कोल्हापूर, दि. 5 (जिमाका) : प्रधानमंत्री पिक विमा योजना जिल्ह्यातील भात, ज्वारी, नाचणी, भुईमूग व सोयाबीन या पिकासाठी लागू आहे. शेतकऱ्यांना या योजनेत 31 जुलै 2022 पर्यंत सहभागी व्हावे. ही योजना राबविण्यासाठी एचडीएफसी अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लि. या विमा कंपनीची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती विभागीय कृषि सहसंचालक बसवराज बिराजदार यांनी दिली.
योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज, आधार कार्ड/आधार नोंदणीची प्रत, 7/12 उतारा, भाडेपट्टा करार असलेल्या शेतकऱ्यांसाठी करारनामा/सहमतीपत्र, पेरणी स्वयंघोषणापत्र, बॅक पासबुक प्रत या आवश्यक कागदपत्रांसह खाते कार्यरत
असणारी बॅंक शाखा/ प्राथमिक कृषि पतपुरवठा सहकारी संस्था, संबधित विमा कंपनी कार्यालय,
आपले सरकार सेवा सुविधा केंद्राशी संपर्क साधावा. पिक विमा पोर्टल (www.pmfby.gov.in) वर ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करुनही शेतकरी योजनेत सहभागी
होऊ शकतात. योजनेबाबत अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी कृषि विभागाचे क्षेत्रिय स्तरावरील
अधिकारी/कर्मचारी अथवा संबंधित विमा कंपनी प्रतिनिधीशी संपर्क साधावा.
प्रधानमंत्री पिक विमा योजना सर्व शेतकऱ्यांसाठी (कर्जदार/बिगर
कर्जदार) ऐच्छिक असून खातेदार शेतकरी व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरीसुध्दा योजनेत भाग घेण्यासाठी पात्र राहतील. योजनेतील सर्व अधिसुचित पिकांसाठी जोखीमस्तर
70 टक्के इतका राहणार असून शेतकऱ्यांनी भरावयाचा
विमा हप्ता खरीप हंगामातील पिकांसाठी विमा संरक्षित रकमेच्या 2 टक्के तर नगदी पिकासाठी 5 टक्के इतका आहे.
प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत प्रतिकूल परिस्थितीमुळे पेरणी/लावणी न झाल्यामुळे (एकूण पेरणी क्षेत्राच्या 25 टक्क्यापेक्षा कमी पेरणी झाल्यास) होणारे नुकसान तसेच पिकांच्या हंगामामध्ये (सर्वसाधारण काढणीच्या 15 दिवस आधीपर्यंत) पूर, पावसातील खंड, दुष्काळ इ. सारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांच्या सरासरी उत्पन्नाच्या 50 टक्केपेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर होणाऱ्या नुकसानीपासून विमा संरक्षण पुरविण्यात येत आहे.
पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, भुस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग इ. बाबीमुळे उत्पन्नात येणारी घट यामुळे होणारे नुकसान, स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान तसेच नैसर्गिक कारणामुळे पिकांचे होणारे काढणीपश्चात्त (काढणीनंतर 14 दिवसापर्यंत) नुकसान या बाबींसाठी विमा संरक्षण पुरविण्यात येत आहे.पिक नुकसानीची जोखीम पिक विम्याच्या माध्यमातून उचलून शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्याचे कार्य या योजनेतून होत असल्याने जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी
या योजनेत सहभागी व्हावे,
000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.