** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Thursday, April 2, 2020

भाजीपाला विक्रीचे विकेंद्रीकरण करावे
किराणा, औषध दुकाने सकाळी 9 ते रात्री 9 चालू ठेवा
- जिल्हाधिकारी दौलत देसाई

       कोल्हापूर,दि. 2 (जि.मा.का) :-  काही नगरपालिकांच्या तसेच ग्रामपंचायतीच्या ठिकाणी तीन-चार दिवस लॉकडाऊन करणं आणि पुन्हा ओपन करणं असं सुरु आहे. यानंतर जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याचीशक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी भाजीपाला विक्रीचे विकेंद्रीकरण करावे तसेच किराणा आणि औषध दुकाने सकाळी 9 ते रात्री 9 सुरु ठेवावीत असे निर्देश जिल्हाधिकारीदौलत देसाई यांनी आज दिले.
        सध्या जिल्ह्यामध्ये सुरु असणाऱ्या संचारबंदीच्या काळात नागरिक स्वत:च स्वयंसेवक झाले आहेत. होम क्वारंटाईनबाबत लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यास मोठी मदत होत आहे. त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो, असे सांगून जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, काही नगरपालिकांच्या तसेच ग्रामपंचायतीच्या ठिकाणी तीन-चार दिवस वेगळा लॉकडाऊन करताना जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी विशेषत: भाजीपाला विक्रेत्यांसाठी विकेंद्रीकरण पध्दतीने नियोजन करावे. सकाळी 9 ते रात्री 9 याकालावधीत जीवनावश्यक वस्तू विशेषत: किराणा दुकाने, औषध दुकाने सुरु ठेवावीत. आवश्यकतेनुसार 24 तास सुरु ठेवण्याची परवानगी दिली तर एकाच दिवशी गर्दी होणार नाही.  नागरिकांनाही त्यांच्या अत्यावश्यक सेवा मिळतील.
           कोल्हापूर महापालिकेच्यावतीनं शहरामध्ये भाजीपाला विक्रीचे विकेंद्रीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा योग्यरितीने होण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील सर्व नगरपालिका तसेच लोकवस्ती जास्त असणाऱ्या ठिकाणी अशा पध्दतीने विकेंद्रीकरण करावे. म्हणजे नागरिकांना लांब जावे लागणार नाही. जवळच्या जवळ वस्तू उपलब्ध होतील आणि गर्दीही टाळता येईल, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
           
0 0 0 0 0 0
           

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.