** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Saturday, March 28, 2020

मुंबई-पुण्यावरुन येणाऱ्यांना सक्तीने संस्थात्मक अलगीकरण केंद्रात ठेवणार -पालकमंत्री सतेज पाटील





        कोल्हापूर, दि. 28 (जि.मा.का)  : मुंबई- पुण्यावरुन जिल्ह्यात येणाऱ्या सर्व प्रवाशांना सक्तीने   संस्थात्मक अलगीकरण केंद्रात ठेवले जाईल. कोणत्याही परिस्थितीत त्यांना घरी सोडले जाणार नाही. त्यामुळे जिल्ह्यात येण्याचा प्रयत्न करु नये.  जेथे आहात तेथेच घरी सुरक्षित रहा, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.   
            दुधाचे टँकर, रुग्णवाहिका इतर जीवनावश्यक वस्तुंची वाहतूक करणाऱ्या वाहनामधून व्यक्तींची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले आहे, असे सांगून पालकमंत्री पुढे म्हणाले, अशी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात येतील.  
वाचकांनी वस्तुनिष्ठ माहितीसाठी वर्तमान पत्रे घ्यावीत
            उद्यापासून वर्तमानपत्रे सुरु करण्याचा निर्णय सर्व संपादकांनी कालच घेतलेला आहे. वर्तमानपत्रे वितरण करणाऱ्याला  मास्क, ग्लोव्हज आणि सॅनिटायझर द्यावे. जेणेकरुन जे वर्तमानपत्र घरामध्ये जाणार आहे ते व्यवस्थित आहे याचा विश्वास वाचकांवर बसला पाहिजे. अशा सर्व सुविधा देण्याचे संपादकांनी मान्य केले आहे. तशी कोणतीही तक्रार येवू नये याची दक्षता त्यांनी घ्यावी. वृत्तपत्रामुळे संसर्ग होत नाही. वस्तुनिष्ठ माहिती समजण्यासाठी वाचकांनी न घाबरता वर्तमानपत्रे घ्यावीत असे आवाहनही त्यांनी केले.

            दूध उत्पादक संस्थांनी दूध न नाकारता त्याचे संकलन करावे. अतिरिक्त दुधाची भुकटी करता येईल का याबाबत केंद्राशी बोलून राज्य शासन प्रयत्न करीत आहे. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या शिवभोजन थाळीच्या  चांगल्या निर्णयाचा 500 सामान्य नागरिकांना आज फायदा  झाला आहे.
            इचलकरंजी येथील निरामय आणि अलायन्स हे हॉस्पिटल अधिग्रहीत केली आहेत. त्याच बरोबर गडहिंग्लजमधील केदारी रेडेकर हॉस्पिटल स्वत:हून आमच्या ताब्यात दिले आहे. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. पारगावचे वारणा हॉस्पिटल त्यांनीही परवानगीचे पत्र दिले आहे. जिल्ह्यामध्ये दुर्देवाने वेळ आली तर सगळ्या दृष्टीने तयारी आहे, असेही पालकमंत्री म्हणाले. 
            शेतकऱ्यांसाठी दिवसाचा वीज पुरवठा करता येईल का यासाठी राज्यस्तरावरुन माझा प्रयत्न सुरु आहे. यामध्ये निश्चित यश मिळेल. लोकांनी संयम पाळावा. प्रशासनामार्फत योग्यती उपाय योजना करण्यात येत आहे. एक रुग्ण सापडल्यावर 100 लोकांना होम क्वॉरंटाईन करण्याची वेळ आली. 500 मीटरचा परिसर सीमाबंद करण्याची वेळ आली आहे. याचा विचार नागरिकांनी करावा. लक्षणे असतील तर ताबडतोब प्रशासनाला संपर्क करावा.  
सव्वा कोटीचे व्हेंटीलेटर
        जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून सव्वा कोटी रुपयांचे व्हेटीलेटर्स विकत घेतले आहेत. मास्क, ग्लोव्हज आवश्यक त्या सर्व सुविधा कमी पडणार नाहीत यासाठी आमचा प्रयत्न सुरु आहे. आपण फक्त घरात राहून आम्हाला सहकार्य करावे, अशी विनंती पालकमंत्र्यांनी नागरिकांना केली. 

            प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोरोनासाठी 100 खाटांची सुविधा असली पाहिजे, असा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. सीपीआरमध्येच करण्याचा निर्णय घेतला आहे. असे सांगून पालकमंत्री पुढे म्हणाले, ज्यांना होम क्वॉरंटाईन सांगितले आहे त्यांनी घरातून बाहेर पडू नये. आजपर्यंत 600 मोटर सायकली जप्त करण्यात आल्या आहेत.   गरज नसेल तर कृपा करुन घरातून बाहेर पडू नका, असे आवाहनही त्यांनी केले.
 0 0 0 0  0


No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.