** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, April 3, 2020

क्वारंटाईन व्यक्तींनी बाहेर पडण्याचा हट्ट टाळावा - जिल्हाधिकारी दौलत देसाई



            कोल्हापूर, दि. 3 (जि.मा.का):-  कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी संस्थात्मक क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींनी घरी जाण्याचा  तसेच घरी क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींनी घराबाहेर पडण्याचा कसलाही हट्ट करु नये, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले.  
            जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले, जिल्ह्यात कोरोना संशयितांना संस्थात्मक विलगीकरण केंद्रामध्ये 14 दिवस क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर जिल्ह्याबाहेरुन तसेच बाधित भागातून आलेल्या व्यक्तींना घरी 14 दिवस क्वारंटाईन करण्यात आले आहे. या सर्व व्यक्तींना आपला 14 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करुन आपली स्वत:ची, कुटुंबाची, समाजाची काळजी घ्यावी.  संस्थात्मक केंद्रात क्वारंटाईनमध्ये असलेल्या व्यक्तींनी घरी जाण्यासाठी कोणताही हट्ट धरु नये. त्यांना ज्या ठिकाणी ठेवले आहे, त्या ठिकाणी रहावे.
घरामध्ये क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींनी घरातच स्वतंत्र खोलीमध्ये रहावे. घरी राहताना इतर कुटुंबियांना कोणताही संसर्ग होणार नाही याची खबरदारी घ्यावी. स्वतंत्र खोलीत राहणे शक्य नसल्यास प्रशासनामार्फत सुरु केलेल्या संस्थात्मक विलगीकरण केंद्रात त्यांची सोय केली जाईल.
विलगीकरण केंद्रात सोयी-सुविधांसह "सारेगम कारवाँ
            संस्थात्मक विलगीकरण केंद्रातील व्यक्तींना आवश्यक सोयी सुविधा चांगल्या प्रकारे देण्यात येत असल्याचे स्पष्ट करुन जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले, या विलगीकरण केंद्रातील व्यक्तींना चहा, नाश्ता, जेवण याबरोबच गरम पाणी, शौचालय, स्वच्छता, आरोग्य तपासणी या बाबींना प्राधान्य दिले आहे. संस्थात्मक विलगीकरण केंद्रातील व्यक्तींच्या समुपदेशनासाठी व्यवस्था करण्यात येत असून कुटंबियांनी त्यांचे समुपदेशन करुन 14 दिवस धीर धरण्याचा सल्ला द्यावा. 
            जिल्ह्यातील सर्व विलगीकरण केंद्रामधील लोकांच्या करमणुकीसाठी "सारेगम कारवाँ" याची सोय करण्यात येत आहे.  याच्या माध्यमातून सर्व गाणी ऐकविण्याची व्यवस्था प्रशासनामार्फत होणार आहे. विलगीकरण केंद्रातील व्यक्तींसाठी करमणुकीचे साधन उपलब्ध होणार आहे.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात लागू केलेल्या संचारबंदीची प्रभावी अंमलबजावणी होत आहे. संचारबंदीची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यातील व शहरासतील लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. यापुढेही लोकांनी घरी राहून सुरक्षित रहावे. जेणे करुन स्वत:, कुटुंब, समाज कोरोना संसर्गापासून दूर राहील, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी केले.
00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.