कोल्हापूर, दि. 7 (जिमाका)- घरकाम करणाऱ्या
महिला, हॉटेल, खासगी आस्थापनांमधील असंघटित मजूर या सर्वांना
अन्नधान्याबरोबरच वेतन देऊन आर्थिक मदतीचा
हात द्या, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले.
जिल्हाधिकारी श्री.
देसाई म्हणाले, संचारबंदीच्या कालावधित
जिल्ह्यातील नागरिकांना अन्नधान्याचा
तुटवडा भासू नये, यासाठी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरु आहेत. परंतु, घरकाम करणाऱ्या महिला, हॉटेल, लॉजेस,
खासगी आस्थापना या ठिकाणी काम करणारे मजूर यांना संचारबंदीच्या कालावधित काम नसल्याने वेतनाची अडचण निर्माण झाली आहे.
शासनामार्फत प्राधान्य गटातील कार्डधारकांना त्याचप्रमाणे अंत्योदय कार्डधारकांना
त्या-त्या दुकानांमार्फत धान्य वितरण सुरु झाले आहे. एप्रिल महिन्याचे 60 टक्क्यांहून
अधिक धान्य वितरण झाले आहे. उर्वरित केशरी कार्डधारकांना सवलतीच्या दरात धान्य
उपलब्ध करुन द्यायचा निर्णय अपेक्षित आहे.
यानंतर या कार्डधारकांना प्राधान्य गटातील आणि अंत्योदयातील कार्डधारकांना मोफत
जे धान्य द्यायचे आहे, तेही दिले जाईल.
परंतु,
काही वर्ग असंघटित आहे. विशेषत: घरकाम करणाऱ्या महिला, खासगी हॉटेल या ठिकाणी काम
करणारे मजूर आहेत. या सर्वांना हक्काने कामासाठी आपण बोलावतो. अशा कामगार वर्गांना
आपण मदतीचा हात देणे आवश्यक आहे. या
संचारबंदीच्या कालावधित आपल्या आस्थापनांनी आपल्याला वाऱ्यावर सोडले, असे त्यांना
वाटायला नको. अशा सर्व कामगारांना फोन करुन त्यांना लागणारे अन्नधान्य व वेतन
द्या. त्यांना मदतीचा हात द्या. निश्चितच आपण सर्वजण माझ्या विनंतीला मान देऊन अशा
असंघटित कामगारांना मदतीचा हात देऊन दिलासा द्याल, अशी अपेक्षाही
जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.