** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, November 6, 2020

6 हजाराची लाच घेताना महावितरणचा अतिरिक्त कार्यकारी अभियंता आबासाहेब मांडके ‘एसीबी’च्या सापळ्यात

 

 

 



 

कोल्हापूर दि. 6 (जिल्हा माहिती कार्यालय) : सौर यंत्रणेचे प्रकरण मंजूर करून देण्यासाठी 6 हजार रूपयाची लाच कार्यालयामध्ये स्वीकारताना उत्तर विभाग महावितरणचा अतिरिक्त कार्यकारी अभियंता आबासाहेब मांडके यास लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले. 

       तक्रारदाराच्या वडीलांचे सौर यंत्रणा विक्री व दुरूस्तीचे दुकान आहे. तक्रारदाराच्या ग्राहकाच्या घरी 10 किलोवॅटची सौर यंत्रणा बसविण्यात येणार आहे. त्यासाठी अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांची मंजुरी आवश्यक आहे. त्यासाठी 5 ऑक्टोबर रोजी ग्राहकाच्या नावने रितसर अर्ज उत्तर उपविभाग, नागाळा पार्क येथील महावितरणच्या कार्यालयात दिला. संबंधित अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. मांडके यांची भेट घेवून सौर यंत्रणेसाठी आवश्यक असलेल्या 10 किलोवॅट वीजेबाबत तक्रारदाराने चर्चा केली. त्यावेळी श्री. मांडके यांनी तक्रारदाराला प्रकरण मंजूर करून देण्यासाठी प्रत्येक 1 किलोवॅट करिता 600 रूपये याप्रमाणे 10 किलोवॅटचे 6 हजार रूपये द्यावे लागतील तरच मी तुमचे काम मंजूर करून देईन, नाहीतर देणार नाही, असे सांगितले. यावर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.

          आज महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कार्यालयामध्ये शासकीय पंच साक्षीदारांच्या समक्ष पडताळणी केली असता पडताळणीमध्ये 6 हजार रूपये लाच श्री. मांडके यांनी मागितल्याचे निष्पन्न झाले. लाचेची रक्कम लागलीच घेवून येण्यास सांगितले.  त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने 6 हजार रूपये लाच स्वीकारतना त्‌यास रंगेहाथ पकडले. आबासाहेब परशराम मांडके,  (वय 52, रा. आयोध्या अपा. एस.टी. कॉलनीजवळ ताराबाई पार्क) याच्याविरूध्द शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

          ही कारवाई पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर पोलीस अधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस उप अधीक्षक अदिनाथ बुधवंत, सहाय्यक फौजदार शाम बुचडे, हवालदार अजय चव्हाण, पो.कॉ. मयुर देसाई, रूपेश माने, संदिप पडवळ व चालक विष्णू गुरव यांच्या पथकाने केले.

          लाचेच्या अथवा अपसंपदेबाबत तक्रारी असल्याच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या हेल्पलाईन टोल फ्री 1064, टोल फ्री क्र. 1800222021 , मो. 9011228333, कार्यालय दूरध्वनी 0231-2540889, व्हॉट्ॲप क्र. 7875333333 वर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक श्री. बुधवंत यांनी केले आहे.

000000

 

 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.