** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, November 20, 2020

बंदिस्त सभागृहे/ मोकळ्या जागेतील इतर सांस्कृतिक कार्यक्रम मार्गदर्शक तत्वांचे पालन करून सुरू करण्यास परवानगी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे आदेश

 


कोल्हापूर, दि. 20 (जिल्हा माहिती कार्यालय): बंदिस्त सभागृहे/ मोकळ्या जागेत होणाऱ्या इतर सांस्कृतिक कार्यक्रम मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अटीस अधीन राहून सुरू करण्यास आज दि. 20 नोव्हेंबरपासून परवानगी दिली असल्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले आहेत.

बंदिस्त सभागृहे/ मोकळ्या जागेत होणारे इतर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजक यांच्याकडून नमुद मानक कार्यप्रणाली/ मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन केल्या जात असल्याबाबतची तपासणी करण्याचे अधिकार त्या-त्या क्षेत्रातील पोलीस अधिकारी/कर्मचारी व स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात येत आहेत.

यापूर्वी कोव्हिड-19 व्यवस्थापनासाठी विहित केलेले शारिरीक अंतराचे व संसर्ग न पसरण्याबाबत वेळोवेळी देण्यात आलेल्या निर्देशांचे पालन करणे बंधनकारक असेल.

चित्रपट व नाटक वगळता बंदिस्त सभागृह व इतर कार्यक्रमासाठी मार्गदर्शक तत्वे-

 सभागृहात प्रवेश देताना थर्मल टेस्टव्दारे प्रेक्षकांच्या शारिरीक तापमानाची चाचणी घेऊनच प्रवेश देणे ही सभागृह व्यवस्थापनाची / आयोजकांची जबाबदारी असेल. बंदिस्त सभागृहाच्या एकूण बैठक क्षमतेच्या 50 टक्के इतक्या मर्यादेपेक्षा प्रेक्षक संख्या जास्त असू नये. बंदिस्त सभागृहातील व्यासपीठ व प्रेक्षकांमध्ये शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार सामाजिक अंतर राखणे (किमान 6 फुट) आवश्यक राहील. बंदिस्त सभागृहातील सादरकर्त्या कलाकारांनी वेळोवेळी वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक राहील. सभागृहातील सर्व परिसर/ खोल्या/ प्रसाधनगृहे वेळोवेळी स्वच्छ करण्याबाबत सभागृह व्यवस्थापनाने वेळापत्रक आखावे व प्रसाधन गृहांची वेळेवर स्वच्छता केल्याची खातरजमा करावी. तसेच वेळोवेळी निर्जंतुकीकरण करण्यात यावे.

बंदिस्त सभागृहात उपस्थित सर्वांनी मास्क लावणे आवश्यक राहील. सभागृहातील कार्यक्रमाच्यावेळी वापरण्यात येणाऱ्या सर्व उपकरणांचे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे. कार्यक्रमासाठीची सहाय्यक कामे त्या-त्या कामांसाठी नेमून दिलेल्या व्यक्तींनीच करावीत. कार्यक्रमासाठी लागणारी साधन-सामुग्री (संगीत व्यवस्था/ लॅपटॉप/ माईक/ प्रकाश योजना इ.) जी कोण व्यक्ती हाताळणार असतील, त्यांनीच ती वापरावी याबाबत दक्षता घेण्यात यावी. शक्यतो ज्याने-त्याने स्वत:चीच साधनसामुग्री वापरावी. बंदिस्त सभागृहांमध्ये रंगभूषाकाराची आवश्यकता असेल तर त्यांनी पीपीई किट धारण करणे आवश्यक आहे. बंदिस्त सभागृहात प्रवेश करतेवेळी गर्दी होणार नाही याची दक्षता आयोजकांनी घेणे आवश्यक आहे. यास्तव सुरक्षित अंतराबाबतच्या मानकांनुसार प्रवेशव्दारे व समुचित ठिकाणी जमिनीवर खुणा आखण्यात याव्यात.  

 

 

 

कोणत्यही प्रेाक्षकांना कलाकार कक्षात जाण्यास परवानगी नसेल. परिवास्तूच्या प्रवेशाच्या व निर्गमनाच्या मार्गावर तसेच सामाईक क्षेत्रांमध्ये हात स्वच्छ करण्यासाठी प्राधान्याने हाताचा -स्पर्शरहित पध्दतीने घेता येणारे निर्जंतुक द्रव्य उपलब्ध ठेवावे. श्वसन विषयक शिष्टाचाराचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. खोकताना/ शिंकताना प्रत्येकाने स्वत:चे तोंड व नाक टिप कागदाने (टिश्यू पेपर) / हात रूमालाने/ कोपराने पूर्णपणे झाकून घेणे आणि वापरलेल्या टिप कागदाची योग्य प्रकारे व्हिलेवाट लावणे आवश्यक आहे.

सभागृहातील कार्यक्रम संपल्यानंतर सभागृहाचे निर्जंतुकीकरण करण्यात यावे. जनजागृतीचा भाग म्हणून सभागृहाच्या दर्शनी ठिकाणी कोव्हिड-19 च्या संबंधातील प्रतिबंधात्मक उपाययोजनांवरील भित्तीपत्रके / उभे फलक झळकविण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात. सभागृह वातानुकुलित असेल अशा ठिकाणी तापमान 24 ते 30 अंश सेल्सिअस या मर्यादेत असले पाहिजे. खाद्य व पेय पदार्थाच्या क्षेत्रामध्ये शक्य असेल तेथे-तेथे अनेक विक्री केंद्रे उपलब्ध करून देण्यात यावीत. प्रत्येक विक्री केंद्रांवर सुरक्षित अंतर राखण्यासाठी, जमिनीवर चिकट पट्टया (स्टिकर) वापरून एक रांग पध्दतीचा अवलंब करावयाचा आहे. केवळ आवेष्टित खाद्यपदार्थ व पेय पदार्थ यांनाच परवानगी देण्यात येईल. सभागृहाच्या  / प्रेक्षागाराच्या आत खाद्यपदार्थांची व पेय पदार्थांची पोचवणी करण्यास मनाई करण्यात येईल.

आयोजन व कार्यकमासाठी सहाय्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मार्गदर्शक तत्वे-

बंदिस्त सभागृहात काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक राहील. वयाने ज्येष्ठ कर्मचारी, गर्भवती महिला कर्मचारी, ज्यांची रोगप्रतिकारक क्षमता कमी आहे असे कर्मचारी यांना जास्त जनसंपर्क असलेल्या ठिकाणी कामासाठी नेमण्यात येऊ नये व त्यांची अधिकची काळजी घेण्यात यावी. कामाच्या ठिकाणी अधिक सुरक्षिततेचा उपाय म्हणून सर्वांनी आरोग्य सेतू ॲपचा वापर करावा. सर्व कर्मचाऱ्यांनी आपल्या आरोग्याबाबत सजगता दाखवावी व आपल्याला असणारे आजार तात्काळ व्यवस्थापनाच्या निदर्शनास आणावेत.

 बंदिस्त सभागृहाव्यतिरिक्त मोकळ्या जागेत आयोजित होणारे कार्यक्रम-

मोकळ्या जागेतील कार्यक्रमासाठी 6-6 फुटांवर खुणा करून त्यानुसार यथाशक्ती लोक बसण्याची / उभे राहण्याची व्यवस्था करावी. त्यानुसार प्रेक्षक बसतील/ उभे राहतील याची संयोजकांनी दक्षता घ्यावी. सादरीकरण करणाऱ्या कलाकारांपासून प्रेक्षेक कमीत-कमी 6 फूट अंतरावर असावेत. कार्यक्रम/ कला सादर होणाऱ्या ठिकाणी प्रेक्षकांना मास्क घालणे अनिवार्य राहिल. थुंकी उत्पन्न कराणारे पदार्थ जसे की तंबाखूजन्य पदार्थ व पान हे बाळगण्यास मनाई राहील. नशा आणणाऱ्या पदार्थांचे/ द्रव्यांचे सेवन करून कार्यक्रमाच्या ठिकाणी येता येणार नाही. थर्मल गन, सॅनिटायझर कार्यक्रमाच्या ठिकाणी असावेत व आयोजकांनी तपासणी करूनच प्रवेश द्यावा.

गर्दी नियंत्रणासाठी सुरक्षा व्यवस्था असावी. मोकळे मैदान, रस्ता, खुले सभागृह इ. ठिकाणी कार्यक्रम होणार असल्यास कार्यक्रम पाहण्यासाठी यथाशक्ती उभे राहणे अथवा बसणे याकरिता मार्किंग करावे. ज्या ठिकाणी अनियंत्रित गर्दी आहे त्या ठिकाणी ध्वनी प्रदुषण विषयक नियम पाळून ध्वनीक्षेपकावरून सूचना द्याव्यात. अनियंत्रित गर्दी व रस्त्यावरील कार्यक्रमांना स्थानिक प्रशासनाने योग्य ती काळजी घेवून परवानगी द्यावी. कार्यक्रमाच्या ठिकाणी खाद्यपदार्थ / पेये विक्रीस बंदी राहील. कार्यक्रम सादरीकरण करण्यासाठी वापरण्यात येणारे नेपथ्य, प्रकाश व ध्वनी यंत्रणा, मंडप व मंडपाचे साहित्य, सजावट साहित्य यांचे निर्जंतुकीकरण करण्याची जबाबदारी संबंधित व्यक्तींची राहील. माझे कुटूंब माझी जबाबदारीला अनुसरून शक्य असेल तेथे कार्यक्रमाच्या ठिकाणी कोरोना पार्श्वभूमीवर घ्यावयाची काळजी ध्वनीफित तसेच संबंधित फलक लावावेत. उपरोक्त बाबत राज्य शासनाच्या महसूल व वन विभाग (आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन) यांच्याकडून पुनश्च प्रारंभ अभियांतर्गत वेळोवेळी प्रसिध्द करण्यात येणाऱ्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक राहील.

आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहिता 1860 (45) च्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदीप्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल.

000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.