** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Thursday, December 17, 2020

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक सीमावर्ती भागात 4 तपासणी नाके; 2 विशेष दक्षता, 1 जिल्हा भरारी पथक -संध्याराणी देशमुख

 

कोल्हापूर, दि. 17 (जिल्हा माहिती कार्यालय): ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2020-21 भयमुक्त व पारदर्शक वातावरणात पार पडण्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने सीमावर्ती भागात 4 तपासणी नाके उभारण्यात येत आहेत. तसेच दोन विशेष दक्षता पथके, एक जिल्हा भरारी पथक कार्यरत असणार आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अतिरिक्त अधीक्षक संध्याराणी देशमुख यांनी दिली.

इतर राज्यातील बेकायदेशीर मद्याची आयात थांबविण्याकरिता कर्नाटक/ गोवा सीमावर्ती भागांमध्ये 4 तात्पुरते सीमा तपासणी नाके अंबोली फाटा, तिलारी, दाजीपूर व गगनबावडा येथे उभारण्यात येणार आहेत.

मतदारांना प्रलोभन देण्याकरिता दारूचा वापर मोठ्या प्रमाणात केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संपूर्ण निवडणूक कालावधीमध्ये अवैध दारू निर्मिती, विक्री, वाहतूक, आयात, निर्यात, मळी, ताडी याची बेकायदेशीर विक्री होणार नाही याची दक्षता घेण्याकरिता तसेच ढाबे, रिसॉर्ट, हायवे लगतची हॉटेल, खानावळी येथे विभागाच्या परवानगीशिवाय मद्याचे व्यवहार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकरिता 2 विशेष दक्षता पथके व 1 जिल्हा भरारी पथक संपूर्ण जिल्ह्यात कार्यरत राहणार आहे.

आदर्श आचारसंहिता कालावधीमध्ये सर्व मद्यविक्री अनुज्ञप्तींचे कार्यकारी अधिकारी यांच्याकडून दैनंदिन निरीक्षण केले जाणार आहे. जर कोणत्याही अनुज्ञप्तीमधून बेकायदेशीर/ परराज्य निर्मित मद्याचा साठा करून त्याची विक्री करताना तसेच विना वाहतूक पास मद्यसाठा किंवा ठोक विक्रेत्यांकडून मद्य आणून बेकायदेशिररित्या साठा करत असल्याचे आढळून आल्यास संबंधितांविरूध्द तात्काळ मुंबई दारूबंदी कायद्यांतर्गत कारवाई करून गुन्हे नोंद केले जाणार आहेत.

आदर्श आचारसंहिता कालावधीमध्ये सर्व मद्यविक्री अनुज्ञप्तीधारकांना त्यांचे अनुज्ञप्तीकक्ष नियमानुसार विहीत वेळेत सुरू व बंद करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. विहीत वेळेपूर्वी अनुज्ञप्ती सुरू केल्यास किंवा विहीत वेळेनंतर चालू ठेवल्यास संबंधितांविरूध्द तात्काळ मुंबई दारूबंदी कायद्यांतर्गत कारवाई करून गुन्हे नोंद केले जाणार आहेत. सर्व मद्य निर्माणी घटक, ठोक व किरकोळ विक्री ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यात आलेले आहेत.

जिल्ह्यामध्ये कोठेही अवैद्य मद्य निर्मिती, विक्री व वाहतुक होत असल्यास या विभागाच्या 8422001133 हा व्हॉट्सॲप क्रमांक व टोल फ्री क्र. 18008333333 अथवा कोल्हापूर अधीक्षक कार्यालयाच्या दूरध्वनी 0231-2546025 क्रमांकावर नागरिकांनी तक्रार नोंदविण्याचे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत करण्यात येत आहे. तक्रार नोंदविणाऱ्याचे नाव संपूर्णत: गोपनीय ठेवण्यात येईल.

000000

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.