह्याला धार्मिक तीर्थस्थळे, क्रीडा, व्यापार, उद्योग यांची गौरवी परंपरा आहे. कोल्हापूरचे समग्र, एकात्मिक ब्रॅण्डिंग करण्यासाठी कोल्हापूर महोत्सवासारखे उपक्रम राबवावेत, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.

 

राज्यपाल जिष्णु देव वर्मा हे कोल्हापूर दौऱ्यावर असताना त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील प्रमुख विकास प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, राज्यपालांचे परिवार प्रबंधक डॉ. निशिकांत देशपांडे,  जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड डॉ.कुलगुरू राजनिश कामत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जासमिन, राज्यपालांचे परिसहायक नवदीप अगरवाल, इचलकरंजी महानगरपालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

 

राज्यपाल जिष्णु देव वर्मा म्हणाले, कोल्हापूरला फार मोठी गौरवी परंपरा लाभलेली आहे. येथील कुस्ती, कबड्डी, सारखे खेळ प्रसिद्ध आहेत. येथील वने समृद्ध आहेत. निसर्ग सौंदर्याने हा जिल्हा नटलेला आहे. इचलकरंजीचा कापड उद्योग, हुपरीचा चांदी उद्योग सातासमुद्रापार पोहोचलेला आहे. या ठिकाणी श्री अंबाबाई, श्री जोतिबा यासारखी तीर्थस्थळे आहेत. कोल्हापुरी गुळ, कोल्हापुरी चप्पल यासह अनेक कृषी उत्पादने, हस्तकलांचा मोठा लौकिक आहे. या सर्व पार्श्वभूमीवर कोल्हापूरला जागतिक नकाशावर प्रमोट करण्यासाठी त्याचे ब्रॅण्डिंग आवश्यक आहे त्या दृष्टीने कोल्हापूर महोत्सवासारखे महोत्सव अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतील. त्यासाठी विमानतळाची कनेक्टिव्हिटी अधिक वाढली पाहिजे.

 

सुदृढ समाज आणि निकोप समाजमन घडविण्यासाठी नशा मुक्त भारत आणि टीबी मुक्त भारत ही अभियाने प्रशासनाने अत्यंत व्यापकपणे राबवावीत, असे सांगून राज्यपाल वर्मा म्हणाले, व्यसनमुक्ती केवळ कायदे, पोलीस प्रशासन अथवा शासकीय उपाययोजनांपुरती मर्यादित नसून, निरोगी आणि व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा, कुटुंबाचा आणि समाजाचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. नशा मुक्त पिढी घडविणे हे आज फार मोठे आव्हान आहे. नशा मुक्ती ला समाजातूनच नकार निर्माण झाला पाहिजे, समाजातील खेळाडू, कलाकार, प्रभावी व्यक्तिमत्वे यांनीही या कार्यात पुढे येऊन जनजागृती व प्रबोधनासाठी योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

 

यावेळी जिल्ह्यात राबविण्यात येत असणाऱ्या महत्त्वाच्या प्रकल्पांचे सादरीकरण जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले. महापालिकेतर्फे डॉ.राजेंद्र भारूड यांनी केले. तर जिल्हा परिषदेतर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.जासमिन यांनी केले. यामध्ये महामार्ग विकास, राज्यस्तरीय रस्ते विकास, विमानतळ विस्तार, सांस्कृतिक वारसा आणि तीर्थक्षेत्र विकास, श्री महालक्ष्मी अंबाबाई विकास आराखडा, श्री क्षेत्र जोतिबा विकास आराखडा, शिक्षण, संशोधन आणि प्रशासन यामधील विविध उपक्रम, वैद्यकीय पायाभूत सुविधा, पुर नियंत्रण आणि प्रदूषण मुक्तीसाठीचे प्रकल्प, प्रस्तावित कोल्हापूर आयटी पार्क, पवणार ते पत्रादेवी महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग, विभागीय क्रीडा संकुल आधुनिकीकरण आणि विस्तार, आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, रिंग रोड व चार पदरी उन्नत मार्गीका, वैभववाडी- कोल्हापूर रेल्वे मार्ग प्रकल्प आदी विषयांबाबतचे सादरीकरण जिल्हाधिकारी यांनी केले.

 

संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह, राजर्षी शाहू खासबाग मैदान, राजर्षी शाहू महाराज समाधी स्थळ, मेकॅनिकल कार पार्किंग, रंकाळा म्युझिकल फाउंटन, ॲस्ट्रो टर्फ हॉकी स्टेडियम, श्री अंबाबाई मंदिर पार्किंग आणि भक्तनिवास यासह शहराच्या विविध सौंदर्यकरणाचे उपक्रम, कोल्हापूर इलेव्हेटर कॉरिडॉर, घनकचरा व्यवस्थापन आणि प्रक्रिया प्रकल्प, जीआयएसबेस्ड मालमत्ता सर्वे आदी विषयांबाबतचे सादरीकरण महापालिका आयुक्त यांनी केले. प्राथमिक शिक्षण क्षेत्रातील जिल्हा परिषदेचे विविध उपक्रम, पिजीआय ग्रेडिंग, समृद्ध शाळा पिंक रूम उपक्रम याबद्दल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सादरीकरण केले.

 

यावेळी राज्यपाल वर्मा यांनी पिंक रूम उपक्रमाचे कौतुक करून याची गरज व महत्त्व अधोरेखित केले. तसेच आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यात उभी करण्यात आलेली ट्रान्सजेंडर यांची रेस्क्यू टीम या संकल्पनेचेही राज्यपाल महोदयांनी कौतुक केले.

0000

 

 


राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी घेतले श्री अंबाबाईचे दर्शन

 





कोल्हापूर, दि. 29 (जिमाका) : राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी श्री अंबाबाई महालक्ष्मीचे दर्शन घेऊन वेदोक्त संकल्प पूजा केली. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्यावतीने समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी श्री अंबाबाईची प्रतिमा देऊन त्यांचे स्वागत केले. यानंतर राज्यपाल श्री वर्मा यांनी मातुर्लिंग श्री महादेव व श्री गणेशाचे दर्शन घेऊन प्रार्थना केली.

 

यानंतर पुरातत्व विभागाच्या वतीने अंबाबाई मंदिर परिसरात सुरु असलेल्या जतन आणि संवर्धन कामाची पाहणी त्यांनी केली. याकामाच्या सद्यस्थितीबाबत जिल्हाधिकारी डॉ. राठोड व धर्मशास्त्र मार्गदर्शक गणेश नेर्लेकर यांनी माहिती दिली.

 

यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, परिवार प्रबंधक डॉ. निशिकांत देशपांडे, राज्यपालांचे परिसहायक नवदीप अगरवाल, करवीर उपविभागीय अधिकारी मोसमी चौगुले, तहसीलदार स्वप्नील पवार, देवस्थान समितीच्या सचिव वर्षा साळुंखे, व्यवस्थापक महादेव दिंडे, तसेच देवस्थानचे पुरोहित प्रमोद उपाध्ये, बाळासाहेब दादरणे आदी उपस्थित होते.

***


कोल्हापूर विमानतळावर राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे स्वागत

 




कोल्हापूर, दि. 29 (जिमाका) : राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे आज सकाळी 10 वा. कोल्हापूर विमानतळावर आगमन झाले.

 

यावेळी त्यांचे प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी स्वागत केले. यावेळी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. राजनिश कामत, कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड, जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, शिवाजी विद्यापीठाचे प्र. कुलगुरु डॉ. ज्योती जाधव, वारणा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के, करवीर उपविभागीय अधिकारी मौसमी चौगुले उपस्थित होते. विमानतळावर आगमन होताच राज्यपालांना पोलीस दलाच्या वतीने 'गार्ड ऑफ ऑनर' (सलामी) देऊन मानवंदना देण्यात आली.

00000

 


Monday, September 28, 2026

हातकणंगले येथे सेवा संकल्प अभियानाचा उत्साहात प्रारंभ

 


 

कोल्हापूर, दि. 28 (जिमाका) : ‘सेवा परमो धर्म:’ या भावनेतून सेवा संकल्प अभियानाचा मुलींचे शासकीय वसतिगृह, हातकणंगले येथे आज उत्साहात प्रारंभ झाला. यानिमित्त विविध सेवाभावी व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. वसतिगृहातील मुलींनी प्रवेशद्वारावर आकर्षक रांगोळी साकारून परिसराची सजावट केली.

मुलींमध्ये सेवा, समर्पण आणि सामाजिक बांधिलकीची भावना रुजविण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बालपणातील जीवनमूल्ये व सेवाभावावर आधारित ‘चलो जीते हैं’ हा प्रेरणादायी लघुपट दाखविण्यात आला.

अभियानांतर्गत वसतिगृह व परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मुली व कर्मचाऱ्यांनी श्रमदानातून परिसराची स्वच्छता केली. तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वसतिगृह परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

मुली व कर्मचाऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे अभियानाचा प्रारंभ कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

0000

दानोळीत छत्रपती प्रतिष्ठानच्यावतीने आरोग्य शिबीर संपन्न


 

कोल्हापूर, दि. 28 (जिमाका) : दानोळी (ता. शिरोळ) येथे छत्रपती प्रतिष्ठानच्यावतीने गणेशोत्सवानिमित्त आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात सेवा संकल्प अभियानांतर्गत BP, शुगर, ECG, नेत्र तपासणीसह आभा व गोल्डन कार्डची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. शिबिराचे उदद्याटन सरपंच सुनिता वाळकुंजे यांच्या हस्ते करण्यात आले.

 

शिबिरात रक्तदाब, रक्तातील साखर, ECG, नेत्र तपासणी करण्यात आले. तपासणीनंतर आवश्यकतेनुसार औषध उपचार, आरोग्य विषयक सल्ला व मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी उदय राऊत, मंडळाचे अध्यक्ष भरत मुळीक, उपाध्यक्ष सुनिल चौगुले, अभय राऊत, सुजय राऊत, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पांडुरंग खटावकर, प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. ए.एन. मोघे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्चना यादव आदी उपस्थित होते.

00000

कर्णबधिरता प्रतिबंध व नियंत्रणाबाबत विद्यार्थिनींमध्ये जनजागृती

 

 

कोल्हापूर, दि. 28 (जिमाका) : राष्ट्रीय कर्णबधिरता प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत ‘कर्णबधिर लोकांचा आंतरराष्ट्रीय सप्ताह’ निमित्त 24 सप्टेंबर रोजी परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालय, कोल्हापूर येथे विद्यार्थिनींसाठी जनजागृतीपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

 

यावेळी बालरोगतज्ज्ञ डॉ. थोरात यांनी नवजात बालकांमधील श्रवणदोषाची कारणे, श्रवणदोषाचे लवकर निदान व त्याचे महत्त्व तसेच सांकेतिक भाषेचे महत्त्व या विषयांवर विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. नवजात बालकांमधील श्रवणदोषाचे वेळेत निदान झाल्यास आवश्यक उपचार व पुनर्वसनाच्या माध्यमातून त्यांचे भवितव्य अधिक सक्षम करता येते, याबाबत त्यांनी माहिती दिली. सांकेतिक भाषेचे महत्त्वही त्यांनी स्पष्ट केले.

 

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सरिता थोरात व सेवा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. निलिमा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यशाळेत बालरोगतज्ज्ञ डॉ. थोरात, परिचर्या प्रशिक्षण केंद्राच्या शिक्षिका सुरवसे, माने तसेच एनपीपीसीडी कार्यक्रमातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

0000


Saturday, September 26, 2026

कोल्हापूरातील सहा तालुक्यांना दुष्काळाची ‘प्रथम कळ’लागू जिल्ह्यात बाधितांना मिळणार विविध सवलती

 


 

कोल्हापूर, दि. २६ (जिमाका) : खरीप हंगाम २०२६ मधील पर्जन्यमानातील तूट व अन्य घटकांच्या आधारे राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती असल्याचे शासनाच्या निदर्शनास आल्याने महाराष्ट्र शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाने २५ सप्टेंबर २०२६ रोजी याबाबत शासन निर्णय निर्गमित केला आहे. राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा, राधानगरी, गगनबावडा, भूदरगड, आजरा व चंदगड या तालुक्यांचा समावेश झाल्याने या सहा तालुक्यांमध्ये ‘Trigger-1’ (प्रथम कळ) लागू करण्यात आली आहे. 

 

‘Trigger-1’ लागू झाल्यामुळे दुष्काळग्रस्त भागासाठी शासनाने विशेष बाब म्हणून विविध सवलती व उपाययोजना लागू केल्या आहेत. यामध्ये जमीन महसूलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती तसेच ७.५ हॉर्सपॉवरपेक्षा अधिक क्षमतेच्या कृषी पंपांच्या चालू वीजबिलात सूट यांचा समावेश आहे. याशिवाय शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोजगार हमी योजनेंतर्गत कामांच्या निकषांमध्ये शिथिलता आणून जास्तीत जास्त कामे सुरू करणे, आवश्यकतेनुसार टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, टंचाई जाहीर केलेल्या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतीपंपांची वीज जोडणी खंडित न करणे, शेतकरी व शेतमजुरांना अन्नधान्याची टंचाई भासणार नाही याची व्यवस्था करणे, जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देणे तसेच जलसंधारणाची कामे सुरू करणे आदी उपाययोजनांचा यामध्ये समावेश आहे. 

 

 सर्वेक्षण केलेल्या क्षेत्रातील पिकांची स्थिती दर्शविणारी छायाचित्रे व GPS कोऑर्डिनेट्स संकलित करून पीक परिस्थितीचा अहवाल शासनास सादर करण्यात येणार आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शेत पिकांच्या नुकसानीपोटी देण्यात येणारी आर्थिक मदत विहित कार्यपद्धती पूर्ण झाल्यानंतर स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे जाहीर करण्यात येणार असल्याचे या शासन निर्णयात नमूद आहे. शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचे सर्वेक्षण व पंचनाम्याची कार्यवाही करण्यात येणार असून, बाधित शेतकऱ्यांना शासनाच्या सवलती व मदतीचा लाभ मिळण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून लवकरच आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल.

०००००

सेवा संकल्प अभियानांतर्गत शाहूवाडी तालुक्यात विविध योजनांचा आढावा


कोल्हापूर, दि. २६ : सेवा संकल्प अभियानांतर्गत शाहूवाडी तालुक्यातील सांबू, शिरगाव व सवते ग्रामपंचायतींना भेट देऊन विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा व प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.

यावेळी प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण, ‘आशीर्वादचा दिवा’ उपक्रम, ‘सूर्यघर’ योजना तसेच मुख्यमंत्री पंचायतराज अभियानांतर्गत सुरू असलेल्या कामांची माहिती घेण्यात आली. योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा वेळेत लाभ मिळवून देण्याच्या दृष्टीने आवश्यक सूचना करण्यात आल्या.

या पाहणीवेळी पंचायत समिती शाहूवाडीचे सांख्यिकी विस्तार अधिकारी श्री. कानडे, ग्रामीण गृहनिर्माण अभियंता  करण कांबळे, संबंधित ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी तसेच लाभार्थी उपस्थित होते.

**

गडहिंग्लज येथे सेवा संकल्प अभियानांतर्गत शिकाऊ अनुज्ञप्ती शिबिर संपन्न

 

कोल्हापूर, दि.26 (जिमाका) : प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांच्या वतीने सेवा संकल्प अभियानांतर्गत दि. 25 सप्टेंबर रोजी गडहिंग्लज येथे शिकाऊ अनुज्ञप्ती संदर्भातील नियमित शिबिर आयोजित करण्यात आले.

या शिबिरात नागरिकांना शिकाऊ अनुज्ञप्ती मिळविण्याची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया तसेच संबंधित नियम व तरतुदींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ऑनलाइन पोर्टलवर अर्ज करताना येणाऱ्या अडचणींबाबत उमेदवारांना आवश्यक माहिती देऊन त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.

या शिबिराचा एकूण 103 नागरिकांनी लाभ घेतला असून त्यांना शिकाऊ अनुज्ञप्तीची सेवा उपलब्ध करून देण्यात आली.

**


सेवा संकल्प अभियान व आयुर्वेद दिनानिमित्त विविध उपक्रम

 


 

कोल्हापूर, दि. 26 (जिमाका) : सेवा संकल्प अभियान, श्रीगणेशा आरोग्याचा अभियान व ११ वा आयुर्वेद दिन साजरा करण्याच्या अनुषंगाने २१ ते २४ सप्टेंबरदरम्यान जिल्ह्यातील विविध आयुष्मान आरोग्य मंदिरे, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांच्या माध्यमातून आरोग्य तपासणी, आयुर्वेद, योग, प्राणायाम, आहार-विहार व दिनचर्येबाबत जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात आले.

 २१ सप्टेंबर रोजी आयुष्मान आरोग्य मंदिर, मगळी आयुष  तालुका गडहिंग्लज येथे ६१ लाभार्थ्यांचे एनसीडी स्क्रीनिंग करण्यात आले. यावेळी दिनचर्या, ऋतुचर्या, हितकर-अहितकर आहार-विहार व व्यसनांच्या दुष्परिणामांची माहिती देण्यात आली. सर्व लाभार्थ्यांचे प्रकृती परीक्षण करून आयुर्वेदिक वनस्पती पुस्तिका देण्यात आली. उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज येथील ए.आर.टी. विभागात ३५ उपस्थितांना डॉ. सचिन कोगनोळे यांनी आहार व दिनचर्येबाबत माहिती दिली. तसेच ग्रामीण रुग्णालय सोळांकुरतर्फे आकणूर येथे आरोग्य शिबिर घेऊन १०४ रुग्णांची तपासणी करण्यात आली.

उपजिल्हा वसाहत रुग्णालय गांधीनगरमार्फत २२ सप्टेंबर रोजी बजरंग तालीम मंडळ, वळीवडे येथे आरोग्य शिबिर घेण्यात आले. यामध्ये ६५ रुग्णांची तपासणी करण्यात आली. आयुष्मान आरोग्य मंदिर, तारदाळ येथे महिलांसाठी योग व ध्यान शिबिर घेण्यात आले. योग प्रशिक्षक पांडुरंग गोळे यांनी योग प्रात्यक्षिके करून योगाचे महत्त्व सांगितले व आयुर्वेदिक वनस्पती पुस्तिकांचे वाटप करण्यात आले.

ग्रामीण रुग्णालय चंदगडतर्फे साई गणेश मंडळ, चंदगड येथे महाआरोग्य शिबिर घेण्यात आले. यामध्ये ८० नागरिकांची तपासणी करून औषधोपचार करण्यात आले. तसेच आयुष कक्ष, ग्रामीण रुग्णालय सोळांकुरतर्फे तुरंबे येथे दिनचर्या, ऋतुचर्या व योगाबाबत माहिती देण्यात आली. यावेळी ७६ रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले.

२३ सप्टेंबर रोजी ११ वा आयुर्वेद दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. सेवा रुग्णालय येथे ‘स्वस्थ भविष्यासाठी आयुर्वेद याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. गरोदर मातांना पोषण आहार व काळजी तसेच आयुर्वेदिक उपचाराबाबत माहिती देण्यात आली. यामध्ये ४६ महिलांची तपासणी करण्यात आली.

उपजिल्हा रुग्णालय गारगोटी येथे ११ वा आयुर्वेद दिन उत्साहात साजरा करण्यात आला. डॉ. स्नेहल कुलकर्णी यांनी ‘स्वस्थ भविष्यासाठी आयुर्वेद’याविषयी मार्गदर्शन केले. डॉ. सविता शेट्टी यांनी आयुर्वेद चिकित्सा प्रणालीची माहिती दिली. या व्याख्यानाचा ११० जणांनी लाभ घेतला. यावेळी ४८ रुग्णांची तपासणी करून आयुर्वेदिक औषधोपचार करण्यात आले.

ग्रामीण रुग्णालय कागल येथे ‘निरोगी उद्यासाठी आयुर्वेद’ या संकल्पनेनुसार आयुर्वेदाचे महत्त्व, दैनंदिन जीवनातील उपयोग तसेच निरोगी जीवनशैलीतील आयुर्वेदाची भूमिका याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

उपजिल्हा रुग्णालय कोडोली येथे आयुष गार्डनमध्ये आयुर्वेदिक वनौषधींची लागवड, आरोग्य प्रतिज्ञा, योग व स्वयंपाकघरातील आयुर्वेद या विषयांवरील पोस्टर प्रदर्शन आयोजित करण्यात आले. डॉ. सुलेखा साळुंखे यांनी आयुर्वेदाचे प्रयोजन, समतोल आहार, व्यायाम, ऋतुचर्या व दिनचर्येबाबत माहिती दिली. आयुर्वेदिक कॅम्पमध्ये ६५ रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले.

ग्रामीण रुग्णालय दत्तवाड येथे ११ वा राष्ट्रीय आयुर्वेद दिवस साजरा करण्यात आला. यावेळी आयुर्वेद संकल्पनेची माहिती व चित्रमय प्रदर्शन करण्यात आले. यावेळी ५१ रुग्णांची तपासणी करण्यात आली. तर ग्रामीण रुग्णालय मलकापूर येथे ४२ रुग्णांची तपासणी करून औषधोपचार करण्यात आले.

ग्रामीण रुग्णालय हातकणंगले येथे ‘स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम्, आतुरस्य विकार प्रशमनम्’ या संकल्पनेनुसार आयुर्वेद दिन साजरा करण्यात आला. आयुष कॅम्पमध्ये ४३ रुग्णांची तपासणी करण्यात आली. आयुष्मान आरोग्य मंदिर, तारदाळ येथे पाककला स्पर्धा, गरोदर माता तपासणी शिबिर व योग शिबिर घेण्यात आले.

प्राथमिक आरोग्य पथक सातवे, ता. पन्हाळा येथे योग शिबिर घेण्यात आले. महिला व पुरुष असे एकूण २७ जणांनी योगाचे शिक्षण घेतले. तसेच पोषण आहार, उपलब्ध आरोग्य सुविधा व आयुर्वेदिक उपचाराबाबत माहिती देण्यात आली.

ग्रामीण रुग्णालय खुपीरे यांच्यावतीने अजित स्पोर्ट्स, वाकरे येथे आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. जनरल तपासणी, उच्च रक्तदाब, रक्तनमुना तपासणी व इतर संदर्भसेवा देण्यात आल्या. एकूण ५३ नागरिकांनी या शिबीराचा लाभ घेतला.

उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज येथे धन्वंतरी प्रतिमेचे पूजन करण्यात आले. आयुष विभागामार्फत सुमारे १४० रुग्णांची तपासणी तर चंद्रसेन गणेश मंडळ, चंदगड येथे ९० रुग्णांची तपासणी करण्यात आली.

ग्रामीण रुग्णालय नेसरी येथे ‘निरोगी उद्यासाठी आयुर्वेद’ व योगाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी ७२ रुग्णांची तपासणी करण्यात आली. वसाहत रुग्णालय गांधीनगर येथे आयुर्वेदाचे महत्त्व, दैनंदिन जीवनातील उपयोग व निरोगी जीवनशैलीतील भूमिका याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

आयुष्मान आरोग्य मंदिर, नांदगाव येथे दिनचर्या, ऋतुचर्या, योग, प्राणायाम, आहार-विहार, मानसिक ताण-तणाव, मुखरोग, कर्करोग, मधुमेह व रक्तदाबाबाबत माहिती देण्यात आली. आयुर्वेद प्रतिज्ञा, योग सत्र, प्रकृती परीक्षण व हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली. आयुर्वेदिक वनस्पती व औषधी वनस्पती पुस्तिकांचे वाटप करण्यात आले. एकूण ६५ रुग्णांची तपासणी करण्यात आली.

आयुष्मान आरोग्य मंदिर, कुंभवडे येथे आयुर्वेद दिनानिमित्त आयुर्वेद, दिनचर्या, ऋतुचर्या, योग, प्राणायाम, आहार-विहार, मानसिक ताण-तणाव, मधुमेह व रक्तदाबाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. आयुर्वेद प्रतिज्ञा, योग सत्र व प्रकृती परीक्षण करण्यात आले. ४८ रुग्णांची तपासणी करण्यात आली.

२४ सप्टेंबर रोजी आयुष्मान आरोग्य मंदिर, मुगळी, एनयूएल पीएचसी अंतर्गत आशा स्वयंसेविकांना आयुर्वेद चिकित्सा पद्धती, आहार-विहार, योग चिकित्सा व वार्धक्यासाठी आयुर्वेद याबाबत माहिती देण्यात आली. आयुर्वेद माहिती व सूर्यनमस्कार पोस्टरचे वाटप करण्यात आले. तसेच आयुष आरोग्य मंदिर, मुगळी, ऑर्थोपेडिक अँड मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल, गडहिंग्लज व जयगणेश तरुण मंडळ, मुगळी यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिक व वयोवृद्ध नागरिकांसाठी अस्थिरोग तपासणी शिबिर घेण्यात आले. यावेळी आयुर्वेदिक उपचार व पंचकर्म उपचाराबाबत माहिती देण्यात आली.

या विविध उपक्रमांच्या माध्यमातून आयुर्वेद, योग, संतुलित आहार, दिनचर्या व ऋतुचर्येचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासोबतच आरोग्य तपासणी व उपचाराच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.

0000

 

भुदरगड पंचायत समितीतर्फे सेवा संकल्प अभियानात विविध लोक कल्याणकारी उपक्रमांचा हजारो नागरिकांनी घेतला लाभ

  

 

कोल्हापूर दि. २६ (जिमाका): पंचायत समिती भुदरगड अंतर्गत दिनांक २४ सप्टेंबर रोजी 'सेवा संकल्प अभियान' मोठ्या उत्साहात पार पडले. "सेवा माझे योगदान" या मुख्य संकल्पनेखाली राबविण्यात आलेल्या या अभियानात आरोग्य, पर्यावरण, स्वच्छता, महिला-बालविकास आणि पशुसंवर्धन या क्षेत्रांत विविध गतिमान उपक्रम राबवून तालुक्यातील हजारो नागरिकांना प्रत्यक्ष लाभ प्रदान करण्यात आल्याची माहिती गट विकास अधिकारी डॉ. शेखर जाधव यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली.

 

 सेवा माझे योगदान अंतर्गत ८५३ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींमध्ये ३ हजार ७५८ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये आभा कार्ड – ५१०, 

 गोल्डन कार्ड- ३४२, रक्त तपासणी- ३७३, नेत्र तपासणी- ४३१, अवयवदान - १२६, वयोवंदना योजना- ७१, NCD तपासणी- १ हजार ६१४, ईसीजी- २१९, एक्स-रे -७२ लाभार्थ्यांची वैद्यकीय सेवा व कार्ड वाटप करण्यात आले.

 

तालुक्यातील ९७ ग्राम पंचायतीमध्ये स्वच्छता ही सेवा अभियान सुरुवात करण्यात आले. पर्यवारण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यात आला यामध्ये २० हजार २८८ मूर्ती संकलित करण्यात आल्या तर ४ हजार ६३८ किलो निर्माल्य संकलन करण्यात आले. ९७ ग्राम पंचायतींमध्ये मध्ये प्लास्टिक वापरावर बंदी घालण्याबाबतचे ठराव मंजूर करण्यात आले. ६९ अंगणवाडी मध्ये पोषण अभियान मध्ये पाककृती, पोषण पंगत हे उपक्रम राबविले. २२ शाळांमधील २०४ विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्ती जनजागृती उपक्रमात सक्रीय सहभाग घेतला. दि. १ ते १० ऑक्टोबर या कालावधीत चित्रकला/वक्तृत्व स्पर्धा घेण्यात नियोजन केले आहे.

 

 तालुक्यातील ९७ ग्रामपंचायतींमधील २७० अंगणवाड्यांमध्ये वृक्षारोपण उत्सव पार पडला. अंगणवाड्यांमध्ये CBE कार्यक्रम व गृहभेटी देऊन १ हजार ३०३ लाभार्थ्यांनी सहभाग घेतला. दि.१७ सप्टेंबर २०२६ रोजी ९७ ग्रामपंचायतींमध्ये 'संकल्पाची रांगोळी' काढून अभियानाचा प्रचार करण्यात आला. ७ ग्रामपंचायतींमध्ये लसीकरण मोहीम राबवण्यात आली. यामध्ये ४१० पशूंची तपासणी, ४४० डोस लसीकरण, २६५ पशुपालकांची उपस्थिती आणि २७० पशुपालकाचे NDLM प्रणालीवर आधार अपडेट करण्यात आले.  जल सेवा यात्रा / जल अर्पण दिवस हे दिनांक २ ऑक्टोबर २०२६ रोजी ४ ग्रामपंचायतींमध्ये आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

***