** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, March 5, 2021

..दीदी मला कपडे देते..जेवण देते..मी पकादादाकडे राहणार जिल्हाधिकाऱ्यांच्या चौकशीला मतिमंद मुलाचा प्रतिसाद; पालकत्वाची जबाबदारी चुलत भावाकडे

 






 

कोल्हापूर, दि. 5 (जिल्हा माहिती कार्यालय): ‘तू कुठे राहतो..कुणाकडे राहणार..तुला जेवायला कोण देतं..’ या जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या चौकशीला प्रतिसाद देत ‘..दीदी मला कपडे देते..जेवण देते..मी पकादादाकडे राहणार’ असल्याचे निरागस आणि सहज उत्तर प्रशांत शिवाजीराव पाटील या मतिमंद मुलाने दिले. त्याचा चुलतभाऊ प्रकाश बापूसो पाटील यांना प्रशांतच्या पालकत्वाची जबाबदारी देण्यात आली.

18 वर्षावरील मतिमंद, बहुविकलांग, मेंदूचा पक्षाघात, स्वमग्नता मुलांच्या पालकत्वासाठी राष्ट्रीय न्यास अधिनियम 1999 ची अंमलबजावणी जिल्हास्तरीय समितीची आढावा बैठक आज राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात घेण्यात आली. जिल्हा समाज कल्याण अधिकारी तथा सचिव दीपक घाटे यांनी विषयवाचन केले. करवीर तालुक्यातील वाकरे येथील प्रशांत शिवाजीराव पाटील याच्या पालकत्व प्रमाणपत्रानुसार आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने सुनावणी घेण्यात आली. यावेळी प्रकाश बापूसो पाटील, कृष्णात धोंडीराम पाटील आणि चंद्रकांत पाटील या तिघांचे म्हणणे तसेच प्रत्यक्ष प्रशांत पाटील याचे म्हणणे ऐकण्यात आले. विचारलेल्या सर्व प्रश्नांना तितक्याच सहजतेने आणि निरागसतेने प्रशांतने उत्तर दिले. आपण सायकल आणि स्कूटी चालवत असल्याचेही त्याने सांगितले. शिवाय उपस्थिती नोंदणी वहीवर इतरांबरोबरच त्याने सहीदेखील केली.

घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन केलेल्या निरीक्षणाची माहिती वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्या साधना कांबळे आणि श्री. घाटे यांनी समितीसमोर मांडली. यानंतर प्रशांतचे पालकत्व प्रकाश पाटील यांना देण्याचा निर्णय समितीने घेतला.

प्रशांत पंडीतराव पाटील यांचा भाऊ श्रीकांत पंडीतराव पाटील हा मनोरूग्ण असल्याने राष्ट्रीय न्यास अधिनियम 1999 च्या कायद्यामध्ये मनोरूग्ण या प्रवर्गासाठी पालकत्वाची तरतूद नसल्याने त्यांचे पालकत्व हे न्यायालयामार्फत घेण्यात यावे, अशा सूचना आजच्या बैठकीत देण्यात आल्या.

आजच्या बैठकीत स्वप्निल विकास कदम याचे पालकत्व  काका सुरेश झांबरे, मुनवार नरूला सय्यद याचे पालकत्व भाऊ अर्शद सय्यद, साहील मनसुर गोलंदाज याचे पालकत्व आई शहनाज गोलंदाज आणि उज्वला नारायण निर्मळे हिचे पालकत्व भाऊ संतोष यांच्याकडे देण्यास मंजुरी देण्यात आली.

बैठकीला सदस्य पत्रकार अतुल जोशी, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते उपस्थित होते.

00000

 

 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.