** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Tuesday, June 28, 2022

सघन कुक्कुट विकास गटाची स्थापना करण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी 1 ते 15 जुलै पर्यंत अर्ज करावेत

 

कोल्हापूर, दि. 28 (जिमाका): मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र असलेला करवीर तालुका वगळून 11 तालुक्यांमध्ये टप्याटप्याने सार्वजनिक/खासगी भागिदारी तत्वावर सघन कुक्कुट विकास गटाची स्थापना करण्यात येणार आहे. सघन गटाची स्थापना करण्यासाठी चंदगड तालुक्यातून अर्ज मागविण्यात आले होते. चंदगड तालुक्यातील एकही अर्जह प्राप्त न झाल्याने पात्र लाभार्थ्यांनी दि. 1 ते 15 जुलै पर्यंत कार्यालयीन वेळेत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ.वाय.ए.पठाण यांनी केले आहे.

सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना व जनजाती क्षेत्र उपयोजनेतील जे लाभार्थी सध्यस्थितीत कुक्कुटपालन व्यवसाय करीत आहेत तसेच ज्या लाभार्थीकडे लघु अंडी उबवणूक यंत्र आहे, अशा लाभार्थ्यांना या योजनेंतर्गत प्राधान्य देण्यात येईल. कुक्कुट व्यवयासात स्वयंरोजगार निर्मितीची आवड असणारे नवउद्योजकही अर्ज करु शकतात. प्रकल्प कार्यान्वित करण्याकरिता आवश्यक असणारी साधने, सुविधा व व्यवहार्यता पडताळून लाभार्थी निवडण्यात येतील. 

मार्गदर्शक सूचना - योजनेंतर्गत एकूण प्रकल्पाची किंमत रु. 10 लाख 27 हजार 500 पैकी सर्व प्रवर्गातील लाभार्थ्यांना शासनाचे 50 टक्के अनुदान असून उर्वरित 50 टक्के रक्कम लाभार्थी स्वतःचा हिस्सा किंवा वित्तीय संस्थेकडून कर्ज घेऊन उभा करु शकतात.  लाभार्थी / अर्जदाराची वयोमर्यादा 18/60 वर्ष राहील. लाभार्थी निवडताना 30 टक्के महिला लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत प्राधान्य देण्यात येईल. सन 2018-19 पासून टप्याटप्याने उपलब्ध होणाऱ्या तरतुदीस अधीन राहून योजना राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 11 तालुक्यांसाठी प्रति तालुका एक प्रमाणे निवड करण्यात येणार आहे. लाभार्थीकडे 2500 चौ. फू. जागा स्वतःच्या मालकीची असावी, तसेच त्या ठिकाणी दळणवळणाची, पाण्याची व विद्युतीकरणाची सुविधा उपलब्ध असावी. प्रकल्प कार्यान्वित करताना शासनाचे अनुदान एकदाच देय असून, त्यानंतर प्रकल्प सुरळितरित्या चालू ठेवून पुढील खर्च संपूर्णपणे लाभार्थीने करावयाचा आहे.

या योजनेंतर्गत प्रकल्प उभारणीसाठी लाभार्थींनी बँकेकडून कर्ज घेतल्यास कर्जाची परतफेड स्वतः लाभार्थीने करावयाची असून कर्ज परतफेडीची जबाबदारी शासनाची राहणार नाही. निवडलेल्या लाभार्थ्यांनी या योजनेअंतर्गत सघन कुक्कुट गटाच्या कामाचे व कुक्कुटपालनाचे पाच दिवशीय प्रशिक्षण नजिकच्या सघन कुक्कुट विकास प्रकल्पामार्फत घेणे बंधनकारक राहील. पक्षीगृहाचा उपयोग कुक्कुटपालनासाठीच करणे बंधनकारक राहील. कुक्कुट पक्षीगृहाच्या बांधकामासाठी प्रकल्प खर्चापेक्षा जास्त खर्च आल्यास तो लाभार्थ्यांनी स्वतः करावयाचा आहे. लाभार्थीस व्यवसाय किमान तीन वर्ष करणे तसेच शासनास हमीपत्र देणे बंधनकारक राहील. लाभार्थीस पक्षीगृह बांधकाम, लघु अंडी उबवणूक यंत्र, एकदिवशीय पिलांची 20 आठवडे वयाचे अंडयावरील पक्षी, उबवणुकीची अंडी यांची खरेदी तसेच इतर पायाभूत सुविधा शासनाच्या निकषाप्रमाणे करणे बंधनकारक राहील. सर्व बाबींची व कागदपत्रांची पूर्तता करून तसेच पडताळणी झाल्यानंतरच शासन निर्णयात नमूद संबंधित बाबींच्या देय अनुदान जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांच्यामार्फत लाभार्थीच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येईल. लाभार्थीनी विहित नमुन्यातील अर्ज संबंधीत तालुक्याच्या पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती चंदगड यांच्याकडून प्राप्त करुन घ्याव्यात. पशुधन विकास अधिकारी (विस्तार) यांनी प्राप्त झालेले अर्ज जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद यांच्यामार्फत लाभार्थी निवडीसाठी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांच्याकडे सादर करावेत.

अर्जासोबत फोटो आयडी/आधार कार्ड/ओळखपत्राची सत्यप्रत/बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत, लाभधारकाकडील मालमत्ता 7/12 व 8अ उतारा आणि ग्रामपंचायत नमुना नं. 8, कुक्कुट पालन व्यवसाय विषयक प्रशिक्षण घेतलेल्या प्रमाणपत्रांची छायांकित सत्यप्रत इ. कागदपत्रे सादर करावीत.

योजनेच्या अधिक माहितीसाठी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, (दूरध्वनी क्रमांक 0231-2662782) कोल्हापूर तसेच पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती चंदगड यांच्याशी संपर्क साधावा.

000000

 

 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.