** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, March 12, 2021

सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा व्हीसी किंवा ओएव्हिएमव्दारे घेण्याचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे आदेश


 

 

               कोल्हापूर, दि. 12 (जिल्हा माहिती कार्यालय) : सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा व्हीसी किंवा ओएव्हिएमव्दारे घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिले.
वार्षिक सभा व्हीसी किंवा ओएव्हिएमव्दारे घेण्यासाठी मार्गदर्शक सूचना-
1)    जिल्ह्यात कोरोना विषाणूमुळे उद्भवणाऱ्या संसर्गजन्य आजारामुळे सार्वजनिक आरोग्य विभाग व महसूल व वन विभागाने तसेच जिल्हा प्रशासन व स्थानिक प्राधिकरणाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करून 50 पेक्षा कमी सभासद असलेल्या सर्व सहकारी संस्था त्यांच्या सभासदांच्या प्रत्यक्ष सहभागाव्दारे वार्षिक सर्वसाधारण सभा घेवू शकतील.
2)   50 पेक्षा जास्त सभासद असलेल्या सर्व सहकारी संस्थांनी खालील कार्यप्रणालीचा अवलंब करून व्हीसी अथवा ओएव्हीएमव्दारे वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करावे.
अ) संस्थेच्या प्रत्येक सभासदास वार्षिक सर्वसाधारण सभेचा दिनांक वेळ व ठिकाण याबाबतची माहिती किमान सात दिवस अगोदर एसएसएस/मेल/व्हॉट्स ॲपव्दारे कळविण्याची व्यवस्था करण्यात यावी.
ब) वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटिस संस्थेच्या नोटिस बोर्ड/ संस्थेच्या शाखांची कार्यालये इत्यादी ठिकाणी लावण्यात यावी. 
क) ज्या सभासदांचे ईमेल पत्ता किंवा संपर्कासाठी मोबाईल क्रमांक नसेल अशा सभासदांना बैठकित चर्चेसाठी असणाऱ्या विषयाबाबतची माहिती सात दिवसात पत्राव्दारे पोहोच करण्याची जबाबदारी संबंधित सहकारी संस्थेची राहील.
ड) सर्व सहकारी संस्थांनी त्यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेबाबतच्या माहितीची जाहिरात संस्थेचे कार्यक्षेत्र विचारात घेवून, किमान एक स्थानिक  वर्तमानपत्र/एक जिल्हा वर्तमानपत्र किंवा राज्य दर्जा असलेल्या मराठी किंवा इंग्रजी वर्तमानपत्रात घ्यावी.
1) वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यासाठी व्हीसी किंवा ओएव्हिएम यापैकी कोणत्या माध्यमाव्दारे घेण्यात येणार आहे.
2) सभेचा दिनांक व वेळ
3) ज्या सभासदांनी आपला ईमेल आयडी किंवा मोबाईल क्रमांक याबाबतची माहिती संबंधित सहकारी संस्थेकडे नोंद केली नसेल त्याबाबतची माहिती कोठे सादर करावी याबाबतचा तपशिल नमुद करावा.
इ) सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा या व्हीसी किंवा ओएव्हिएमव्दारे घेण्यासाठी संबंधित सहकारी संस्थेने त्यांच्याकडे उपलब्ध असणाऱ्या तज्ञ व्यक्तीच्या सल्ल्याने अथवा तज्ञ व्यक्ती/ एजन्सीची निवड करून त्यांच्यामार्फत सभेचे कामकाज पार पाडावे. 
ई) सदर एजन्सीची निवड करताना मराठी सॉफ्टवेअर उपलब्ध असणाऱ्या एजन्सीचा प्राधान्याने विचार करावा.
उ) वार्षिक सर्वसाधारण सभेचे अभिलेख प्रचलित तरतूदीनुसार जतन करून ठेवण्याची जबाबदारी संबंधित संस्थेची राहील.
ऊ) वरील मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपणे पालन करून संस्थांनी आपल्या वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्याची कार्यवाही तात्काळ करावी.
       उपरोक्त आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहिता 1860 (45) याच्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदीप्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
000000
 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.