** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Wednesday, May 12, 2021

महाडीबीटी पोर्टलवरील बियाणे घटकासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 


 

कोल्हापूर, दि. 12 (जिल्हा माहिती कार्यालय) : महाडीबीटी पोर्टलवर शेतकरी योजनेंतर्गत बियाणे घटकाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेंतर्गत लाभार्थींना राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान योजनेतील सोया,भात, तूर, मूग, उडीद, मका, बाजरी इ. अनुदानावर बियाणे उपलब्‍ध होणार आहेत. यासाठी शेतकऱ्यांनी 15 मे पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन पुण्याचे कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी केले आहे.

महाडीबीटी पोर्टलचे https://mahadbtmahait.gov.in हे संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावरील शेतकरी योजना हा पर्याय निवडावा. शेतकरी स्वत:च्या मोबाईल, संगणक, लॅपटॉप, टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र, ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्र इ. माध्यमातून वरील संकेतस्थळावर जावून अर्ज करू शकतील. वैयक्तिक लाभार्थी म्हणून नोंदणी करू इच्छिणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना त्यांचा आधार क्रमांक वरील संकेतस्थळावर प्रमाणित करून घ्यावा लागेल. ज्या वापरकर्त्याकडे आधार क्रमांक नसेल त्यांनी प्रथम आधार नोंदणी केंद्राकडे जावून त्याची नोंदणी करावी. हा नोंदणी क्रमांक महा-डीबीटी पोर्टलमध्ये नमूद करून त्यांना योजनांसाठी अर्ज करता येईल. अशा अर्जदारांना अनुदान वितरीत करण्यापूर्वी महाडीबीटी पोर्टलमध्ये त्यांना देण्यात येणारा आधार क्रमांक नोंदणीकृत करून प्रमाणित करून घ्यावा लागेल. त्याशिवाय त्यांना अनुदानाचे वितरण करण्यात येणार नाही.

यासाठी शेतकरी आपल्या जवळच्या सामुहिक सेवा केंद्राची मदत घेवू शकतात. यामध्ये कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास helpdeskdbtfarmer@gmail.com  या ई-मेल वर किंवा 020-25511479 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही कृषी आयुक्तालय कार्यालयाकडून करण्यात येत आहे.

00000

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.